Saturday, 6 August 2016

जीवन जगण्याचा संस्कार “गोचरी दया”

संग्रहित छायाचित्र - लेखातील नावांशी संबंध नाही (गोचरी घेताना साध्वी)
हिंदू धर्मात उपनयन संस्कार करताना माते भिक्षांदेही हा संस्कार बालवयात केला जातो. बालवयात केलेला हा संस्कार फारसा गंभीर नसतो. केवळ एक धार्मिक औपचारिकता पूर्ण करायची म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. उपनयन संस्काराची गरजही अलिकडे कमी होत आहे. मुलांनाही बटू म्हणून केस कापण्यात वैषम्य वाटत असल्याने तेही हा संस्कार नाकारायला लागले आहेत. बालवयातला हा संस्कार सोडून देता येतो.

परंतु, जैन धर्मियात साधू, संत, साध्वी आदींच्या  रोजच्या उदरनिर्वाहाची रचनाच रोजच्या शिधा मागणीवर केली आहे. त्याला गोचरी दया म्हणतात. साधू-संत-साध्वी हे स्थानकात निवास करतात. त्या स्थानकाच्या परिसरातील कुटुंबांच्या घरी रोजची गोचरी घेण्यासाठी त्यांना जावे लागते. समाजाची घरे कमी असतील तर इतरांकडे जाता येते. मात्र, ते कुटुंब शुद्ध शाकाहारी असल्याची खात्री हवी. दिवसभरातल्या दोन वेळच्या जेवणासाठी दोन्ही वेळा साधू-संत-साध्वींना परिसरातील लोकांच्या घरी गोचरी मागायला जावे लागते. एका वेळच्या जेवणासाठी जेवढी पुरेशी होईल तेवढीच गोचरी स्वीकारावी लागते. यातही नियम अत्यंत कडक आहेत. पाऊस, कर्फ्यूसारखी स्थिती असेल तर गोचरी दयेसाठी जाता येत नाही. अशा प्रसंगी साधू-संत-साध्वींना काही दिवसांचा उपवास घडतो. असेही नाही की समाजातील मंडळींनी स्वतःहून शिधा आणून दिला आणि ते साधू-संत-साध्वीनां स्वीकारला. 

ज्या घरी गोचरी मागायला जायचे तेथे स्वयंपाक काय झाला आहे त्याचा अंदाज घेतला जातो. घरातील लोकांना एकवेळ जेवायला जेवढे लागेल तेवढे बाजूला काढून साधू-संत-साध्वींसाठी गोचरी स्वीकारली जाते. गोचरी आणायला संबंधिताच्या घरीच जावे लागते. इतरांनी ती साधू-संत-साध्वींना आणून द्यायची नसते. सांयकाळी पुन्हा अशीच स्थिती असते.

संग्रहित छायाचित्र - लेखातील नावांशी संबंध नाही
गोचरी आणायला जाताना आयुष्यभर मुखासमोर पांढरी पट्टी बांधूणे, पांढरे उपरणे व पांढरी लुंगी घालणे असाच पेहराव असतो. अर्थात, तो नेहमीच असतो. धार्मिक स्थान अथवा स्वाध्याय भवन किंवा निवासाच्या क्षमतेनुसार आवश्यक त्या परिसरात गोचरी स्वीकारली जाते.

जैन साधू-संत-स्वाध्वींच्या पाण्याची व्यवस्थाही अत्यंत वेगळ्या पद्धतीची आहे. पाणी सुद्धा गोचरी  प्रमाणेच मागून आणले जाते. त्याला धोवन पाणी म्हणतात. म्हणजे काय तर, आपण घरातील भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवतो. जेव्हा ते सकाळी पुन्हा ते भांडे पाणी भरण्यापूर्वी आपण राखेने धुतो. राखेने भांडे धुतलेले पाणी म्हणजे धोवन पाणीअशा पाण्याचा वापर जैन साधू, संत, साध्वी करतात.

जैन साधू-संत-साध्वीना अत्यंत कठोर नियमांचे पालन करावे लागते. संपूर्ण देशभरात शेकडो किलोमीटर अनवाणी फिरावे लागते. वाहनांचा वापर नसतो. उन्हात, पावसाळ्यात व हिवाळ्यात कोणताही तक्रार न करता रस्त्याच्या कडेने चालावे लागते. अनेकांचा अपघातात मृत्यू होतो. त्यांचे पोषाख सुद्धा पांढऱ्या कपड्यांचाच असतो. मात्र, आपल्या प्रवचानातून इतर समाजातील सर्व लोकरंग जागृत ठेवण्याचे कार्य ही मंडळी करीत असते.

जैन साधू संत-स्वाधी १२ मास चालत असतात. त्यातील चातुर्मास आणि त्यासोबत आलेला अधिकमास जोडून ५ महिने त्यांचा रहिवास धार्मिक स्थान, स्थानक अथवा भवनात असतो. तेथे वीज, पाणी, शौचालये, स्नानगृह याची सोय नसते. शौचासाठी जवळपासच्या जंगलात जावे लागते.

गोचरी दयाचा हा विषय आज एवढ्यासाठीच मांडला आहे की, जळगाव शहरातील जैन समाजातील ५४ ज्येष्ठ पुरुष व ५४ महिला मान्यवरांनी एक दिवस सांधू-संत-साध्वींप्रमाणे गोचरी दया मागून निर्वाह केला. यात उद्योगपती तथा ज्येष्ठ सर्वश्री रतनलाल सी. बाफना, महेंद्र बाफना, महावीर बोथरा, पारस कांररीया, विक्रम मुणोत आदींचा सहभाग होता. त्यांच्या सोबत ७ वर्षीय संजय मुणोत यानेही गोचरी दयात सहभाग घेतला. गोचरी ही साधू-संत-साध्वी नेहमी घेतात. पण गोचरी दयाचा अर्थ असा की, समाजातील सामान्य व्यक्तिने सकाळी ९ वाजेपासून रात्री ८ पर्यंत धार्मिक स्थान किंवा स्थानकात रहिवास करायचा. त्यासाठी साधू-संत-साध्वीप्रमाणे पोषाख धारण करायचा. त्यांच्या प्रमाणेच दिनचर्चा ठेवायची.

संग्रहित छायाचित्र - लेखातील नावांशी संबंध नाही
महिलांची गोचरी दया होती त्यादिवशी पाऊस होता. महिला स्थानकात आल्या मात्र, गोचरी दयेसाठी जावू शकत नव्हत्या. अखेर स्थानकात असलेल्या भोजनगृहातून (त्याला पारंपरिक शब्द चौका म्हणतात) शिधा स्वीकारण्यात आला. यात सौ. नयनताराजी बाफना, सौ. रसिलाजी बरडीया, श्रीमती विजयाजी मलारा (रत्नवंश सिंहीनी), सौ. करुणा विक्रम मुणोत आदी महिला सहभागी झाल्या. सौ. मुणोत यांनी चातुर्मास काळात ९ उपवासही केले आहेत.

जळगाव येथील स्वाध्याय भवनात सध्या प. पू. आचार्य हिराचंदजी महाराज यांचे शिष्य प. पू. इंदुबालाजी म. सा. यांचा चातुर्मास सुरू आहे. तेथे सोम ते गुरूवार रोज सकाळी ७ ते ८ धार्मिक विषयावर प. पू. मुदीतप्रभाजी यांचे प्रवचन असते. शुक्रवारी प्रवचनाच्या विषयावर परीक्षा घेतली जाते. शनिवारी नव्या विषयावर चर्चा होते. रविवारी धार्मिक व सर्वसामान्य विषयावर चर्चा असते.

अशा प्रकारच्या चर्चेतून एके दिवशी प. पू. मुदीतप्रभाजी यांनी आवाहन केले की, जैन साधू-संत-साध्वी ज्याप्रमाणे गोचरी दया मागून आचरण करतात त्यानुसार एक दिवस तुम्हीही करून पाहा. या आवाहनावरून जवळपास १०८ मान्यवर तयार झाले.

रतनलाल बाफनाजींचे धर्मपालन

संपूर्ण देशभरात सोन्या-चांदीचे दागिने निर्माते व विक्रेता तसेच गोल्डमॉलची संकल्पना निर्माण करणारे श्री. रतनलालजी बाफना हे धार्मिक बाबतीत कर्मठ आहेत. त्यांच्यावर मातोश्रींनी धर्म, आचरण व पालनाचा संस्कार केला. आताही ते कट्टरपणे धार्मिक परंपरांचे पालन करतात.

जैन धर्मातील साधू-संत-साध्वीच्या आचरणाचे कठोर नियम आणि वैशिष्ट्ये सर्वसामान्य लोकांना कळावीत याच विधायक हेतून हे लेखन केले आहे. कुबेराप्रमाणे संपत्ती हाती असतानाही, जेव्हा ज्येष्ठ मंडळी गोचरी दयेच्या वाटेवर चालतात तेव्हा धर्म आणि संस्काराच्या अनेक गोष्टी समाजात खोलवर सकारात्मक परिणाम करीत रुजतात. अशा समाजात संस्कार हे न बोलता पिढीजात टीकून राहतात.


(सूचना या लेखात वापरलेली छायाचित्रे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गोचरी – GOCHRI” या शोधात आढळलेली आहेत. लेखातील व्यक्तींच्या नावांशी त्याचा कशाही प्रकारे संबंध नाही. जैन साधू-संत-साध्वी हे फोटो काढणे, माईक लावणे यास मनाई करतात.)

No comments:

Post a Comment