Monday 25 July 2016

मोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमि

विदर्भाची भूमि ही संतांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून वर्धाजवळ सेवाग्राम येथे काही काळ विसावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपुरला  दीक्षाभूमि चे पावित्र्य मिळाले. सामाजिक प्रश्नांवर सोप्या भाषेत गाणी, ओव्या गावून किंवा किर्तन करून भाष्य करणाऱ्या तथा खंजिरीवादक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंजमुळे मोझरीला देशभरात ओळख मिळाली. या तिनही व्यक्ती आणि स्थान महात्म्यचा माझ्यावर प्रभाव आहे. यापूर्वी मोझरी, दीक्षाभूमि व सेवाग्रामला मी दोनवेळा भेट दिली आहे. तेथे घालवलेला एक-एक क्षण मला नेहमी आठवतो आणि काही तरी वेगळे करण्याची प्रेरणा देतो.  

माझा मुलगा रोहित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. गांधी, आंबेडकर यांच्याविषयी त्याला जुजबी माहिती असावी. तुकडोजी महाराजांविषयी नसावीच. माझ्या घरात असलेल्या शोकेसमध्ये बुद्ध, छ. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, गांधी, आंबेडकर, विवेकानंद आदींच्या मूर्ती आहेत. या व्यक्तीमत्वांची माहिती देणारी चरित्रग्रंथे ही आहेत. ग्रामगीता असून अनेक लेखात मी त्यातील संदर्भ सुद्धा वापरले आहेत. त्यामुळे अधुनमधून संत, राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर हलकीफुलकी चर्चा होत असते. ही पार्श्वभूमि असल्यामुळे मनांत एक सुप्त ईच्छा होती. ती म्हणजे, कधीतरी मुलाला मोझरी येथील गुरूकुंजमध्ये, नागपूरच्या दीक्षाभूमिवर आणि वर्ध्याच्या सेवाश्रममध्ये नेवून त्याला तेथील स्थान आणि व्यक्ती महात्म्य समजून सांगावे.


हा योगायोग गेल्या दि. २२ ते २४ जुलै दरम्यान जुळून आला. मी, पत्नी आणि मुलगा मोझरी ते दीक्षाभूमि व्हाया सेवाग्राम असा दौरा करून आलो. तीनही ठिकाणी गेल्यानंतर मुलाला संबंधितांच्या कार्याची बारकाव्याने माहिती दिली. तेथील चित्र प्रदर्शनी पाहताना संबंधितांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग पाहाता आले. माझी आणि सौभाग्यवतींची मेमरीही रिफ्रेश झाली.

गुरूकुंजमध्ये ...

माणिक बाडोंजी इंगळे असे तुकडोजी महाराजांचे नाव होते. त्यांची वैचारिक बैठक अध्यात्मिक होती. ते खंजिरी हे वाद्य उत्तमपणे वाजवत. सेवाग्राममध्ये मुक्कामी असताना गांधीजींनी तुकडोजी महाराजांना बोलावून घेतले होते. तेथील सामुहिक प्रार्थना पाहून तुकडोजी महाराज भारावले. त्यांनीही सामुहिक प्रार्थनेचा प्रचार-प्रसार केला. आष्टी, चिमूर मुक्ती संग्रामात त्यांना कारावासही झाला. त्यांनी स्वानुभवातून ग्रामगीता रचली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. त्यांनी भारतीय साधू समाजाचे संघटनीही उभे केले. तुकडोजी महाराज अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मूलन, पाखंडी धर्म, गोवध विरोध यासह अन्य सामाजिक वाईट प्रथा-परंपरांवर गायन, किर्तनातून शाब्दीक हल्ले केले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये तीन हजार भजन, दो हजार अभंग, पाच हजार ओव्या लिहील्या. धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि औपचारिक-अनौपचारिक शिक्षणावर सहाशे पेक्षा जास्त लेख लिहीले.


दीक्षाभूमिमध्ये ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामुहिक दीक्षाभूमि म्हणून नागपूरची निवड केली. दि. १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासाठी नागपूर येथे दीक्षा घेण्याचा कार्यक्रम जेथे झाला तेथे सुमारे ४ एकरात दीक्षाभूमि उभारण्यात आली आहे. या जागेवर १२० फुट लांबीचा बौद्ध स्तूप उभारला आहे. या ठिकाणी बुद्धाची मोठी मूर्ती आहे. थाई येथील विद्यार्थ्यांनी ही मूर्ती भेट दिली आहे. या दीक्षाभूमिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात बोधीवृक्ष आहे. स्तुपाजवळच्या सभागृहात डॉ. आंबोडकरांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. दरवर्षी किमान १२ लाख पर्यटक येथे भेट देतात. या स्थळाला राज्य सरकारने पर्यटनस्थळाचा अ दर्जा दिला आहे.


सेवाश्रमात ...

वर्धापासून अवघ्या ९ किलोमीटरवर सेवाश्रम आहे. या आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींसाठी जमुनालाल बजाज यांनी केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी साबरमतीच्या आश्रमात जाणार नाही, अशी शपथ गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह संपल्यानंतर घेतली होती. त्यांना तेथे अटक झाली होती. कारागृहातून सुटल्यावर साबरमतीला जायचे नाही म्हटल्यावर जमुनालालजींनी गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रमासाठी जागा दिली. तेथेच सेवाग्राम उभे राहिले. आदि निवास, बापू कुटी, प्रार्थना भूमि, कस्तुरबा कुटी, मीराबेन कुटी, महादेवभाई कुटी, भोजन कुटी, परचुरे कुटी, कार्यालय आदींचे निर्माण गरजेनुसार झाले. या आश्रमाचे वैशिष्ट्ये असे की, येथील घरे आजही पूर्वापार स्थितीत ठेवली आहेत. कौलारु घरे, मातीच्या भिंती, बांबूंचे छत, मातीची-तांब्या पितळेची भांडी, चरखे, लाकडी खडावा, दांडी यात्रेची काठी, गोल फ्रेमचा चष्मा, कंदील असे अनेक विषय पाहतना, समजून घेताना गांधीजींच्या आयुष्याचे अनेक प्रसंग उलगडत जातात.

या तिनही ठिकाणी आम्ही तिघे भारावून गेलो. तुकडोजी महाराज, आंबेडकर आणि गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्रे मनाला अंतर्मुख करीत होती. काही छायाचित्रे कायमची मनांत ठसली. तिनही ठिकाणच्या एका प्रसंगाचे छायाचित्र कमालीचे मनांत ठसले आहे. ते म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न आंबेडकर आणि महात्मा गांधीजींची अंत्ययात्रा. प्रचंड गर्दीचे त्या-त्यावेळी उच्चांक ठरलेले छायाचित्र आजही डोळ्यांसमोरून जात नाही.

एका गोष्टीचे समाधान झाले. ते म्हणजे, प्रवास पूर्ण झाल्यानंतर मुलगा म्हणाला, पप्पा बरे झाले आपण तिनही ठिकाणी गेलो. मला सुद्धा या स्थळांना भेटी दिल्याचे समाधान आहे. कारण मला तिनही व्यक्तिमत्त्वांचा जवळून परिचय झाला. हे वाक्य ऐकून ११०० किलोमीटर प्रवास केल्याचा क्षीण एका सेकंदात नाहीसा झाला !!!No comments:

Post a Comment