![]() |
डाविकडून नंदु जोगळेकर, मी, डॉ. चंद्रकांत वाघमारे, नितीन देशमुख |
विदर्भातील वऱ्हाड
प्रांताचा आणि माझा संबंध तीन वर्षांचा. सन २००३ ते २००६ दरम्यान मी अकोला येथे दैनिक
सकाळच्या विभागीय कार्यालयात मुख्य उपसंपादक म्हणून काम केले. अकोलासह बुलडाणा व
वाशीम ही विभागीय कार्यालये सुद्धा माझ्या कार्यक्षेत्रात होती. अकोल्यात सुहास
कुळकर्णी, रत्नाकर जोशी, नंदु जोगळेकर, विशाल राजे, मनिष जोशी, विनोद इंगोले, गिरीश
देशमुख, जीवन सोनटक्के, संजय सोनार, गजानन लोणकर, मनोज वाकोडे आदी माझे सहकारी
होते. बुलडाण्यात अरुण जैन व वाशीममध्ये नंदकुमार शिंदे हे सहकारी होते. अकोला
सोडून मी जळगाव येथे दैनिक सकाळसाठी सहयोगी संपादक म्हणून आलो. अकोल्यातील मित्र
परिवार दुरावला.
माझी एक खोड आहे. मी एखादे
शहर सोडले की, तेथे फारसा परत जात नाही. मात्र, तेथील मित्रांच्या संपर्कात सतत
राहतो. जाणे येणे नसले तरी मैत्री कायम राहते. अकोल्याबाबत तसेच झाले. गेल्या ९
वर्षांत अकोला येथे पुन्हा जाणे झाले नाही. परंतु जोगळेकर, सोनटक्के, सोनार आदी
फोनवर, मोबाईलवर संपर्कात होते.
अकोल्यात सहकारी मिळाले.
नंतर ते मित्र झाले. विविध प्रकारच्या सानिध्य, सहकार्यातून त्यांच्याशी दोस्ती
घट्ट झाली. कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत ग्रामीण बातमीदार अविनाश बेलाडकरसर (मूर्तिजापूर), कृष्णा फंदाटसर (तेल्हारा), दीपक देवसर (अकोट) यांच्याशीही दोस्ती घट्ट होती. आम्ही एकत्रिपणे
फिरणे, सोबत वन-घरगुती भोजन, सैर-सपाटा याचाही आनंद घेत होतो. शिंदे,
बेलाडकरसर यांनी विश्यांरामगृहात स्नेहभोजन ठेवले. कारंजा येथे मनिष जोशींनी गुरुप्रसाद दिला. वाकोडेने शेतात रात्रभोज दिले. इंगोलेच्या घरी
रात्री जावून पिठल भाकरी जेवलो. विशाल राजेला शेगाव येथे रात्री जेवणाची सक्तीने व्यवस्था
करायला लावली होती. वारी, खटकाली, बाळापूरचा किल्ला, पातुरची देवी अशा अनेक ठिकाणी आम्ही समुहाने भटकलो. कधी मोटारसायकलींवर तर कधी पार्सल ठेकेदार पप्पूशेटच्या काळीपिवळीत. शेगावला तर आम्ही कधीही भेट देत असू. टीम अकोला कामातही बाप होती. एका विभागीय कार्यालयात आम्ही ९ पाने लावत असू. तालुका पुरवण्यांसह टॉपिकल पुरवण्या आम्ही केल्या. बातमीदार बातमी लेखनसह फोटोग्राफी करीत. आणखी एक गंमत म्हणजे आम्ही चित्रपट पाहायला काम आटोपून सोबतीने जात. मुख्य कार्यालयाला कळवून. अशा संपर्कातून आमची मैत्री ही दोस्तीत अधिक घट्ट झाली.
नंदु जोगळेकरच्या घरात |
नंदु जोगळेकर यांच्या
मित्रमंडळीत माझी उठबस होती. जोगळेकर हा सामाजिक जाणिवा असलेला मित्र. गरीब,
दुर्बल घटकातील मुलांसाठी सुटीत शिकवणी वर्ग घेणारा. त्याच्याकडे नेहमी मुलांचा
गोतावळा असे. त्यांच्यासोबत सामुहिक भोजन होत असे. शक्यतो नवरात्रीत. नंदुचे मित्र
नितीन देशमुख, डॉ. चंद्रकांत वाघमारे आणि सुधीर देशपांडे हेही आमच्या दोस्तीच्या
परिघात आले. नितीन रंगकाम करीत असे. मेहनती माणूस. डॉ. वाघमारे म्हणजे मनमौजी आणि
फटकळपणे बोलणारे. माझ्या तब्बेतीची काळजी त्यांनी घेतली. तीनवर्षे मोफत तपासणी व
औषध देवून. देशपांडे बँकेत काम करीत. त्यांच्याकडे गाण्यांच्या मैफली रंगत. जोगळेकरांची
ताई श्रीमती केतकर याही मला लहान भावाप्रमाणे मानत. मी आजारी असताना मुगाच्या
खिचडीत सायीचे दूध घालून देणारी ताई. तशी कठोर स्वभावाची. अकोल्यात दोस्तीचा परिघ
असा विस्तारला.
गेल्या ९ वर्षांत यातील
बऱ्याच जणांशी संपर्क झाला नाही. दोघे-तीघे संपर्कात होते. कधीतरी भेटीचा योग हवा
होता. तो दि. २२ जुलैला जुळून आला. नागपूरला जायचे म्हणून अकोल्यावरुन जाताना
जोगळेकरांशी संपर्क केला. जुजबी भेट घ्यावी म्हणून भेटायचे ठरविले. पण, जोगळेकर व
देशमुख यांनी वेगळेच नियोजन केले होते.
मी अकोल्यात पोहचलो आणि
जोगळेकर, देशमुख बाळापूर नाक्यावर आम्हाला घ्यायला आले. देशमुखांना पाहून आनंद
झाला. जोगळेकरांच्या घरी गेलो. माझ्या समोर एका जुन्या घरात राहणाऱ्या जोगळेकरांनी
स्वतःचे घर बनविले आहे. ते पाहून खुप आनंद झाला. घर कसे झाले याची कहाणी त्यांनी
सांगितली. तेथे सोनारही आला. त्याचेही घर झाल्याचे ऐकून व नंतर पाहून आनंद द्विगुणीत
झाला. जोगळेकरांचे चिरंजीव मंदारही भेटला. सौ. जोगळेकर व सौ. देशमुख वहिनी यांनी
झटपट स्वयंपाक करीत जेवून जाण्याचा आग्रह केला. गप्पा सुरू असताना इतरांचीही
ख्याली खुशाली विचारली. काही सहकारी, मित्र कसे बदलतात त्याची उदाहरणे समोर आली.
नंदु जोगळेकरचे छोटेसे घर |
जोगळेकर आम्हाला डॉ.
वाघमारे यांच्याकडे घेवून गेले. डॉक्टर आजही तसेच आहेत. फिट्ट ॲण्ड फाईन.
डॉक्टरांची आणि माझी मैत्री मित्र, दोस्त याच्या पलिकडची म्हणावी लागेल. हा माणूस
माझा यार आहे. यार म्हणून त्याच्याशी यारी. मनांतले चांगले-वाईट कोणाजवळ तरी
बोलायला जागा असावी लागते. ज्याच्याशी तसे बालायची इच्छा असते तो यार असतो. मैत्री
प्रामाणिक असते. दोस्ती विश्वासाची असते. मात्र, यारी ही या दोन्ही गुणांसह राग,
लोभ, अबोला, वाद अशा भावनात्मक गुणांशीही जुळलेली असते. डॉ. वाघमारे माझे तसे
मित्र होते. कार्यालयातील सहकाऱ्यांचे गाऱ्हाणे मांडण्याची ती जागा होती. डॉ.
वाघमारे स्वतः फटकळ. माझेही कान उपटायला कमी करीत नसत. म्हणून त्यांना यार म्हणणे
योग्य. त्यांच्याही भेटीला गेलो. धावतीच भेट पण अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढणारी
होती. गप्पा केल्या. त्यानंतर नागपूरच्या मार्गाला लागलो.
आठवणींच्या या प्रवाहाच
काही नावे मुद्दाम गाळलेली आहेत. ती संबंधिताना समजावित म्हणून. सोबत काम करताना
मी अनेकांना उत्तम, गुणवत्तापूर्ण कामांचा वसा दिला. प्रशासनाचा प्रमुख असल्याने
कधीकधी कटू निर्णय घ्यावे लागतात. मी ते घेतले. पण, कोणाचेही नोकरी विषयी किंवा सेवा
विषयी नुकसान केले नाही. केवळ आपलीच बाजू पाहणाऱ्या काही जणांनी त्यांच्या परिने
त्रासही दिला. माझ्या आयुष्यात त्रास देणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. कारण, मी
नेहमी मित्र, दोस्त, यार जोडत आलो. त्रास देणाऱ्यांचा फार विचारच केला नाही. अशा लोकांचा
अनुल्लेख हाच त्यांच्यासाठी मनस्ताप असतो. तो आपण त्यांना मुद्दाम द्यायचा नाही.
कारण. मैत्री संदर्भात माझे एक सूत्र आहे ...
एक मैत्री अशी हवी
भविष्यात कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नात्याला अंतर
न देणारी ....
भविष्यात कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नात्याला अंतर
न देणारी ....
(ओळी दुसऱ्याच्या आहेत)
मैतर जीवाचा असावा , तर असा.! एवढे सगळे मैतरस्मृतींचे धागे एकमेकांत गुंफून त्याची तलम वीण उबदारपणे मायेने पांघरविणारा
ReplyDeleteमैतर जीवाचा असावा , तर असा.! एवढे सगळे मैतरस्मृतींचे धागे एकमेकांत गुंफून त्याची तलम वीण उबदारपणे मायेने पांघरविणारा
ReplyDelete