Sunday, 12 June 2016

गिरीश महाजनही आरोपांच्या वावटळीत!!

राज्याचे जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्यातील आता एकमेव मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात धूळग्रस्त वावटळ उठली आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात ४.९७ एकर शेतजमिन महाजन यांच्या नावावर सन २००२ पासून आहे. या शेतजमिनीचा महाजन यांच्या नावाचा सातबारा उतारा आता फेबसुक, ट्विटर आणि व्हाट्सऍप सारख्या सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहचला आहे. महाजन यांनी विधानसभेच्या ३ निवडणुका जामनेर मतदार संघातून सन २००४, २००९ आणि २०१४ दरम्यान लढवून जिंकल्या. आता आक्षेप हा घेतला जात आहे की, या तीनही निवडणुकींसाठी उमेदवार म्हणून प्रतिज्ञापत्र भरताना महाजन यांनी मानपूर शिवारातील जमिन मालमत्ता विवरणात दाखविलेली नाही. महाजन यांचे यावर उत्तर आलेले नाही. एक गोष्ट मात्र नक्की की, खडसेंच्यानंतर आता महाजन आरोपांच्या वावटळीत आहेत. या जागेसंदर्भात जर निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयात कोणी तक्रार केली अथवा याचिका दाखल केली तर महाजन यांच्या अडचणी वाढू शकतात.
गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त शेतजमिनीचा सातबारा उतारा
भारतीय जनता पक्षातील सर्वांत पॉवरफुल्ल नेते एकनाथराव खडसे यांना विविध आरोपांच्या धुराळ्यात मंत्रीपद सोडावे लागले. त्या सर्व आरोपांची धूळ खाली बसत असून खडसेंवरील आरोप कसे निखालस खोटे आहेत ? असे मत मांडणारी बाजूही आता माध्यमांमधून समोर येत आहे. खडसे समर्थकांना या धूळपोछा विषयी आनंद नक्कीच व्हायला हवा. पण, खडसेंचे मंत्रीपद माध्यमांनी नव्हे तर दिल्लीत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी हिरावले आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि दिल्लीतील श्रेष्ठी खडसेंना जाहिरपणे क्लिनचिट देत नाहीत तोपर्यंत संयमाने प्रतिक्षा करणेच उचित आहे.

जळगाव जिल्ह्याचे मंत्रिमंडळ स्तरावर राजकिय नशीब पुन्हा गांडू असल्याचा हा अनुभव आहे. मंत्रीपदावर असताना सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, एकनाथराव खडसे आणि आता गिरीश महाजन यांना विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे. यात जैन, देवकर व खडसे यांनी मंत्रीपद गमावले. आता महाजन यांचे काय होणार ? ही उत्सुकता आहे.

वाय. जी. महाजन
एम. के. पाटील
भारतीय जनता पक्षासाठी ही नामुष्कीची वेळ आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील एकाच जिल्ह्यातील भाजपचे दोन बडे नेते विविध आरोपात गुरफटले जात असल्याने पक्षाची राज्य व राष्ट्रीयस्तरावर निश्चित कोंडी होत आहे. जळगाव जिल्हा भाजपवर  नामुष्की ओढवण्याची ही दुसरी वेळ आहे. इतिहासाची मागील पाने थोडी चाळली तर लोकसभेत खासदार असलेल्या याच जिल्ह्यातील दोघांना सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी लाच स्वीकारताना बडतर्फ व्हावे लागल्याची काळी पाने समोर येतात. तहलका डॉट कॉमची ते देन होती. त्यावेळचे ज्येष्ठनेते वाय. जी. महाजनसर व माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील यांच्या माथी भाजपच्या खासदारांनी लाच स्वीकारल्याचा कलंक लागलेला आहे. या प्रमादानंतर महाजनसर व अण्णा राजकारणाच्या बाहेर टाकले गेले. वर्तमानाच्या पानांवर खडसे, गिरीश महाजन यांच्या नशिबी विविध कारणांमुळे बदनामी लिहीली जात आहे. हे जिल्हावासियांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

खडसे यांच्या संदर्भात एक बाजू समाधान देणारी आहे. ती म्हणजे, त्यांनी मंत्रीपदावरून पाय उतार होण्यापूर्वी आपल्यावरील सर्वच आरोपांचा जोरदार प्रतिवाद केला. ते स्वतःच्या बचावाची लढाई स्वतः लढले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांचा धूळपोछा ते वेळीच करूनही घेतील. पण खडसे यांची व्यक्तिगत आणि जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची प्रतिमा निश्चित डागाळली गेली आहे. अर्थात, ही नामुष्की ओढवून घेताना खडसेंचा स्वभाव दोष आणि त्यांच्या भोवतीच्या लाभार्थी कोंडाळ्याचा अती उत्साहीपणाही तेवढाच कारणीभूत आहे.

३० कोटींच्या लाच प्रकरणात अर्थ नाही, भोसरीची जागा खडसेंचीच, मनिष भंगाळेचे आरोप निखालस खोटे, तांडेल यांचे आरोप चुकीचे असे खुलासे आता सुरू झाले आहेत. परिस्थिती तशी असल्याचे समोर आले तर बहुतांश जळगावकरांना हायेसे वाटेल. खडेसेंची मंत्रीपदावर पुनर्स्थापना करणे हा निर्णय पक्षाचाच असेल. तसे असले तरी खडसे किंवा महाजन यांना काही प्रश्नाची उत्तरे नैतिकतेच्या पातळीवर जाहिरपणे द्यावीच लागतील. प्रश्न आहे तो, कोट्यवधींच्या जमिनी खरेदी करण्यासाठी आपण पैसा आणला कोठून ? खडसे आणि महाजन हे कागदोपत्री शेतकरी आहेत. या दोघांचा कोणता उद्योग, व्यापार, व्यवसाय असल्याचे यापूर्वी जिल्हावासियांना माहित नाही. अलिकडे पाच-सात वर्षांत नातेवाईक, मित्रमंडळाने काही कंपन्या, फर्म निर्माण केल्या असतील तर त्याची फारशी चर्चा नाही. बहुधा, दोघेही आयकर विवरण भरत असावेत. त्यात नफा मिळाल्याचा उल्लेख असेल तर प्रश्नाचे उत्तर एका मिनिटात मिळेल. नसेल तर, प्रश्न कायम राहतो. शिवाय, ज्यांच्या नावे जमिनी आहेत, त्यांच्याही उत्पन्नाचे साधन कोट्यवधींचा नफा, शिल्लक, गंगाजळी ठेवणारे असावे.

 गिरीश महाजन पूर्वीपासून वादाळलेले

कमरेला पिस्तुल लावणारे महाजन
महाजन यांच्याविषयी उठलेला जमिनीचा मुद्दा हा काही पहिला वादाचा विषय नाही. महाजन मंत्रिमंडळात प्रवेशकर्ते झाले त्याच दिवशी ते आपल्यासोबत वाद घेवून आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून खाते वाटप जाहिर होण्यापूर्वी महाजन यांनी जलसंपदामंत्री म्हणून माध्यमांना मुलाखती दिल्याचे आठवत असेल. पहिला वाद हाच होता. त्यानंतर जामनेर येथे मंत्री महाजन यांचा सत्कार मित्रांनी केला. तेथे भाषणात महाजन बोलून गेले होते की, जलसंपदा विभागाच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची लाच मला देण्याचा प्रयत्न झाला. महाजन यांचे हे वक्तव्य प्रांजळ भासत असले तरी लाच देणे, घेणे, तसे सूचविणे हे कायद्याचा भंग करणारे आहे, असे महाजनांच्या लक्षात आले नाही. ते प्रकरण तेव्हा फारसा गाजावाजा न करता निभावले गेले.

नंतर मंत्री महाजन यांना स्वतःमधील सामान्य माणसाची जाणिव झाली. त्यांनी जामनेर शहरातून बुलेट सवारी केली. आवडत्या पान दुकानावर जावून पान खाल्ला. अर्थात, अशा विषयांची चर्चा दुहेरी असते. हे वागणे कोणाला भावते तर कोणी म्हणते मंत्र्याला शोभत नाही. नंतर महाजन यांना अचानक स्वतःमधील अतिसामान्य असण्याचा साक्षात्कार झाला. मूक-बधीर मुलांच्या शाळेतील कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून त्यांनी भाषण केले. यावर झालेल्या टीकेचा बचाव करताना ते म्हणाले, हो मला उघडपणे शस्त्र बाळगायची सवय आहे. त्यांच्या बचावाला मुख्यमंत्री फडणवीसही धावून आले. खडसेंच्या बाबत फडणवीस गप्प बसले हे ठळकपणे जाणवते.

राज्य सरकार भाजपचे, जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री भाजपचे, जळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रशासन भाजपाळलेले, अवतीभवती शस्त्र पोलीस बंदोबस्त असतानाही महाजन कमरेला पिस्तूल लावून फिरतात, हा संदेश काही जनतेच्या पचनी पडला नाही.

महाजन यांच्या स्वभावाची मोठी गंमत आहे. त्यांना सर्व सामान्य लोकांच्या गराड्यात राहायला आवडते. पण, मंत्री असताना सर्व समान्य माणसासारखे वर्तन करून चालत नाही, हे त्यांना पटवून देणार कोण ?


शाहिस्नानप्रसंगी महाजन
महाजन हे नाशिक व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नाशिक येथे कुंभमेळ्यात शाहीस्नान प्रसंगी गंगाघाटावर गर्दीत उभे राहून भाविकांना मदत करणारे मंत्री महाजन लोकांना भावले. पण, नंदुरबार येथे साधुसंत संमेलनाच्या निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचणारे मंत्री महाजन कोणालाही आवडले नाहीत. या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर महाजन सावध झाले. जामन्या येथे लोकसंघर्ष मोर्चाने आयोजित केलेल्या आदिवासी होळीप्रसंगी महाजन यांनी नृत्य टाळले. तसे त्यांनी प्रांजळपणे बोलून दाखविले.

सामान्य लोकांना भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात आपदग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांची भेट पालकमंत्री म्हणून नाकारली असाही विषय नंतर माध्यमात चर्चेत होता. नाशिक येथे कुंभमेळ्याची कामे सुरू असताना अवतीभवतीच्या काही मित्रांमुळे महाजन चर्चेत होते. जळगाव जिल्ह्यात तडीपारीचा इतिहास असलेली काही मंडळी नाशिकमध्ये महाजनांचे कारभारी होते, असाही आरोप तेव्हा माध्यमातून झाला. कुंभमेळ्यासंदर्भातही आक्षेपाचे अनेक विषय होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहिरपणे महाजनांचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर परदेशात जावून कुंभमेळ उत्कृष्ट संयोजनाबद्दल पुरस्कारही आणला. दुसरीकडे नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या एका वर्तुळात महाजन यांच्याविषयी सुरस कथाही चर्चेत असतात.

जलसंपदा घोटाळ्यावर बोलणारे महाजन
जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून काम करताना त्या खात्याची सार्वत्रिक प्रतिमा डागळली जाईल असे वक्तव्य करण्याचा प्रयत्नही महाजन यांनी प्रांरभीच्या काळात केला. जलसंपदा हे सर्वांत बदनाम खाते आहे, या खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केले तर अख्खे खाते  रिकामे होईल, या खात्याचा माजी मंत्री २० ते २५ टक्के कमिशन घेत होता, मलाही तसे टक्के देण्याचा प्रयत्न झाला, जलसंपदा विभागात १,१०० कामे बोगस आहेत, मला १०० कोटींचे कमिशन देण्याचा प्रयत्न झाला, पुण्यातील एका कंत्राटदाराने २२ टक्के कमिशन देण्याचा प्रयत्न केला, मी नार्कोटस्टला तयार, अजित पवार-सुनिल तटकरेंनी तयारी दाखवावी अशी अनेक वादग्रस्त विधाने महाजन यांनी केली. एक प्रकारे आपल्याच मंत्रालयाला व त्यातील यंत्रणेला डागाळण्याचा हा प्रकार होता. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने प्रकल्पांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढविल्या असे महाजन एकीकडे बोलत असताना त्यांनीही विदर्भातील ११ बंधाऱ्यांच्या कामाच्या किंमती ८ पटीने वाढविल्याचे समोर आले. ज्या फांदीवर बसला तीच फांदी मोडणाऱ्याला शेखचिल्ली संबोधले जाते. महाजन यांनी स्वतःच्या मंत्रालयाविषयी केलेल्या वक्तव्यांना कोणते संबोधन देता येईल ? महाजनांचा हाच बोलघेवडा गुण लक्षात घेवून माजी मुख्यमंत्री नारायण राणे महाजनांना म्हणाले होते, आपल्या अवकातमध्ये राहा ! ही माजी मुख्यमंत्र्यांने आजी मंत्र्यांसाठी वापरलेली अत्यंत शेलकी भाषा.

जलसंपदा विभागाच्या जुन्या कामांविषयी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करीत असताना महाजन दुसरीकडे म्हणत होते, राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करायला हवेत ४० हजार कोटी रुपये ! अशा वक्तव्यावर लोकांच्या भुवया उंचावत होत्या. महाजन सांगतात त्याप्रमाणे यातही व्यवहार असावेत का ? ही समान्य माणसाला पडणारी शंका.

नंदुरबारमध्ये नाचणारे महाजन
गिरीश महाजन यांनी ग्रेट शोमन म्हणून जळगाव येथे महाआरोग्य अभियानाचा चांगला उपक्रम घेतला. त्याचा हेतू चांगला होता. काही ठराविक कुटुंबांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळाला. मात्र, संयोजनातील त्रुटींमुळे अनेकांना लाभ न मिळता परत जावे लागले अशाही कहाण्यानंतर चर्चेत आल्या. मुख्यमंत्री कार्यालयामार्फत सुरू असलेल्या आरोग्य अभियानात कार्पोरेट सिस्टिमचा गैरलाभ कसा घेतला जातो ? याचीही चर्चा समोर आली.

खडसे यांच्यानंतर महाजन यांच्याविषयी निर्माण झालेली आरोपाची वावटळ त्यांच्यासाठी व्यक्तीशः व भाजपसाठी पक्ष म्हणून अडचणीचीच आहे. राजकिय व्यक्तिमत्व उभे करण्यासाठी आयुष्यातील ३० ते ४० वर्षांच्या खस्ता प्रत्येकजण खातो. राजकराण करताना अनेक गोष्टी अधिक- उणे कराव्या लागतात. तसा प्रकार क्षम्यही असतो. मात्र, त्यांची उघड चर्चा होते ते बदनाम होतात आणि त्यांची चर्चा होत नाही ते गुमनाम असतात. राजकारणातील हा प्राथमिक धडा जळगावचे राजकारणी कौशल्याने आचरणात आणतील तेव्हाच जळगावच्या राजपटावर संमती, सहकार, सहकार्य, सहमतीचा खेळ सुरू होईल. विकासाचे चक्र धावू लागेल.


*** गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त शेतजमिनीची कागदपत्रे फेसबुकवर


https://www.facebook.com/tdilip/posts/10208690619097139


 *** या ब्लॉवरील मजकूर कॉपी पेस्ट करू नका. लिंक फॉर्वर्ड करा


No comments:

Post a Comment