![]() |
पाऊस पाडण्यासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर |
जळगाव
जिल्ह्यात पावसाने ताण दिली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या
आठवड्यापासून पाऊस नाहीच. शेतकऱ्यांसह साऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. पेरण्यांची काहीही तयारी नाही. बियाण्यांच्या
दराचाही घोळ आहेच. बाजारपेठेतही हालचाल नाही. राजकारण हे क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रात वातावरण डल, निस्तेज आहे.
पाऊस
लांबला की, देवाधर्माचा धावा सुरू होतो. पाखंडी लोकांचे फावते. मग सुरू होतात
अंधश्रद्धेचे प्रयोग. अगदी पर्जन्ययागापासून, महादेवाचा
गाभारा पाण्याने भरणे, गणपती पाण्यात बुडवून ठेवणे किंवा गावभर धोंडी मिरवणे.
बेकडाचे लग्न लावण्याचा महामूर्ख प्रयोगही होतो. पावसासाठी सामुहिक प्रार्थनेचाही
कार्यक्रम घेतला जातो. हे आहेत नेहमीचे अनुभव. यातील होम
हवनचा पर्याय चाळीसगाव येथे अलिकडे झाला.
सामुहिक प्रार्थनेचे इतर जिल्ह्यातील एक दोन ठिकाणचे फोटो व्हायरल होत आहेत. जसा जसा पाऊस लांबेल
तसे इतर प्रयोग सुरू होतील.
![]() |
महामंडलेश्वर भवानी नंदनजी महाराज |
पाऊस
पाडण्याचा दावा करणाऱ्या या पाखंडी महंताच्या वक्तव्यासोबत अजून एक बातमी चर्चेत
होती. ती म्हणजे, भारताच्या इस्त्रोने गुरूवारी (दि. २२ जून) एकाचवेळी २० उपग्रह
अवकाशात सोडून विक्रम केला. यात भारताचे तीन व इतर देशांचे १७ उपग्रह होते. ज्या अवकाशात भारताचे शास्त्रज्ञ
विज्ञान, संशोधनाची मक्तेदारी निर्माण करीत आहेत तेथे
एक महंत पाऊस पाडण्याचे आपल्यात सामर्थ्य असल्याचा दावा करीत आहे. या सारखा भयंकर विनोद भारतातच घडू शकतो. खरे तर भारताची ओळख
इस्त्रोमुळे व्हायला हवी. तसे होत नाही.
पावसाच्या
अंदाजासंदर्भात एक विनोदही चर्चेत आहे. तो म्हणजे, हवामान खात्यातील नोकरी सर्वांत
चांगली असते. कारण, अंदाज चुकला तरी कोणी
खुलासा विचारत नाही. पाऊस आला तर आला, नाही आला तरी नोकरी जात नाही. हे अपयश आहे
सरकारचे. परदेशात पासाचे अंदाज दर तासाला दिले जातात. आपल्याकडे पावसाचे अंदाज २४
तासात दिले जातात. परदेशात हवामानविषयक अंदाज देणाऱ्या खासगी संस्थाच्या वेबसाईट
आणि मोबाईल ऍप असतात. आपल्याकडे महाराष्ट्रात आजही बुलडाणा
जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणीवरून पावसाचा अंदाज काढला जातो. सरकारच्या शेतीमित्र हेल्पलाईन डेड असतात किंवा सुरू
केल्यानंतर भरलेली माहिती पुन्हा अपडेट होत नाही.
![]() |
पाऊस पाडण्यासाठी हवे रडार |
पाऊस
लांबला की, आजकाल एक मागणी सरकारकडे केली जाते. ती म्हणजे, कृत्रिम पाऊस पाडा.
गंमत त्याच्या पुढे असते. सरकारमधील मंत्रीही सांगतात, सरकार कृत्रिम पाऊस पाडणार.
कृत्रिम पाऊस म्हणजे काय ? हे मंत्रीही नीटपणे
सांगू शकत नाहीत. कोणताही पाऊस कृत्रिम नसतो. पाऊस हा नैसर्गिकच असतो. ती
पाडण्याची स्थिती कृत्रिमपणे निर्माण करता येते. आकाशात पुरेसे बाप्ष असलेले ढग आढळले की त्यातून पाऊस पाडणे शक्य होते.
पुरेसे बाप्ष म्हणजे, काळेशार ढग. अशा प्रकारचे ढग आकाशात असले की, त्यात मीठासारखे किंवा सोडीयमचा अंश असलेले द्रावण फवारून पाऊस पडण्याची शक्यता असते. कोणतेही ढग
जमिनीपासून किमान सहा हजार फुटांवर असतात. त्यातून पाऊस पाडायचा तर प्रामुख्याने
आकाश निरीक्षणासाठी रडार आणि ढगांमध्ये शिरून द्रावण
फवारणीसाठी विमान किंवा हेलिकॉप्टर हवे असतात. काही ठिकाणी द्रावणाचे रॉकेटही सोडले जातात. या विषयी मी स्वतः खामगाव येथे
तीन-चारवेळा जावून प्रकल्प वर्षाच्या अधिकारी व तज्ञांकडून माहिती घेतली होती.
तेथेच हवामान व पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी हा विषय समजून सांगितला होता.
आपल्या
सरकारच्या धोरणांची ही शोकांतिका आहे की, पावसाचा अंदाज देण्यासाठी आजही
महाराष्ट्रात कुठेही स्वतंत्र रडार यंत्रणा नाही. शिवाय, त्यासाठी लागणारी विशिष्ट
विमाने, हेलिकॉप्टर नाहीत. यंत्राद्वारे
पाऊस
पाडायचा तर सरकारला तशी यंत्रणा भाडोत्री तत्वावर आणावी
लागते. तशी ती आणली जाते. मात्र, आकाशात काळे ढगच (बाष्पयुक्त) नसतील तर कोट्यवधींचा खर्च
होवूनही पाऊस पाडता येत नाही. तसे झाले की, सरकारच्या
प्रयत्नांची टींगल टवाळी होते. जशी रेल्वेने लातूरला पाणी पुरवठ्याची झाली.
असाच
एक टवाळखोर प्रयोग दोन-तीन वर्षांपूर्वी जामनेर येथे करण्यात आला होता. गुजरातमधून
आलेल्या एका माणसाने ब्लोअरचा वापर करून पाऊस पाडू शकतो असा दावा केला होता. ब्लोअर
म्हणजे कुलरमध्ये असतात तसे पंखे. बाहेरील हवा आत ओढून थंड हवा (बाष्पयुक्त हवा)
बाहेर सोडणारा पंखा. त्या व्यक्तीला गावाजवळच्या एका टेकड्यावर थांबविण्यात आले
होते. त्याने तेथे एक ब्लोअर लावलेला होता. त्यातून दिवसरात्र वरच्याबाजूला हवा
सोडली जात होती. हा वीजेचा अपव्यय होता. मी स्वतः तीनवेळा जावून त्या व्यक्तीला ब्लोअरद्वारे
पाऊस कसा पडेल ? असे विचारले होते.
त्याचे उत्तर हास्यास्पद होते. तो म्हणायचा, ब्लोअरद्वारे बाष्पयुक्त हवा आकाशात जाईल आणि तेथे बाष्प (म्हणजेच ढग)
गोळा झाले की पाऊस पडेल. तो तद्दन फालतूपणा होता. त्याला काहीही शास्त्रीय आधार
नव्हता. ज्यांच्या मदतीने ती व्यक्ती प्रयोग करीत होती, ते आज राज्याचे
जलसंपदामंत्री आहेत.
परदेशात
शेतकऱ्यांना खासगी हवामान संस्था ढगांची माहिती देतात. ढगांमध्ये असलेले बाष्प, वाऱ्याचा वेग याचाही अभ्यास
त्यासाठी लागतो. तेथे बहुतांश शेतकऱ्यांकडे छोटे विमान असते. हवे तेव्हा उड्डाण
करून ढगांत द्रावण फवारणी करून ते पाऊस पाडून घेतात.
![]() |
रडारमुळे ५० एअर माईल क्षेत्रातील ढगांचे फोटो मिळतात |
आपल्याकडचे समुह मानसशास्त्र आजही “मेंढी किंवा म्हशीच्या” कळपांचे अनुकरण करणारे आहे. एकाने केले किंवा नाही केले की सर्वजण तसेच करतात. मागीलवर्षी जलयुक्त शिवार योजनेत नाला, तलाव खोलीकरण कामे सरकारी यंत्रणा करीत होती. तेव्हा लोकसहभाग नगण्य होता. मात्र, यावर्षीच्या भयावह दुष्काळ व पाणी टंचाईमुळे अनेक ठिकाणी लोकांनी पुढाकार घेवून जलयुक्त शिवारप्रमाणे कामे केली आहेत. पाऊस आल्यानंतर त्याचे निश्चित चांगले, सकारात्मक परिणाम दिसतील. प्रतिक्षा करावी लागेल.
आता
येथे अजून एक मुद्दा महत्त्चाचा आहे. आपल्याकडे आजही पर्यजन्य मापके ही तालुका
पातळ्यांवर लावली जातात. संपूर्ण तालुक्याच्या पावसाची सरासरी अशा एखाद्या पर्जन्य
मापकावर केलेल्या नोंदीमुळे काढली जाते. अलिकडे काही वर्षांतला अनुभव असा आहे की,
एका तालुक्यातही वेगवेगळ्या सरासरीने वेगवेगळ्या भागात पाऊस होतो. काही भाग कोरडा
राहतो किंवा काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो. याचा फटका दुष्काळाचे निकष
लावताना होतो. पाऊस सरासरीपेक्षा जास्त, त्यामुळे पिकांची पैसेवारी सरासरीपेक्षा
(५० टक्केपेक्षा) जास्त येते. कोरड्या भागातील शेतकरी बिच्चारा ओरडून ओरडून थकतो.
दुष्काळी अनुदान काही मिळत नाही. हा अनुभव लक्षात घेवून प्रत्येक गावात किमान एक
पर्जन्य मापक यंत्रणा लावण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. होम हवन, धोंडी, प्रार्थना, बेडकाचे
लग्न हे पर्याय न स्वीकारता पर्जन्यमापक लावण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
![]() |
गारपीट रोखणारे कथित यंत्र |
पावसाशी संबंधित विषय
असल्यामुळे अजून एक विषय वारंवार समोर मांडला जातो. त्यावरही लक्ष दिले पाहिजे.
पाऊस पडत नाही तसा तो जास्त पडून अतिवृष्टी होते. अतिवृष्टी रोखण्यासंदर्भातील
यंत्रही तयार केल्याचा दावा बुलढाणा
जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. त्यात स्केलर एनर्जीचा वापर केला असे म्हटले
जाते. या एनर्जीची निश्चित समजेल अशी संकल्पना नाही. बहुतांश शास्त्रज्ञ ही एनर्जी
मानत नाहीत. मात्र, हा प्रकारही तसा गोंधळाचाच आहे.
भयावह पाणी टंचाईने जसे
मराठवाड्याला पाणी अडवा-जिरवा, जलयुक्त शिवार, नाला-तलाव खोलीकरण याचे शहाणपण दिले
तसे पाऊस होत नसल्यास काय करावे आणि काय करू नये ? याचेही शहाणपण आपण आता स्वीकारायला हवे. पावसासाठी टेकड्यांवर वृक्षारोपण,
जलपुनर्भरण, पर्जन्य मापकांची नोंद याचा विचार करायला हवा. अशा शहाणपणातून आपली
जलसाक्षरता वाढेल. पावसाचे गणित आपल्याला समजू शकेल.
संदर्भासाठी एक लिंक - http://hindi.revoltpress.com/nation/we-are-able-for-raining-says-a-saint/
No comments:
Post a Comment