Saturday 9 July 2016

आग बुझानेवाले यहाँ बहुत है ...!!!

सर्व धर्मिय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईद मिलन सोहळा

जळगावचा नवा सामाजिक पॅटर्न

जळगाव शहरात रमजानचे रोजे सुरू असताना व्हाट्स ऍपच्या माध्यमातून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच कावाई करून संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत परप्रांतातील संशयित आरोपींना अटक करून जळगावात आणले. वातावरण तंग असताना मुस्लिम समाजातील काही मंडळींनी युवकांचे माथे भडकावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणे आणि नंतर गोलाणी संकुलात हिंसाचाराचा व दहशतीचा प्रकार घडला.

खरे म्हणजे पोलिस कारवाई करीत असूनही युवकांचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हाती जावून कारागृहात अडकलेल्या ७०-८० मुलांच्या घरचे पवित्र रमजानचे वातावरण खराब झाले. अगदी ईद साजरी करण्याच्या दिवसापर्यंत वातावरण तसेच दुखःद होते. ज्यांनी पोस्ट टाकली ती मंडळी जामीन घेवून बाहेर पडली सुद्धा. मात्र अजिंठा चौफुली किंवा गोलाणीत वादंग करणाऱ्या संशयित मुलांना अद्याप जामीन मिळालेला नाही.

अशा वातावरणात अस्वस्थ समाज मनावर फुंकर घालण्याचा खुप सकारात्मक कार्यक्रम दि. ९ जुलैला जळगाव जिल्हा पत्रकार संघात झाला. युवकांचा सहभाग असलेल्या अमन फाऊंडेशन आणि मणियार बिरादरीने ईद मिलनचा सोहळा आयोजित केला होता. हा कार्यक्रम कोणत्याही नेहमीच्या कार्यक्रमासारखा नव्हता. हा ईद मिलन सोहळा हिंदू, जैन, बौध्द, ख्रिस्ती आणि मुस्लिम धार्मिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्यास जळगावमधील मान्यवर महिला-पुरूष यांच्यासह मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते.

या कार्यकमात फारूक शेख, करीम सालार, रामानंद पोलीस ठाण्याचे पीआय वाडीले, वासंती दिघे, दिलीप तिवारी यांनी विचार मांडले. उपस्थित सर्व धार्मिक प्रतिनिधींनी स्वतःचा धर्म काय म्हणतो आणि इतर धर्मियांशी कसे वागावे हे सांगतो ? यावर मार्गदर्शन केले. हिंदू धर्मिय प्रतिनिधी प्रसाद महाराज, विश्वनाथ जोशी, बौद्ध प्रतिनिधी बी. संघरत्ने, फादर अब्राहम, पारसी प्रतिनिधी दरबारीसाहेब, जैन धर्माचे कपिल बोहरा, रुख्मिणी चौधरी, आमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीआय सुनील कुऱ्हाडे, अशोक भाटीया उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुस्लिम प्रतिनिधींनी मोकळेपणाने भूमिका मांडली. युवक मंडळी दुसरीकडे भरकटत असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाच वापर करताना त्यातील काही जबाबदारी पाळावी असा मुद्दा मांडत डोके बिथरवणाऱ्या मंडळींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. खुदा सारे काही पाहतो, खुदाने दिलेले आयुष्य खूप किमती आहे, खुदा गरीबांना मदत करणाऱ्यांना जन्नत देतो, मृत्यू नंतर खुदाला उत्तर द्यायचे आहे, अशा सकारात्मक बाबी धार्मिक प्रतिनिधींनी मांडल्या.

चर्चेत इतरही मुद्दे आले. मुस्लिम समाजातील महिला रोजा इफ्तार किंवा ईद मिलन कार्यक्रमात सहभागी व्हाव्यात, मुलांवर संस्काराचे काम घरातून आई, बहिणी करतात, त्यामुळे त्यांनाही अशा सोहळ्यात सहभागी करावे अशी सूचना करण्यात आली. प्राध्यापक तथा धार्मिक प्रतिनिधी सोहेल आमीर म्हणाले, सोशल मीडियाने भोगोलिक दृष्ट्या मानवाला जवळ आणले मात्र हृदयाचे विभाजन करून टाकले. शेख इमरान यांनी कुराण पठण केले. अमन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशपाक खान यांनी प्रास्ताविक केले. सय्यद अल्ताफ यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

सर्व धर्मियांच्या उपस्थितीत होणारा हा ईद मिलन सोहळा हा जळगाव पॅटर्न म्हणून राज्यभरात पोहचवावा असे आवाहन यावेळी सर्वांनी केले. पुढील सोहळ्यात महिलाही सहभागी होतील असे सांगण्यात आले. गरमागरम शिरखुर्मा सह नमकीनचा अस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.

No comments:

Post a Comment