Saturday 27 August 2016

मराठा क्रांती मोर्चाला विरोधाचे अवलक्षण कशाला ??

कोपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे एकत्रिकरण होवून मूकमोर्चाच्या रुपात निषेधाचे हत्यार उपसण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदा शिस्तबध्द मूकमोर्चा निघाला. त्याचे वैशिष्ट्य होते की, तो मोर्चा प्रस्थापित पुढारी किंवा संघटनांच्या शिलेदारांनी आयोजित केलेला नव्हता. समाजातील काही संवेदनशिल युवकांनी एकत्र येवून मूकमोर्चाचा नवा पॅटर्न तयार केला. सर्वांत पुढे लेकीबाळी, माता भगिनी, त्या पाठोपाठ युवक, नंतर समाजातील प्रतिष्ठित बुजूर्ग आणि शेवटी प्रस्थापित पुढारी, संघटना आदींचे नेते. असा हा लाखोंचा मोर्चा जेव्हा शांतपणे निघाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.


योगायोग कसे असतात पाहा, कोपर्डीत संशयित आरोपी ज्या घटकातील आहे त्याच घटकाशी संबंधीत एक अंत्ययात्रा मोर्चाला आडवी आली. आयोजकांनी काय केले ? झुंडशाही नाही केली. मोर्चा थांबवून अंत्ययात्रेला मार्ग करून दिला. अंत्ययात्रा गेली आणि मोर्चा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. हा आहे औरंगाबाद मूकमोर्चाचा पॅटर्न. ज्या समाजात छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, आई जिजाऊ यांच्या नावाने विविध संघटना चालतात, त्यांच्या जयजकारातून युवक काहीही करायला तयार होतात, तो समाज आता सार्वत्रिक व सामुहिक सामंजस्य दाखवून बदलतो आहे याचे हे प्रतिक आहे. औरंगाबाद नंतर पुणे, उस्मानाबाद वगैरे ठिकाणीही अशा प्रकारे संयमित मोर्चे निघाले. आता तोच पॅटर्न घेवून जळगावातही मूकमोर्चा उद्या (दि. २८ ऑगस्ट २०१६) निघतो आहे.

जळगाव येथे झालेली मराठा समाजाची पहिली बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठा समाज हा महाराष्ट्रात बहुजन आहे. मराठे राजे होते. सरदार होते. शिलेदार होते. जमिनदार होते. वतनदार होते. गावाचे पाटील होते. छत्रपतींनाहा आपल्या सरदार व इतरांना रयतेचे पालक बना हाच सल्ला दिला होता. तेव्हाही व आजही मराठे सत्ता, प्रतिष्ठा व धनसंपत्ती बाळगून होते. अनेक गावांमध्ये आजही जत्रा, यात्रा, रथ आदी धार्मिक, सांस्कृतिक कार्यात पूजेचा मान सन्मान देशमुख, पाटील, पवार आदी वतनदारांच्या वाड्यांतूनच असतो. आजही राज्याच्या सत्तेत मराठा नेतृत्व बहुसंख्य आहे. याचा दुसरा अर्थ असा की मराठा समाज हा मोठ्या संख्येत (३३%) असल्याने तो लोकसंख्येत मोठ्या भावासारखा आहे. इतर समाजाची लोकसंख्या जशी कमी अधिक तशी त्यांचीही समाजातील भाऊबंदकी व हिस्सेदारी आहे. येथे सांगायचा मुद्दा हाच की, घरातील मोठा भाऊ जर त्याच्या एखाद्या हक्कासाठी भांडत असेल तर इतर समाजाने लहान भावांप्रमाणे किमान गप्प बसायला हवे. भारतीय घटनेने कोणत्याही समाजाला एकत्र यायला आणि आपले विचार मांडायला स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार मराठ समाजाने मूकमोर्चा आयोजनासाठी सुरु केलेले प्रयत्न समर्थनिय आहे. यात वावगे काहीही नाही.

औरंगाबाद येथील मोर्चातील लाखोंची गर्दी
या मोर्चा आयोजनाचा उद्देश कोपर्डी घटनेचा निषेध करणे हा जरी असला तरी मराठा संघटनची सार्वत्रिक ताकद दाखविण्याचाही हेतू त्यामागे आहे. अशा प्रकारची ताकद ही आता डोक्यांच्या संख्येतून दाखविणे ही काळाची गरज झाली आहे. कारण सरकारमधील नेते आणि प्रशासनातील बाबू हे अशाच गर्दीच्या साम, दाम, दंड, भेद या नितीला घाबरतात आणि याच गर्दीच्या मतांचा विचार राजकीय पक्ष, नेतेही करतात. मूकमोर्चा निमित्त समाजाचे संघटन किंवा संख्यात्मक डोकी दाखविण्याचा हा प्रकार घटनात्मकच आहे. आज मराठा समाज असे करीत आहे, उद्या इतर समाजांनाही आपापले प्रश्न मांडण्यासाठी याच पॅटर्नचे आंदोलनात्मक हत्यार उपसता येणार आहे. आज मराठ्यांच्या एकत्रिकरणाचे जसे कोणाला गैर वाटायला नको तसे ते इतरांच्या एकत्रिकरण व संघटनाबाबतही नंतर कोणाला गैर वाटणार नाही.

कोपर्डीच्या घटनेने मराठा समाजाला एकत्रिकरणाचा मार्ग दाखवला. कन्येवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा सर्वांना एकत्र घेवून आला. अशा प्रकारची दुर्दैवी आपत्ती ही कोणत्याही समाजाच्या बालिका, मुलींवर येवू शकते. आपत्तीखोर समाजकंटकही कोणत्याही समाजाचे असू शकतात. म्हणूनच अशा प्रकारचे आंदोलन करीत सरकार व तपास यंत्रणांवर धाक निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य म्हणावा.

मराठा समाज आज या निमित्ताने एकत्र येण्यामागे अजून एक अदृश्य कारण आहे. ते म्हणजे मराठा बहुजनांच्या मतांवर समाजातील अनेक पुढाऱ्यांनी सत्ता व मत्ता मिळविली. त्यातुलनेत समाजाचे प्रश्न काही सोडविले नाही. अशा विचारांचा असंतोष मराठा युवकात आहे. त्यात दुखरी बाजून म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे भीजते घोंगडे. मराठा समाजासाठी घटनेच्या तरतुदीपेक्षा जास्त आरक्षण देण्याचे धोरण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सत्तेतून पाय उतार होताना अवलंबिले. त्यांनाही माहित होते की हा विषय कोर्ट कज्जात अडकणार. नंतर तेच झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात विषय खोळंबला आहे. मराठा समाजाला आरक्षण देवू नका असे इतर कोणताही समाज सांगत नाही. कारण, आता प्रत्येकाला आरक्षणात हिस्सेदारी हवी. गोंधळ आहे तो येथे. ओबीसी म्हणून सर्व १८ पगड जाती जमाती, आदिवासींशी संबंधित अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात आहेतच. आता मराठा समाजासह मुस्लिमही आरक्षण मागत आहे. यावर न्यायालये, कायदे मंडळ व लोकप्रतिनिधी सभा काय घ्यायचा तो निर्णय घेतील. त्यालाही विरोधाचे कारण नाही. प्रश्न एवढाच असेल की मग खुल्या प्रवर्गातील घटक राहतात कोण ? हेही एकदा निश्चित करु टाका.

मराठा समाजाच्या मूकमोर्चा संदर्भात अपवादात्मक व्यक्तिंनी विरोधाचा सूर लावला. त्यांना अचानक कोपर्डीची आपत्तीग्रस्त कन्या सर्वसमाज घटकांची प्रतिनिधी वाटली. हाही मुद्दा खराच आहे. आपदग्रस्त व्यक्ति कोणत्याही एका समाजाची, जातीची नसते तर ती समाजाची घटक असते. तसेच आरोपीही एका समाजाचा नसतो तर तो प्रवृत्तीने गुन्हेगारच असतो. मुद्दा हाच आहे की मराठा समाजाचा मूकमोर्चा निघेपर्यंत इतर समाजाची मंडळी गप्प का होती ? आता लाखोंच्या गर्दीत घुसण्याचा प्रयत्न ही मंडळी कशाला करते आहे ? तेथे नेतृत्व थोडेच करायचे आहे. मूकमोर्चा जर मराठा समाजाने मराठा समाजासाठी आयोजित केला आहे तर त्याला विरोधाचे अवलक्षण करणारे महाभाग गप्प का बसत नाहीत ?

कोणत्याही समाजाच्या पुढाऱ्यांवर राजकीय बालंट, गैरव्यवहाराचे लफडे आले की समाजाच्या नावाने आदळ आपट करणारी मंडळी आज मराठा संघटनला विरोध दर्शवित आहेत. थोडे स्पष्ट बोलायचे तर जेव्हा गैरमार्गाने अपसंपदा गोळा केल्याच्या आरोपात छगन भुजबळ कारागृहात गेले तेव्हा समता परिषदेच्या नावाने नाशिक परिसरात कोण, काय करीत होते ? अलिकडचे उदाहरण. एकनाथराव खडसे यांनी कथित आरोपांच्या फैरीमुळे स्वतः मंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यावेळी जळगावमधील कोणता समाज निषेधाचे पत्रक काढत होता ? खडसे विरुद्ध आमदार गुलाबाराव पाटील यांच्या पाठिमागे उभे राहण्यासाठी आणि खडसेंच्या समर्थनासाठी कोणते समाज फत्रकबाजी करीत होते ? मनोहर जोशी किंवा आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या किंवा होणाऱ्या आरोपांसाठी अशी पत्रकबाजी केल्याचे एखादे उदाहरण आहे का ? असेल तर कृपया सांगावे.

मराठा समाजाच्या दि. २९ च्या मूकमोर्चाला कोणीही विरोध करण्याचे कारण नाही. उलट या निमित्त मराठा समाजाने खरेच एकत्र यावे. समाजात उच्च, कनिष्ट, कुणबी, ९६ कुळी अशा ज्या काही भिंती आहेत त्या मोडाव्यात. समाजाचे संघटन विधायक व दूरदृष्टीचा विचार करणाऱ्यांच्या ताब्यात द्यावे. राजकीय लाभाचे गणित मांडू पाहणाऱ्यांचे काय करावे ? याचाही वेळीच निर्णय घ्यावा. कारण, गर्दीचा लाभ कोण, कसा घेईल हे सांगता येत नाही. मराठा समाजाच्या या मूकमोर्चाचा पॅटर्न महाराष्ट्रातील झुंडशाहीला विधायक दिशा दाखवणारा आहे. ती झुंडशाही कोणत्याही समाजाची असू शकते. मूक राहून संघटन होते, मूक राहून संख्याबळ दाखवता येते ही शिकवण व त्याचा आदर्श हा मोर्चा घालून देतो आहे. अशावेळी बोलघेवड्यांच्या थयथयाटाकडे दुर्लक्ष  करणे यातच शहाणपणा आहे.


व्यक्तिगत पातळीवर मी या मोर्चाला पाठिंबा देतो आणि समर्थनही करतो !!!

No comments:

Post a Comment