Tuesday 17 May 2016

जिल्ह्यातील मौनधारी भाजपनेते !!!

उदय वाघ                                      आमदार सुरेश भोळे
गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात गेले तीन दिवस जिल्ह्याचे नेते व महसूल तथा कृषिमंत्री एकनाथराव खडसे स्वतः आपली भूमिका मांडत आहेत. खडसेसाहेबांच्या बाजूने मुख्यमंत्री अथवा भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी अजूनही कमेंट केलेली नाही. शिवाय, पक्षाच्या प्रवक्त्यांनीही फारसा प्रभावी युक्तिवाद केलेला नाही. राज्यावर जी स्थिती आहे तीच जिल्हास्तरावर आहे. सत्तेच्या सारीपाटावर हिस्सेदारीत ज्यांना खडसेसाहेबांनी वाटा दिला त्यापैकी एकानेही भाऊंवर विश्वास व्यक्त केलेला नाही.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष, खासदार, आमदार, विधान परिषद आमदार, जि. प. अध्यक्ष यांच्यासह जिल्हा, तालुक्यावरील सत्तेत हिस्सेदार यांच्यापैकी कोणीही भाऊंची बाजू घेणारे वक्तव्य केलेले नाही अथवा पत्रक कोणीही प्रसार माध्यमांना दिलेले नाही. असेही नाही की, भाऊंनी या पदाधिकारींना सांगितले, माझे मी पाहतो. तुम्ही गप्प बसा. खडसेसाहेब दोषी की निर्दोष हा तपासाचा भाग आहे पण या मौनी पदाधिकारींनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेवून भाऊंवर लोकोपवादाचा दोष लावून टाकला आहे. दोष तीन प्रकारे असतात. एक सत्तेचा, तो एसीबीने गुन्हा दाखल करून लावला आहे. दुसरा न्यायालयाचा, तेथे गजानन पाटील कोठडीत आहे. तिसरा दोष हा लोकोपवादाचा असतो. लोक काय बोलतात ? या दोषापायीच रामाने सिताचा त्याग केला होता. पण, घरातील मंडळी मौन बाळगून असतील तर लोकोपवाद घरातून सुरु होतो.

भाजपचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी भाऊंच्या बाजुने वक्तव्य करीत नाही यामागे मला थोडे वेगळे कारण दिसते. सत्तेचे वाटप करताना भाऊंनी महत्त्वाची पदे कुटुंबियात ठेवली त्यामुळे त्या पदांची अभिलाषा बाळगून असलेले अनेकजण आतून नाराज आहेत. नाराजांची संख्या वाढली असून त्यांनी आता मौन घेतले असावे. एक एक उदाहरण पाहू.

भाजप जिल्हाध्यक्षपदी उदय वाघ हे खडसेंमुळे पुन्हा आहेत का ? मुळीच नाही. ते तडजोडीतून या पदावर आहे. खडसेंनी आ. सुरेश भोळेंना जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवले म्हणून पक्षंतर्गत दुसऱ्या फोर्सने वाघ यांना रिपीट केले. याशिवाय, सादरे प्रकरणात वाघ यांना विशिष्ट जातीच्या पदाधिकारींनी खुलासा द्यायला भाग पाडले होते. खडसेंवरील निष्ठा दाखविण्यासाठी सुभाष चौकातील सभेत कमरेखालची भाषा वापरायलाही भाग पाडले होते. उदय वाघ यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची पुरवणी काढली तर काही भाऊ समर्थक नाक मुरडत होते.

आता आ. भोळेंचे पाहू. ते नगरसेवकचे आमदार झाले. मात्र रिकामी जागा पत्नीला दिली. दुसरीकडे चर्चा अशी आहे की,  आ. भोळे यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितले गेले होते. त्यामागचे कारण चर्चा करण्याचे नाही. पण, आ. भोळे मनातून शासंक आहेतच. शहरातील व्यापारी गाळे लिलावाच्या प्रकरणामुळे भोळेंची व्यापाऱ्यांमध्ये पत खालावली आहे. मुख्यमंत्र्यांचे २५ कोटी भाऊ मिळू देत नाही असे भाजप नगसेवकच बोलतात.आ. भोळे पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नाही.

आमदार गुरुमुख जगवानी यांची टर्म संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांना पुन्हा संधी मिळेल याची शाश्वती नाही. जागा जिल्ह्याच्या वाटेवर आली तर दुसरे पर्याय आहेत. तेही या प्रकारामुळे नाराज आहेत. शहरातील व्यापाऱ्यांचा जगवानींवर रोष आहेच. गाळे लिलाव प्रकरणात जगवानींनी व्यापाऱ्यांकडून कोर्ट कचेरीसाठी पैसा गोळा केला. त्याचे पुढे काय झाले ? व्यापारी विचारतात.

आमदार सौ. स्मिताताई वाघ या कोणामुळे आमदार झाल्या याची चर्चा आता उघडपणे आहे. मुख्यमंत्री आणि पक्षांतर्गत दुसरा फोर्स यांनी सौ. वाघ यांना ही संधी मिळवून दिली आहे. हा किस्सा बहुतांश मंडळी खासगीत सांगतात.

खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या महत्त्वाकाक्षांना आता मोठे घुमारे फुटले आहेत. जिल्हा दूध संघात तज्ञ संचालक अशी नेमणूक होण्यापूर्वी त्यांनी तेथे आदेश देणे सुरु केले होते. त्यानंतर त्यांना सुनावलेले बोल ते विसरलेले नाहीत. सादरे प्रकरणावेळी खा. पाटील गप्प होते. खासदार म्हणून पाटील यांचे दिल्लीत बरेच स्वतंत्र काम सुरु आहे.

खासदार रक्षाताईंनी केलेली कामगिरी पुरवण्यांमधून वाचण्यात आली. दोन वर्षानंतर त्या स्वतःसाठी पक्षाची उमेदवारी स्वतःच आणू शकतील असा विश्वास वाटतो. खडसे परिवारातील इतरांच्या तुलनेत रक्षाताईंनी स्वतःची प्रतिमा तयार केली आहे. उद्योग - व्यवसायात जळगावमधील केबल नेटवर्कही त्यांच्याकडे असल्याचे सांगतात.

चाळीसगावचे आमदार निवडणुकीपूर्वी पासून स्वतंत्र आहेत. त्यांचा विजय ते भाजपचा नव्हे तर स्वतःच्या संघटनचा मानतात. पक्षाची उमेदवारी त्यांना स्वतःचे बलस्थान वाटते. त्यामुळे ते आजही एक वेगळी यंत्रणा सोबत बाळगून आपले काम करतात. खा. पाटील व आमदार पाटील यांचे बरेच गुळपीठ आहे.

खासदारकी हिरावल्यामुळे आमदार झालेले हरिभाऊंचे डोळे आजही जुन्या आठवणींनी ओले होतात. कलेक्टर मैडम जेव्हा आमदाराला सरकारी बैठकीत किंमत देत नाही तेव्हा आमदाराचा अहंकार दुखावतो. भाजपतील गटबाजी आणि सुमार कामगिरीमुळे हरिभाऊंच्या ताब्यातील मधुकर साखर कारखाना विरोधकांकडे गेला आहे.

आता राहिला प्रश्न आमदार सावकारेंचा. खडसेंमुळे आमदारकी साबुत राहिली पण, भाजपत त्यांची ओळख आहे कुठे ? ना संघटनेत आणि ना इतर संस्थांमध्ये. सावकारे यांना बँक, दूधसंघ यात जागा मिळाली नाही. पक्षाच्या व्यासपीठावरही ते दिसत नाहीत.सावकारे आजही भाजपत उपरेच आहेत.

कधीकाळी जळगाव जिल्ह्यात खडसे - गिरीश महाजन जोडगोळी पक्षाचे नेतृत्व एकत्र करायची. आज दोघेही मंत्री असले तरी खडसे जिल्हा पालकमंत्री असल्याने महाजन एखादी सरकारी बैठकही घेवू शकत नाही. महाजनांचे जळगाव जिल्ह्यात येणे म्हणजे, सकाळी अजिंठा विश्रामगृह नंतर जामनेरला प्रयाण. जामनेर मतदार संघात कार्यक्रम. नंतर मुंबईला प्रयाण. एकदातर महाजन व खडसे रेल्वेतून जळगावला सोबत परतत असताना, महाजन यांनी कार्यकर्त्यांची रेल्वेस्थानकावर गोची नको म्हणून जळगावऐवजी पाचोरा रेल्वेस्थानकावर उतरून जामनेर जाणे पसंत केले होते. खडसे -  महाजन संबंध सहकार्याचे नाहीत. त्यामुळे महाजन हे खडसेंसाठी खुलासा करणे तूर्त शक्य नाही.

खडसेंच्या भोवती असलेल्या गोतावळ्याची ही स्थिती आहे. कोणत्याही कार्यक्रमात स्टेजवर उभे राहताना इतरांना पाचव्या नंबरची जागा असते. खडसेसाहेब, खासदारताई, महानंदवाल्याताई, बँकवाल्याताई यानंतर इतर. कलेक्टरसोबत असतील तर इतरांचा नंबर सहावा. अलिकडे शारदाताई सुध्दा म्हटल्या, पक्षाने जबाबदारी दिली तर मी राजकारणात येते !! आता त्या येणार म्हणजे जागा रिकामी करावी लागणार. नाराजीच्या विषयांचा प्रारंभ आहे तो या छोट्या गोष्टींमधून. कुटुंबाला राजकारणात आणणे हे व्यक्तिगत समाधान देणारे असले तरी अडचणीच्या काळात कुटुंबातील मंडळी खुलासा करू शकत नाही, केला तरी तो लोकांना सामील प्रतिवादीगत वाटतो. हेही खडसेंना आता लक्षात येत असावे.

वरील नावे सोडली तर खडसेसाहेबांच्या भोवती गोतावळा असतो कुणाचा ?? सारे लाभार्थी. पण आतून निराशेचा नासूर बाळगणारे. अशांच्या कोंडाळ्यात खडसेसाहेबांशी मनमोकळे बोलताही येत नाही. असे सोबती असले की, खिंड न लढवताच बाजीप्रभू शहीद व्हायचा !! मी स्वतः बघितले आहे की, शेजारी तासंतास बसून असलेल्या अनेकांना खडसेसाहेब अक्षरशः दोन शब्द सुनावून जायला सांगतात.

खडसेसाहेबांच्या बाबत काय व्हायला हवे ? तर जिल्हा समितीची बैठक होवून खडसेसाहेबांवर विश्वास व्यक्त करणारा ठराव भाजप प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांना जायला हवा. काँग्रेस हा देखावा करण्यात पटाईत आहे.

गेले दोन दिवस खडसेसाहेबांनी गजानन पाटील व तक्रारदार जाधव बाबत मांडलेले काही मुद्दे पटणारे आहेत. गायरान जमिन न देणे, पुनर्विलोकन निकाल, तक्रारदाराचा स्वभाव वगैरे. असे असले तरी या प्रकरणात तीन महिने एसीबी पाळत ठेवते हे जरा खटकणारे आहे. 

त्यातही खडसेसाहेब दोन प्रश्नांची उत्तरे अजून देत नाही. पहिला, विरोधी पक्षनेता म्हणून जाधवला शिफारस का दिली ? दुसरा जाधवांचा अर्ज फेटाळल्यानंतर पुनर्विलोकन कितीवेळा झाले ? 

एसीबीचे ते तीन महिने आणि जिल्ह्यातील पदाधिकारींच्या मौनाचा संबंध असू शकतो ?? हा प्रश्न मला अस्वस्थ करीत आहे.

5 comments:

  1. यालाच राजकारण म्हणतात का सर?

    ReplyDelete
  2. यालाच राजकारण म्हणतात का सर?

    ReplyDelete
  3. sir tumchya likhanala tar todach nahi
    mag te rajkaran aso ki etar vishayavar
    tumchi sabdamadhaly fatkebai sarvanach
    yad lavte

    ReplyDelete