Friday 26 August 2016

दृश्य कलेचे शिवधनुष्य – अभिवाचन

जळगावात आज (दि. २७) परिवर्तन अभिवाचन महोत्सव सुरू होतो आहे. अलिकडच्या काळात अभिवाचन या दृश्य कलेचा बऱ्यापैकी प्रचार-प्रसार होतो आहे. प्रसंग, संवाद, अभिनय, नेपथ्य आदींची रंगमंचीय अनुभुती देत मंचिय नाट्य व संवादीक अभिनयाचा सुवर्णमध्य साधणारी दृश्य कला म्हणजेच अभिवाचन होय. कलावंतांसाठी अभिवाचन हे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान आहे.


कोणत्याही साहित्याची निर्मिती लेखक करतो.  वाचक किंवा रसिक त्याचे वाचन व्यक्तिगत पातळीवर करतो. एकांतात वाचन बहुधा नजरेने होते. असे वाचन मेंदूकडून केवळ शब्दांचे अर्थ समजून घेते. त्यात भावभावना नसतात. मात्र, जेव्हा साहित्याचे वाचन इतरांच्या समोर भावभावना तथा अभिनयासह केले जाते तेव्हा त्यात वाचनासह अभिनय असतो. म्हणून त्याला अभिवाचन म्हणायचे. काही तज्ञ अभिवाचन म्हणजे निवेदन प्रधान लेखन, नाटक, कथाकथन या सगळ्यांचे मिश्रण म्हणजे दृश्य कला असे म्हणतात.

जळगाव शहराच्या समृद्ध अशा नाट्य क्षेत्रात आपला नावलौकिक व प्रतिष्ठा निर्माण करून कार्य करणारी परिवर्तन ही संस्था आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन ही संस्था करते. याच संस्थेने जळगावात अभिवाचन महोत्सवाची परंपरा निर्माण केली. यावर्षी वाचन संस्कृती समुद्ध करू या हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे. जळगावात १९८४ पासून काही कलांवत मंडळी अभिवाचनाचे प्रयोग करीत असत. चाळीसगाव येथेही डॉ. करंबळेकर यांनी अभिवाचनाचे उपक्रम सुरू केले आहेत.

या महोत्सवात सुप्रसिद्ध लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्य, कथा, कविता, कादंबरी, ललित लेख यांचा वाचनातून परिचय करुन दिला जाणार आहे. नव्या पिढीची पुस्तकांशी मैत्री व्हावी, त्यांच्यात वाचन संस्कार रुजावा यावर भर देण्याचा प्रयत्न महोत्सवातून केला जातोय.

हा महोत्सव ७ दिवस चालणार आहे. त्याचा प्रारंभ आज (दि. २७) सायंकाळी ७ वाजता रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावर आधारित चित्तो जेथा भयशून्य च्या अभिवाचनाने होणार आहे. मूळ बंगाली, इंग्रजी व मराठी अशा तीनही भाषेत प्रथमच रवींद्रनाथाचे साहित्य अभिवाचनाद्वारे रसिकांच्या समोर येणार आहे. शहरातील इतरही ठिकाणी, महाविद्यालयातही अभिवाचनचे सादरीकरण केले जाणार आहे. मोठ्यांसोबत लहानग्यानचेही अभिवाचन होणार आहे. काशिनाथ पलोड शाळा व अनुभूती दोन शाळांमधील विद्यार्थी सहभागी होतील. अभिवाचन, व्याख्यान, परिसंवाद अशा प्रकारे सादरीकरण होईल.

अभिवाचनाच्या विविध प्रयोग व प्रकल्पांविषयी असे म्हणतात की, ऐरोली (नवी मुंबई) येथील किशोर पेंढरकर यांना अभिवाचन हे नवे माध्यमम्हणून गवसले. त्यांनी ते स्वतंत्र माध्यम म्हणून प्रयोगात आणले. त्यांनी तसा सिद्धांत मांडला व तो विकसित केला. अभिवाचनासाठी लेखकाने जसे साहित्य लिहीले आहे तसे वाचन करण्याऐवजी नव्याने संहिता लिहिण्याची गरज किशोर पेंढरकर यांनी सर्वप्रथम ठामपणे मांडली. त्यांनी संहितेचे सादरीकरण आणि कालावधी याचा विचार केला. नाटक बसवताना संहितेचा, भूमिकेचा जेवढा विचार करावा लागतो, त्याचा सराव करावा लागतो तेवढाच विचार, सराव अभिवाचनातही करावा लागतो. तरच सादरीकरण उत्तम होऊ शकते, हे त्यांनी विविध प्रयोगातून दाखवून दिले.

केवळ सामान्य वाचनातून लेखकाला अपेक्षित अर्थ कळतो पण त्यात भावार्थ, संवेदना नसते हे सष्ट करून त्यांनी साहित्यातील प्रसंग, घटना, व्यक्तिमत्त्व जिवंत करून प्रेक्षकांसमोर साकार करण्यासाठी संवाद उच्चारणासाठी काही प्रमाणात नेपथ्याचाही विचार केला. अतिशय स्पष्ट उच्चारण, आवश्यक ती लय, अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम यांचा योग्य वापर, शब्दांवरील जोर, आवाजातील योग्य ते चढउतार याचे संयोजन संवादात केले. अशा प्रकारे तयार होणारी दृश्य कला ही परिणामकारक अभिवाचन असू शकते हे त्यांनी समजून दिले.

अभिवाचन प्रकार हा कलावंत, रसिकांसाठी नवा प्रवाह किंवा नवे माध्यम आहे. बदलत्या काळात पल्लेदार, संगीत नाटकांचे रुप बदलले. तीन अंकी नाटकाचे दोन अंक झाले. त्यापुढे जाऊन दीर्घांक आले. रसिकांना दीर्घकाळ रंगमंदिरात खिळवून ठेवणे अवघड होत असल्याने हे प्रयोग सुरु झाले आहेत. आता दीर्घांकाच्या पुढचा प्रयोग अभिवाचनाचा आहे. पूर्वी अभिवाचनाचेही प्रयोग मुंबई, पुण्यात होत. जळगावातही होत. पण परिवर्तन या संस्थेमुळे त्यात नियमितता आली आणि ते रसिकांत रुजू लागले. नाट्यानंद देणारा हे वेगळे माध्यम नाट्य क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक काम ठरु लागले आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील होतकरु कलावंत आणि रसिकांनी आता सात दिवस (दि. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) दरम्यान मायादेवी नगरातील रोटरी हॉलमध्ये रोज सायंकाळी ७ वाजता उपस्थिती द्यावी.

No comments:

Post a Comment