Wednesday 15 June 2016

जळगावच्या मेहरुण तलावाने दिला सकारात्मक लोकसहभागाचा धडा

जळगावकरांना समुह विकासासाठी एकत्र येण्याची कार्यशैली व मानसिकता बदलावी लागणार आहे. जळगाव शहर हे केवळ बोलून सुंदर होणार नाही तर ते सुंदर करण्यासाठी साऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे. समुह आणि सामुहिक विकासात लोकसहभाग, लोकवर्गणी व लोकलेखा मूल्यांकन आवश्यक असते. त्याची फल स्वरुप अनुभुती याचवर्षी मेहरूण तलाव तुडुंब भरल्यानंतर प्रत्येक जळगावकराला येणार हे निश्चित. म्हणून म्हणावेसे वाटते की, एका तलावाचे खोलीकरण समाजाला सभ्यता आणि सहृदयता शिकवून देत आहे. आता आपण एकत्र येवून मनामनांतील गाळ उपसण्याची गरज आहे. हे काम यंत्राद्वारे होवू शकत नाही. ते आपणच आपले केले पाहिजे.

जळगाव शहर. अनेक स्थित्यंतराचे ठिकाण.  राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आडवळणांची अनेक परिवर्तने या शहराने पाहिली. बहुतांश सकारात्मक व काही नकारात्मक सुद्धा. व्यापार-उद्योग-व्यवसायाचे शहर म्हणून जळगावला चेहरा-मोहरा लाभला. अर्थकारणाच्या कक्षा विस्तारताना दातृत्वाचे छत्रही अनेकांनी उभारले. काही मान्यवर दात्यांची उभ्या महाराष्ट्रात ओळख झाली.

सामाजिक विकासात लोकसहभाग आणि लोकवर्गणीचा लक्षवेधी जळगाव पॅटर्न पूर्वी स्व. मधुकरराव चौधरी आणि स्व. जे. टी. महाजन यांनी जोपासला. ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधांची अनेक कामे लोकवर्गणीतून उभी राहिली. त्या काळात राजकारणी बोलत आणि जनता ऐकत असे. नंतरच्या काळात व्यापारी-उद्योजकांच्या दातृत्वातून शहरी भागात सामाजिक सुविधांचे काही लहान प्रकल्प उभे राहिले. यात जलमंदिर, चौक सुशोभिकरण करण्यात आले. शहराला सुंदर चेहरा देण्याचे काम यातून झाले. राजकारणी विनंती करीत आणि उद्योजक-व्यापारी त्यांचे ऐकत असत. यानंतर आलेला बीओटीहा विकास फॉर्म्यूला शहर व जिल्हावासियांना मानवला नाही. त्यातून रस्त्यांची कामे वगळता फार काही उभे राहिले नाही. अशा योजनांसाठी सरकार बोलत असे आणि ठेकेदार ऐकत असत..
-------------------------------------------------------------------------------------


जिल्हाधिकारी म्हणतात ...

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मेहरुण तलावाच्या खोलीकरण व सुशोभिकरणाच्या कामात खुप रस घेतला आहे. महापौर लढ्ढा, स्थायी समिती सभापती बर्डे यांच्या सोबत सातत्याने त्या संपर्कात आहेत. मेहरुण बांधासाठी पिंचिग करायला ६५ लाख, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ६० लाख, वृक्षारोपणासाठी विशेष निधी, हायमास्ट लॅम्पसाठी निधी देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. 

जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या, अधिकारीवर्ग निधी द्यायला तत्पर असतो. मात्र, तो विकासावर खर्च व्हायला हवा. महापालिकेच्या टीमने आता जी धडाडी दाखविली आहे, ती पाहून मला वाटते निधी खर्च होवू शकतो. जळगावच्या नागरिकांचा लोकसहभागही उत्साह वाढविणारा आहे.
-------------------------------------------------------------------------------------


बदलत्या काळाने राजकारण आणि विकासाची धोरणेही बदलून टाकली. समन्वय, सहकार्य आणि आदराचे राजकारण संपून सत्ता व सामर्थ्याचे प्रदर्शन सुरू झाले. लोकवर्गणी व लोकसहभागचे विकास धोरण बाजुला पडून शंभर टक्के अनुदानातून विकास कामे हे नवे धोरण अस्तित्वात आले. म्हणजेच, सर्व प्रकारच्या सामुहिक विकासाची कामे सरकारच्या अखत्यारित गेली आणि सरकारमधील सत्ताधारी मंडळी अनुदानाच्या खेळात हवे ते साध्य करू लागली. त्यातून होणाऱ्या भव्यदिव्य विकासाच्या काही कहाण्या नकारात्मकता घेवून जन्माला आल्या. विकासाचे मूल्यमापन तकलादू, कमकुवत व अल्पावधीचे ठरले. अनुदानाची उड्डाणे कोट्यवधींच्या घरात जावून सत्ताधारी व ठेकेदार मालामाल व मस्तवाल झाले. अशा बदलांचा व परिवर्तनाचा कमी अधिक परिणाम जळगाव शहरावरही काळानुरूप झाला. कालातंराने सरकारी गंगाजळी आटली आणि सरकारी धोरण पुन्हा खासगीकरणाकडे वळले.

भौतिक स्वरुपातील विकास थांबला, खुंटला पण मानवी सहृदयता, सहाय्यता आणि सहकार्य हे सार्वत्रिक व समुह विकासाचे गुणही ओहटी लागल्यागत आटले. राजकारण जितके टोकदार होत गेले तेवढ्याच लोकांच्या संवेदना संपून त्या केवळ वेदना स्वरुपात राहिल्या. कोणताही वेदना ही सल आणि दरी वाढवते. जळगावात तसे काही घडत गेले. जळगावकर विभागले गेले. सकारात्मकता, सहकार्य, सामुहिकता या गुणांचा शॉर्टफॉल निर्माण झाला. यात फरक एवढा होता की, शहर विकासाची यंत्रणा असलेल्या महानगपालिकेविषयी लोकांच्या मनात निराशा निर्माण झाली. लोकप्रतिनिधी उदासिन आणि अधिकारी नाकर्ते असे हे आजचे चित्र आहे.

कोणताही स्थिती ही चिरकाल असत नाही. त्यात बदलाचा माईलस्टोन कोणीतरी रोवत असतो. तो नव्या दिशेकडे आणि नव्या आव्हानांकडे घेवून जाण्याचा मार्गदर्शक असतो. जळगावकरांमधील बदलाचा एक माईलस्टोन रोवण्याचे काम सध्या सुरू आहे. सामुहिक विकास हा लोकसहभाग आणि लोवर्गणीतून आजही शक्य असल्याचे एक हृद्य उदाहरण जळगाव लगतच्या मेहरुण तलाव खोलीकरण व सुशोभिकरणाच्या रुपात आकाराला येत आहे. पदाधिकारी, अधिकारी यांची एकत्रित कल्पकता, काम करण्याची तयारी आणि मान्यवरांच्या दातृत्वाचा ओघ अशा तिहेरी संगमातून मेहरूण तलाव नव्या आकारात साकारतो आहे.

तीन महिन्यांपूर्वी जळगाव महापालिकेच्या महापौरपदी नितीन लढ्ढा आणि उपमहापौरपदी ललीत कोल्हे यांची निवड झाली. दोघांचीही शहरासाठी सामुहिक काम करण्याची ईच्छा आहे. लढ्ढा हे महानगर पालिकेतील अनुभवी नेते आहेत. शहराच्या अनेक प्रश्नांची जाण त्यांना आहे. पदामुळे त्याचा निराकरणाचा अधिकारही आहे. महानगर पालिकेच्या कार्यपद्धतीविषयी त्यांचा उत्तम अभ्यास आहे. कोल्हे यांनी एल. के. फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने शहर स्वच्छतेचा वसा चालवला आहे.

महिनाभरापूर्वी लढ्ढा यांनी मेहरूण तलावाच्या विविध समस्या व परिसरातील अडचणींकडे लक्ष वेधले. लढ्ढा यांनी तलावातील पाणी गळती थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. याच काळात तलावातील गाळ काढण्याचा विषय पुढे आला. लढ्ढा यांनी या कामासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विनंती केली. महाजन यांनी अधिकाऱ्यांना विचारले. तलावाच्या खोलीकरणासाठी काही निधी देता येईल का ? निधी नाही, पण जलसंपदा विभागाची यंत्र देता येईल असे सांगण्यात आले. ही यंत्रे आणण्यासाठी इंधन खर्च हवा होता. लढ्ढा यांनी महानगर पालिकेतून ५ लाख रुपये दिली. त्यानंतर यंत्रे तलावात येवून काम सुरू झाले. काही बाबींसाठी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले.

मेहरूण तलावातील गाळ काढण्यासाठी समाजातील काही उद्योजक, व्यापारी, सहकारी संस्था, दानशूर मंडळी मदत करतील हा विश्वास ठेवून लढ्ढा यांनी त्यांना शब्द टाकला. जळगावातील सामाजिक स्थित्यंतराचा नवा अध्याय लिहीण्यास येथून प्रारंभ झाला. जैन उद्योग समुह, रेमंड, सुप्रीम, जळगाव पीपल्स बँक, के. के. कॅन्स, महिंद्रा हॉटेल, जिल्हा इंजिनियर्स असोशिएशन, क्रेडाई असे अनेक जण समोर आले. येथे अर्थव्यवहाराचा एक मुद्दा महत्त्वाचा होता. महानगर पालिकेने कोणत्याही दात्याकडून रक्कम मागितली नाही. धोरण असे ठरविले की, संबंधित दात्यांनी थेट जेसीबी, पोकलॅण्ड किंवा बुलडोझर यंत्रणा आणावी. गाळ उपसून तो डंपरने वाहून न्यावा. या कामाचा खर्च परस्पर चुकता करावा. यात महानगर पालिकेशी अर्थव्यवहाराचा संबंध नसल्याने लोकसहभाग देण्यास तयार असलेल्या संस्थांनी आपापल्या संपर्कातील यंत्रणा तलावात उतरवली. त्यामुळे दिवसागणीक तलावातील गाळ उपसला जावू लागला.

मे महिन्याच्या उत्तरार्धात गाळ उपसण्याचे काम  लक्षवेधी स्तराला पोहचले. अवाढव्य स्वरुपात निघणारा गाळ हा तलावाच्या काठावर टाकून पेरीफेरीचा मार्ग तयार करणे सुरू झाले. तलाव खोल होत असताना आजुबाजूला रस्ताही विस्तारू लागला. जे. के. पार्क लगतचा बंधाराही मजबूत करण्यात आला. आता या बंधाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी दगडाचे पिचिंग केले जाणार असून त्यावर साधारणपणे ६५ लाखांवर निधी जिल्हा विकास नियोजन समितीकडून मिळणार आहे.

मेहरुण तलावाच्या परिसरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महानगर पालिकेने सव्वा कोटी रुपयांचा प्रस्ताव नगरोत्थान योजनेत सादर केला आहे. त्यात ५० टक्के निधी म्हणजे ६० लाखांचा निधी देण्यास जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंजुरी दिली आहे.

मेहरुण तलावाचे आजचे क्षेत्र ६२ हेक्टर आहे. पाणी साठा क्षमता ३६.६५ लाख घनमीटर आहे. तलावाची सरासरी खोली ५.७५ मीटर आहे. तलावा शेजारील पाणलोट क्षेत्र.६.५० किलोमीटर आहे. तलाव खोलीकरण मोहिमेत जवळपास ३० हजार ब्रास गाळ काढण्यात आला. यासाठी जवळपास १०० डंपर लागले. यामध्ये ६० खाजगी तर ४० शासकीय डंपरचा समावेश आहे.  गाळ काढल्याने तलावाची खोली सरासरी ३ ते ५ फुटाने वाढले आहे. त्यामुळे त्यात जवळपास ७ कोटी लिटर्स वाढीव पाणीसाठा होवू शकेल. पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ काढणे सुरू राहणार आहे. 

मेहरुण तलावाच्या या खोलीकरणाची मोहिम जळगाव शहरात लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून समुह व सामुहिक विकासाचे नवे पर्व निर्माण करणारी आहे. महापौर नितीन लढ्ढा,  जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थाती समितीचे सभापती नितीन बर्डे, सुप्रीमचे प्रभूदेसाई, जळगाव पीपल्स बँकेचे  भालचंद्र पाटील, के. के. कॅन्सचे रजनिकांत कोठारी, महिंद्रा हॉटेलचे तेजा महिंद्रा आदींच्या एकत्र येण्यातून या पर्वाचा माईलस्टोन रोवला गेला आहे. पावसाची अजुनही प्रतिक्षा असल्यामुळे तलावाचे खोलीकरण अद्यापही सुरू आहे. राजकारणाच्या उलथापालथीत या सकारात्मक घटनेकडे तसे जळगावकरांचेही दुर्लक्ष झाले आहे.

आता जळगावकरांना समुह विकासासाठी एकत्र येण्याची कार्यशैली व मानसिकता बदलावी लागणार आहे. जळगाव शहर हे केवळ बोलून सुंदर होणार नाही तर ते सुंदर करण्यासाठी साऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे. समुह आणि सामुहिक विकासात लोकसहभाग, लोकवर्गणी व लोकलेखा मूल्यांकन आवश्यक असते. त्याची फल स्वरुप अनुभुती याचवर्षी मेहरूण तलाव तुडुंब भरल्यानंतर प्रत्येक जळगावकराला येणार हे निश्चित. म्हणून म्हणावेसे वाटते की, एका तलावाचे खोलीकरण समाजाला सभ्यता आणि सहृदयता शिकवून देत आहे. आता आपण एकत्र येवून मनामनांतील गाळ उपसण्याची गरज आहे. हे काम यंत्राद्वारे होवू शकत नाही. ते आपणच आपले केले पाहिजे.

 मेहरुण तलावाचा इतिहास

इसवी सन १२ व्या शतकात मेहरुण तलाव हा दंडकारण्याचा भाग होता, असे मानले जाते. हा भाग ओसाड व निर्जन होता. येथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गोरक्षनाथ व त्यांच्या शेकडो शिष्यांनी हा तलाव खोदला, अशी दंतकथा आहे. तोच तलाव हा "मेहरूण तलाव". गोरक्षनाथांचे "अमरसंवाद" आणि "नवनाथ पदे" या जुन्या लोकगीतातून या तलावाचा उल्लेख आढळतो.

दुसरा संदर्भ असा आहे की, ब्रिटीश काळात मेहरुणी नाल्याचे पाणी अडवून हा तलाव तयार केला गेला. सन १८७६ ला दुष्काळ पडला म्हणून मेहरूणचा तलाव मोठा करण्यासाठी जळगाव नगरपालिकेने ८० हजार रुपये खर्च करून तलावाचे विस्तारीकरण केले. दि. २९ जुलै १८७७ ला तलावाजवळ बंधारा बांधण्यासाठी ब्रिटीश सरकारने जळगाव नगरपालिकेला ६५ हजार रुपये कर्ज दिले होते. सन १८७९ मध्ये बॉम्बे ऐक्टनुसार या तलावास शासकिय जागा म्हणून घोषीत करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात तलाव भरल्यानंतर बंधारा फुटत होता म्हणून त्यावर १९६८ ला शिसे ओतून पक्का बंधारा तयार करण्यात आला, अशी नोंद आहे. १९७९ मध्ये वन विभागानेही शासन दप्तरी मेहरुण तलावाची नोंद केली.

गांधीतिर्थचा असाही सहभाग

जळगाव शहरात सार्वजनिक उपक्रमात सकारात्मक लोकसहभाग वाढावा म्हणून गांधीतिर्थच्या माध्यमातून नवी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. माय सिटी माय ड्रिम या संकल्पनेअंतर्गत आपले विचार आपले जळगाव हा उपक्रम सुरू होत आहे. यात कोणीही व्यक्तिगत स्तरावर किमान ३२ हजार रुपयांची मदत केल्यानंतर नेहरुण तलावाच्या कामावरील एक दिवसाचा खर्च भरुन निघणारआहे. अशा व्यक्तिगत दात्यांना आवाहन करणारे फलक शहरात लावण्यात येत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९८२२६५०२४५ वर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment