Monday 8 August 2016

जगायचंय मुक्तपणे ... !!!

मागील महिन्याचा प्रसंग. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्याचे लक्षात आले. मित्राने पकडून आरटीओ अॉफिसला नेले. लायसन्स रिन्युअल केले. ते अवघ्या १३ महिन्यांच्या मुदतीचे होते. तेथील अधिकाऱ्यांना विचारले, "रिन्युअल ५ वर्षांसाठी होते ना ?" ते म्हणाले, "वयाची पन्नाशी पूर्ण होत असेल तर तेवढ्याच काळासाठी मिळते. त्यानंतर तुम्ही फिजिकली फिटचा दाखला दिल्यानंतर ५ वर्षांसाठी मिळेल. पुढच्या महिन्यात तुम्ही पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहात." त्यांचे ते वाक्य ऐकून मी आनंदून गेलो. आयुष्याचे "अर्धशतक" गाठतोय म्हटल्यावर माझा स्वतःविषयीचा दृष्टीकोन तेथेच बदलला.

वयाची पन्नाशी. क्रिकेटमध्ये ५० धावांचे महत्त्व फलंदाजाला असते. तसे ते मानवी आयुष्यातही आहे. मानवाच्या पुर्वीच्या सरासरी आयुर्मानाची तुलना केली तर तेव्हा वय सरासरी ५० ते ६० असे, अर्ध्या गोवरा-या मसणात गेल्या असे लोक म्हणत. नंतरच्या काळात विज्ञान व तंत्रामुळे माणसाचे आयुष्य वाढले. वय सरासरी ७० च्या पुढे गेले. म्हणजेच पन्नाशीचा उंबरठा उत्तरार्धाचा प्रारंभ. ही जाणिव दुहेरी. पन्नास वर्षे संपली हा निराशादायक विचार. पण जगायला अजून २९,३० वर्षे आहेत की, हा आनंददायी विचार. मी या दुसऱ्या विचाराच्या प्रेमात पडलोय.

सरलेल्या आयुष्याचे गणित मांडताना लक्षात येते, कुटुंबाच्या वर्तुळात वजाबाकीच्या एन्ट्रीच जास्त आहे. कमावले आणि गमावल्याच्या हिशेबात गमावल्याची बाजू थोडी उजवी भासते. सरणारी ५० वर्षे ढोबळ स्वरुपात कशी गेली ? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. पहिली १० वर्षे मोठा नातू, मुलगा म्हणून लाडाची होती. नंतरची १० वर्षे शिक्षणाची होती. नंतरची १० वर्षे नोकरीत निभावणे व स्थिरावण्याची होती. त्यानंतरची १० वर्षे दाम्पती जीवनाची आहेत. सरणा-या दशकात नोकरीचा सुवर्णकाळ होता आणि अडचणीही. असा हा आयुष्याचा ग्राफ. कधी कालसौख्य लाभल्याचा तर कधी काळाने नाकारल्याचा.

अर्धशतकाच्या उंबरठ्यावर वजाबाकीच्या एन्ट्री जास्त दिसत असल्या तरी आनंद, सुख, समाधानाची आमाऊंटही जास्त आहे. म्हणजे निराशेचे प्रसंग १० आले, ते १० दिवस राहिलेले.  आनंदाचे प्रसंग दोनच आले मात्र, ते २० दिवस अनुभवले. वजाबाकी म्हणायची तर १२ वीत अपयश, नंतर अपरिहार्यतेतून घेतलेले शिक्षण, नोकरीत अस्थिरता बदल्या, तीन वेळा कामात बदल, फारसे सुखात्म, ऐषोआरामाचे आयुष्य नाही, गरजांशी तडजोडी आणि ताणलेले नातेसंबंध. आनंद देणारे प्रसंग मोजके पण जास्त काळ टिकलेले. आई वडीलांचे आजही माथ्यावर हात, मुलगा-बायकोची साथ, नोकरीत सर्वोच्च स्थान, ४० शीच्या शिक्षणात सुवर्णपदक, आज डोक्यावर कोणतेही कर्ज नाही, निरोगी, निर्व्यसनी आयुष्य. सर्वांत मोठा आनंद, जळगाव शहर जिल्ह्यातील मान्यवरांशी जिव्हाळ्याची मैत्री.
असल्याचा.

पन्नाशीचा उंबरठा ओलांडायचा आहे. त्या पलिकडचे आयुष्य ठरवून जगायचे आहे मुक्तपणे. २७ वर्षांच्या नोकरीत ताण तणाव घेवूनच प्रवास झाला. आपल्या आयुष्याला आकार द्यायच्या नादात पाच दशकांचा फेरा झाला. हातही चिखलाचेच माखले.  जगायचा चिखल मात्र होवू दिला नाही. आयुष्याला आकार देणे हीच संकल्पना बंदीस्त करुन टाकते. कधी चाकोरीत तर कधी मर्यादेत. आयुष्य मुक्त जगायचा काळ बहुधा पन्नाशी नंतरचा. काहींसाठी निवृत्तीनंतरचा. जबाबदारींची बंधने मोकळी होतात किंवा त्यातून सुटका होत जाते. बंधन की सुटका ही मनोवृत्ती असते, मानले तर बंधन नाही तर मुक्तीच. तसे होत नाही, जबाबदारीचा दबाव किंवा जोखड मनाला मुक्त होवू देत नाही. आता मात्र ठरवले आहे. मुक्तपणे, स्वच्छंदी जगायचे आणि विचारांनीही नैसर्गिक राहायचे.

इतर लोक आयुष्याला पारदर्शक हा कचकड्याचा शब्द वापरतात. पारदर्शकता हा भंपक शब्द आहे, कारण ती सुध्दा दाखवली तेवढीच असते. म्हणून मी ठरवले आहे, आयुष्य नैसर्गिक असावे. नियतीने दिले तसे. डोळ्यांतून आसवे येणार असतील ना तर येवू देत. दुःखाची असतील तर खारट आणि आनंदाची असतील तर अमृतासम. नाहीतर अमृत कोणी चाखले आहे का ? अश्रु आणि घामाच्या चवीशीच साधर्म्य दाखवणारी अमृताची चव असावी. म्हणूनच या पुढचा संकल्प ...आता जगायचे तर मुक्तपणे ...!!!

फत्तर के घाव बहुत मिले
औरोंपे कुछ हमनेभी उछाले ...
दुसरोंको मरहम लगाता हूँ
मुँहसे मेरे आह नही निकलती ...
.

15 comments:

  1. खुप छान लिहिलय,वास्तव।

    ReplyDelete
  2. खुप छान लिहिलय,वास्तव।

    ReplyDelete
  3. Very nice and heart touching narration. graet keep going " warrior " my wishes with you

    ReplyDelete
  4. Very touchy narrations,well done. Wish you happy birthday today

    ReplyDelete
  5. Very touchy narrations,well done. Wish you happy birthday today

    ReplyDelete
  6. पन्नास वर्षांचे थोडक्यात पण सुंदर विश्लेषण !
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  7. excellent expression! Belated Happy Birthday Sir!

    ReplyDelete