![]() |
हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटेंसोबत अपूर्णांकची टीम |
राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळवून देणाऱ्या जळगावकर कलावंतांच्या या नाटकाने "जळगावचे व्यावसायिक नाटक" या वर्गात प्रवेश केला आहे. शंभुअण्णाला मी म्हटले, "अण्णा हे नाटक आता व्यावसायिकतेकडे चालले आहे." त्यावर अण्णा म्हणाले, "नाटकाचे तिकीट लावून शो सुरु झाले की ते नाटक व्यावसायिक होते. माझ्या दृष्टीने तिकीट पाच रुपयांचे की पन्नास रुपयांचे याला महत्व नाही. "अपूर्णांक" चे २४ प्रयोग ज्या महानगर, शहर व निमनगरात झाले, तेथील प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि नाटकानंतर होणारी चर्चा, त्यात महिलांचा बोलका सहभाग हे सारे सारे नवे आहे. या नाटकाने "जळगावच्या नाटकाकडे" इतर ठिकाणच्या कलावंतांना गांभीर्याने पाहायला लावले आहे हे मात्र नक्की ...!!"
माेहन राकेश लिखित ‘अाधे अधुरे’ हे नाटक सन १९७० च्या सुमारास गाजले. कुटुंबाची चौकट मोडून इतरांकडे सुख, समाधान शोधयला निघालेली सावित्री तेव्हा बंडखोर ठरली होती. महिलावादी संघटनांनी त्याला विरोध केला होता. आज शंभुअण्णा टीमच्या या नाटकाचे प्रयोग महिला संघटना आयोजित करीत आहेत. "अपूर्णांक" ने सामाजिक परिवर्तनाचे हेही वर्तुळ पूर्ण केले आहे.
जयवंत दळवींनीही या नाटकाचा मराठी अनुवाद केला होता. मात्र, दळवींची भाषा आणि त्यांनी निवडलेली कौटुंबिक चौकट ही महानगरीय अपार्टमेंटची होती. अपार्टमेंटची महिला तेव्हा शिष्ट वर्गात होती. या पार्श्वभूमिवर शंभूअण्णांनी पुन्हा "आधे अधुरे" चा अनुवाद करायचे म्हणजे आव्हान होते. मात्र, शंभुअण्णा रंगमंचावर कसलेला गडी आहे. ते उगाचच "अपूर्णांक" त पाच वेगवेगळ्या (सूत्रधार, महेंद्र, सिंघानिया, जगमोहन अाणि जुनेजा) भूमिका करीत नाहीत ! शंभुअण्णांनी ‘अपूर्णांक’ची चौकट सर्वसामान्य घराची केली. संवाद लेखनातील स्वातंत्र्य पुरेपूर घेवून ते सामान्य कुटुंबाचे केले. त्यामुळे घरातली सावित्री बहुतांश महिलांना आपल्यातील "ती" वाटू लागली. नाटकाचा विषय "बीटवीन द लाईन" बंडखोर महिलेचा असला तरी सावित्रीची मानसिक कुतरहोड मंजुषा यांनी अभिनयात भन्नाटपणे उभी केली.
गंमत हिच आहे की "आधे अधुरे"ची नायिका एका कुटुंबातील अपवादाची कहाणी होती. मात्र "अपूर्णांक" तील सावित्री ही बहुतांश घरातील अव्यक्त नायिका ठरते आहे. अाधुनिक भारतातील असंख्य कुटुंबांचं प्रातिनिधिक रूप त्यात दिसते आहे. मूळ नाटकाच्या गाभ्याला धक्का लागू देता आजच्या संदर्भातील रुपांतराचे नाटक ते वास्तव असेही वर्तुळ "अपूर्णांक" ने पूर्ण केले आहे.
शंभुअण्णा नाटकाविषयी, कलावंताविषयी आणि बैक स्टेज सहायकांविषयी भरभरुन बोलतात. ते म्हणतात, नाटकानंतर चर्चेचा नवा फंडा आम्ही सुरू केला. त्याला रिस्पॉन्स ट्रिमेंडस आहे. नंदुरबार, भडगाव, मुंबई, पुणे अशा सर्व ठिकाणच्या महिला सावित्रीवर भारभरून बोलतात. "दुसरीकडे सुख, समाधान शोधणारी सावित्री दोषी वाटते का?" असे मी विचारतो तेव्हा सर्व महिला एका सुरात "नाही" म्हणतात. अर्थात, पुरूष "काही अंशी दोषी मानतात." डॉ. प्रकाश आमटे परिवाराने हेमलकसात आमचे याच विषयासाठी भरभरून कौतुक केले.
नाटकाच्या पुढील प्रवासाविषयी शंभुअण्णा म्हणतात, २५ प्रयोगांचा प्रवास अनंत अडथळ्यांचा आहे. कलावंतांच्या रजा, सुट्ट्या,परीक्षा आणि अखेर अर्थकारण. पण सध्या आम्ही करतोय. पदरचे पैसे खर्च केले. कोणाकडे मागितले नाही. एक मात्र नक्की ... परिवर्तनची वाटचाल सध्या तरी या नाटकावर सुरु आहे. या नाटकाची एक आठवण अस्वस्थ करते. राज्य नाट्य स्पर्धेनंतर "अपूर्णांक" गाजू लागले. स्व. भवरलाल जैन यांनी नाटक पाहण्याची ईच्छा व्यक्त केली. नाटकाचा खास शो जैनहिल्सवर झाला. नाटक पाहून स्व.मोठेभाऊ अण्णांना खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "मित्रा तुझा ट्रैक चुकलेला नाही. तो बरोबार आहे" ही या नाटकासाठी मोठ्ठी शाब्बासकी होती.
या निमित्ताने जळगावातील आमचे अनेक पडद्यामागील मित्रांना आवाहन आहे. सध्या "बेटी पढाव बेटी बढाव" चा गाजावाजा आहे. हिच बेटी नंतर संसारात कशी आकसून जाते? हे वास्तव स्वरुपात दाखविणाऱ्या या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग प्रायोजित स्वरुपात करायला मदत करा. आपल्या जळगावच्या "बॉर्न फॉर थीएटर" या मटेरियलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेवून जायला मदत करा.
या नाटकाच्या टीममधील हर्षल पाटील (नेपथ्य), हाेरिलसिंग राजपूत (प्रकाश व्यवस्थापन), अमरसिंग राजपूत (दिग्दर्शन) अाणि पुरषाेत्तम चाैधरी नारायण बाविस्कर (निर्मिती) यांच्यासह चिंतामण पाटील, राहूल निंबाळकर, योगेश बेलदार, मंगेश कुलकर्णी, विनोद पाटील, योगेश चौधरी आदींचेही अभिनंदन. २५ व्या प्रयोगाचे आयोजन करणारे मल्टीमीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमीटेडचे सीईओ सुशीलभाऊ नवाल यांचेही अभिनंदन !
No comments:
Post a Comment