![]() |
हेमाताई आणि भरतदादा |
खान्देशी मातीत नाती पट्कन
रुजतात. आई, बाबापेक्षा दादा आणि ताई ही नाती सर्वसामान्य होतात. कोण्याही अनोळखी
माणसाचा एखाद्या कार्यातून संपर्क आला तरी त्याला दादा आणि महिलेस ताई म्हणणे ही
खान्देशी परंपरा. आंग्ल परंपरेत अन्कल, अन्टी म्हणत नाते जोडतात. हिंदी भाषिक
परंपरेत माणसाला भाईसाहब म्हटले जाते आणि महिला भाभीजीच ठरते. खान्देशात मात्र
बहिणाबाईच्या अहिराणीत सुद्धा “काहुन
रे दादा” आणि “कसाले ताई” असेच
म्हणतो.
वयाच्या किंवा अधिकाराच्या
मोठेपणातून काही नाती आपोआप चिकटतात. तशी ती आपसूक आली तरी ती कार्यातून निभावून
नेत सार्थ ठरवायची असतात. भरतदादा आणि हेमाताईंनी आपल्या दाम्पत्ती आणि सेवाभावी
जीवनातून ही नाती निभावली आहेत. म्हणूनच एखादा परिचित जेव्हा भरतदादा म्हणतो
त्याचवेळी तो सहज हेमाताई सुद्धा म्हणतो. पती-पत्नीचे असे विलक्षण नाते इतरत्र
कुठे दिसते ?
भरतदादा रावेरचे आणि
हेमाताई कोल्हापूरच्या. एकाच माळेतील दोन मणी. हेच साम्य सहजिवनाच्या प्रारंभाला
पूरक ठरले. दादांसोबत आलेल्या हेमाताई नंतर सर्व परिवाराच्या ताई झाल्या. कोल्हापुरातून
चंद्रकांत पाटील हेही जळगावात संघ परिवारचे कार्य करायला आले होते. त्यांनाही खान्देशी
लोकांनी दादा ही बिरुदावली लावली. आज ते महाराष्ट्रात मंत्री म्हणून कमी आणि “चंद्रकांतदादा” म्हणून ओळखले जातात.
तरुण भारतमध्ये डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम |
भरतदादांचा आणि हेमाताईंचा
माझा परिचय “तरुण भारत” निमित्त आला. भरतदादांमुळे मी परिवारात आलो.
जवळपास १९ महिने काम आणि जबाबदारी म्हणून सोबत होतो. भरतदादांनी मला कामाचे
स्वातंत्र्य दिले. काही प्रसंगात ते माझ्यामागे खंबीरपणे उभेही राहिले. त्यांच्या
कार्यशैलीची ही खासियत म्हणावी. जबाबदारी घेतली तर ती निभवा, वारंवार हस्तक्षेप
करायला लावून नका. समुह नेतृत्वात हाच लोकप्रिय फॉर्मूला वापरावा लागतो.
बहुतांशवेळा तो यश देतो तर कधीकधी कॅल्युलेशनही चुकतात. कलेक्टीव्ह विस्डम ही भरतदादांना
जोपासलेली संकल्पना. विविध गुण असलेल्या माणसांचा संच नेतृत्वासाठी तयार करणे.
समुह नेत्त्वासाठीची एक विधायक चाळणी.
![]() |
देशदूत गोदावरी योजनेत परिक्षण करताना हेमाताई, गनी मेमन |
भरतदादा बांधकाम क्षेत्रात
एक यशस्वी उद्योजक आहेत. जळगावमधल्या बऱ्याच नामवंत लोकांच्या प्रकल्पात त्यांची
पार्टनरशीप असते. मात्र, त्याचा गाजावाजा ते करीत नाहीत. केशवस्मृती
प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालणाऱ्या समुह सेवा प्रकल्पांचे नेतृत्वही भरतदादांकडे
आहे. भरतदादा मोजके व नेमके बोलण्यात माहीर आहेत. म्हणूनच जळगाव शहराच्या “थिंकटॅन्क” मध्ये
त्यांचे स्थान हे अग्रभागी असते. भरतदादांच्या व्यावसायिक व्यापाचे अर्थकारण आणि
जमा-खर्च हेमाताई सांभाळतात, असे माझे निरीक्षण आहे. बहुधा ते तसे असावेही. आज या
दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दोघांविषयी मनापासून लिहावेसे वाटले म्हणून
लिहीले. आजकाल कोणाविषयी चांगले लिहायचे असेल तर चांगले शब्द वापरावेत कोणते हाही
प्रश्न पडतो. मात्र, “सकारात्मक जळगाव” म्हणून लेखणी चालवताना भरतदादा आणि हेमाताई
यांच्याविषयी शब्दांची कंजुषी करूनही चालणार नाही. दोघांचेही व्यक्तीमत्व “नारळाच्या दोरी” प्रमाणे आहे. नात्याचा पीळ आहे म्हणून दोघे एकत्र आहेत आणि
स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांचा आपापला पीळ आहेच. म्हणूनच ते नाती घट्ट बांधू
शकतात आणि जपूही शकतात.
दोघांनाही लग्नदिनाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment