Thursday 28 July 2016

फॅन्सी नंबरप्लेट विरोधात लोकाभियान !

जळगाव शहरातील वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेट विरोधात पोलिसांनी अभियान सुरू करावे अशी सूचना माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट एसपी डॉ. जालिंदर सुपेकर यांना केली आहे. त्यानुसार एक – दोन दिवसांत फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचे चालक अथवा मालक एखाद्या चौकात वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसतील. असे प्रकार टाळायचे असतील तर संबंधितांनी वेळीच आपापल्या वाहनांच्या नंबर प्लेट या नियमानुसार तयार करुन घेणे उचित ठरणार आहे.

कोणतेही शहर सुंदर, सुरक्षित करण्याची जबाबदारी नागरीकांच्या सामुहिक जबादारी व सवयी यावर अवलंबून असते. इतरांपेक्षा माझे वर्तन किंवा माझे अस्तित्व वेगळे आहे असे दाखविण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न कोणाकडूनही केला गेला की, तेथे नियम, कायदे यांना फाटा दिला जातो. कायद्याला फाटा देणाऱ्या प्रवृत्ती मूलतः तीन प्रकारच्या असतात. पहिली प्रवृत्ती म्हणजे, आमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि आम्ही त्याद्वारे काहीही करू शकतो, असे समजणारी धनसत्ता. दुसरी प्रवृत्ती म्हणजे, आमच्या हातात सत्ता आहे आणि आम्ही त्याचा वापर मनांत येईल तसा वापर करू शकतो, असे समजणारी राजसत्ता. तिसरी प्रवृत्ती ही गुन्हेगारी किंवा मग्रुरी असलेली असते. दुनिया जाए भाड में, आम्ही मनमानी करू, असे समजणारी गुन्हेसत्ता. सार्वजनिक नियम, कायदे मोडणाऱ्या याच तीनच प्रवृत्ती असतात. या पलिकडे चौथा प्रकार नाही.

दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट तयार करणाऱ्या या तीन प्रवृत्तींचीच माणसे रस्त्यांवरील वाहनांत दिसतात. मनाप्रमाणे नंबर देण्यासाठी आरटीओने त्या नंबरचा लिलाव किंवा जादा शुल्क आकारणीची सवलत दिली आहे. ही सवलत फक्त तो नंबर मिळण्यासाठी आहे, तो नंबर वेगळ्या पद्धतीने लिहिण्यासाठी नाही. मात्र, जादा पैसा फेकून मिळालेला नंबरही मनमानी पद्धतीने लिहिण्याची विकृती वरील तीन प्रकारच्या प्रवृत्तींमध्ये दिसते.

सर्व सामान्य माणूस वाहन खरेदी केल्यानंतर आरटीओकडे जावून रांगेत उभा राहून कागदपत्रांची पूर्तता करून नंबर मिळवतो. त्याला अक्षर, आकडे, सिरीयल यात रस नसतो. जो मिळेल तो नंबर घेवून,  रितसर नंबर प्लेट तयार करून घेतो. त्याचे वाहन नंबरसह दुसऱ्या दिवशी रस्त्यांवर धावायला लागते.

मात्र, हवा तो नंबर मिळावा असे खूळ डोक्यात असलेल्या प्रवृत्ती त्या नंबरसाठी जादा रक्कम मोजतात किंवा दोन-तीन महिने प्रतिक्षा करून बिना नंबरची गाडी पळवतात. समाजातील सामुहिक शिस्त बिघडते ती अशा प्रकारातून. खरे तर या प्रवृत्तींना आरटीओने वेळीच मनाई करायला हवी. वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला हवी. तसे होत नाही. उलटपक्षी हवा तो नंबर मिळवून देण्यासाठी दलालांच्या टोळ्या आरटीओत सक्रिय दिसतात.

फॅन्सी नंबर तयार करणाऱ्यांची मनोवृत्ती किती लहान असते, हेही काही उदाहरणांवरून पाहाता येते. अनेकांना वाहनांचा नंबर वन असावा अशी अपेक्षा असते. हा वन मिळविण्यासाठी मग नको ते प्रकार केले जातात. नंबर प्लेटही तशीच केली जाते. समाजात वावरताना गाडीचा नंबर वन असणे आणि समाजात पत, प्रतिष्ठा नंबर वन असणे यात जमिन- अस्मानचा फरक आहे. नंबर वनसाठी मंत्री, उद्योजक, भांडवलदार, राजकारणी व सरकारी अधिकारीही प्रयत्न करतात. याचे किस्से चर्चेत आले की, त्यांच्या मनोवृत्तीवर लोक हसतात.

>>> राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावरील बीजेपी फॅन्सी नंबर प्लेटचे खुळ


वाहनांचे नंबर घेताना मोबाईल नंबर, फोन नंबर, जन्म तारीख, बंगला नंबर असा ताळमेळ जोडणारेही अनेक महानुभाव आहेत. तसे केल्याचे ते कौतुकाने सांगतात. त्यासाठी खर्च केलेला पैसाही सांगतात. याचेही हसू येते. नंबरच्या बेरजेचा खेळ करुन शुभ-अशुभ नंबर काढणारेही अंकतज्ञ आहेत. बेरजेनंतर सम संख्या नको तर विषम संख्या हवी असे अनेकांचे खुळ असते. त्यातूनच फॅन्सी नंबरचा घोळ केला जातो.

फॅन्सी नंबर प्लेटमध्ये सर्वाधिक गमतीचा, लोकांच्या टिंगल टवाळीचा विषय म्हणजे स्वतःचे टोपण नाव जसे दादा, काका, मामा, बाबा, अण्णा आदी नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकात दाखविण्याचा प्रकार. ही म्हणजे दी ग्रेट कॉमेडी आहे. अरे बाबांनो तुम्हाला तुमचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते, सहकारी, कर्मचारी टोपण नावाने ओळखतात ना ? की ते रोज विसरून जातात ? की तुम्ही स्वतःचे टोपण नाव विसरून जाता ? तसे असेल तर तुमच्या वाहनांच्या नंबर प्लेट टोपण नावाने तयार करा. म्हणजे अधुन मधून वाहनाच्या मागे-पुढे जावून टोपण नाव वाचता येईल व लक्षात ठेवता येईल. पण, तसे नसेल तर टोपण नावाला केविलवाण्या पद्धतीने बिंबविण्यासाठी कशाला फॅन्सी नंबर प्लेट तयार करता ?


>>>  फॅन्सी नंबर प्लेटचे प्रकार


जळगाव शहरात अशा प्रकारे फॅन्सी नंबर असलेली अनेक वाहने सध्या रस्त्यांवर धावतात. ती कोणाची आहेत ? हे सर्व सामान्यांना माहिती आहे. या संदर्भात एसपी सुपेकर आणि माध्यम प्रतिनिधींनी गंभीरपणे चर्चा केली आहे. फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकण्याबाबत शहर वाहतूक पोलीस कठोरपणे कार्यवाही करतील अशा अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या अभियानात नागरिकांनीही एक धाडस जरूर करावे. ते म्हणजे, जळगाव जिल्ह्यात धावणाऱ्या एमएच १८ पासिंगच्या फॅन्सी नंबर प्लेटचे फोटो व्हाट्स अपवर माध्यमांच्या प्रतिनिधीकडे पाठवावे. जेणे करून ते थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविता येतील. फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने कोणाच्या मालकीची आहेत, त्यांची नावेही जरूर पाठवावीत. अशा प्रकारचे एखादे अभियान लोकांनी जागरुकपणे चालविले तर शहरातील वाहनांच्या नंबर प्लेटसाठी सामुहिक शिस्त तयार होईल. या सोबतच अजून एक विनंती एसपींना केली आहे. ती म्हणजे, वाहनांच्या आतील बाजुने पोलीस, आर्मी, माजी सैनिक असे लिहिलेल्या पाट्याही असतात. अशाही वाहनांवर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. चला तर फॅन्सी नंबर प्लेट मुक्त वाहन अभियानाला प्रारंभ करू या ...

वाहनांची नंबर प्लेट कशी असावी ?

केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या ५० व्या कलमाप्रमाणे सर्व वाहनांच्या नंबर प्लेट इंग्रजी भाषेत रोमन अक्षरे व आकड्यांमध्येच असावी. अन्य कोणत्याही भाषेतील नंबर प्लेट अवैध मानली जाते. सार्वजनिक वाहतुकीच्या रिक्षा, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीच्या वाहनांची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असते. त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहीलेला असतो. खासगी वापराच्या वाहनांची (दुचाकी, चारचाकी) वाहनांची नंबरप्लेट पांढऱ्या रंगाची असते. त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहीलेला असतो. वाहनाच्या समोरची व मागची नंबरप्लेट कशी हवी, त्याची उंची, आकार, रंग, अक्षरांची जाडी ही केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार निश्चित आहे. दुचाकी वाहनांसाठी १५ एमएम व चारचाकी वाहनांसाठी २५ एमएम आकाराची नंबर प्लेट सक्तीची आहे. त्यावरील अंक, त्याची उंची, रूंदी व दोन आकड्यांमधील अंतरसुद्धा ठरवून देण्यात आले आहे. चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर अक्षर आणि आकड्यांची उंची ६५ एमएम, रुंदी १० एमएम असावी.


नंबर हा इंग्रजीमध्ये रोमन फॉन्टमध्ये असावा. दुचाकीच्या नंबर प्लेटवर अक्षरांची उंची ३० एमएम, रुंदी ७ एमएम असावी. आकडे देखील याप्रमाणे असावेत. पुढील नंबर प्लेटवर व मागील नंबरप्लेटमध्ये अक्षर आणि आकड्यांच्या उंचीत १० एमएमचा फरक असावा. फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहन चालक व मालक यांच्यावर वाहतूक पोलिसांनी केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या ५० (१) (१७७) नुसार दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.



अधिक माहितीसाठी मुंबई वाहतूक पोलिसांची वेबसाईट पाहा....

https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/…/numberplat…

2 comments:

  1. Tiwariji, maximum fancy no. Plates are of persons related to department or Gundas, politicians , so nothing will happen to them, if you really want to see the action let some , patrakar works on the subject

    ReplyDelete