![]() |
दीप प्रज्ज्वलन करताना मान्यवर वक्ते |
जळगाव शहरात विचारांची
सकारात्मकता सुरू करणारा एक चांगला कार्यक्रम दि. १७ जुलैला झाला. “माय सीटी ... माय ड्रिम” या उपक्रमांतर्गत “जळगावच्या
विकासात गुरुंची आवश्यकता” या
विषयावर शहरातील ८ मान्यवर आणि मान्यवर अध्यक्ष अशा ९ जणांनी विचार मांडले. तब्बल
सव्वा तीन तास चालेल्या या कार्यक्रमास श्रोता म्हणून किमान ५०० वर नागरीक उपस्थित
होते. कार्यक्रम लांबला असे मुद्दाम म्हणणार नाही. कारण, ८ विषयांवर ८ वक्ते किमान
१५ मिनिटे बोलले तरी दोन तास वेळ लागणार हे नक्की होते. या सोबत इतर बाबींसाठीही
वेळ द्यावा लागतो. म्हणजेच ३ तास आपल्याला “कांताई”
सभागृहात बसावे लागेल हा हेतू निश्चित करून बहुतांश श्रोते आले होते. लक्षवेधी बाब
म्हणजे, युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा विषय, “जळगावच्या विकासात गुरूंची आवश्यकता” हा होता. जवळपास आठही वक्ते विषयापासून लांब गेले.
जळगाव शहराच्या भविष्यातील समस्या आणि त्यावरील विकासाचे संभाव्य उपाय, पर्याय
यावर दिशादर्शन अपेक्षित होते. ते खुप त्रोटक किंवा वरवरच्या पद्धतीने सांगितले
गेले. प्रत्येक वक्त्याने आपल्याला आलेल्या कटू, नकारात्मक अनुभवांची मांडणी करीत
उपाय योजना सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या चर्चेतला बराचवेळ यात खर्ची
पडला. बरेच कथन हे स्वतःच्या अनुभवांच्या भोवती असल्याने चर्चा ही व्यक्तीगतही
वाटली. मात्र, सर्वांच्या चर्चेतून मुद्दा एकच पुढे आला. तो म्हणजे, “जळगाव माझं आहे. ते कसेही असले तरी ते आमच्या
आवडीचे आहे.” गुरुस्थानी असलेल्या वक्त्यांचे हे एकमत
यापुढील “माय सीटी ... माय ड्रीम” उपक्रमाला गती देणार आहे.
![]() |
उपस्थित आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा |
या चर्चेचा समाजाला काय
फायदा, जळगावकरांना काय लाभ ? असा
प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. जळगाव शहरात माझे किमान २० वर्षांचे वास्तव्य लक्षात
घेता मला पहिल्यांदा असे जाणवले की, शहरातील ऑयडॉल असलेली मंडळी किमान शहराशी
संबंधित विषयांवर बोलायला लागली आहेत. हेही नसे थोडके. कारण, आज कोणताही विचार
सार्वत्रिक स्वरुपात मांडला की, त्याला विरोधाचे घुमारे घेवून अनेक जण झटपट उभे
राहतात. एखाद्या विचाराला विरोध करणे हे सोपे असते. मात्र, आपण एखादा विचार घेवून
उभे राहणे हे तेवढेच अवघड असते. हा अनुभव लक्षात घेता “माय सीटी ... माय ड्रीम”
उपक्रमात होत असलेल्या प्रयत्नांना लगेचच सकारात्मक प्रतिसाद मिळेल असे कोणीही
गृहीत धरलेले नाही. पण, मेहरुण तलावाच्या लोकसहभागातील खोलिकरणाने हाही संदेश दिला
आहे की, प्रश्न, शंका घेवून जे उभे राहतात त्यांना उभे राहू द्या. त्यांच्याशी
वादविवादात वेळही घालवू नका. आम्ही मदत करायला सशक्त आहोत मग काम करणाऱ्यांनी त्या
विरोधाचा विचार का करायचा ? सकारात्मक
विचारांची पेरणी आहे ती या ठिकाणी.
जळगावची सद्यस्थिती दाखविणारा व्हिडीओ (सौजन्य - मल्टीमीडिया फिचर्स प्रा. लि.)
जळगावची सद्यस्थिती दाखविणारा व्हिडीओ (सौजन्य - मल्टीमीडिया फिचर्स प्रा. लि.)
या चर्चेत कोण कोण सहभागी
होणार हे आयोजकांनी जाहिर केलेले नव्हते. त्याचेही कारण आहे. आजकाल कोणाला सोबत
घेतले ? यावरही चर्चाचर्वण करणारी विरोधी
विचारधारा आहेच. एखाद्या प्रारंभालाच खोडा घातला जायला नको म्हणून मान्यवर
वक्त्यांची नावे कार्यक्रमात जाहिर करण्यात आली. जे वक्ते होते ते त्यांच्या
कार्यक्षेत्रातील मान्यवर आहेत. ते गुरुस्थानी आहेत. शहर विकासावर मार्गदर्शन करू
शकतात एवढा अधिकार त्यांना आहे. तरीही प्रत्येकाने आपल्या कथनाचा समारोप करताना,
मी गुरु नाही हे नम्रतेने सांगितले. शहराशी संबंधित विषयांवर चर्चा एकत्रपणे
करण्याचा हा प्रयत्न अनेकांना भावला. पहिला प्रयत्न म्हणून हे निश्चित दखल
घेण्यासारखे आहे.
उद्योग-व्यापार
क्षेत्राविषयी “सातपुडा ऑटोमोबाईल्स” गृपचे संचालक प्रा. डी. डी. बच्छावसर, शिक्षण
क्षेत्राविषयी “खान्देश एज्युकेशन सोसायटी”
चे अध्यक्ष प्रज्ञांवत नंदकुमार बेंडाळे,
अर्थकारणाविषयी “वेगा केमिकल्स”चे संचालक तथा “जळगाव पीपल्स बँकेचे”
अध्यक्ष भालचंद्रदादा पाटील, ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट अनीलभाई शहा, नगर विकास
तथा पर्यावरण विषयावर ज्येष्ठ आर्किटेक्ट तथा पर्यावरणवादी शिरीष बर्वे,
सांस्कृतिक क्षेत्राविषयी ज्येष्ठ रंगकर्मी शंभुण्णा पाटील, सामाजिक व राजकारण
विषयावर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा “बीटा कन्सट्रक्शन” चे
संचालक भरतदादा अमळकर व शहरीकरणाविषयी “जैन
उद्योग सुमहाचे” प्रमुख अतुलभाऊ जैन यांनी
विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. के. बी. अण्णा पाटील होते. श्रोते
म्हणून शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, स्थायी समितीचे सभापती नितीन
बरडे पूर्ण वेळ उपस्थित होते. मनपा प्रशासन व राजकारण या विषयावर झालेली चर्चा
पदाधिकाऱ्यांनी ऐकली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक “मल्टी मीडिया फिचर्स” चे
सीईओ तथा “माय सीटी ... माय ड्रीम” चे संकल्पक सुशीलभाऊ नवाल यांनी केले. ही चर्चा का
घडवून आणत आहोत ? हा मुद्दा त्यांनी स्पष्ट
केला. सूत्रसंचालन
गिरीश कुळकर्णी यांनी केले. चर्चेत कोण काय बोलले ते जाणून घेवू.
ग्राहकाला अग्रस्थानी ठेवा
- बच्छाव
सामाजिक जबाबदारी ओळखा –
बेंडाळे
नंदकुमार बेंडाळे - स्वातंत्र्यानंतरचे
व आजचे शिक्षण यात खुप बदल झाला आहे. संगणकाचा वापर आणि नेटची उपलब्धता यामुळे
शिक्षण अधिक गतीमान होते आहे. त्यासोबत समाज गतीमान होण्याची गरज आहे. प्राथमिक,
माध्यमिक ते उच्च शिक्षण याच्या उपयुक्ततेचा विचार करायला हवा. शिक्षणाप्रति सरकारची
जबाबदारी निश्चित व्हायला हवी. सरकारची धोरणे आज काही तर उद्या काही आहेत. दहावी,
बारावीची परीक्षा सरकारने रद्द केली. मात्र, उच्च शिक्षणात सर्व ठिकाणी स्पर्धा
किंवा प्रवेश परीक्षा आहेत. त्यामुळे युवक
संभ्रमित होत आहेत. शिक्षण हे विचारशक्ती वाढवणारे असावे. आपल्या भागात
कोणत्या शिक्षणाची गरज आहे यावर सर्वांनी एकत्र मंथन करावे. मनपाने प्राथमिक
शिक्षणाचा संस्कार जपावा. त्यासाठी रोडमॅप तयार करावा. त्यासाठी मनपाने सरकारी
किंवा इतर संस्थांचा निधी आणावा. सरकारी योजनेत निधी मिळतो. मात्र, त्यात अनेक
अडचणी असतात. कायद्यांचा त्रास होतो. मनपाने शिक्षण संस्थांना लावलेल्या विकास कर
दराचा फेरविचार करावा.
स्वतःच स्वतःचे गुरु व्हा –
भैरुदादा

अनिलभाई शहा - विकास म्हणजे
उपभोग्य वस्तुंची उपलब्धता आणि सेवा, अशी आजची व्याख्या आहे. जास्त सुविधा हवी तर जास्त पैसा हवा. मग हा पैसा
कसाही मिळवा असे सूत्र माणूस स्वीकारतो. विकास मोजण्याचे सूत्र जीडीपी आहे. पण हा
जीडीपी अपघात किंवा आपत्तीने वाढतो. कारण, तेव्हा लोकांना व विविध यंत्रणांना काम
मिळते. सेवा-सुविधा मिळवताना आपण समाज व्यवस्था व पर्यावरण बिघडवतो आहोत. शहरे
बकाल व गावे ओसाड होत आहेत. शहरीकरणमुळे गावागाडा बिघडला. लोकसंख्या भरमसाठ वाढली
व सेवा-सुविधांचा असमतोल निर्माण झाला. जादा पैसै मिळवायला नागरिकांची नैतिकता
घसरली. आता येथे आपण कसे बदलणार हे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांसाठी जगावे,
प्रामाणिकपणे कर द्यावा असे आचरण हवे. जसे सरकार व प्रशासन असते तसे करदाते असतात.
त्यामुळे करातून मिळालेल्या निधीचे काय केले याचा जाब प्रशासन व राजकारणी लोकांना
विचारा. सरकारच्या निधीतील गळती रोखा.
थ्रीजी सिस्टीम स्वीकारावी
– बर्वे
शिरीष बर्वे - शहर सुद्धा जिवंत
माणसासारखे असते. श्वास घेते. आजारीही पडते. मात्र, इतरांशी तुलना करताना आपले शहर
आपल्याला नेहमी भकास वाटते. भविष्यात शहर कसे असावे ? हा विचार करताना सर्व प्रथम पर्यावरणाशी जुळलेल्या जीवनशैलीचा
स्वीकार करा. भविष्यात नैसर्गिक साधनांची कमतरता अधिक भासेल. परदेशात टाऊन प्लानर हा
सर्वांत मोठा असतो. आपल्याकडे राजकिय लोक टाऊन प्लानकडे स्वार्थातून पाहतात. आपले विकासाचे
नियम सर्वांत घातक आहेत. जळगावचे प्लस-मायनस विश्लेषण करून विकासाचे नियोजन करावे.
त्यासाठी राजकिय मानसिकता हवी. भविष्यात पाणी, अन्न आणि पर्यावरण याच समस्या
असतील. स्लो ग्रोथ ही कधीकधी संधी असते. शहर घडविण्यासाठी थ्रीजी चा वापर करावा
लागेल. थ्रीजी म्हणजे, ग्लोब (पृथ्वी) गांधी (गांघी विचार) आणि गौतम (बुद्धाचे
विचार)
शंभुअण्णा पाटील - सांस्कृतिक
म्हणजे आपली संस्कृती. जळगावच्या संस्कृतिला इतिहास मोठा नाही, पण जो आहे तो छान आहे.
जळगाव शहरावर विशिष्ट जात-धर्म याचा प्रभाव नाही. येथे लेवा, मुस्लिम, कोळी आणि
मारवाडी समाजाने संमिश्र समाज घडवला. येथे विविध समाजाची सरमिसळ झाली आहे. येथील लोक
सोशिक आहेत. जळगाव शहर सुंदर माणसांचे आहे. त्यांनी चांगले ठरविले तर ते काहीही चांगले
घडवू शकतात. हे शहर समृद्ध आणि सुंदर आहे. शहरातील संस्कृति टीकवून ठेवण्यासाठी शहरातील सर्वच जाती धर्माचे लोक प्रयत्न करतात. आपले जळगाव सुंदर करण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. चांगल्या माणसांमुळे शहर सुंदर होते असे जेव्हा वाटेल तेव्हा शहराचे सौंदर्य आणखी वाढेल. आहेत काही गोष्टी दुरूस्त करायला संधी आहे. त्यासाठी एकत्र बसणे महत्त्वाचे आहे.
सरकार, नेत्यांना आळशी करू
नका – अमळकर
भरतदादा अमळकर – शहर
विकासाच्या विषयावर ऐकणारे थोडे असले तरी ते दमदार असावेत. त्यांच्या माध्यमातून
प्रभावी संदेश दिला जातो. विकासाचे बोलणारी एकच व्यक्ती गुरू असत नाही. कोणतेही संकट
व त्यातून मिळणारी संधी हेच गुरू असतात. राजकिय भांडणे आणि निष्क्रिय प्रशासन यांच्यासमोर
ठरवून काम करावे लागेल. राजकिय जागृतीसाठीही लोकचळवळ हवी. मेहरूण तलावाने लोकसहभागाचा
आदर्श घालून दिला. राज्यकर्ते बदलतात. पक्ष बदलतात. मात्र, त्यांची मानसिकता एकच
असते. समाज व्यवस्था बदलायची तर लोकचळवळ, लोकसहभाग हवा. मात्र, तो भरकटायला नको.
लोकचळवळ ही नागरी समस्यांकडे न्यावी. वाईट काम करणाऱ्या समाजाला योग्य ठिकाणी थांबवावे.
लोकसहभागमुळे प्रशासन व राजकारण निष्क्रीय होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.
मला जळगाव आवडते – अतुल
जैन
अतुल जैन – कोणत्याही
कार्यातील निगेटीव्हीटी पकडू नका. माझं जळगाव वरील प्रेम आणि माझं जळगाव या गोष्टी
कायम मनांत ठेवा. आपले जळगाव लोकांच्या राहाण्यालायक बनविण्याची जबाबदारी आपली
आहे. लोकांना पाणी, रस्ते हवेत. कचरा उचलला जावा. सरकार व मनपाकडून अपेक्षा करताना
नागरिककडूनही चुकीचे घडते आहे. सार्वजनिक पैशांचा वापर सर्वसमावेशक व्हावा. त्याचे
नियोजन केले जावे. मी २५ वर्षांत ८२ देश फिरलो. पण, मला जळगाव
आवडते. मी मुंबईत सुद्धा थांबू शकत नाही. पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व खासगी
वाहतूक यावर शहरांची प्रगती ठरते. त्यात सुधारणा हवी. युवकांना पुढे जाण्याची व संधी,
जागा हवी. कोणतीही चळवळ नको, लोकसहभाग नको. इतरांच्या नकाराला पणच कृतीतून उत्तर
द्यावे. आपणच आपला मार्ग काढावा. आपण सकारात्मक झालो तर त्याचा सर्वांना लाभ होतो.
स्वार्थ ते निःस्वार्थ असे काम करू नका निःस्वार्थ ते स्वार्थ असे काम करा. जळगावकरांनी
जळगावकरांकडून जळगावकरांसाठी काम करून घ्यावे.
एकत्र येणे हाच पर्याय –
के. बी. अण्णा
जळगाव शहराच्या विकासावर
बोलण्यासाठी आपण एकत्र आलो की चांगली बाब आहे. यापुढेही असे एकत्र प्रयत्न सुरू
राहावेत. एकत्र आल्याने प्रश्न सुटतात. त्यावर मार्ग सापडतात.
Nice analysis...
ReplyDeleteछान, दिलीपराव! नेहमीप्रमाणे आगळेवेगळे, समग्र व चपखल लिखाण...
ReplyDeleteछान, दिलीपराव! नेहमीप्रमाणे आगळेवेगळे, समग्र व चपखल लिखाण...
ReplyDeleteTiwari ji, everybody said that whenever you need our help for planning or execution for completing dream project we are available with our knowledge n resources, that was the important and key factor of event
ReplyDelete