Thursday 5 May 2016

अपरिपक्व प्रेमाची बोचरी सल म्हणजे "सैराट"

दहावी - बारावीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शालेय मुला - मुलींना वर्गातील कोणीतरी आवडत असते. पौगंडावस्थेत त्यांच्यात उत्पन्न होणारी ही प्रेमाची जाणिव तशी अपरिपक्व मात्र अधीर करणारी असते. तिला बघणे, तिच्या गल्लीत जाणे, तिच्या एका झलकसाठी तासंतास तिष्ठून राहणे, चिठ्ठी देणे - घेणे, तिने टाकलेल्या एका कटाक्षात घायाळ होणे आणि दोन - चार दिवस त्याच्यातच गुंतून जाणे, थोडीफार बोलचाल, परिचितांच्या नजरा चोरून सोबत भटकणे अशा अनुभवातून बरेच जण यौवनावस्थेच्या उंबरठ्यावरुन जातात. मी सुध्दा गेलोय. एकदा नाही तर दोन वेळा. घायाळ नुसता मीच नव्हतो तर अशा अवस्थेत विव्हळणाऱ्या मित्रांनाही मदत केली आहे.

पण, कॉलेज लाईफ सुरु झाले किंवा पुढील शिक्षण, नोकरीसाठी गाव सुटले की अशा अर्धवट, कच्च्या - पक्क्या प्रेम कहाण्या धुसर झालेल्या मी अनुभवल्या आहेत. माझेही तेच झाले. याला प्रेम फसले असे म्हणता येणार नाही. प्रेमाचा अर्थच कळलेला नसताना केवळ आकर्षणातून निर्माण होणारी ती भिन्न लिंगी आसक्ती असते हे मात्र मी दाव्याने सांगू शकतो. कालप्रवाहात ही आसक्ती लोप पावून अर्धवट प्रेमविर ताळ्यावर आल्याची असंख्य उदाहरणे आहे. नंतरचे वैवाहिक व प्रापंचिक आयुष्य सुरु झाले की, या आठवणींवर विस्मृतीची धूळ साचू लागते. कालौघात धुळीचा पापुद्रा होतो.

माझ्या आयुष्यातील कच्या, अपरिपक्व आकर्षणाचा पापुद्रा "सैराट" ने काल उचकटून टाकला. ती गल्ली, ती शाळा, तो घाट, ते मित्र, ती चिठ्ठी प्रकरण, सहवासाचे स्वप्न रंजन हे सारे सारे अगदी कालपरवा माझ्या सोबत घडल्याचे वाटू लागले. ते शेत, ती केळी, तो ऊस, ती पाय विहीर ही चित्रपटातील लोकेशन्स मला गावाच्या फ्लॅशबॅकमध्ये घेवून गेली. गाव, गल्ली आणि शेती - वाडीचे एवढे सुंदर चलचित्रण "सैराट" मध्ये पुन्हा अनुभवता आले. चित्रपटाचा पूर्वार्ध हा आपलाच वाटला.

दोघांचे सोबत पळून जाण्यापर्यंतच्या कहाण्या शंभरात दहा घडतात. पळून जाणाऱ्यांपैकी आठ जोड्या परत येतात. एक जोडी पूर्णतः उध्वस्त होते आणि एक सहजीवनात यशस्वी होते. ही टक्केवारी मित्रांची प्रेमप्रकरणे, गल्ली व गावातील भानगडी आणि स्वानुभवातून काढली आहे. "सैराट" मधील त्या दोघांचे पत्र्याच्या शेडमधील वावरणे हे व्यावहारिक जीवनाची प्रत्ययकारी जाणिव करून देते. भविष्यात काय होवू शकते याची ती झलक आहे. परिस्थितीचे हे चटके खावून प्रेमी युगल घरी परतल्याचीच उदाहरणे मी अनुभवली आहे. एखाद - दोन घरातीलच आहेत म्हणा. पळून जावू केलेले लग्न नंतर सुखी दाम्पती जीवनात रुपांतरित झाल्याची अपवादाने उदाहरणे आहेत. "सैराट" हा पूर्वार्धात प्रत्येक शालेय मुला - मुलीची अपरिपक्व मानसिकता दाखवणारा चित्रपट आहे. मात्र "सैराट" चा उत्तरार्ध हा शंभरातील एका अपवादाचा चित्रपट आहे. 

"सैराट" चा अनपेक्षित शेवट हा महाराष्ट्रीयन संस्कृतीशी पटणारा नाही. युपी, बिहार, हरियाना अशा अॉनर किलिंगच्या सहज घडणाऱ्या घटनांचे ते प्रतिबिंब आहे. कसलेल्या चित्रकाराने कॅन्व्हासवर सुंदर चित्रकारी करावी आणि अखेरचा फिनिशिंग मास्टर स्ट्रोक मारताना सरावलेल्या ब्रशने भलतेच काही करावे असा "सैराट" चा शेवट मला वाटतो. हे माझे स्वतःचे मत आहे. इतरांचे वेगळे असू शकेल. माझ्याशी सहमत असावेच ही अपेक्षा नाही. 

"सैराट" मला माझ्या शालेय प्रेमाची आठवण करुन देण्यापर्यंत आवडला. गावाचे शानदार चित्रिकरण भावले. साथ देणाऱ्या शाळकरी मित्रांच्या स्मृती चाळवल्या. "सैराट" मध्ये मला जात, पात, समाज कुठेही दिसला नाही. त्यावरील कोणत्याही आक्षेपांशी मी सहमत नाही. "सैराट" पाहावा, अनुभवावा असाच जमला आहे.

आता प्रश्न उरतो, "सैराट" का पाहावा ? याचे एकमेव उत्तर आहे ते म्हणजे गावाकडील, शाळेतील भुतकाळी प्रेमाची सुखद खपली काढून घेण्यासाठी. सिनेमाच्या खूर्चीत शरीर ठेवून पडद्यावरील जोडीत स्मृती शोधण्यासाठी. ज्यांचे प्रेम फसले आहे त्यांनी आणि ज्यांचे यशस्वी झाले त्यांनीही तो पाहावा. एक अनुभव नक्की, "सैराट" संपल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताना विसरलेल्या मित्रमैत्रिणी मेंदूच्या एक एक कप्प्यातून बाहेर आल्या. प्रेमाची रोजची रिकरींग ही हृदयात होते, मात्र फसलेल्या प्रेमाचे फिक्स डिपॉझीट हे मेंदूत असते. काल या  फिक्स डिपॉझीटच्या पावत्या "सैराट" ने हाताळायला लावल्या ...

आर्ची - आणि परश्याची प्रेम कहाणी ही सुसाट, सैरभैर अशीच आहे. गावात मोटारसायकल पळवणाऱ्या मित्राला आम्ही म्हणायचो काय "सर्राट" गाडी पळवतो. सर्राट आणि सैराटची जवळीक मला यात दिसते. बहुधा इतरही अर्थ असू शकतो 

*** सैराट चित्रपट कुटुंबासह पाहावा असा आहे.

(टीप - चित्रपट संपल्यावर हेडमास्तर असलेली बायको म्हणाली, अशा चित्रपटामुळे शाळकरी मुले प्रेमाच्या भानगडीत पडण्याची शक्यता आहे. मी चित्रपटात भूतकाळ शोधला. ती भविष्यावर बोलतेय)

9 comments: