Wednesday 13 July 2016

भाजपच्या गोटात काय चालले आहे ?


मंत्री गिरीश महाजन आणि भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ
व्हाट्स ऍपच्या विविध गृपमध्ये आज दुपारी चोपडा येथील पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे वृत्त फिरत होते. अवघ्या दोन महिन्यांत किसन नजनपाटील यांची बदली होत असल्याचे सांगण्यात येते. थेट बदलीऐवजी सक्तीच्या रजेवर पाठविणार असे सांगण्यात येत आहे. या विषयावर एसपी डॉ. जालींदर सुपेकर यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी चुप्पी साधली. कोणताही खुलासा केला नाही. दरम्यान, चोपडा येथील भाजपच्या समर्थकांचा पीआय किसन नजनपाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असून पोलीस ठाण्यात आणि परिसरात अवैध धंदे चालतात असे त्यांचे म्हणणे आहे. पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे प्रकरण भाजपसाठी त्रासाचेच दिसत आहे. पक्षातर्फे कोणतही बाजू सध्यातरी समोर आलेली नाही. 

पीआय किसन नजनपाटील यांची बदली का केली जात आहे ? या विषयावरही चर्चा सुरू आहे. त्यानुसार चोपडा येथील भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील आणि तालुकाध्यक्ष आत्माराम गोरख म्हाळके यांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याच्या कारणावरून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बदली घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. पाटील यांच्या विरोधात ९ गुन्हे दाखल असून त्यापैकी २ सिद्ध न झालेले आहेत. रमजान महिन्याच्या काळात त्यांना ८ दिवस तालुका बंदी सुद्धा होती. यापूर्वी त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव दोनवेळा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले मात्र ते मंजूर झाले नाहीत. म्हाळके यांच्या विरोधातही ७ गुन्हे दाखल असून ४ सिद्ध न झालेले व राजकिय स्वरुपाचा १ गुन्हा मागे घेण्यात आला आहे. मात्र, सन १९८८ दरम्यान त्यांना २ वर्षे हद्दपार करण्यात आले होते. पाटील व म्हाळके यांच्या तडीपारीचे प्रकरण पुढे पाठविल्याचा दोष पीआय किसन नजनपाटील यांच्यावर आहे. भाजपचे समर्थक असेही म्हणतात, की या दोन्ही पदाधिकाऱ्यांना तडीपार संबंधातील नोटीस देण्यात आलेली नाही. शिवाय काही दिवसांपूर्वी कत्तलसाठी जाणाऱ्या गायींच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्यांवरच पीआय नजनपाटील यांनी गुन्हे दाखल केल्याची नाराजी आहे. मात्र, हा प्रकारही पीआय नजनपाटील यांचे समर्थक खोडून काढतात.

एसपी डा. जालींदर सुपेकर
पार्टी वुईथ डिफ्रन्ट अशी ओळख असलेल्या भाजपच्या नेतृत्वातील राज्य सरकार सध्या सत्तेत आहे. गृह खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. त्यांच्याच पक्षाचे शहर व तालुकाध्यक्ष तडीपारीच्या दारात आहेत. हा प्रकार भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना कसा सहन होईल ? त्यामुळे पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे चक्र फिरल्याची चर्चा आहे.

एसपी सुपेकर हे पीआयची थेट बदली करू शकत नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किसन नजनपाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. असा घिसाडघाईचा निर्णय एसपी लगेच घेवू शकत नाहीत. कोणीतरी त्यांना तसे करण्यास भाग पाडत असावे, म्हणूनच हे सारे घडते आहे.

कोणत्याही एसपीवर सर्व प्रथम प्रभाव हा मंत्र्याचा असतो. सध्या जिल्ह्याचे कोणीही पालकमंत्री नाहीत. जलसंपदा व उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन जळगावचे आहेत. ते भाजपचेही आहेत. भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला असेल तर महाजन एसपींवर बदलीसाठी दबाव आणू शकतात. जिल्हा पदाधिकारी कोण असू शकते ? तर ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, नाशिक मनपाचे आयुक्त गेडाम यांच्या अवकाळी बदलीमुळे  नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांची राज्यभरात बदनामी झाली आहे. त्यात पुन्हा मंत्री महाजन पीआय नजनपाटील यांच्या बदलीचे शुक्लाष्टक मागे कशाला लावून घेतील ?

या विषयावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे समर्थन केले. ते म्हणाले, भाजपचे चोपडा शहराध्यक्ष पाटील व तालुकाध्यक्ष म्हाळके यांच्या विरोधात चोरी, दरोडे यासारखे गुन्हे नाहीत. जे आहेत ते जुने आहेत. तरी सुद्धा त्यांची तडीपारीची प्रकरणे पीआय नजनपाटील यांनी पाठविली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधाती पीआय नजनपाटील यांनी एकतर्फी कारवाई केली आहे. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही पाटील, म्हाळके यांच्यासोबत उभे आहोत. आम्हीच एसपींना विनंती केली आहे.

पीआय नजनपाटील यांच्या बदलीस चोपडा शहरातील काही समाजसेवी व पत्रकार मंडळींनी विरोध सुरू केला आहे. किसन नजनपाटील यांची कामगिरी चांगली आहे, असे हे लोक म्हणतात. एखाद्या अधिकाऱ्यांच्या बदली रद्दसाठी होणारी चर्चा राज्य सरकार व मंत्र्यांची पत घालवणारी असते. भाजपसाठी हे अडचणीचे आहे. पीआय नजनपाटील यांनी भुसावळ येथे चांगली कामगिरी केल्याचे सांगितले जाते. तेथे त्यांनी राजकिय सपोर्ट असलेल्या गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. ते सर्व सामान्यांसाठी सहृदयी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांनी जळगाव येथे काम करताना जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल बीएचआर प्रकरणात अभ्यासाअंती ३६ आरोपींवर जम्बो गुन्हा दाखल केला होता.
 
याच विषयासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क केला असता पीआय नजनपाटील यांच्या बदलीशी संपर्क नसल्याचे त्यांच्याकडून मध्यस्थामार्फत सांगण्यात आले. सध्या जिल्हा पालकमंत्री जाहिर झालेले नाहीत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महाजन यांच्याकडे येणार अशी शक्यता आहे. त्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये रस घेणारा संभाव्य पालकमंत्री अशी त्यांची बदनामी होवू शकते. मंत्री महाजन यांच्यावर गेडाम, किशोर बोर्डे आणि आता किसन नजनपाटील यांच्या बदलीचा ठपका लागतो आहे. भाजपअंतर्गत हे काय चाललेल आहे ? हेच समजत नाही. 

एकमेकांच्या विरोधात कारस्थान करणारे नेते अशीच प्रतिमा भाजपच्या मंत्र्यांची होते आहे. स्वकियांच्या संदर्भात असाच काहीसा दावा एकनाथराव खडसे यांनीही केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील मंत्रालय बदलण्याचा वाद ट्विटरवर जाणे, कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिलेल्या राम शिंदे यांनी पदभार न स्वीकारणे, मंत्री महाजन यांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये असलेला इंटरेस्ट हे सारे पाहता भाजपची मंडळी आपल्या सार्वत्रिक प्रतिमेचा विचार करायला तयार नाही, असेच दिसते.

या साऱ्या प्रकारात एसपी सुपेकर यांनी साधलेली चुप्पी बरेच काही सांगते. त्यांना मेसेज दिले आणि नंतर मोबाईलवर संपर्क केला. ते काहीही बोलले नाही. मात्र सुपेकर यांच्या कार्याविषयी सुद्धा जिल्ह्यात नाराजी आहे. जळगाव शहरात सर्रास सट्टा सुरू असल्याबद्दल माध्यमांनी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्या आहेत. सुपेकर यांच्या काळात पोलिसींग संपून पोलिसांचा गुन्हेगारांवरील दरारा संपला असे काहीसे २ वर्षांतील चित्र आहे. जिल्ह्याची संवेदनशिल ओळख पुसून जाणार असे एसपी सुपेकर जाहिरपणे म्हणत असताना दुसऱ्या दिवशी पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे प्रकरण उद्भवले आहे. ईद मिलनमध्ये बोलणारे एसपी आता गप्प का ? असा प्रश्न जिल्ह्यातील जनता विचारणारच !!! (रात्री ९ च्या सुमारास एसीपी सुपेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली)

 क्राईम मिटींग असल्याने बोलू शकलो नाही - एसपी सुपेकर

चोपडा येथील पीआय किसन नजनपाटील यांची बदली झालेली नाही. नजनपाटील स्वतः रजेवर आहेत. त्यांनीच रजेचा अर्ज भरला आहे, असे स्पष्ट मत एसपी डॉ. जालींदर सुपेकर यांनी मांडले आहे. त्यांनी सांगितले की, नजनपाटील यांच्याविषयी चाललेली चर्चा वस्तुस्थितीला धरून नाही. रमजानचा बंदोबस्त संपल्यावर नजनपाटील स्वतःच रजेवर गेले आहेत. त्यांना कोणीही सक्तीच्या रजेवर पाठविलेले नाही. नरेंद्र पाटील यांचे हद्दपार प्रकरण जुने होते व ते नामंजूर झाले आहे. रमजानच्या काळात नरेंद्र पाटील यांना केवळ ८ दिवसांसाठी तालुकाबंदीचा प्रस्ताव होता. तो तेव्हा मंजूर झाला नाही. आता रमजान संपला आहे. जी चर्चा आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही.

No comments:

Post a Comment