Tuesday, 16 August 2016

संवाद सेतू “शाकम कनेक्ट २०१६”

बाळासाहेब डुबे, मी, मुकुंद ठिगळे, शेख मुख्तार
बहुप्रतिक्षीत शाकम कनेक्ट २०१६ हा संवाद सोहळा दि. १४ ऑगस्टला नेहमीच्या जल्लोषात साजरा झाला. यावर्षीही मी हजेरी लावली. यावेळच्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमपणे करण्यात आले होते. थीमबेस दोन कार्यक्रम झाले. आता हळूहळू शाकम कनेक्टला निश्चित अशी दिशा मिळू लागली आहे. हा चांगला बदल आहे. आयोजकांपैकी बाळू देशपांडे, नरेश लहाने, खत्री, चौरसीया, प्रणिता आदींना धन्यवाद. काहींची नावे घेतलेली नाही. पण, इतरांनीही खुप मेहनत घेतली.  
शाकम कनेक्ट हा आता माजी विद्यार्थ्यांच्या संवादाचा एक सेतू झाला आहे. गेली सहावर्षे तो साजरा होतोय. हे सातवे वर्ष होते. शाकमच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असतो. जुने-नवे मित्र या एका दिवसासाठी एकत्र येतात. आपापल्या प्रगतीविषयी भरभरून बोलतात. शाकमच्या भग्न इमारतीत जावून आठवणींना उजाळा देतात. संपूर्ण दिवस जुन्या विश्वात रमतात.


मी, तुकाराम कर्वे, पेंडसेसर, मुख्तार, डुबे
या वर्षीचा शाकम कनेक्टही नवा आनंद घेवून आला. सकाळी १० ला सर्वांनी एकत्र येवून नोंदणी केली. सौ. प्रणिता देशपांडे यांनी गुलाब पुष्प देत आणि ठेवणीतील हसू ओठांवर आणत स्वागत केले. नोंदणीच्या ठिकाणाहूनच जुन्या आठवणींना प्रारंभ होत होता. गळाभेट घेणारे अनेक जण कॉलेजच्या  भाषेत बोलत होते. शाकम सुरू झाल्यापासूनचे माजी विद्यार्थीही उपस्थित होते.

यावेळी आयोजकांनी स्वयंशिस्त लावलेली होती. खालून तिसऱ्या मजल्यावर जाताना दोन-तीन खुर्च्या नेण्याची सूचना नरेश लहाने देत होते. लहाने हा माणूस कधीही थकत नाही. तीन दिवस सतत वेगवेगळ्या जबाबदारी घेवून तो राबत होता. फ्लेक्स, नोंदणी अर्ज असे तयार करणे सुरू होते. बाळासाहेब डुबे त्याच्या सोबत होता. बाळू देशपांडे फायनल हात फिरवत होते आणि धर्मेश, खत्रीसह इतर मंडळीही जमेल ते काम करीत होते.

शाकम कनेक्टने जुन्या इमारतीच्या आवारातून शाकमच्या नव्या कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण, तेथे भाव, भावनांचा लवलेश काही नव्हता. त्याचे एक कारण हेही असावे की, शाकमची नवी इमारत आजही कला महाविद्यालयाची इमारत वाटत नाही. कारण या इमारतीला चेहरा देण्याचे काम, कल्पकता कोणीही लढविलेली नाही.

कॉलेजचा पडलेला फलक
आठवणींना उजाळा
जुन्या इमारतीची तुलना नव्या इमारतीशी होते. परिसराती तुलना होते. ती यावेळी प्रकर्षाने झाली. याचे कारण, सन १९८० ते १९९० च्या दशकात शाकमच्या जुन्या इमारत व परिसराला जपण्याचे काम तेव्हाचे अधिष्ठाता व प्राध्यापकांनी केले होते. अधिष्ठाता एम. बी. इंगळे आणि एम. टी. चौधरी यांना अनेकांनी शर्ट काढून बनियनवर बाग-कारंजाचे काम करताना पाहिले होते. आताचे अधिष्ठाता शाकम कनेक्टमध्ये सहभागी होतात मात्र, इतर प्राध्यापक मंडळी दिसत नाहीत. शिवाय, शाकम कनेक्टच्या निमित्ताने कलेच्या प्रांतातील अनेक प्रोफेन्शल एकत्र येतात, त्यांच्या अनुभवाचा लाभ करून घेताना ही मंडळी दिसत नाही. असो विषयांतर झाले.

मी, परमारसर, पेंडसेसर
सही करताना मी
सकाळी १० ला प्रा. काटे यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर अल्पोपहारास प्रारंभ झाला. खात खात मित्र-मैत्रिणी भेटत होत्या. गप्पा रंग भरू लागल्या. माजी शिक्षकही आले. त्यात पेंडसेसर, बी. के. परमारसर, एम. टी. चौधरीसर, जमादारसर. करकरे दाम्पत्य, बडगुजरसर आदी उपस्थित झाले. अधिष्ठात गढरीसरही आले होते. जुने विद्यार्थी गटागटाने त्यांना भेटू लागले. जवळच सह्यांचा फलक होता. एकमेकांना आग्रह करीत सह्या करायला भाग पाडले जात होते. वाफाळलेल्या कॉफी, चहासोबत गप्पा उष्णावत होत्या. बाळू देशपांडे आणि इतर मंडळी आग्रह करीत होते.

गप्पा आणि गप्पा
रवी देशमुख जाहिराती दाखवताना
१२ च्या सुमारास पहिले सत्र सुरू झाले. शाकम मास्तरांचा तास ही नवी कल्पना यावेळी होती. उपस्थित माजी शिक्षकांना काहीवेळ आठवणी शेअर करण्याचे सांगण्यात आले. अर्थात, गप्पा थोड्या वेल्हाळ झाल्या पण मजा आली. कॉलेज सोडल्यानंतर पहिल्यांदा बोलत असल्यामुळे शिक्षकांनाही भरभरून बोलावेसे वाटले. जवळपास दोन तास हे सत्र सुरू होते.

ढोकणे, मी, मुख्तार
लिंबाचे झाड
यावर्षी एक नवा प्रयोग केला गेला. माजी विद्यार्थ्यांपैकी तीन जणांनी प्रेझेंटेशन्स सादर केले. त्यातील रवी देशमुख (दिशा ऍड, पुणे) यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आणि प्रकाश देवभानकर (मुंबई) यांनी संगणकीय कलर रचना याविषयी उपयुक्त प्रेझेंटेशन सादर केले. दोन्ही प्रेझेंटेशन उत्तम झाले. 


कार्यक्रमाच्या रचनेविषयी बाळू देशपांडे यांनी भूमिका मांडली. पुढील वर्षांच्या शाकम कनेक्टसाठी नव्या नेतृत्वाला पुढे करण्यात आले. गोविंद यांनी आभार मानले. त्यानंतर रंगला शाकम धमाका. गाणी, नृत्य, संगीत यामुळे रंगत वाढली. मुले, मुली रंगात रंगल्या. अखेर परतीच्या मार्गावर असताना पुन्हा भेटण्याचा संकल्प करीत गृप फोटो काढला गेला.

माझ्यासाठी आनंदी आनंद

परमारसरांशी गप्पा
शाकम कनेक्टला मी माझ्या मित्रांसाठी आलो. वेळातवेळ काढून नव्हे तर एक दिवस अगोदर. मी, बाळासाहेब डुबे, शेख मुख्तार आम्ही रात्रीच भेटलो. खुप गप्पा झाल्या. रात्रीचे जेवण गुलमंडीवरील मेवाडमध्ये केले. तेथील आठवणीही जागवल्या. मेवाडचे संचालन आता तिसऱ्या मालकाकडे आहे. १९८९ मध्ये मेवाडचा डोसा खाणे ही प्रतिष्ठेची बाब होती. आता मेवाड सामान्य हॉटेल झाले आहे. तुकाराम कर्वेही रात्री आला पण भेटू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मुख्तार औरंगपुऱ्यातून पायी कॉलेजकडे निघालो. मध्येच खत्री भेटला. शिव्या देत त्याने गाडीत बसायला लावले. मग, गाडीत गेलो. सीटी पोलीसठाणे, काळागेटमार्गे.

शाकम कनेक्ट रंगत असताना बाळासाहेब व तुकारामने खुप फोटो काढले. तुकारामने ५ लाखांचा कॅमेरा व लेन्स घेतले आहेत. त्याविषयी तो कौतुकाने बोलला. रवी देशमुखनेही त्याच्या क्लायंटच्या जाहिराती दाखविल्या. गिरीश रामटेके व ढोकणे भेटले. ढोकणे जीवघेण्या अपघातातून बचावला आहे. काठी टेकत आला होता. अजुनही शिव्या दिल्याशिवाय बोलू शकत नाही. मी मुख्तार, बाळू आणि तुका महाविद्यालयाच्या जीर्ण इमारतीत जावून आलो. हृदयाला पुन्हा जखमी झाल्या. यावेळी मैत्रितील भांडणाच्या जखमा नाहीत, तर आहेत त्या कॉलेज उध्वस्त झाल्याच्या. मागीलवेळी कॉलेजचा फलक भींतीवर होता. तो आता पडला आहे. खंडहरपेक्षाही बत्तर अवस्था आहे. शाकम कनेक्टला येण्यासाठी या इमारतीशी भावनिक नाते आहे. ते बहुधा काळाच्या पडद्याआड निघाले आहे.

नव्या व जुन्या विद्यार्थ्यांना जोडणारा शाकम कनेक्ट हा संवाद सेतू यापुढे यशस्वी करायचा असेल तर शाकमच्या नव्या इमारतीतील अधिष्ठाता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नाते जोडावे लागेल. भावनिक आणि व्यावसायिक असे दुहेरी. तुम्हाला अनुभवांची शिदोरी द्यायला अनेक प्रोफेश्नल तयार आहेत. प्रश्न एवढाच आहे की, तुमच्याकडे झोळी आहे का ???

3 comments:

  1. अतिशय सुंदर वर्णन.. परंतु काही आठवणी ज्या मनात घर करून बसल्या आहेत त्या व्यक्त करण्याची इच्छा गद्गद असतानाही तशाच दाबून ठेवल्या... इच्छा असतानाही श्रावण महिना असल्याचे, घेणे सोडले, कारणे देत मेवाड हॉटेल मध्ये वेज थालीचा आनंद घेतला. मित्रा असाच दर वर्षी भेटत रहा. "शाकम कनेक्ट २०१६" चे सुंदर रित्या केलेल्या वरणनाचे स्वागत आणि आभार.

    ReplyDelete