Saturday 11 June 2016

पेव्हेलियनमध्ये खडसे काय करणार ?

३० कोटींची लाच मागणारा कार्यकर्ता, भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी, जावायाची लिमोझीन कार यासह मच्छिमार सोसायटीच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी केलेला आरोप यामुळे एकनाथराव खडसे यांची राज्यमंत्री मंडळातून गच्छंती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे  अखिल भारतीय अध्यक्ष अमित शहा यांनीच थेट निर्वाणीचा आदेश दिल्यामुळे सत्तेच्या पीचवरून खडसे नाखुशीने परत आले. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर खडसेंना सक्तीने “रिटायर्ड हर्ट”करून “पेव्हेलियन” मध्ये बसविण्यात आले आहे. आता खडसे तेथे काय करतात, पीचवर पुढील खेळ कसा होतो आणि खडसेंचे पाठीराखे काय काय करतात ? याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

क्रिकेटच्या एखाद्या समान्यात पीचवर गेलेला बॅटमन स्वैर पद्धतीने खेळतो. संघाची गरज काय आहे याचा तो विचार करीत नाही.“पेव्हेलियन” मध्ये बसलेला कॅप्टन किंवा इतर खेळाडूंच्या संदेश, इशाऱ्याकडे तो दुर्लक्ष करतो. सोबत बॅटींगसाठी असलेल्या दुसऱ्या सहकारी बॅटमनकडेही तो लक्ष देत नाही. अशावेळी “स्ट्रॅटेजिक टाईम”आऊटमध्ये कॅप्टन स्वतः पीचवर येवून दोघा अंपायरला विनंती करून“स्वैराचारी बॅटमन” ला आपल्या सोबतच परत घेवून जातो. याला म्हणतात “रिटायर्ड हर्ट”. अर्थात, अशी अवस्था जखमी किंवा शारीरिकदृषट्या थकलेल्या खेळाडूवर ओढवते.

क्रिकेट खेळाशी समांतर असलेल्या राजकारणातही बऱ्याचवेळा काही नेत्यांना वेळप्रसंगी “रिटायर्ड हर्ट” केले जाते. क्रिकेटमधील वरील अवस्था एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत तंतोतंत जुळून आली आहे. राज्यात भाजपच्या सत्तेच्या पीचवर खडसे स्वैरपणे खेळत होते. हा स्वैराचार म्हणजे, सत्तापदांची घरात वाटणी, विविध प्रकारचे आरोप आणि त्यातही इतरांचे गंभीर बोलणे मनात येईल तसे टोलावणे असा प्रकार सुरू होता. त्यांचे दुसरे सोबती बॅटमन गिरीश महाजन हे दुसऱ्या बाजूला हताशपणे बॅट सांभाळून उभे होते. पेव्हेलियनमधून कॅप्टन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुकाटपणे खडसेंचा स्वैर खेळ पाहात होते. अखेर स्ट्रॅटेजिक टाईम आऊटप्रसंगी फडणवीस मैदानात आले. त्यांनी अंपायर मोदी, शहा यांच्याशी चर्चा करून खडसेंना रिटायर्ड हर्ट करून पेव्हेलियनमध्ये नेले. म्हणूनच, क्रिकेटशी समांतर असा हा राजकारणाचा खेळ आहे असे म्हणता येईल.

आता गंमत अशी आहे की, पेव्हेलियनमध्ये सक्तीने परत आलेला क्रिकेटचा खेळाडू बऱ्याचवेळा खूर्चीवर बसून इतरांचा खेळ पाहतो. दुसऱ्यांनी धावा कुटल्या की तो टाळ्या वाजवतो, कॅप्टन व इतरांच्यासोबत हसून दाद देतो. किंवा इतरांशी गप्पा मारतो. तो जखमी असेल तर इतरांना त्याच्याविषयी सहानुभूती असते. आता खडसेंच्या बाबतीत असे होणार का ? हा खरा प्रश्न आहे. इतरांनी रिटायर्ड हर्ट केले म्हणून खडसे पेव्हेलियनमध्ये गप्प बसून राहतील असे समजण्याचे कारण नाही. पीचवर सुरू असलेला इतरांचा खेळही खडसे शांतपणे पाहतील असे नाही. कॅप्टन किंवा इतर खेळाडूंशी ते आदराने, हसून जमवून घेतील असेही नाही. उलटपक्षी मैदानावरील शत्रू पक्षाच्या गोटातील समदुःखी किंवा समविचारी खेळाडूंच्या संपर्कात येवून ते नव्या खेळाची किंवा “मॅच फिक्सिंग” ची तयारी करू शकतात.

राज्याच्या सत्तेतील दुसऱ्या क्रमांकचे पद आणि प्रदीर्घ अनुभवामुळे आदराचे पहिले पद हाती असलेल्या खडसेंवर सत्तेतून अवकाळी आणि नामुष्कीने बाहेर जाण्याची वेळ आली. हे का घडले ? यावर बऱ्यापैकी विचार मंथन झाले आहे. खडसेंवर जे आरोप आहेत, त्याची चौकशी एका निवृत्त न्यायाधिशाच्या मार्फत सरकार करणार आहे. त्यापुढील सर्व अंदाज जर किंवा तर चे आहेत. खडसेंवर ही वेळ का आली ? याची चर्चेत न आलेली इतरही काही कारणे समजून घ्यायला हवीत.

खडसे हे जळगाव जिल्ह्याचे नेते असून “लेवा बहुल पॅटर्न” मधून त्यांचे सत्तास्थान टीकून राहिले आहे. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी लेवा बहुल पॅटर्नमध्ये स्व. मधुकरराव चौधरी, स्व. जे. टी. महाजन, स्व. वाय. एस. महाजन, गुणवंतराव सरोदे आदी लेवा पाटील समाजातील नेत्यांचे सत्तास्थान बहरले होते. त्यासोबतच “मराठा बहुल पॅटर्न”मध्ये स्व. के. एम. पाटील, स्व. गुलाबराव पवार, स्व. के. डी आबा पाटील, स्व. प्रल्हादराव पाटील, स्व. ओंकार वाघ, स्व. अनिलदादा देशमुख आदींचे सत्तास्थान विस्तारले होते. मराठा पॅटर्नचे शिलेदार चिमणराव पाटील, डॉ. सतीश पाटील, वसंतराव मोरे, खासदार ए. टी. पाटील, गुलाबराव देवकर हेही होते.

जळगाव जिल्ह्यात सत्तेचा अजुन एक पॅटर्न विस्तारला होता. तो म्हणजे, मराठा व लेवा पाटील पॅटर्नला समांतर असलेला “इतर समाजाच्या नेत्यांचा पॅटर्न” सत्तास्थाने. यात प्रतिभाताई पाटील (राजपूत), सुरेशदादा जैन, अरूण गुजराथी यांच्यासह इतर माळी, कोळी, वंजारा, तेली, मारवाडी, वाणी, समाजातील नेत्यांचा सहभागही होता. इतर समाजाच्या नेत्यांच्या पॅटर्नमध्ये एक “उपपॅटर्न गुजर पाटील समाजाचा” ही आहे. त्यात दत्तात्रय महाजन, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे.

म्हणजेच जळगाव जिल्ह्याच्या राजकिय पॅटर्नमध्ये प्रामुख्याने मराठा, लेवा, गुजर पाटीलसह इतर समाजाचे पॅटर्न पूर्वीपासून अस्तित्त्वात असून त्यात फारशी ढवळा ढवळ कोणीही करू शकत नाही. हे पॅटर्न पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वापरत होती. आताही वापर केला जातो. मात्र, सध्या भाजपच्या गोटात या पॅटर्नचे नवे-जुने लाभार्थी आपापाली हिस्सेदारी सांभाळून आहेत. राजकिय पक्ष या पॅटर्नचा विचार करून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवतात. म्हणूनच, एक खासदार लेवा पाटील तर दुसरा मराठा पाटील निवडून येतो. शिवाय, विधानसभेत जिल्ह्यात असलेल्या इतर समाजातील संजय सावकारे (मागास घटक), शिरीष हिरालाल चौधरी (तेली), गुलाबराव पाटील (गुजर पाटील), किशोर पाटील (राजपूत), प्रा. चंद्रकांत सोनवणे (कोळी) यांनाही निवडून येण्याची संधी मिळाली आहे. यात केवळ सावकारे हे भाजपकडून निवडून आले असून उर्वरित खडसेंच्या नेतृत्त्वातील भाजपच्या विरोधात निवडून आले आहे. भाजपतही गिरीश महाजन (जामनेर), ए. टी. पाटील (जळगाव), उन्मेश पाटील (चाळीसगाव), हरिभाऊ जावळे (यावल) हे आपापल्या मतदार संघात स्वतःच्या प्रभावावर निवडून आले आहेत. खडसेंच्या प्रभावळीत स्वतः खडसे, सावकारे आणि जळगावमधून सुरेश भोळे हे निवडून आले आहेत. याचाच अर्थ जळगाव जिल्ह्यात खडसे पॅटर्नच्या मर्यादा एका विशिष्ट परिघातच निश्चित आहेत. शिवाय, लेवा पाटीदार पॅटर्नमध्येही खडसेंच्या परिघाबाहेर अनेकांचे स्वतःचे परिघ आहेत. निष्कर्ष हा निघतो की, पेव्हेलियनमध्ये बसलेल्या खडसेंच्या सोबत “गुफ्तगू”करणारी स्वतःच्या पक्षातील मंडळी फारच मर्यादीत राहणार आहे.
खडसेंचा प्रभाव भाजपच्या टीममधील पीचवरच्या खेळाडूंवर जसा मर्यादीत आहे तसाच तो टीम निवडणाऱ्या शहर व जिल्हा कंट्रोल बोर्ड म्हणजे पक्षाच्या शहर व जिल्हा समित्यांवर आहे. या समित्यांची रचना सुद्धा लेवा बहुल व मराठा बहुल पॅटर्नवर झाली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मराठा समाजाचे उदय वाघ यांच्याकडे आहे. शहर शाखा जिल्हाध्यक्षपद लेवा पाटील समाजाचे सुरेश भोळे यांच्याकडे आहे. भोळे हे खडसेंचे तर वाघ हे गिरीश महाजन यांचे समर्थक मानले जातात. ही विभागणी फारशी चर्चेत नाही. पण, ती तशी आहे असे अनेकजण खासगीत बोलतात. जळगाव भाजप समित्यांचे कंट्रोल बोर्ड सुद्धा चार पॅटर्नमध्ये आहे. पहिला पॅटर्न म्हणजे संघ परिवारातून भाजपत प्रवेश केलेले “संघीभाजप”. या मंडळींचे खडसेंशी फारसे सख्य नाही. जवळकीही नाही. जळगावचे संघी जवळ नाही म्हणून नागपूरच्या रेशीमबागेत खडसेंचे फारसे संबंध नाहीत. नागपूर कनेक्शनमधूनच अंजली दमानिया जळगावात येवून खडसेंवर थेट आरोप करून गेल्या अशी चर्चा आहे. पक्ष समितीत दुसरा पॅटर्न हा गिरीश महाजनांच्या सुप्त समर्थकांचा आहे. तिसरा पॅटर्न हा खडसे समर्थक व लाभार्थींचा आहे. चौथा पॅटर्न हा या तीनही घटकांपासून लांब अंतर ठेवून असलेल्या भाजपच्या जुन्या नेत्यांचा आहे. यात सरोदे, वाय. जी. महाजन, गोपाळराव जोशी यांच्या सारखी वृद्ध मंडळी आणि बाजूला सारलेले डॉ. व्ही. आर. तिवारी, बी. एस. पाटील, एम. के. पाटील अशी मंडळी आहे. म्हणजेच, पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या खडसेंच्या भोवती त्यांच्याच कोंडाळ्यातील लोकांचा गराडा राहू शकतो.

खडसे यांना पॅव्हेलियनमध्ये बसण्याची वेळ का आली ? या मागे अजून एक पक्के कारण आहे. ते म्हणजे, खडसेंच्या राजकिय प्रवासाला ४० वर्षे होत आहेत. त्यातील सत्तेची ७ वर्षे (शिवसेना नेतृत्वातील भाजप युतीचे ५ वर्षांचे सरकार आणि आता भाजप नेतृत्वातील शिवसेना, मित्रपक्ष युतीचे २ वर्षांचे सरकार) वगळता खडसे नेहमी विरोधी भूमिकेतच राहिले आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे सन १९८० ते ९५ पर्यंत जळगाव जिल्ह्यातून खडसे व नंतर महाजन हेच दोन आमदार निवडून येत असत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने काँग्रेस नेत्यांच्या हातात असत. जिल्हा बँकेत स्व. प्रल्हादराव पाटील व जिल्हा परिषदेत स्व. के. डी. पाटील यांची सत्ता असताना खडसे किंवा भाजपच्या लोकांना तेथे प्रवेशही नव्हता. जिल्ह्यातील साखर कारखाने, सुतगिरण्या यातही खडसे किंवा भाजपला संधी नव्हती. अशावेळी खडसे हे विधीमंडळात या संस्थांच्या गैरव्यवहाराचा एखादा मुद्दा घेवून मांडत. यासाठी खडसेंना एखाद दुसरा कागद मिळायचा. तेच खडसेंचे अभ्यासाचे भांडवल असे. कालांतराने खडसे भाजपत सिनिअर झाले. नंतर युतीच्या मंत्रीमंडळात मंत्रीही झाले. तापी पाटबंधारे महामंडळाची त्यांनी केलेली स्थापना हे विधायक काम. मात्र, या महामंडळाच्या मार्फत झालेल्या अनेक कामांच्या बाबत आजही आरोप सुरूच आहेत. गेल्या पाच, सहा वर्षांपूर्वी खडसेंना विधीमंडळात विरोधी पक्षनेतापद मिळाले. त्यांच्या नेहमीच्या विरोधाच्या भूमिकेला साजेसे ते काम होते. सत्ताधाऱ्यांच्या गैरप्रकार किंवा गैरव्यवहारांचे कागद त्यांच्याकडे येवू लागले. त्याच्या फायली सुद्धा झाल्या. याचा उपयोग खडसेंनी विधीमंडळात जेवढा सरकारला अडचणीत आण्यासाठी केला तेवढाच संबंधित मंत्र्याकडील सत्तेच्या लाभाच्या हिस्सेदारीतही केला. खडसेंनी घोटाळ्याचे किमान हजार प्रकरणे मांडली. ती पाहूनच ज्येष्ठनेते शरद पवार खडसेंना म्हणाले होते, “विरोधी पक्षनेता म्हणजे सेटलमेंट नेता आहे”. पवार यांच्या होलण्याचा रोख म्हणजेच, “कागद, फाईल व हिस्सेदारी” या सूत्रावर चाललेले खेडसेंचे काम होते. हेच सूत्र वापरून खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये भाजपला पूरक वातावरण तयार केले. फाईलच्या अस्तित्वाला घाबरलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसेंसमोर रिंगणात आलेच नाहीत.

मंत्री असताना सत्तेच्या पीचवर खेळायला उतरलेल्या खडसेंवर पहिला आरोप हा पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्या प्रकरणात झाला. त्यांनी वाळू चोरांना संरक्षण दिले असा अन्वयार्थ सादरेंच्या “सुसाईड नोट”मध्ये निघतो आहे. सादरेंच्या पत्नीने प्रथम थेट खडसेंवर आरोप केले होते मात्र, नंतर त्यांनी प्रतिज्ञापत्र देवून खडसेंवरील आरोपांचा इन्कार केला. या प्रकरणात खडसेंचा वावर हा विरोधी पक्षनेत्या सारखाच होता. मंत्री म्हणून आपल्या प्रतिमेचे भान त्यांनी राखले नाहीच. उलटपक्षी सत्तेच्या पीचवर ते स्वैर खेळायला लागले. त्यानंतर आरोपांची मालिकाच सुरू झाली. त्यात नेटशेडच्या अनुदानाचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. कार्यकर्त्याने ३० कोटींची लाच मागितल्याचा आरोप एसीबीने केला. भोसरीतील एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप गवंडे व अंजली दमानिया यांनी केला. जावयाच्या लिमोझीन कारचा आरोप प्रिती मेमन यांनी केला. दाऊदशी मोबाईलवर संपर्काचा आरोप मनिष भंगाळे याने केला. मत्सोत्पादन संस्थांकडून रकमेच्या मागणीचा आरोप तांडेल यांनी केला. अशा या आरोपांच्या चेंडूला टोलवताना खडसे सत्तेच्या पीचवर स्वैर झाले. मनात येईल तसे आरोप टोलवू लागले. अखेर हताश झालेल्या कॅप्टनने त्यांना  रिटायर्ड हर्ट केले.

खडसे यांचा स्वभाव गप्प बसणारा नाही. ते राजकिय हिशोब चुकता करायला कोणत्याही स्तराला जावू शकतात. त्यांना प्रशासन कसे वापरावे यांचे उत्तम ज्ञान आहे. प्रशासनातील बऱ्याच अधिकाऱ्यांशी त्यांचे अरेतुरेचे संबंध आहेत. राज्यात सरकार काँग्रेस आघाडीचे होते तरी विरोधी पक्षनेता म्हणून मंत्रालय खडसेंच्या तालावर नाचत असे. अशा प्रकारच्या कनेक्शनमधूनच जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्याची चौकशी सुरू करून सुरेशदादा जैन यांना जवळपास तीनवर्षे कारागृहात डांबून ठेवण्याची किमया खडसेंना साधली आहे. राज्यातील जनतेने पोलीस सेवेतील लोहार बंधुंच्या ससेहोलपटाचा प्रकार बघितला आहे. खडसेंनी लोहार बंधुंच्या गैरपद्धतीच्या नेमणुकीचा पुरता पाठपुरावा करून त्यांना घरी पाठविले. एवढेच नव्हे तर ते नोकरीत परत आल्यावरही त्यांना नोकरीतून घरी पाठविले. ही दोन्ही प्रकरणे जाहिर चर्चेतील आहेत. त्यातून खडसेंचा बदला घेण्याचा स्वभाव लक्षात येतो. असाच प्रकार खासदार ईश्वरलाल जैन व त्यांचे पूत्र मनिष यांच्या बाबत खडसेंनी केला होती. जैन पितापुत्रांना साग लागवड योजनेच्या आकडेवारीत गुंतवून त्यांना कारागृहात पाठविण्याचा हरएक प्रयत्न खडसेंनी केला. खडसे आणि भुसावळचे संतोष-अनिल चौधरी यांच्यातील वादविवादही गाजले आहेत. चौधरी बंधुना कारागृहात पाठविण्यासह जिल्ह्यातून तडीपार करण्याचे श्रेयही खडसेंच्या नावावर आहे. खडसेंचा हा स्वभाव टोकाचा आहे. डूख धरणारा आहे. त्यामुळे ते पेव्हेलियनमध्ये असले तरी आपल्याला रिटायर्ड हर्ट करणाऱ्यांना शांतपणे काम करू देतील याची शाश्वती नाही.

पक्षात फारशी खळखळ नाही

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खडसेंचा राजीनामा घेतल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपमध्ये थोडीफार प्रतिक्रीया उमटली. ती खडसेंच्या कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःच्या समाज बहुल पॅटर्नमध्ये व लाभार्थींमध्ये जास्त होती. जळगाव मनपातील भाजपचे १५ नगरसेवक राजीनामा देतील असे सांगण्यात आले. पण, भाजपमधील दोन नगरसेवकांनी रोखठोक भूमिका मांडल्यामुळे तो फॅशन शो बिघडला. काही आमदारही राजीनामा देतील असे सांगण्यात येत होते. पण, त्यांची नावे कधीच समोर आली नाहीत. जळगावमधील काही लोकांना मुंबईत भाजप कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा द्यायला नेले होते. तेथेही फारसा प्रभाव पडला नाही. खडसे पॅटर्नमधील मंडळी फारशी आक्रमक होवू शकली नाही. त्यामुळे बंडाळी किंवा नाराजी दाखविण्याच्या कृतीतील हवाच निघून गेली.

मीडिया ट्रायलचा साक्षात्कार

मंत्रीपदाचा राजीनामा देताना खडसेंनी त्यांच्या विरोधात मीडिया ट्रायल झाल्याचा आरोप करीत सर्वच माध्यमांना दोष लावला. खडसे माध्यमांवर नाराज होण्याचे एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था अशा अनेक निवडणुकांच्या काळात खडसेंनी स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्धीचे पॅकेज दिले. हा व्यवहार होता. तो विशिष्ट हेतू साध्य करेपर्यंत होता. माध्यमांनी धंदा केला आणि खडसे व कुटुंबियांना सत्तास्थाने मिळाली. मात्र, या व्यवहाराच्या पलिकेडे खडसेंच्या इतर गैरप्रकारांकडे माध्यमांनी दुर्लक्ष करण्याचे कुठे ठरलेले होते ? संपादकांना मुक्ताईनगरात जेवण दिले किंवा काहींना विमानात नेवून फिरवले म्हणजे ते कायम खडसेंचे बांधिल राहतील असे थोडेच आहे ? माध्यमांवर घसरताना खडसेंना असे वाटते की, मी पैकेजसाठी सतत खर्च केला तरी माध्यमे माझ्या विरोधात आहेत. म्हणून ते आजही माध्यमांविषयी कडवे बोलतात.

रक्षा खडसेंना पुढे जाण्याची संधी

पेव्हेलियनमध्ये खडसे आराम करीत असताना त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी आता पीचवर खेळण्याचा सराव करावा लागेल. त्यांच्या घरात सध्या पत्नी मंदाताई या महानंद अध्यक्ष, कन्या रोहिणी या जिल्हा बँक अध्यक्ष व सुनबाई रक्षा या खासदार आहेत. यापैकी मंदाताई व रोहिणी यांचे कार्यक्षेत्र व कामाच्या कक्षा मर्यादीत आहेत. रक्षा खडसे या गेल्या दोन वर्षांपासून रावेर मतदार संघात उत्तम जनसंपर्क साधून आहेत. त्यांचे दिल्ली दरबारी व मुंबई मंत्रालयात चांगले संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात जळगाव जिल्ह्यात रस्ते व महामार्ग विकास प्रकल्प, मेगा रिचार्ज प्रकल्प मार्गी लागत आहेत. शिवाय रेल्वे, टेलिफोन विभागाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. खासदार निधीतून ग्रामीण भागात कामे होत आहेत. रक्षा खडसे यांची ही “नेट प्रॅक्टीस” त्यांनी थेट खेळाच्या पीचवर संधी देणारी आहे. त्यांनी निश्चितपणे पुढाकार घ्यायला हवा.

जिल्ह्याचे तीनही पॅटर्न बदनाम !

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात प्रामुख्याने तीन पॅटर्न आहेत. मराठा बहुल, लेवा पाटील बहुल आणि इतर समाज बहुल. हे तीनही पॅटर्न नेत्यांवरील आरोपांमुळे बदनाम झाले आहेत. बहुधा जळगावमधील नेत्यांना मंत्रीपद मानवत नाही, असे इतिहासाच्या पानात डोकावताना दिसते. जिल्ह्यात मराठा, लेवा पाटील पॅटर्नला बाजूला सारून सत्तावर्तुळ तयार करणारे सुरेशदादा जैन कारागृहात गेले. अण्णा हजारे यांनी जैनांच्या विरोधात गैरप्रकारांचे आरोप केल्यामुळे त्यांना मंत्रीपद सोडून रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. त्यानंतर मराठा बहुल पॅटर्नमधील गुलाबराव देवकर यांनाही घरकूल घोटाळ्यातील आरोपी म्हणून मंत्रीपद सोडून कारागृहात जावे लागले. त्यांचीही कारकिर्द रिटायर्ड हर्ट अशीच झाली. त्यानंतर खडसे यांच्या लेवा पाटील बहुल पॅटर्नची सांगता आरोपांमुळे रिचायर्ड हर्ट अशीच झाली.

गिरीश महाजन संधीचा लाभ घेतील ?

खडसेंच्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या नेतृत्वाची आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर येवू शकते. पक्षाच्या समित्यांमध्ये त्यांना मानणारा गट आहे. शिवाय, महाजन यांचे जळगाव शहरातील खान्देश विकास आघाडीशी घरोब्याचे संबंध आहेत. जामनेर पालिकेत भाजपचे बहुमत नसतानाही महाजन यांच्या पत्नी साधना या नगराध्यक्ष आहेत. महाजन यांची प्रशासनावर बऱ्यापैकी पकड आहे. सत्तेच्या पीचवर खेळताना कॅप्टन फडणवीस यांचा त्यांना पाठींबा आहे. कॅप्टनच्या मर्जीतील खेळाडू अशी त्यांची ओळख आहे. जळगावमधील उद्योजक, व्यापारी त्यांचे चांगले मित्र आहे. त्यामुळे महाजन यांना जळगाव जिल्ह्यात नेतृत्व करण्याची चांगली संधी आहे. मात्र, महाजन यांना काही गोष्टींवर नियंत्रण ठेवावे लागले. जसे, रस्त्यावर न नाचणे, मनात येईल तेव्हा बुलेट न पळविणे, लाचेची ऑफर आल्याची उघड चर्चा न करणे, लोकांचे मोबाईल कॉल रिसिव्ह करणे, घरी किंवा कार्यालयात अभ्यागतांना तासंतास ताटकळत न ठेवणे. पुरुष व महिला कार्यकर्त्यांशी गरजेपुरता संबंध ठेवणे.

जळगावात केबल वॉर हेही एक कारण

खडसे यांच्या निकटवर्तीयांनी अनेक प्रकारच्या व्यवसायात सहभाग घेतल्याची चर्चा सुरू असते. त्यात जळगाव शहरातील केबल व्यवसाय हेही सुटलेले नाही. केबल हा विषय करमणूककर विभागाशी संबंधित आहे. खडसेंकडे मंत्री म्हणून हा विभाग होता. केबल ऑपरेटर म्हणून कलेक्टर परवाना देतात. जळगाव शहरातील जुन्या केबलचालकाला विविध प्रकारच्या चौकशीत अडकवून त्यांच्याऐवजी खडसेंच्या नातेसंबंधातील व्यक्तीलाच केबल व्यवसायात उतरविल्याची चर्चा आहे. इन केबल चालक हेही भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी कोर्टातून आपला परवाना परत मिळवला. खडसेंच्या निकटवर्तीयांची गुरूनाथ एन्टरटेन्मेंट आहे. केबल वॉरच्या वर्चस्वात जुन्याच माणसांनी जळगाव शहर व तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे.

हरिभाऊ जावळेंना मंत्रीपदाची संधी ?

खडसे यांचे मंत्रीपद काढून घेतल्यामुळे खान्देशात असलेला लेवा पाटील बहुल समाज भाजप विषयी नाराज होण्याची शक्यता आहे. लेवा पाटील समाजाच्या पाठबळावर भाजपचे १ खासदार रक्षा खडसे व तीन आमदार खडसे, जावळे व भोळे निवडून आले आहेत. हे सामाजिक गणित लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातून हरिभाऊ जावळे यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जावळेंच्या बाबतीत योगायोग असा की, त्यांनी रावेर-भुसावळ मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून विजय मिळविला होता. तिसऱ्या वेळीही भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र, खडसे यांनी आपले पक्षांतर्गत वजन वापरून जावळेंचे नाव कापून सुनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी मिळवून दिली. त्या निवडून आल्या. मनातून दुखावलेल्या जावळेंना नंतर विधानसभा निवडणुकीसाठी यावल मतदार संघातून उमेदवारी दिली गेली. जावळे निवडूनही आले.

भाजपचे जिल्ह्यात ६ आमदार आहेत. यात विधान परिषदेचे गुरुमुख जगवानी व सौ. स्मिता उदय वाघ या आमदार आहेत. जिल्हास्तरावरील बैठकांना या सर्व लोकप्रतिनिधींना न बोलवायचा प्रकारही कलेक्टरांनी या पूर्वी केला आहे. याच विषयावरून जावळेंनी एकदा कलेक्टरशी वाद घातला होता.

महाजन - जावळे संबंध उत्तम आहेत. त्यामुळे महाजन यांच्यासोबत जावळे मंत्री झाले तर दोघे एकत्र काम करतील. जावळे स्वभावाला मृदू आहेत. मात्र, काही लोकांवर अंध विश्वास ठेवून काम करण्याची त्यांना सवय आहे. अशाच प्रकारे कार्यकारी संचालकावर अंध विश्वास टाकल्यामुळे जावळेंना मधुकर सहकारी साखर कारखान्यातील सत्ता घालवावी लागली. सध्या जावळेंच्या प्रयत्नातून केळी प्रक्रिया प्रकल्प सुरु होत आहे. मंत्रीपदाची संधी मिळाली तर महाजन - जावळे जोडी चांगले काम करू शकतील.

तिघा अधिकाऱ्यांची बदली आवश्यक

जिल्ह्याशी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी सत्तेतील मंडळींशी योग्य अंतर ठेवून वागले पाहिजे. मात्र जळगावच्या कलेक्टर रुबल अग्रवाल व एसपी डॉ. जालींदर सुपेकर हे खडसे परिवाराचे सदस्य म्हणून वावरत आले आहे. जिल्हा पालकमंत्री किंवा आपल्या मंत्रालयाचे मंत्री म्हणून कलेक्टर, एसपींनी आदर करून आदेश ऐकले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, आपली प्रतिमाच परिवारातील होईल इतके पदाचे अवमुल्यन केले पाहिजे. जळगावमधील वाळू चोरी प्रकरणात अशोक सादरे या पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली. अप्रत्यक्ष हा ठपका कलेक्टरवर होता. जळगावात चोऱ्या, घरफोडी थांबल्या नाहीत. हे एसपीचे अपयश आहे. याबरोबरच जळगाव महापालिकेत आयुक्त संजय कापडणीस यांची कारकिर्द केवळ खोडा घालणारा अधिकारी अशीच राहीली. जळगाव मनपाचे सर्वाधिक वाटोळे कापडणीस यांच्या काळात झाले. या अधिकाऱ्यांचे हे वर्तन खडसेंच्या पाठबळावर होते. त्यामुळे खडसे सत्तेतून गेल्यानंतर अग्रवाल, सुपेकर व कापडणीस यांनीही बदली मागून घ्यायला हवी.

4 comments:

  1. खुप छान लेख

    ReplyDelete
  2. खुप छान लेख

    ReplyDelete
  3. अकसर लोग 12वीं क्लास पास करके महीना 6000 से 15000 रुपये तक ही
    कमाते है और पूरी जिंदगी एसे ही काम करते है पर उन लोगो को ये नही पता
    होता की india से बहार के लोग हमसे कई गुना आगे होते है और वो लोग
    पढाई के साथ साथ इंतना पैसे कमाते है जितनी एक CA का होता है इसकी
    एक ही बजह है की इंडिया के लोग networking में विश्वास नही करते और
    हम लोग सोचते है की बिना कुछ किये ही सब मिल जाये दोस्तों हर काम मे
    मेहनत करना पड़ता है बिना कुछ किये आपको कुछ हासिल नही होगा
    इंडिया का गरीबी का कारण भी ये ही है तो दोस्तों अब में आपको एक
    ऐसा platform के बारे में बातउंगा जिसमे बिना कोई पैसा लगाये आप लोग
    लाखो तक कमा सकते है उसके लिए आपके पास android मोबाइल होना
    बहुत जरुरी है अब आपको अपने android मोबाइल के अंदर एक play store app
    के अंदर जाना है और champ cash लिख के उस app को डाउनलोड करना है
    जब app डाउनलोड हो जायेगा आपको रजिस्टर करना है और sponsor
    code : 321260 लिख कर उस id को पूरा करना है जैसे ही id बनके तैयार हो
    जायेगी तो आपके सामने एक task होगा उसमे कुछ app दिए होंगे उन सभी
    app को एक एक करके डाउनलोड करना है और उन्हें 2 से 3 मिनट तक चलना है
    जैसे ही आप task पूरा कर लोगे तो आपको $1 dollar आपके champ cash
    wallet में मिल जायेगा ज्यादा पैसे कमाने के लिए आपको आपने friends
    को invite करना है जब आपके friends id बनाकर task पूरा कर लेंगे तो आपको
    $0.300-$600 dollar मिलेगा जब आपके फ्रेंड किसी और को invite करेंगे तो
    और उन्होंने टास्क पूरा कर लिया तो भी आपको पैसे मिलेगे और ऐसे 7 लेवल
    तक चलता रहेगा देर मत कीजिए जल्दी से champ cash डाउनलोड करे
    Sponsor code 321260 इस काम को कोई भी कर सकता है students,
    housewife, old man , etc For more information msg me Whats app
    Number 8806656508

    ReplyDelete