Wednesday, 29 June 2016

दादा आणि ताई जोडी न्यारी ...!!!

हेमाताई आणि भरतदादा
खान्देशी मातीत नाती पट्कन रुजतात. आई, बाबापेक्षा दादा आणि ताई ही नाती सर्वसामान्य होतात. कोण्याही अनोळखी माणसाचा एखाद्या कार्यातून संपर्क आला तरी त्याला दादा आणि महिलेस ताई म्हणणे ही खान्देशी परंपरा. आंग्ल परंपरेत अन्कल, अन्टी म्हणत नाते जोडतात. हिंदी भाषिक परंपरेत माणसाला भाईसाहब म्हटले जाते आणि महिला भाभीजीच ठरते. खान्देशात मात्र बहिणाबाईच्या अहिराणीत सुद्धा काहुन रे दादा आणि कसाले ताई असेच म्हणतो. 

Thursday, 23 June 2016

पावसासाठी शहाणपण

पाऊस पाडण्यासाठी वापरले जाणारे हेलिकॉप्टर
जळगाव जिल्ह्यात पावसाने ताण दिली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस नाहीच. शेतकऱ्यांसह साऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. पेरण्यांची काहीही तयारी नाही. बियाण्यांच्या दराचाही घोळ आहेच. बाजारपेठेतही हालचाल नाही. राजकारण हे क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रात वातावरण डल, निस्तेज आहे.

पाऊस लांबला की, देवाधर्माचा धावा सुरू होतो. पाखंडी लोकांचे फावते. मग सुरू होतात अंधश्रद्धेचे प्रयोग. अगदी पर्जन्ययागापासून, महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे, गणपती पाण्यात बुडवून ठेवणे किंवा गावभर धोंडी मिरवणे. बेकडाचे लग्न लावण्याचा महामूर्ख प्रयोगही होतो. पावसासाठी सामुहिक प्रार्थनेचाही कार्यक्रम घेतला जातो. हे आहेत नेहमीचे अनुभव. यातील होम हवनचा पर्याय चाळीसगाव येथे अलिकडे झाला. सामुहिक प्रार्थनेचे इतर जिल्ह्यातील एक दोन ठिकाणचे फोटो व्हायरल होत आहेत. जसा जसा पाऊस लांबेल तसे इतर प्रयोग सुरू होतील.

Wednesday, 15 June 2016

जळगावच्या मेहरुण तलावाने दिला सकारात्मक लोकसहभागाचा धडा

जळगावकरांना समुह विकासासाठी एकत्र येण्याची कार्यशैली व मानसिकता बदलावी लागणार आहे. जळगाव शहर हे केवळ बोलून सुंदर होणार नाही तर ते सुंदर करण्यासाठी साऱ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे. समुह आणि सामुहिक विकासात लोकसहभाग, लोकवर्गणी व लोकलेखा मूल्यांकन आवश्यक असते. त्याची फल स्वरुप अनुभुती याचवर्षी मेहरूण तलाव तुडुंब भरल्यानंतर प्रत्येक जळगावकराला येणार हे निश्चित. म्हणून म्हणावेसे वाटते की, एका तलावाचे खोलीकरण समाजाला सभ्यता आणि सहृदयता शिकवून देत आहे. आता आपण एकत्र येवून मनामनांतील गाळ उपसण्याची गरज आहे. हे काम यंत्राद्वारे होवू शकत नाही. ते आपणच आपले केले पाहिजे.

तापी पूर्णा शुगरसाठी घेतलेली शेतजमीन एकमंत्री, तीन आमदार परत करतील ?

जलसंपदामंत्री  गिरीश महाजन, आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार जगवानी 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मालकीच्या मानपूर (ता. भुसावळ) शिवारातील ४.९७ हेक्टर शेतजमीनीचा मुद्दा आता वेगळ्या वळणावर आला आहे. ही शेतजमीन सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या तापी पूर्णा शुगर ऍण्ड अलाईड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडने खासगी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केली होती. गेल्या पंधरा वर्षांत हा साखर कारखाना सुरू होवू शकला नाही. त्यामुळे खासगी साखर कारखान्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी शेतजमीन विक्री केली होती त्यांना आता मुंबई शेतजमीन कूळ वहीवाटदार अधिनियम १९४८ च्या कलम ६३ (१) (अ) नुसार आपली मूळ शेतजमीन सन २००१ च्या मूळ किमतीत परत मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. यासाठी या शेतकऱ्यांनी भुसावळ तहसीलदार किंवा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे साधा अर्ज करणे आवश्यक आहे.  

Tuesday, 14 June 2016

गिरीश महाजनांच्या जमिनीचा “भंडाफोड”

आपण शांति धरावी व दुसऱ्यास धरायाला लावावी
आपण तऱ्हेवाईकपणा सोडावा, व दुसऱ्याकडून सोडवावा
आपण चांगली क्रिया करावी व पुष्कळांकडून करवावी
एखाद्याला अपाय करावयाचा असेल तर तो बोलून दाखवू नये, परभारेच त्याला त्याचा ठोकताळा आणून द्यावा
राजकारण पुष्कळ केले तरी ते कोणाला कळू देवू नये, पण ते करताना दुसऱ्याला पीडा देण्याचा हेतू नसावा.

तापी पूर्णी शुगर प्रॉडक्टची नेटवर माहिती १
सार्थ दोसबोध चे पारायण करताना दशक अकरावे हे भीमदशक असून त्यात पाचवे प्रकरण राजकारण या विषयावर आहे. राजकारण करणाऱ्या माणसात कोणते गुण असावेत आणि राजकारण कसे करावे ? याविषयी समर्थांनी २७ लक्षणे सांगीतली आहेत. त्यातील काही ओळींचा साधा सोपा अर्थ वर दिला आहे. राजकारण करताना एखाद्याचा काट्याने काटा काढायचा असेल तर ते मुखावर न आणता परभारेच त्याचा काटा काढावा असे समर्थांनी इतर लक्षणांच्या सोबत सांगीतले आहे. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या अर्धसत्याचा खेळखंडोबा होय.

Sunday, 12 June 2016

गिरीश महाजनही आरोपांच्या वावटळीत!!

राज्याचे जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्यातील आता एकमेव मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात धूळग्रस्त वावटळ उठली आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात ४.९७ एकर शेतजमिन महाजन यांच्या नावावर सन २००२ पासून आहे. या शेतजमिनीचा महाजन यांच्या नावाचा सातबारा उतारा आता फेबसुक, ट्विटर आणि व्हाट्सऍप सारख्या सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहचला आहे. महाजन यांनी विधानसभेच्या ३ निवडणुका जामनेर मतदार संघातून सन २००४, २००९ आणि २०१४ दरम्यान लढवून जिंकल्या. आता आक्षेप हा घेतला जात आहे की, या तीनही निवडणुकींसाठी उमेदवार म्हणून प्रतिज्ञापत्र भरताना महाजन यांनी मानपूर शिवारातील जमिन मालमत्ता विवरणात दाखविलेली नाही. महाजन यांचे यावर उत्तर आलेले नाही. एक गोष्ट मात्र नक्की की, खडसेंच्यानंतर आता महाजन आरोपांच्या वावटळीत आहेत. या जागेसंदर्भात जर निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयात कोणी तक्रार केली अथवा याचिका दाखल केली तर महाजन यांच्या अडचणी वाढू शकतात.

Saturday, 11 June 2016

पेव्हेलियनमध्ये खडसे काय करणार ?

३० कोटींची लाच मागणारा कार्यकर्ता, भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी, जावायाची लिमोझीन कार यासह मच्छिमार सोसायटीच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी केलेला आरोप यामुळे एकनाथराव खडसे यांची राज्यमंत्री मंडळातून गच्छंती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे  अखिल भारतीय अध्यक्ष अमित शहा यांनीच थेट निर्वाणीचा आदेश दिल्यामुळे सत्तेच्या पीचवरून खडसे नाखुशीने परत आले. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर खडसेंना सक्तीने “रिटायर्ड हर्ट”करून “पेव्हेलियन” मध्ये बसविण्यात आले आहे. आता खडसे तेथे काय करतात, पीचवर पुढील खेळ कसा होतो आणि खडसेंचे पाठीराखे काय काय करतात ? याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

Monday, 6 June 2016

बहुसंख्य विरुद्ध बहुजन

जनकल्याणासाठी मिळालेल्या सत्तेचा वापर एखाद्या नेत्याने स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा बगलबच्च्यांसाठी केल्याचे माध्यमांनी कागदपत्रांची जंत्री दाखवून उघड केले की, संबंधित नेता आज दोन पद्धतींनी स्वतःचा बचाव करताना दिसतो. पहिल्या पद्धतीत, त्याला स्वतः बहुजन असल्याचा साक्षात्कार होतो. दुसऱ्या पद्धतीत तो माध्यमांवर घसरून माध्यमांनी मला बदनाम केल्याचा (मीडिया ट्रायल) दावा करायला लागतो. या दोन्ही प्रकारच्या बचावात नंतर स्वतःची जात, समाज आणि राजकिय पक्षासाठी केलेले कार्य, त्याग असे भावनिक मुद्दे उकरुन काढत समर्थकांची दिशाभूल केली जाते किंवा समर्थक स्वतःच भडकतात. गुण्यागोविंदाने एकत्रित नांदणारे समाजमन कलुषित करून विभाजनाची बिजे बेमालूम पेरली जातात. अशा प्रकारे उद्भवणाऱ्या सामाजिक स्थितीत सर्व सामान्यांनी बहुजन म्हणजे काय ? हे नीट समजून घेणे आवश्यक आहे.

Sunday, 5 June 2016

रक्षा खडसेंना कामाची अधिक संधी !

राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देवून एकनाथराव खडसे बाहेर पडले आहेत. काही काळानंतर मंत्रीमंडळात खडसे कमबॅक करतील याविषयी शंका नाही. खडसेंवरील कथित आरोपांच्या चौकशीला निवृत्त न्यायाधिश किती वेळ घेतील हे सांगता येत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागातील गैरव्यवहारांशी संबंधित आरोपांमुळे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून काही काळ मंत्रीमंडळाच्या बाहेर राहणे पसंत केले होते. पण, त्यांच्या कमबॅकची फिल्डींग त्यांच्या राजीनाम्याच्या दिवशीच लागली होती. चौकशीचा फार्स अवघ्या सहा महिन्यांत आटोपून व जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढून पवार हे मंत्रीमंडळात परतले होते. 

दुसरे उदाहरण सुरेशदादा जैन यांचे आहे. अण्णा हजारेंनी सुरेशदादांवर विविध प्रकारच्या गैरव्यवहारांचे आरोप केल्यामुळे आघाडी सरकारने जैनांचा राजीनामा घेतला होता. जैनांनाही कमबॅकचे आश्वासन मिळाले होते पण, ते पक्षाच्या श्रेष्ठींनी पाळले नाही. खडसेंच्या बाबतीत या दोन्ही उदाहरणांपैकी भविष्यात काय घडते ? हे काळच दाखवून देईल. 

Friday, 3 June 2016

जळगाव जिल्ह्यात सुडाचे राजकारण !!!(या विषयावर दिलेल्या माहितीवरून झी २४ तासने विशेष रिपोर्ट केला आहे. त्याच विषयाचा सविस्तर लेखाजोखा)

लेखाशी संबंध नसलेला फोटो
जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या अस्थीर आहे. जिल्ह्यातील सर्वांत प्रभावशाली नेते तथा भाजप सरकारमधील मंत्री एकनाथराव खडसे विविध आरोपांच्या घेऱ्यात सापडले आहेत. खडसेंचे काय होणार ? याची चिंता खडसे समर्थकांना आहे तशीच त्याची उत्सुकता खडसे विरोधकांनाही आहे. जिल्ह्याचे राजकारण अशा टोकदार परिस्थितीत नेण्यासाठी गेल्या चार-पाचवर्षांतील अनेक घटना, घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातील एक ठळक कारण हे सुडाचे राजकारण हेही आहे. या राजकारणाचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेवू ... 

Thursday, 2 June 2016

खडसेंवर मंत्रीपद वापराचे हेत्वारोप

एकनाथराव खडसेंची वेळ चुकली असावी ???
जळगाव जिल्ह्यातील सध्याचे सर्वांत प्रभावीनेते तथा भाजपच्या नेतृत्वातील सरकारमधील सर्वांत ज्येष्ठ मंत्री एकनाथराव खडसे सध्या पक्षांतर्गत श्रेष्ठी, भाजपला नियंत्रित करणारा संघ परिवार आणि पक्षांतर्गत विरोधकांच्या व्हू फाईंडरमध्ये आहेत. व्हू फाईंडरमध्ये व्यक्ती दोनच वेळा असते. एकतर त्या व्यक्तीवर बारकाव्याने लक्ष ठेवण्यासाठी किंवा योग्य रेंजमध्ये आल्याचे आढळल्यानंतर टार्गेट शूट करण्यासाठी. बहुधा खडसेंच्या बाबतीत या दोन्ही  शक्यता आहेत.