Thursday, 2 June 2016

खडसेंवर मंत्रीपद वापराचे हेत्वारोप

एकनाथराव खडसेंची वेळ चुकली असावी ???
जळगाव जिल्ह्यातील सध्याचे सर्वांत प्रभावीनेते तथा भाजपच्या नेतृत्वातील सरकारमधील सर्वांत ज्येष्ठ मंत्री एकनाथराव खडसे सध्या पक्षांतर्गत श्रेष्ठी, भाजपला नियंत्रित करणारा संघ परिवार आणि पक्षांतर्गत विरोधकांच्या व्हू फाईंडरमध्ये आहेत. व्हू फाईंडरमध्ये व्यक्ती दोनच वेळा असते. एकतर त्या व्यक्तीवर बारकाव्याने लक्ष ठेवण्यासाठी किंवा योग्य रेंजमध्ये आल्याचे आढळल्यानंतर टार्गेट शूट करण्यासाठी. बहुधा खडसेंच्या बाबतीत या दोन्ही  शक्यता आहेत.
भाजपच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळात खडसे सध्या महसूल, कृषि, दुग्धोत्पादन, मत्सोत्पादन, करमणूक कर, अल्पसंख्याक आदी १२ खात्यांचे मंत्री आहेत. यातील काही मंत्रालयांच्या मंत्रीपदाचा उपयोग करीत खडसे यांनी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी लाभ घेतल्याच्या आरोपांची प्रकरणे सध्या चर्चेत आहेत. या सर्व प्रकरणांवर खुलासा करताना खडसे यांनी स्वतःवरील सर्व आरोप खोटे, दिशाभूल करणारे आहेत असा दावा वारंवार केला आहे. मात्र, खडसे यांच्यावरील आरोपांमुळे प्रथम राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकारची प्रतिमा डागाळली. त्यानंतर थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसमोर स्वच्छ प्रशासन व प्रतिमेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजकिय पक्ष म्हणून भाजपच्या नेतृत्वानेही खडसेंची फारशी पाठराखण केलेली नाही. त्यामुळे खडसे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या निष्कासनासाठी "व्हू फाइंडर" सेट केला जात आहे.

खडसे यांच्यावर ही वेळ का आली ? याची अनेक कारणे आहेत. त्याचे विश्लेषण वेगवेगळ्या प्रकारे  करता येईल मात्र, खडसे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत सुरू केलेल्या सुडाच्या राजकारणाचे पडसाद सध्या उमटत असल्याचे अनेक जण बोलतात. या सुडाच्या राजकारणात खडसेंनी भाजपतील आणि भाजपच्या बाहेरील अनेकांची होरपळ केली आहे. आज, त्यातील अनेक मंडळीनी एकमेकाला साथ देत खडसेंच्या विरोधात प्रकरणे उभी केली आहेत. त्यात काही सत्य तर काही असत्याचा खरा वाटेल असा मुलामा दिलेली आहे. या प्रकरणांची सुसंगती लावली तर लक्षात येते की, खडसे यांनी काही गोष्टीत आपल्या मंत्री पदाचा किंवा राजकिय सामर्थ्याचा कुठेतरी वापर केल्याचे सामान्य माणसाच्या सहज लक्षात येते. बहुधा हाच मुद्दाही पक्षश्रेष्ठींना पटत असेल म्हणूनच त्यांनी खडसेंना "क्लिनचीट" अथवा "अभयदान" दिलेले दिसत नाही.

खडसे विरोधी पक्षनेता व नंतर राज्याचे कृषिमंत्री झाले. खडसेंच्या फार्म हाऊसवर सरकारी अनुदानातून उभारलेल्या "नेटशेड" चा विषय आमदार गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी उचलून धरला होता. कृषी खाते खडसेंकडे आहे. त्यानंतर विषय आला खडसेंच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या गजानन पाटील यांनी एका मान्यवराकडे सरकारी भूखंड देण्यासाठी ३० कोटींची लाच मागितल्याचा. हे प्रकरण गृह विभागाशी संबंधित "एसीबी" ने थेट पोलीसात दाखल केले. गृह विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे तर भूखंडाशी संबंधित महसूल  खाते खडसेंकडे आहे. यानंतर खडसेंवर आरोप झाला की, कराचीस्थित कुख्यात आंतराष्ट्रीय डॉन दाऊदच्या पत्नीच्या नावाने असलेल्या फोनवरून खडसेंच्या मोबाईलवर कॉल आल्याचा. हे प्रकरण कोणत्याही राजकिय नेत्याने उकरून काढलेले नाही. हे प्रकरण एका हॅकरने समोर आणले असून त्याने आता हायकोर्टात धाव घेतली आहे. हा विषय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाशी संबंधित असतानाही मुंबई पोलीसांनी परस्पर खुलासा करून टाकला. या आरोपांच्या गर्दीत खडसेंच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी आरक्षीत एक भूखंड थेट पत्नीच्या नावाने चार कोटीत खरेदी केल्याचे प्रकरण पुरावे देत समोर आले. ही जागा एमआयडीसीच्या ताब्यात असताना खडसेंनी महसूल विभागाच्या अखत्यारित कागदपत्रे तयार करून ती खरेदी केली. उद्योगमंत्रालय शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे असून शिवसेनेशी घरोबा तोडणारा मीच, असे वक्तव्य खडसेंनी यापूर्वी केले आहे. हा आरोप चर्चेत असताना भूखंडाविषयी आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी खडसेंनी दबाव आणल्याचा प्रकारही एक पोलीस निरीक्षकाने समोर आणला आहे. तशी नोंद पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्याच्या डायरीत केली आहे. असे यापूर्वी कोणत्याही मंत्र्याच्या बाबत घडलेले नाही. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. अगदी अलिकडे असाही आरोप समोर आला आहे की, ३० कोटींच्या लाच प्रकरणातील गजानन पाटील याने मत्सोत्पादन प्रकल्पातही काही संस्थांकडे लाच मागितली. यावर ३ जुनला पत्रकार परिषद होणार आहे.

खडसे यांनी अगदी तत्परतेने प्रत्येक आरोपाचा इन्कार केला आहे. त्यांनी सर्व प्रकारे सरकारी यंत्रणा वापरत खुलासेही केले आहेत. नेटशेडचे अनुदान कसे रितसर घेतले हे त्यांनी सभागृहात सांगितले. त्यानंतर आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या संबंधित आमदाराचे बोगस कृषि कर्ज प्रकरणही शोधून काढले. गजानन पाटील प्रकरणात तक्रारदार जाधव हे "हॅब्युचिअल" तक्रारदार असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एमआयडीसीच्या जागेचा खुलासा करण्यासाठी पुणे कलेक्टरचे पत्र वापरले. कराचीतील कॉल नाकारण्यासाठी १२ तासात पोलीसांची क्लिन चीट मिळविली. या विषयावर गदारोळ करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विषयी टीव्ही माध्यमावर आक्षेपार्ह वक्तव्य केले व नंतर दिलगीरीही व्यक्त केली.

मत्सोत्पादन व पोलीस निरीक्षकावर दबाव आणल्याप्रकरणी अजुन त्यांनी खुलासा केलेला नाही. मात्र, वरील सर्व आरोपांच्या मागे खडसेंना नैतिकदृष्ट्या अडचणीचा मुद्दा एकच आहे, तो म्हणजे, मंत्रीपदाची शपथ घेताना घटनादत्त अधिकारांचा मी गैरवापर स्वतः किंवा इतरांसाठी करणार नाही असे म्हणावे लागते. खडसेंनी ते म्हटले आहे. त्यांची ती शपथ केवळ एका मंत्रालयासाठी नाही तर त्यांच्याकडील १२ मंत्रालयांसाठी आहे. आणि त्या १२ पैकीच पाच- सहा मंत्रालयांशी संबंधित ही प्रकरणे चर्चेत आहेत. पदाचा गैरवापर झाला हे कागदोपत्री सिद्ध होत नसले तरी कागदपत्रांच्या मागील घडामोडीतून काय घडले असावे ? हे लक्षात येते. खडसेंवरील हे आरोप हेत्वारोप स्वरुपातील आहेत. म्हणूनच ते जास्त अडचणीचे आहेत.

नैतिकता, विश्वास, पारदर्शकता याची लेखी प्रमाणपत्रे कुठे असतात का ? जेव्हा आपण म्हणतो, गैरव्यवहाराचे पुरावे द्या, त्याचवेळी कोणी विचारले की, तुमच्यातील नैतिकता, विश्वास व पारदर्शक कारभाराचे पुरावे द्या, तर त्याचे लेखी पुरावे कोणते असतात ? नैतिकता, विश्वास, पारदर्शकता हे गुण माणसाच्या वर्तनात असतात. कृतितून दिसतात. अनुभवातून त्याची प्रचिती येते. बहुधा खडसेंच्या बाबतीत हा मुद्दा तकलादू ठरत आहे. आरोपाला कागदी खुलासा किंवा बचावाची बाजू म्हणता येईल. पण, लोकांच्या मनातील खडसेंच्या प्रतिमेला गेलेला धक्का किंवा तडा कसा दुरूस्त होणार ?

गेल्या तीन-चार वर्षांत खडसेंनी प्रत्येक ठिकाणी राजकिय प्रभाव सिद्ध करणारे राजकारण केले. आपल्याशी वैर घेणाऱ्या किंवा आरोप करणाऱ्या व्यक्तीला संपवून टाकण्याचीच त्यांची भूमिका राहिली. पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेरील इतर नेत्यांनाही याचा दाह जाणवला आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा मंत्री म्हणून जळगाव जिल्ह्यात वावर नगण्य आहे. महाजन असे का वागतात ? ते खडसेंचा आदर करतात की, जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही, असे काही ठरले आहे ? हरिभाऊ जावळे यांची खासदारकीची उमेदवारी ऐनवेळी का बदलली गेली ? शिवसेना आमदाराच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला त्याच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी दाखल केला. त्याच आमदाराच्या बोगस कर्जाची प्रकरणे शोधून काढली. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदारालाही गुन्हा दाखल करण्याची जाहीर भाषा वापरून भंडावून सोडले. राज्यसभेचे खासदार ईस्वरलाल जैन, त्यांचे पूत्र मनिष जैन यांच्या विरोधात साग लागवड प्रकरण लावून धरले. जैन पितापूत्र सुद्धा आम्ही निर्दोष आहोत असे ओरडून सांगत होते, मात्र खडसे त्यांच्या अटकेच्या तारखा जाहीर करीत होते. अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल जैन पितापुत्राच्या बाजुने आला.

खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सहकारात सर्वपक्षीय व बिनविरोधचा फॉर्म्यूला आणला. काय होता हा बिनविरोधचा फॉर्म्यूला ? विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना खडसे यांच्याकडे जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ यात झालेल्या गैरप्रकारांच्या अनेक फाईल आहेत. अनेक आजी-माजी संचालकांवर विविध प्रकारच्या नोटीसा लागलेल्या आहे. ती मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. बिनविरोध म्हणजे, तुम्ही आता थांबा नाहीतर चौकशा सुरू होवून प्रकरणे पोलीसात जातील, हाच एक न बोलता केलेला इशारा होता. त्यामुळे बऱ्याच जणांनी निवडणूक रिंगणातून काढता पाय घेतला. खडसेंना हेच हवे होते. नातेवाईकांसह भाजपच्या इतरांना सहकारात स्थिरावण्याची संधी बिनविरोधमुळे मिळाली. असे होत असताना, आपल्या विरोधात अनेक छुपे विरोधकही तयार होत असल्याकडे खडसेंनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कारण, जिल्ह्यातील सत्ता ही कलेक्टर, एसपी आणि इतर अधिकाऱ्यांच्या लांगुनचालनामुळे प्रभावाखाली राहू शकते हा त्यांचा अनुभवी कयास होता. तो खराही होता.

येथे एक मुद्दा पुन्हा लिहायची इच्छा होते. तो म्हणजे, राजकारणात किंवा सहकारात आपल्या कुटुंबियांना पदे मिळवून देतान खडसे यांनी ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. पवार स्वतःच्या घराणेशाहीचा बचाव करताना म्हणत, अजित किंवा सुप्रिया हे निवडून आलेले आहे. त्यांना कोणीही नियुक्त केले नाही. हेच वाक्य उचलून खडसे स्वतःच्या कुटुंबियांचा बचाव करीत. खडसेंनी पवार यांचे सोयीचे वक्तव्य सोयाच्या जागी वापरले. मात्र, खडसे विरोधीपक्षनेते असताना पवार एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, विरोधीपक्षनेते तोडीपानी करण्यात व्यस्त असतात. बहुधा पवारांचे हे वक्तव्य खडसे सोयीने विसरले. मात्र, आज मंत्रीपदावरील खडसेंवर होत असलेल्या आरोपांच्या फैरीत पवारांनी केलेल्या वक्तव्याचे काही शब्द खडसेंभोवती "शब्दांची भुतावळ" म्हणून फिरताना दिसतात ...

No comments:

Post a Comment