Tuesday 12 July 2016

राजकिय नेत्यांच्या वादग्रस्त फोटोंचे पुराण !

गुलाबराव पाटील - सुरेशदादा जैन भेट
(कृपया मजकूर कॉपी पेस्ट करू नये. इतरांना ब्लॉगची लिंक पाठवावी.)

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा जळगावात येवून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यमंत्री पाटील आणि घरकूल घोटाळ्याच्या आरोपांतर्गत कारागृहात असलेले सुरेशदादा जैन यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले. या छायाचित्राने अनेक प्रश्न निर्माण केले. पाटील हे मंत्री झाल्यानंतरची ही भेट आहे का ? कुठे भेट झाली ? न्यायालयात की कारागृहाच्या बाहेर ? राज्यमंत्र्याने आरोपावरून कारागृहात असलेल्या व्यक्तिस भेटणे योग्य की अयोग्य ? असे विषय यातून निर्माण झाले.  
दरम्यान, राज्यमंत्री पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर अशा भेटीचा इन्कार केल्याचा खुलासाही सोशल मीडियात अवतरला. पाटील – जैन भेट बहुधा अगोदरची असावी. त्याचे ते फोटो असावेत. तसा खुलासा कोणीही केलेला नाही. मात्र, वस्तुस्थिती तशी असावी. आता येथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे, पाटील – जैन यांच्या भेटीचा हा फोटो वेळ पाहून सोशल मीडियात का व्हायरल झाला ? जैन यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. जैन हे प्रभावशाली नेते असून त्यांना जामीन दिला तर ते घरकूल घोटाळ्याच्या साक्षीदार व इतरांवर प्रभाव टाकू शकतात, असा दावा यापूर्वी सरकार पक्षाने केलेला आहे. आताही जैनांच्या जामीनास सरकार पक्षाचा आक्षेप असून राज्यमंत्रीच जैन यांना भेटतो, हे दाखविण्यासाठी व्हायरल झालेले छायाचित्र उपयुक्त ठरू शकले असते. जैन समर्थकांची गोची आहे ती अशी.

यापूर्वीही जळगाव मनपाचे काही पदाधिकारी जैन यांना कारागृहात भेटून आल्यानंतर त्यांनी स्वतःचे फोटो व्हायरल केले होते. तेव्हाही कारागृहात असलेल्या जैन यांचे जळगाववर बारीक लक्ष आहे, असा संदेश फोटोसह व्हायरल झाला होता. अतिउत्साही कार्यकर्ते, समर्थक कशा प्रकारे नेत्यांचे नुकसान करतात हे पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो यावरून लक्षात येते. पाटील – जैन फोटो व्हायरल झाल्यानंतर जैनांच्या जामीनाचा अर्ज एक महिना पुढे ढकलला गेला. तो त्यामुळे झाला असे नाही. हा योगायोगच असू शकतो.

एकनाथ खडसेंना अडचणीचा फोटो
फोटोंच्या संदर्भातील असेच तीन विषय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बाबत घडले आहेत. आपल्या अवतीभोवती असलेले कार्यकर्ते किंवा समर्थक कोणत्या हेतूने फोटो काढतील आणि त्याचा सोशल मीडियात त्याचवेळी किंवा नंतर काय उपयोग होईल हे सांगता येत नाही. खडसेंच्या संदर्भात घडलेले तीन प्रसंग असेच आहे.

पहिला प्रसंग हा मुंबईत रेल्वेस्थानकाजवळ घडला. मुंबईकडे जाताना खडसे यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे सकाळी मुंबईत पोहचल्यावर रेल्वेस्थानकाजवळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यातून खडसेंना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खडसेंचे या संदर्भातील फोटो त्यांच्याच जवळच्या लोकांनी मोबाईल कॅमेराने काढून ते लगेच व्हायरल केले. या प्रकारामुळे नंतर खडसे दुखावले गेले. आपल्या प्रकृतीविषयी आपलीच माणसे चुकीचे संदेश देतात हे त्यांनी जाहिरपणे बोलून दाखविले होते. वास्तविक खडसेंच्या सोबत तेव्हा त्यांच्या अत्यंत विश्वासातील मंडळी होती.

शरद पवार - शाहिद बलवा प्रकरण
खडसे यांना दुसरा अनुभव स्व. पीआय सादरे आत्महत्या प्रकरणात आला. वाळू ठेक्याशी संबंधित एका कार्यकर्त्याचे नाव माध्यमांमध्ये चर्चेत होते. त्या नावाच्या कार्यकर्त्याशी जवळीक नसल्याचा पहिला खुलासा खडसे यांनी केला होता. त्यानंतर लगेच खडसेंच्या सोबत त्या कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल झाला. हा फोटो संबंधिताचा व्यक्तिगत फोटो होता. सोबत दोन-चार मित्र असतील. मात्र, तरीही तो फोटो माध्यमांकडे पोहचला. नंतर खडसेंनी संबंधिताशी आपला संपर्क असल्याचे मान्य केले.

खडसेंनी तिसरा अनुभव मुक्ताईनगरच्या एका दुसऱ्या कार्यकर्त्याच्या संदर्भात आला. त्याने ३०  कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातही खडसे आणि त्या कार्यकर्त्याचे संबंध दाखविणारे फलकांचे फोटो लगेच व्हायरल झाले.
वरील तीनही प्रकरणात खडसेंच्या सोबत असलेल्या मंडळींनीच व्यक्तीगत मोबाईलमधील फोटो अतिउत्साहात व्हायरल केल्याचा फटका त्यांना बसला. कोणत्याही नेत्यासोबत फोटो काढायला हौशेगौशे प्रयत्न करीत असतात. नेत्यांना नाही म्हणता येत नाही. कोणती व्यक्ती काय करते, त्याचा हेतू काय ? हे नेत्यांना समजत नाही. नंतर काही वादाचे किंवा गुन्हेगारीविषयक प्रश्न उद्भवले की, सहज काढलेल्या फोटोंचा चुकीचे संदेश देण्यासाठी वापर व्हायला लागतो. हा अनुभव वारंवार येत आहे.

ललित मोदी - प्रियंका गांधी वाड्रा प्रकरण
नेत्यांसोबत क्रिमिनल लोकांच्या फोटोंचे पुराण खुप जुने आहे. अशा प्रकारच्या फोटोमुळे ज्येष्ठनेते शरद पवार दोन वेळा अडचणीत आले आहेत. पवार संरक्षणमंत्री असताना त्यांच्या सरकारी विमानाच्या दिल्ली – मुंबई प्रवासात यांच्या सोबत संशयित आरोपी असलेले शर्मा बंधू आल्याचे फोटो माध्यमांमध्ये आले होते. तेव्हा मुंबईचे आर. आर. सिंह यांच्या सूचनेवरून त्या दोघांना सोबत आणले असा खुलासा पवार यांना करावा लागला होता. अगदी अलिकडे पवार यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी शाहिद बलवा यांच्या विमानातून प्रवास केल्याचाही विषय चर्चेत होता. हा विषय खडसे यांनी विधीमंडळात विरोधी पक्षनेता असताना मांडला होता.

सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका व जावाई रॉबर्ट वाड्रा हे लंडनमध्ये आश्रित आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललीत मोदी यांना भेटल्याचे प्रकरणही असेच आहे. या कॅज्युअल भेटीचे वृत्त व फोटो ललीत मोदी यांनीच व्हायरल केले होते. असे करण्यामागे त्यांचा स्वतःचा दृष्टीकोन स्वच्छ नव्हता.

आजारपणाच्या संदर्भातील अत्यंत खासगी फोटो व्हायरल करून चुकीची माहिती देण्याचा प्रकार स्व. आर. आर. पाटील यांच्या विषयी सुद्धा घडला आहे. कॅन्सरवरील उपचाराच्या दरम्यान स्व. पाटील हे व्हिलचेअरवर असतानाचा फोटो त्यांच्याच निकटवर्तीयांनी व्हायरल केला होता.

सौ. अमृता फडणवीस व बाबाने दिली माळ प्रकरण
फोटो वादाचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता यांनाही बसला आहे. पुण्यात एका बाबाने चमत्कार करून माळ काढली आणि ती सौ. अमृता यांना दिली. हा प्रकार अंधश्रध्देला खतपाणी घालणारा होता. हा फोटो सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून व्हायरल झाला आणि वादग्रस्त ठरला होता.

प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असतानाचा असे अनेक फोटो जळगावमध्ये चर्चेत होते. प्रतिभाताई राष्ट्रपती भवनात असताना त्यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जात. तेथे प्रतिभाताईंच्यासोबत उभा राहून फोटो काढत. जळगावच्या रेशन घोटाळ्यातील व्यक्तीने असा एक फोटो काढून आणला होता. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे तो रेशनदुकानदार जिल्हा परिषद, तहसील कार्यालयात फिरताना त्या फोटोची प्रींट सोबत घेवून फिरायचा.

वरील सर्व उदाहरणे ही नेते किंवा सेलिब्रीटी यांच्या संदर्भात अनावधानाने, माहित नसताना किंवा विशिष्ट हेतूने काढलेल्या फोटोंच्या संदर्भात घडलेली आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी आता नेत्यांसह त्यांच्या विश्वासू समर्थक, कार्यकर्ते यांनी सजग होणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी काही लोकांच्या सोबत फोटो काढायला थांबविणे किंवा नकार देणे असे कार्य करणे आवश्यक झाले आहे. हेतू शुद्ध नसतील तर नेत्यांची अडचण होण्याचे प्रकार असेच सुरू राहतील. वादग्रस्त फोटो पुराण असेच पुढे सुरू राहील. 

No comments:

Post a Comment