आचार्य अत्रे |
वृत्तपत्रे आणि राजकारण यांचे नाते नेहमी आवळे-जावळे असते. ते कधी एकमेकांवर रुसणारे तर कधी कवटाळणारे असते. वृत्तपत्रे राजकारण वाढवते तसे संपवते. वृत्तपत्राने महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे राजकारण संपविल्याचा जुना इतिहास आहे. तेव्हा मीडिया ट्रायल हा शब्द नव्हता पण वृत्तांकन मीडिया ट्रायलचेच होते.
सुधाकरराव नाईक (मुंबई १९९३ बॉम्बस्फोट व दंगली), मनोहर जोशी (जोग जागा प्रकरण), विलासराव देशमुख (रामगोपाल वर्माचा सरकारी दौऱ्यात सहभाग व चित्रपट प्रिमियर), अशोक चव्हाण (आदर्श घोटाळा) आदींना बसला आहे. मात्र त्याचा प्रारंभ आचार्य अत्रेंनी केला असे दिसते.
मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात आचार्य अत्रे म्हणजे आद्य गुरु. मराठा वृत्तपत्र म्हणजे त्यांचे शाब्दीक हत्यार. याचा वापर अत्रेंनी भल्याभल्यांना वठणीवर आणण्यासाठी केला. मात्र मीडिया ट्रायलजा कटू इतिहासही आचार्य अत्रेंच्या मराठा विषयी लिहीला गेला आहे. याचे संदर्भ ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या लेखात आढळतात.
![]() |
मारोतराव कन्नमवार |
वृत्तपत्रांनी नेत्यांच्या घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. महाराष्ट्रात असा अन्याय आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' या दैनिकाने अनेकांवर केला आहे. ह. रा. महाजनी यांच्यापासून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापर्यंत आणि यशवंतरावांपासून पुढे देशाच्या पंतप्रधानपदावर पोहोचलेल्या मोरारजीभाईंपर्यंत अनेकांच्या प्रतिमा अतिशय विकृत स्वरूपात मराठी मानसावर आचार्यांनी त्यांच्या समर्थ लेखणी आणि वाणीच्या द्वारे ठसविल्या आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती इ. बरोबरच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील त्यांचा मोठा वाटा कायमचा स्मरणात राहणार असला तरी त्यांची ही कर्तबगारीही विसरता येण्याजोगी नाही. अत्र्यांच्या या कर्तृत्वाचा सर्वात मोठा व निरपराध बळी मारोतराव सांबशीव उपाख्य दादासाहेब कन्नमवार हा आहे.
अत्र्यांनी त्यांची यथेच्छ टवाळी केली. त्यासाठी अग्रलेखांपासून नाटकांपर्यंतचे सारे लेखनप्रकार हाताळले. संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढयाचे एक कर्णधार असलेल्या आचार्यांवर मराठी मानस मोहीत होते आणि त्या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री व नंतर मुख्यमंत्री झालेले कन्नमवार अत्र्यांसह त्यांच्या तमाम चाहत्यांच्या रोषाचे आणि टिंगलटवाळीचे विषय होते. कन्नमवारांचे दुर्दैव हे की त्या अपप्रचाराला आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायला आयुष्याने त्यांना पुरेसा वेळ दिला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकीर्दीला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत नाही तोच त्यांचे निधन झाले आणि मराठी मनावरची त्यांची अत्रेकृत प्रतिमाच कायम राहिली.
दि. २४ ऑक्टोबर ६४ या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी हिऱ्यांच्या स्मगलिंगपासून अनेक गोष्टींना उत्तेजन दिले असा मोठा प्रवाद मुंबईतील टीकाखोर वृत्तपत्रांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात उभा केला होता. कन्नमवारांचे दारिद्रयोत्पन्न व दारिद्रयसंपन्न आयुष्य ठाऊक असणाऱ्या त्यांच्या वैदर्भीय व अन्य चाहत्यांना त्या प्रचारी प्रवादाने तेव्हा कमालीचे व्यथित केले होते. त्यांच्यावर कोणते तरी बालंट येणार किंवा तशाच एखाद्या आरोपावरून त्यांना बदनाम केले जाणार असे वाटू लागले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांचे सहस्त्रावधी चाहते पार कासावीस होऊन गेले.
(सुरेश द्वादशीवार यांचा ब्लॉग)
(अॉपरेशन सिंहासन, नरेंद्र कदम, मटा)
No comments:
Post a Comment