Friday 2 September 2016

दोघा नेत्यांचे दोन प्रश्न उत्तर मात्र एकच !!

जळगाव जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणाच्या उंबरठ्यावर आहे. ज्येष्ठनेते सुरेशदादा जैन यांचा राजकिय विजनवास साडेचारवर्षांपासून सुरू झालेला आहे. तेव्हा त्यांच्या ३५ वर्षांचे राजकारण थबकले होते. आज साडेचार वर्षानंतर सुरेशदादा जामीन मिळवून कारागृहाच्या बाहेर आले आहेत. त्यांच्या समर्थकांनी काल जल्लोष केला. गेल्या साडेचार वर्षांत सुरेशदादा समर्थक प्रश्न विचारत होते की, दादांना जामीन का मिळत नाही ?  

दुसरीकडे ज्येष्ठनेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवसही काल साजरा झाला. खडसे मंत्रीपदी नसतानाही कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा जल्लोष केला. खडसेंच्या ४० वर्षांच्या यशस्वी राजकिय वाटचालीनंतर त्यांचेही राजकारण थबकले आहे. विविध कथित आरोपांच्या फैरीमुळे खडसेंनी मंत्रीपद सोडले असे सांगण्यात येते. खडसेही तसेच बोलतात. मात्र, ते प्रश्न विचारतात की मला कोणत्या गुन्ह्याची ही शिक्षा मिळाली आहे ? त्यांचे कार्यकर्तेही हाच प्रश्न विचारतात.

जैन आणि खडसे यांचे प्रश्न समर्थक व कार्यकर्त्यांना निश्चित अस्वस्थ करतात. प्रथम दर्शनी असे दिसते की, दोघांनी विचारलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. एकावर न्यायालयीन यंत्रणेने तर दुसऱ्यावर पक्षीय राजकारणाने अन्याय केल्याचा निष्कर्ष सहज काढता येतो. भारतीय लोकशाहीच्या दोन आधारस्तंभांनी दोघांचे राजकारण थिजवले आहे. पण, खरेच हा दोष न्यायालयीन किंवा राजकिय व्यवस्थेला देवून प्रश्नांचे खरे उत्तर मिळेल ?

सुरेशदादांच्या जामीनावर जल्लोष करणारे हे विसरले आहेत की, जैन निर्दोष सुटलेले नाहीत. त्यांच्यावर मनपाच्या निधीचा संगनमताने गैरवापर केल्याचा ठपका आहे. पोलांसानी सबळ पुरावे दिले म्हणून सुरेशदादांना कारागृहात जावे लागले. त्यांचा मुक्काम कारागृहात का राहिला तर न्याय व्यवस्थेच्या भाषेत ज्या गोष्टी मग्रुरी अथवा मुजोरीच्या ठरु शकतात त्या सुरेशदादा यांनी व त्यांच्या समर्थकांनी केल्या. त्याची तीन ठळक उदाहरणे म्हणजे, मनीष जैन यांच्यासारख्या अपरिपक्व युवा राजकारणी (तेव्हाचे त्यांचे वय पाहून) नेत्यांने काढलेला मोर्चा, गजानन मालपुरे यांनी जिल्हा रुग्णालयात घातलेला गोंधळ आणि स्वतः सुरेशदादांनी तपासी अधिकाऱ्यास न्यायालय परिसरात धमकावणे. याशिवाय, सुरेशदादांच्या उथळ, उताविळ समर्थकांचे वर्तनही कारणीभूत आहेच. आताही जैनांच्या जामीनावर जल्लोष करणारी मंडळी समाजाला काय मेसेज देत आहेत ? गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून एक समाज मूकमोर्चा काढतो तर दुसरीकडे संशयित आरोपीस जामीन मिळला तर काही लाभार्थी फटाके फोडतात. माणसांच्या विचारांचे, कृतीचे अधःपतन म्हणतात ते हेच.

खडसेंच्या संदर्भातही काही विषय असेच आहेत. मंत्री असलेल्या खडसेंवर अनेक आरोप झाले. त्यातील काही कथित, बोगस होते व आहेत. परंतु भोसरी येथील एमआयडीसीच्या क्षेत्रातील प्लॉट खरेदीचा विषय खडसेंसाठी अडचणीचा ठरला आहे. त्याचीच चौकशी करणे शक्य व्हावे म्हणून खडसेंनी मंत्री पदाचा राजीनामा दिला असे तेच वारंवार सांगत आहेत. मग हे खरे असताना, मला स्वकियांनी अडचणीत आणले असे खडसे कसे काय म्हणू शकतात ? याला जोडून वारंवार खडसे असेही म्हणतात की, मी कॅप्टन व्हायला हवे होते. खरे आहे. खडसे मुख्यमंत्री व्हायला हवे होते. ते झाले नाहीत. पक्षाध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कौल देवेंद्र फडणवीस यांच्या बाजुने गेल्यानंतर खडसेंना गप्प बसण्याशिवाय काय पर्याय होता ? मात्र, पक्षाने १२ खात्यांचे मंत्रीपदही खडसेंकडेच दिले होते. म्हणजेच पक्षाचा त्यांच्यावर विश्वासही होता. जळगाव जिल्ह्यात भाजपचे निर्णय खडसेच घेत होते. खडसेंच्या बोलावण्यावर दोनवेळा फडणवीस जिल्ह्यात धावत आले. हा सारा इतिहास लक्षात घेतला तर मग खडसेंना अडचणीत स्वकियांनी आणले असा आरोप करणे योग्य ठरते की आरोपांची परिस्थिती स्वतः खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी निर्माण केली  ? असे म्हणणे योग्य ठरते. आताही खडसेंची वक्तव्ये पक्षातील विशिष्ट नेत्यांना त्यांच्या जातीपातीस टार्गेट करणारी आहेत. खडसेंचे शत्रू फडणवीसच असे चित्र आज भाजप अंतर्गत निर्माण झाले आहे.

जैन व खडसे यांचे राजकारण नव्या वळणारवर आहे. जैन यांना थांबून, पाहून निर्णय घ्यावा लागेल. जैन अद्याप घरकुलच्या आरोपातून मुक्त झालेले नाहीत. ते मुक्त होवू शकतात किंवा त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. चौकशीची इतरही प्रकरणे वाढून ठेवलेली आहे. त्यांच्या समर्थकांनी विनाकारण कटूता वाढवणारी भाषा वापरली तर या प्रकरणांना हवा देण्याचे काम दुसऱ्या बाजुने होवू शकते. खडसे यांचा निर्णय तीन महिन्यांनी होणार आहे. माजी न्यायाधिशांनी चौकशी सुरू केली आहे. त्याची प्रतिक्षा करण्याचा संयम खडसे व समर्थकांना बाळगावा लागेल. काही काळ शांत राहा, असे पक्षातील नेते सांगत आहेत, असे स्वतः खडसे सांगतात. मात्र, स्वपक्षींयावर आरोप करताना त्यांच्या विधानांची धार तेज होतेच. जैन, खडसे यांच्या प्रश्नांची उत्तरे हे त्यांना व्यक्तिगत व त्यांच्या काही समर्थकांना निश्चितच माहित आहे. काळाने दोघांना एकाच वळणावर उभे केले आहे. तेथून दोघे वेगळी दिशा घेवू शकतात किंवा हातात हात घालून सोबत चालू शकतात.


साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे यांनी एकत्र येवून खान्देश विकास मंच स्थापन केला होता. या मंचच्या प्रचारासाठी मी सकाळ दैनिकाचा सहयोगी संपादक म्हणून खास अभियान चालवले होते. तेव्हा सुरेशदादांचे व सकाळची मालकी असलेल्या पवार परिवाराचे संबंध ताणलेले होते. तरीही मी जिल्हा विकास या हेतूने जैन, खडसेंची युतीची भलावण केली होती. दोघांच्या उपस्थितीत सकाळच्या सभागृहात चर्चा घडवून आणली होती. जैन व खडसे एकत्रितपणे काय करू शकतात याविषयी लोकांच्या अपेक्षांचा अहवालही आम्ही दिला होता. हा कार्यक्रम संपल्यावर सुरेशदादा व खडसे यांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली होती. हा प्रसंग मी अनुभवलेला असल्यामुळे दोघांनी नव्या वळणावरुन सोबत जावे असा आग्रह करण्याचा अधिकार मला नक्कीच आहे.

No comments:

Post a Comment