Sunday 5 June 2016

रक्षा खडसेंना कामाची अधिक संधी !

राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देवून एकनाथराव खडसे बाहेर पडले आहेत. काही काळानंतर मंत्रीमंडळात खडसे कमबॅक करतील याविषयी शंका नाही. खडसेंवरील कथित आरोपांच्या चौकशीला निवृत्त न्यायाधिश किती वेळ घेतील हे सांगता येत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागातील गैरव्यवहारांशी संबंधित आरोपांमुळे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून काही काळ मंत्रीमंडळाच्या बाहेर राहणे पसंत केले होते. पण, त्यांच्या कमबॅकची फिल्डींग त्यांच्या राजीनाम्याच्या दिवशीच लागली होती. चौकशीचा फार्स अवघ्या सहा महिन्यांत आटोपून व जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढून पवार हे मंत्रीमंडळात परतले होते. 

दुसरे उदाहरण सुरेशदादा जैन यांचे आहे. अण्णा हजारेंनी सुरेशदादांवर विविध प्रकारच्या गैरव्यवहारांचे आरोप केल्यामुळे आघाडी सरकारने जैनांचा राजीनामा घेतला होता. जैनांनाही कमबॅकचे आश्वासन मिळाले होते पण, ते पक्षाच्या श्रेष्ठींनी पाळले नाही. खडसेंच्या बाबतीत या दोन्ही उदाहरणांपैकी भविष्यात काय घडते ? हे काळच दाखवून देईल. खडसेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर दोन दिवस माध्यमांमध्ये वारंवार चर्चा नेतृत्वाची होती. अर्थात, जिल्ह्याच्या राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर आजही खडसेंची पकड कायम आहे. सहजासहजी तेथे कोणताही पडझड होणार नाही. अजुन काही काळ खडसेंवरील निष्ठा दाखविण्याचा फिव्हर लाभार्थी मंडळीत असेल. खडसेंच्या भोवतीचा गोतावळाही कमी होणार नाही. अशा वातावरणात खडसे परिवारातून आता कोणाला तरी एक हाती नेतृत्वाची तयारी करावी लागेल. या संभाव्यस्थितीत खासदार रक्षा खडसे यांना दिल्लीसह राज्यातील राजकारणात एक पाऊल पुढे जावून काम करण्याची संधी दिसत आहे. त्यासाठी सासरे खडसेंचे मार्गदर्शन त्यांना मिळेल. शिवाय, खडसेंच्या कार्यकर्त्यांना शासन, प्रशासन, सामाजिक क्षेत्रात पाठबळ देण्याचेही कामही त्यांनाच करावे लागेल. कारण, आता खडसे अनेक कामात व्यक्तीगत लक्ष घालण्यापेक्षा काही काळ दिशादर्शनाचे काम करू शकतील. १२ खात्यांचे मंत्री म्हणून त्यांना करावी लागणारी धावपळ, दगदग आता थांबणार आहे.

गेली दोनवर्षे खासदार म्हणून रक्षा खडसे यांनी केलेले कार्य निश्चित लक्षवेधी आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या वाढदिवशी दि. १३ मेस विविध दैनिकात प्रसिद्ध पुरवण्यांमधून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा उत्तमपणे मांडला गेला आहे. त्या मेहनती असून लोकांच्या गरजा, समस्या समजून घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की त्या संगणक विज्ञान शाखेत पदवीधर आहेत. दिल्लीतील मंत्रालयात मंत्री व सचिवस्तरावर त्यांनी बऱ्यापैकी ओळख निर्माण केली आहे. खडसेंच्या स्नूषा म्हणून त्यांना सहकार्य व आदरही मिळत असतो. तेथील कामाच्या कक्षा त्या अधिक रुंदावू शकतात.

रक्षा खडसे या साधारणतः २०१० मध्ये राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. नंतर त्या सरपंचही झाल्या. हे काम करताना त्यांना सामान्य लोकांचे आणि गावाचे प्रश्न कळले. ते सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. २०१२ च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या कोथळी गटातून रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होण्याचीही संधी मिळाली.


 २०१४ मध्ये १६ व्या लोकसभेची निवडणूक झाली. रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून विजयी झाल्या. त्यांनी कार्यपद्धतीत अधिक सुधारणा करून प्रभावी जनसंपर्क वाढविला आहे. लहान-मोठ्या गावात सामान्य लोकांच्या कार्यक्रमासही त्या आवर्जून हजर असतात. मुक्ताईनगर तालुक्यात अधिकाऱ्यांच्या बैठका, रेल्वे-दूरसंचार विभागाच्या बैठका, जिल्हास्तर नियोजन बैठकांमध्ये रक्षा खडसेंचा सहभाग सक्रीय असतो. रेल्वेच्या नोकर भरतीत खान्देशी युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक जलद रेल्वेगाड्यांना जळगाव, भुसावळ व इतरत्र थांबे मिळवून दिले. पंढरपूर, पुणे, मुंबईसाठी नव्या गाड्या सुरू केल्या. हातेडसारखे छोटे गाव त्यांनी दत्तक घेतले. तेथे जवळपास ४० लाखांवरील कामे प्रस्तावित आहेत. खासदार म्हणून मिळणाऱ्या निधीतून त्यांची रुटीनची कामे सुरूच आहेत.

जळगाव जिल्ह्याशी संबंधित महत्त्वाकांक्षी महामार्ग विकास प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याची चांगली संधी रक्षा खडसे यांना आहे. जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे रक्षा खडसे संपूर्ण प्रकल्पातील कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू शकतात. तसे झाले तर जळगाव जिल्हा मराठवाडा, विदर्भ, गुजरात, मध्यप्रदेश या प्रांताशी जलदगतीने दळणवळण होण्यासाठी जोडला जाईल. याबरोबरच तापीनदीवरील महाकाय जलपूनर्भरण योजना मार्गी लावण्यासाठी रक्षा खडसेंनी लक्ष घातले आहे. जवळपास ४ लाख हेक्टरला या जलपूनर्भरण योजनेचा लाभ मिळणार असून २० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकेल.

रक्षा खडसे स्वभावाने मृदू आहेत. त्याची कृतीही सौजन्याची असते. विषय समजून घेण्याची त्यांची तयारी असते. खासदारपदाचे वलय बाजूला सारून त्या कार्यकर्त्यांना सहज भेटतात. सभा, समारंभातही त्या सहजपणे बोलू शकतात, वावरू शकतात. एकनाथ खडसे यांच्यासोबतच्या बहुतांश नेते व समर्थकांशी रक्षा खडसे यांचे ट्युनिंग उत्तमपणे जमते. खडसे परिवारातील इतर कुटुंबियांच्या तुलनेत रक्षा खडसे सोबर आहेत. त्यांच्या ठायी जिल्हा नेतृत्वाची क्षमता निश्चित आहे. स्व. निखील खडसेंचा मित्रपरिवारही त्यांना सहकार्य करण्यास तत्पर असतो. असे सर्व गुण जुळून येत असल्यामुळेच रक्षा खडसेंनी आता अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.

एकनाथराव खडसे राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करतील हे निश्चित आहे. मात्र, आता त्यांच्या निवांतपणाच्या काळात काही गोष्टी रक्षा खडसे यांनी पुढाकार घेवून करून दाखविल्या तर खडसेंसह त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनाही आपल्या वाली रक्षाताई असल्याचा दिलासा मिळेल. तसे झाले तर खडसे परिवारालाही आनंद होईलच. स्व. निखील खडसे यांच्याकडून अपेक्षित असलेले नेतृत्व लेवापाटीदार व इतर समाजाला आपसूक रक्षा खडसेंच्या रुपातून मिळू शकेल.


1 comment:

  1. SIR, BEST FEATURE OF OUR SISTER. I WANT TO POST THIS MATTER ON MY FACEBOOK ACCOUNT. PL. KINDLY GIVE THE PERMISSION.

    ReplyDelete