Friday, 12 August 2016

अनिलभाई कांकरीया म्हणजे बुस्टरभाई ...

कांकरीया परिवार आणि नवजीवनचे नाते पिढीजात आहे. आतापर्यंतच्या ५२ वर्षांच्या प्रवासातील काही आठवणी मोकळेपणाने अनिलभाई झेप या ब्लॉगवरून सांगत आहेत. नवजीवनच्या  गौरवशाली प्रवासाविषयी अनेक बाबी अनेकांना माहित आहेत किंवा पुढेही होतील. पण, अनिलभाई कांकरीया हे उत्तम कौन्सिलर आहेत हे अनेकांना बहुधा माहित नसावे. मी त्याचा अनुभव गेल्या २० – २२ वर्षांत अनेकदा घेतला आहे. म्हणून मी अनिलभाईंना बुस्टरभाई म्हणतो.  



ही आठवण बहुधा २००३ च्या सुमाराची असावी. मी व अनिल जोशी शहरातील व्यापारीपेठेत दैनिकाच्या जाहिरातीसाठी फिरत होतो. संपादक व मॅनेजर एकत्र फिरतात अशी आमची एकमेव जोडी होती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची सूचना एकाचवेळी दोघांना समजत असे. आजकाल अशी जोडी दिसत नाही, असे इतर लोक बोलतात. असो, विषयांतर नको. तेव्हा उन्हाळा जोरात  होता. धंदे-पाणी मंदावलेले होते. अशावेळी इतर सर्वच दैनिकातून बाजारात मंदीच्या बातम्या सुरू होत्या. अनिलभाईंनी त्याच बातम्या समोर ठेवून म्हटले, मीस्टर एडीटर, मॅनेजर तुम्ही छापतात मंदी आहे मग जाहिराती मागतात कशा ? आम्ही दोघे निरुत्तर होतो. अनिलभाई म्हणाले, बाजारात ग्राहक येईल अशा बातम्या द्या. तुम्हाला आपोआप जाहिराती मिळतील.

त्यानंतर दोन महिने गेले. श्रावणचा प्रारंभ झाला. धंदे मंदच होते. पण, श्रावण आला की उत्सवांना प्रारंभ होतो. त्यामुळे जळगावातील काही व्यापारी व दुकानदार यांनी एकत्र येवून बिझिनेस फेस्टीवल सुरू केला. म्हणजे, दुकानाबाहेर कमानी वगैरे लावून ग्राकांना आकर्षून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी सामुहिक सवलतींचा योजनाही सुरू झाली. जळगावच्या बाजारात हा पहिला प्रयोग होता. तेव्हा आम्ही या प्रयत्नाची बातमी दैनिकात पहिल्या पानावर फ्लायर करून छापली. इतर दैनिकांनी त्यांच्या सवयीने छापली. व्हायचा तो परिणाम झाला. त्या फेस्टीवलच्या जाहिराती केवळ आम्हाला मिळाल्या. अनिलभाई असा प्रकारे मला बुस्टर ठरले होते. मी आजही मंदीची बातमी देताना १० वेळा विचार करतो.

दुसरा किस्सा अनिलभाईंच्या भाच्याचा. तो धुळ्यात असतो. मध्यंतरी एका मल्टीनॅशनल कंपनीत पुण्यात नोकरी करीत होता. त्याला चांगले पॅकेज होते. मात्र, भाच्याला वाटले आपण स्वतः व्यवसाय सुरू करावा. त्याने नोकरी सोडली आणि घरी आला. त्याच्या आईने आणि अनिलभाईंच्या बहिणीने फोन केला. तू धुळ्याला ये आणि भाच्याला समजव. अनिलभाई गेले. भाच्याशी बोलले. त्याने व्यावहारिक गणित मांडले. आताच्या पगारापेक्षा मी स्वतःच्या व्यवसायात जास्त कमावू शकतो हे अनिलभाईंना पटवून दिले. मग, त्यानंतर अनिलभाईंनी बुस्टर डोस बहिणीला दिला. म्हणाले, तो कमाई करण्याचे स्वप्न बघतोय. त्याला काम करू द्या. तो यशस्वी होईल. नंतर झाले तसेच. आज भाच्याची कंपनी जोरात आहे.

तिसरा किस्सा माझा स्वतःचा. साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी मी स्वतः नोकरी की स्वतःचे काही सुरू करावे अशा द्विधा मनःस्थितीत होतो. अनिलभाई म्हणाले, तिवारीजी आता स्वतःचे झाड लावून त्याला पाणी घाला. नंतर अनिलभाई आणि इतर मित्रांशी चर्चा केली. नवी संकल्पना घेवून सोशल मीडियात काम सुरू केले. असे काम की अजून कोणी केले नाही आणि भविष्यात तसे कोणी करूही शकणार नाही. अवघ्या सहा महिन्यात जळगावमधील २० कार्पोरेट व मान्यवर व्यक्तींचे काम सुरू झाले. अगदी वेगळे आणि आनंददायी काम. आता मी सोशल मीडियीत मोकळेपणाने लिहू शकतो, तो त्याचा परिणाम आहे. मला माझ्याच सेवेमुळे विश्वास मिळाला व आर्थिक स्थैर्यही मिळाले. हा बुस्टरडोस अनिलभाईंचाच होता..


नवजीवनच्या प्रवासाला आता ५२ वर्षे पूर्ण झाली. त्यात कांकरीया परिवाराची एकजूट आणि काही कौटुंनिष्ठा व शिस्त याची भक्कम चौकट हेही कारण आहे. अनिलभाईंचा नवजीनव परिवार पाहून इतरांनी नक्की काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नवजीवनच्या प्रवासाला भरपूर शुभेच्छा ...!!!

No comments:

Post a Comment