आपण शांति धरावी व
दुसऱ्यास धरायाला लावावी
आपण तऱ्हेवाईकपणा सोडावा,
व दुसऱ्याकडून सोडवावा
आपण चांगली क्रिया करावी व
पुष्कळांकडून करवावी
एखाद्याला अपाय करावयाचा
असेल तर तो बोलून दाखवू नये, परभारेच त्याला त्याचा ठोकताळा आणून द्यावा
राजकारण पुष्कळ केले तरी
ते कोणाला कळू देवू नये, पण ते करताना दुसऱ्याला पीडा देण्याचा हेतू नसावा.
![]() |
तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती १ |
“सार्थ दोसबोध” चे पारायण करताना “दशक अकरावे” हे “भीमदशक”
असून त्यात पाचवे प्रकरण “राजकारण” या विषयावर आहे. राजकारण करणाऱ्या माणसात कोणते
गुण असावेत आणि राजकारण कसे करावे ? याविषयी
समर्थांनी २७ लक्षणे सांगीतली आहेत. त्यातील काही ओळींचा साधा सोपा अर्थ वर दिला आहे.
राजकारण करताना एखाद्याचा काट्याने काटा काढायचा असेल तर ते मुखावर न आणता परभारेच
त्याचा काटा काढावा असे समर्थांनी इतर लक्षणांच्या सोबत सांगीतले आहे. आज हे
आठवण्याचे कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या “अर्धसत्याचा खेळखंडोबा” होय.
भारतीय जनता पक्षाच्या
राज्यस्तर आणि जिल्हास्तर पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या टोकाचे राजकारण सुरू आहे. विविध
गट तट आणि माजी आजी नेत्यांच्या विचारधारेवर काही नेते व कार्यकर्त्यांची विभागणी
सुरू आहे. एकमेकांचा परस्पर काटा कसा काढता येईल याची व्यूहरचना मुंबई ते गल्ली सुरू
आहे. याच रणनितीचा एक भाग म्हणजे,
माध्यमांच्यासमोर अर्धसत्य सांगण्याचा किंवा अर्धसत्य हेच पूर्ण सत्य असल्याचे
सांगण्याचे प्रकार केला जात आहे. अशा प्रकारातून व्यक्ती, कार्यकर्ते आणि पक्ष
यांचेच नुकसान होत आहे.
![]() |
तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती २ |
निमित्त आहे ते,
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नावावर असलेल्या मानपूर (ता. भुसावळ) येथील ४
हेक्टर ९७ आर शेतजमीनीच्या मालकीचे. ही शेतजमीन गिरीश महाजन यांच्या नावावर असून राज्य
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात ही शेतजमीन दाखविलेली नाही, अशा
आरोपाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. एका इंग्रजी दैनिकातून आणि एका टीव्ही चॅनेलवरून
याविषयी लगातार वृत्त देण्यात आले आहे. याच ब्लॉगच्या लेखकाने गिरीश महाजन यांच्या
या वादग्रस्त जमीनीविषयी “परखड
लेखन” ही केले आहे. हे लेखन करताना, त्यावेळी
बाजू “एकांगी” आहे आणि “अर्धसत्य” आहे याची पुरेपूर कल्पना होती. पण कधी कधी काही
उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी “सापळा” लावावा लागतो आणि त्यात “अमिष” ठेवून “सावज”
पकडावे लागते. माध्यमांची रणनिती अशीही असते.
तीच गिरीश महाजन यांच्या शेतजमीनसंदर्भात वापरण्यात आली.
त्या वादग्रस्त शेतजमिनीच्या
विषयाशी संबंधित पूर्ण सत्य मांडण्याची संधी पडद्यामागील अनेकांच्या सहकार्याने आज
पूर्ण होवू शकली. मानपूरमधील त्या शेतजमीनीचा केवळ एक गट नव्हे तर त्या गटालगतच्या
इतरही शेतजमीन मालकांचा विषय आता ऐरणीवर आला आहे. महाजन यांच्या नावावर असलेल्या शेतजमीनीचा
सातबारा किंवा खरेदी खत माध्यमांमध्ये व्हायरल करताना त्याविषयीचे “अर्धसत्य”
बेमालूमपणे पसरविण्याचे काम मोठ्या खुबीने करण्यात आले आहे. अशा वातावरणात कधीकधी
आपणही एखाद्या वृत्ताची “गुगली”
टाकून “उर्वरित अर्धसत्य” जाणून
घ्यायचे असते. तो अनुभव महाजन यांच्या नावावरील शेतजमीनीने आणून दिला आहे.
आता मुद्दा हा आहे की,
जामनेर शहरात निवास करणाऱ्या गिरीश महाजन यांना ही शेतजमीन का खरेदी करावी लागली
? ती त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून
खरेदी केली आहे की एखाद्या नियोजित प्रकल्पासाठी तांत्रिक स्वरुपात खरेदी केली आहे
? या प्रश्नांच्या उत्तराचा मागोवा शेतजमीनीच्या
खरेदी मागील आणि भारतीय जनता पक्षातील “सुंदोपसुंदी”विषयीचे पूर्ण सत्य समोर आणून उभे करते.
![]() |
तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती ३ |
जळगाव जिल्ह्यातील सहकार
प्रकल्पांची उभारणी ही साधारणपणे सन १९७० ते २००० च्या दरम्यान झाली. जिल्हातील
बहुतांश सुतगिरणी, साखर, दूध, स्टार्च आणि रम असे प्रकल्प काँग्रेसमधील नेत्यांच्या
पुढाकाराने सुरू झाले. तेव्हा भारतीय जनता पक्षातील बोटावर मोजता येतील अशा नेत्यांना
सहकारात प्रवेशही नव्हता. थोडक्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कोणताही सहकार
प्रकल्प आजपर्यंत सुरू करता आलेला नाही. अपवाद म्हणजे अलिकडे सुरू झालेली आदिशक्ती
संत मुक्ताई सहकारी सुतगिरणी. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी स्वतःच्या
पुढाकारात सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश
आले नाही. नंतरच्या काळात सहकारातील सत्ता व संपत्तीच्या उन्मादात काँग्रेसच्या
नेत्यांनी साखरेची सहकार कारखानदारी दिवाळखोरीत आणली. अनेक कारखाने बंद झाले किंवा
लिलावात निघाले.
सहकार साखर कारखानदारी
मोडकळीस येत असताना भारतीय जनता पक्षाचे नागपूर येथील नेते नितीन गडकरी आणि बीड
येथील नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी खासगी साखर कारखानदारी उभारण्याचा प्रयत्न
सुरू केला. त्याचवेळी जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी
एकत्र येवून भुसावळ तालुक्यातील मानपूर येथे खासगी साखर कारखाना सुरू करण्याचा
प्रयत्न केला. या प्रकल्पासाठी जमीन हवी होती. खासगी प्रकल्पासाठी जास्त शेतजमीन
घेता येणार नाही अशी तांत्रिक अडचण असल्यामुळे एकमेकांशी गुळपीठ असलेल्या काही
नेत्यांच्या नावावर आजुबाजूच्या शेतजमीनी विकत घेण्यात आल्या. हा व्यवहार
तापीपूर्णा साखर कारखान्याच्या मुख्यप्रवर्तकांनी केला. त्यांनीच संबंधित
शेतकऱ्यांना जमीनीसाठी रक्कम अदा केली. खरेदी खत, कागदपत्रे आणि नंतर शेतजमीनीच्या
मालकी हक्काचे सातबारा उतारे हे मुख्यप्रवर्तकांच्या हातातच राहिले. ते इतरांना
दिले गेले नाहीत. इतपर्यंत त्या शेजजमीनीच्या मालकीचे “अर्धसत्य” आहे.
![]() |
तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती ४ |
आता जाणून घेवू पूर्ण
सत्य. नंतरच्या काळात सहकार क्षेत्रातील बंद सहकारी साखर कारखाने त्यांच्यावरील
थकीत देणी वसुलीसाठी थेट लिलावात विक्री करण्याचे धोरण काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस आघाडी सरकारने स्वीकारले. याचा लाभ जसा आघाडी सरकारमधील काही मोजक्या नेत्यांनी
घेतला तसाच तो भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यांनीही घेतला. जळगाव जिल्ह्यात
अशाच प्रकारे वसंत सहकारी (कासोदा) व संत मुक्ताई सहकारी (मुक्ताईनगर) साखर
कारखान्यांचे लिलाव झाले. संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याचा लिलाव जळगाव
जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील पॉवरफुल्ल नेत्यांच्या मध्यस्थीने झाला. आज
खासगी स्वरुपात सुरू असलेल्या या कारखान्यात या पॉवरफुल्ल नेत्यांचे कुटुंबिय
पदाधिकारी आहेत.
सहकारातील बंद साखर कारखाने
लिलावात कवडीमोल भावाने मिळत असल्यामुळे खासगी तत्वावर महागडे ठरतील असे साखर
कारखाने उभारण्याची योजना मागे पडली. मात्र, या खासगी कारखान्यासाठी केलेले शेतजमीनींचे
व्यवहार पूर्ण झाले आणि सातबारा उताऱ्यांवर संबंधितांचे नावही लागले. बासनात
गुंडाळलेल्या खासगी कारखान्याच्या योजनेविषयी इतर मंडळींना उत्सुकता नव्हती.
त्यांना त्या शेतजमीनीविषयी सुद्धा उत्सुकता नव्हती. ज्या शेतजमीन खरेदीसाठी आपण
पैसा दिला नाही, जी शेतजमीन आपण स्वतः कधी पाहिली नाही, ती शेतजमीन आपण आपल्या
मालमत्तेत कशी दाखवावी ? हा तसा
नैतिक प्रश्न असल्यामुळेच गिरीश महाजन यांनी सन २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा
निवडणुकीत उमेदवारीसाठी मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र भरताना खासगी साखर कारखान्यासाठी
घेतलेली शेतजमीन आपल्या मालमत्ता विवरणात दाखविली नाही. दोन अर्धसत्य जोडून सत्यतेचे
वर्तुळ अशाप्रकारे पूर्ण होते. येथे गिरीश
महाजन यांनी या विषयावर पाळलेले मौन हेच बरे काही सांगणारे आहे.
आता मुद्दा हा आहे की,
मानपूरमधील ज्या गटातील शेतजमीनीचा विषय गिरीश महाजन यांच्या नावाने चर्चेत आला
आहे, त्याच गटाच्या आजुबाजूच्या शेतजमीनी कोणाच्या आहेत ? याचाही उल्लेख झाला पाहिजे. शिवाय, आता असे सांगण्यात येत आहे
की, वादग्रस्त शेतजमीनीवर फळबाग लावण्याचा प्रयत्न महाजन करीत आहेत. एका टीव्ही
चॅनेलवर वादग्रस्त शेतजमीन दाखविण्यात आली असून त्या तेथे सिमेंट फळ्यांचे कुंपण
केलेले दिसत आहे. शिवाय, तेथे यंत्र चालवून जमिनीचे सपाटीकरण सुरू असल्याचेही
दाखविले आहे. कोण्या एका शेतकऱ्याने आपली जमीन महाजन यांनी बळजोरीने बळकावली असा
आरोपही केला आहे. नियोजित खासगी साखर कारखान्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या एका
पाल्यास नोकरी देवू, असेही आश्वासन तेव्हा देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
हा संपूर्ण विषय समजून घेत
असताना आता सामान्य नागरिक म्हणून एक भूमिका मांडायची इच्छा होते. ती म्हणजे,
गिरीश महाजन यांच्या नावावर असलेली ती शेतजमीन मूळ मालकांना सन २००२ मध्ये
घेतलेल्या मूळ किंमतीत परत करावी. किंवा सन २००४ पासून महाजन हे जर त्या
शेतजमीनीची मालकी दाखवित नसतील तर महसूल प्रशासनाने ती शेतजमीन ताब्यात घ्यावी. येथे अजून एक मुद्दा आहे तो
म्हणजे, सध्या शेतजमीन कोणाच्या ताब्यात आहे ? कारण, महाजन यांच्या नावाचा सातबारा
उतारा असला तरी ते मालकीचा दावा करीत नाहीत. अशावेळी “जिसका कोई मालिक नही उसका महसूल मालिक है” या न्यायाने प्रशासनाने वागावे. अजून एक तिसरा
मार्ग आहे, महाजन यांनी ही शेतजमीन भूदान योजनेत दान करावी.
जर महाजन वरील प्रमाणे काहीही
करण्यास तयार नसतील तर तापीपूर्णा खासगी साखर कारखान्याच्या मुख्यप्रवर्तकांनी मौन
तोडून जागेचे मूळ कागदपत्र माध्यमांच्या समोर आणून महाजन यांना उघडे पाडावे. तसाही
तापीपूर्णा साखर कारखान्याचा विषय यानिमित्ताने उगाळण्याची संधी मिळाली आहे. तो
प्रकल्प खरोखर का पूर्ण होवू शकला नाही ? याविषयी
भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पॉवरफुल्ल नेत्याने वक्तव्य करायला हवे.
हे वृत्त लिहीत असताना “सार्थ दासबोध” मधील वरील ओळी आठवल्या
तशा राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या “ग्रामगीता”तील “आचार प्राबल्य” या अध्यायातील पुढारी व गावचे पतन यातील काही ओव्या आठवतात,
त्या अशा
न्यायदेवता सिंहासनी
बसविली, तीच अन्याय करून गेली
मग कैची सुव्यवस्था आली,
सांगा सांगा.
सत्संगतीसी पंडित
बोलाविला, त्यानेच गावी कलह केला
शहाणा म्हणावा तोच निघाला,
महामूर्ख जैसा
गुंडास धरोनिया हाती करिती
मनी येईल त्याची फजीती
त्यावाचोनि पुढाऱ्याची
गति, म्हणती प्रगतीपथा येईना.
थोडी वेगळी माहिती
गुगल सर्चमध्ये तापी पूर्णा शुगर फॅक्टरी म्हणून सर्च केले असता, तापी
पूर्णा शुगर ऍण्ड अलाईड प्रॉडक्टस लिमिटेड नावाची कंपनी समोर येते.
या कंपनीची
स्थापना दि. १० मे २००१ ला झाली
आहे. कंपनीचे भागभांडवल २० लाख रुपये दाखविले आहे. कंपनी नोंदणी क्रमांक १३१९४१
असून कंपनी खासगी प्रकारातील आहे. कंपनीचा कार्यालयीन पत्ता एकनाथ खडसे, कोथळी,
मुक्ताईनगर, जळगाव असा आहे.
Tapi-purna Sugar And Allied Products Limited
Profile
Corporate
Identification Number
|
U15421MH2001PTC131941
|
Company
Name
|
Tapi-purna
Sugar And Allied Products Limited
|
Year of
Foundation
|
2001
|
Registrar
of Companies
|
RoC-Mumbai
|
Registration
Number
|
131941
|
Line of
Business
|
Manufacture
and refining of sugar (vacuum pan sugar factories)
|
Parent
Line of Business
|
Manufacture
of sugar [manufacture of glucose and other sugars made from starches is
classified in class 1532]
|
Top
Line of Business
|
Manufacture
of other food products
|
principal
business activity
|
Manufacturing
(Food stuffs)
|
Company
Category
|
Company
limited by Shares
|
Company
Sub Category
|
Indian
Non-Government Company
|
Class
of Company
|
Private
|
Office
Address
|
EKNATH
KHADSE, A. P. KOTHALIMUKTAI NAGAR JALGAON Maharashtra INDIA
|
State
|
Maharashtra
|
Authorized
capital (in Rs.)
|
2000000
|
Paid up
capital (in Rs.)
|
-
|
Date of
Incorporation
|
05/10/2001
|
Company
Status (for eFiling)
|
ACTIVE
|
तापी पूर्णा शुगर ऍण्ड
अलाईट प्रॉडक्ट लिनीटेड विषयी माहिती उपलब्ध वेबसाईट
१) https://3ci.in/8-company/870687-tapi-purna-sugar-and-allied-products-limited-u15421mh2001ptc131941
२) https://opencorporates.com/companies/in/U15421MH2001PTC131941
ब्लॉगवरील मजकूर कृपया कॉपी करू नका
No comments:
Post a Comment