Thursday 7 April 2016

"पंच" रुपातील मंदाताई खडसे !

दुपारी टीव्हीवर "सिया के राम" ही रामायणावरची मालिका पाहत होतो. रामाला वनवासातून परत नेण्यासाठी भरत आणि "रघुवंश"परिवार चित्रकूट पर्वतावर आलेला असतो. कैकयी रामाला वचनमुक्त करायचे म्हणते. भरत रामाला राजधर्मची आठवण करून देत परत अयोध्देला यायचा आग्रह धरतो. राम मात्र पितृ वचनाचे पालन करण्याच्या निर्णयावर दृढ असतो. अखेर राजर्षि राजा जनकच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा बसते. भरत युक्तिवाद करतो आणि म्हणतो, रामाने राजधर्म पाळावा. अयोध्देच्या जनतेचे कल्याण करावे. रघुवंश कुटुंबाला आधार द्यावा. जे वचन अधर्मी आहेत, ते रामाने पाळू नये. राम युक्तिवाद करतो आणि म्हणतो, मुलांना पितृऋणातून मुक्त होणे हाच खरा धर्म आहे. मी वनवास हा लोककल्याणासाठी स्वीकारला आहे. माझ्या हातून संपूर्ण वसंधुरेची सेवा होणार आहे. असे म्हणत राम युक्तिवाद पूर्ण करतो. आता निर्णय द्यायची वेळ जनकाची. जावाई राम, प्रिय कन्या सीता वनवासात आलेले. सहृदयी बाप आणि नीतिवान राजा जनक काय निर्णय देणार ? सारे तणावात. जनक म्हणतो, राजधर्माचे पालन करायचे तर भरत म्हणतो ते खरे आहे. पण, पितृऋणातून मुक्त होणे हे मुलासाठी सर्वांत मोठे कर्तव्य असते. रामाने वनवास पूर्ण करावा हा माझा निर्णय आहे. त्यानंतर भरत रामाच्या पादुका घेवून अयोध्देचा कारभार करायला परततो.
हा प्रसंग पाहात असताना मुंबईहून मित्राचा व्हाटस् ॲपवर निरोप आला. सहकारी दूध डेअरींच्या शिखर संस्था "महानंद"  च्या अध्यक्षपदी सौ. मंदाताई एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड झाल्याचा. अर्थात, हे अपेक्षित  होते. सौ. मंदाताई या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष, राज्याचे दुग्ध विकासमंत्री तथा इतर महसूल, कृषी आदी १२ खात्यांचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी, खा. रक्षाताई खडसे यांच्या सासू, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहीणीताई खडसे - खेवलकर यांच्या मातोश्री आहेत. सौ. मंदाताईंची ओळख एक गृहिणीपासून "महानंद"च्या अध्यक्ष अशी साधीच आहे. 

जळगाव दूध संघात पहिल्यांदा सौ. मंदाताई या महिला म्हणून अध्यक्ष झाल्या. मंत्री एकनाथराव खडसे यांनी खडसे परिवारातून अध्यक्ष नको असे म्हणत पूर्णवेळ संघाला देवू शकेल अशा व्यक्तीची निवड करू असे जाहीरपणे म्हटले होते. मात्र, दूध संघाचा गाडा सुरळीत करण्यासाठी इतर सर्व संचालकांनी एकत्र येवून सौ. मंदाताई यांनाच अध्यक्षपदावर बसविले. त्यानंतर दूध संघाच्या नुतनिकरणाचा ५० लाखांचा प्रकल्प अहवालही सौ. मंदाताईंनी तयार केले आहे. हा अहवाल दुग्ध मंत्रालयच मंजूर करणार आहे. दरम्यानच्या काळात "महानंद" मधील संचालक मंडळही विविध कारणांनी बरखास्त झाले. त्यामुळे "महानंद" मध्ये नेतृत्वाची संधी आपसूक सौ. मंदाताईंना चालून आली. "महानंद" थेट दुग्ध विकास मंत्रालयाच्या नियंत्रणात येते.

सौ. मंदाताई यांच्या रुपाने "महानंद" च्या अध्यक्षपदाचे नेतृत्व जळगाव जिल्ह्याकडे चालून आले आहे. बहुधा, सौ. मंदाताई संचालक नसत्या तर ही संधी पश्चिम महाराष्ट्राकडे गेली असती. म्हणूनच सौ. मंदाताई यांना बिनविरोध मिळालेल्या अध्यक्षपदाचे कौतुक आहे.

सौ. मंदाताई म्हणजे सहृदयी पत्नी, आई, सासू, आजी आणि कोथळी दूध सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय त्या मुक्ताई तालुका शिक्षण संस्थेच्या संचालकही आहेत. चि. निखिलच्या निधनानंतर सौ. मंदाताईंनी नातू गुरुनाथ आणि नात क्रिशिका यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. कारण खा. रक्षाताई या संसदीय राजकारणात सतत व्यस्त असतात. त्यामुळे सौ. मंदाताई दोघानात, नातू यांना घेवून मुंबईत राहतात. पती एकनाथराव खडसे यांच्या जेवणावर आणि तब्बेतीवर त्यांचे लक्ष असते. सौ. मंदाताई मुंबई, मुक्ताईनगर किंवा जळगाव कुठेही असल्या तरी "साहेबांच्या" जेवणाचा मेनू त्याच फोनवरून ठरवतात. 

सौ. मंदाताई अनेक वर्षांपासून कोथळी दूध सोसायटीच्या चेअरमनपदी आहेत. त्यांचा पिंड शेतात लक्ष घालण्याचा आहे. सौ. मंदाताईंना संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याने बैलगाडीवर शेतात जाताना अनेकवेळा पाहिले आहे. खडसेंच्या फार्म हाऊसवर सौ. मंदाताईंनी वेगवेगळ्या भाज्या वाढवल्या आहेत. घर, येणारे-जाणारे यांच्यावर त्यांचे लक्ष असते. कौटुंबिक निर्णयात त्यांचाच शब्द अंतिम असतो. सौ. मंदाताई सार्वजनिक कार्यक्रमात फारशा येत नाहीत. मात्र अलिकडे त्या दूध संघ विस्तार आणि विकासावर बोलू लागल्या आहेत. 

सौ. मंदाताई यांचे रुप हे दक्ष पत्नी, जागरुक आई, चौकस सासूबाई, ममताळू आजी आणि सहकारातल्या घरगुती नेत्या अशा पंच प्रकारात आहे. सौ. मंदाताईंचा हा प्रवास निश्चित लक्षवेधी आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्यायलाच हव्यात.
दरम्यान, टीव्ही वरील "सीया के राम" मालिकाही संपत आली होती. राजा जनकाने रामाशी असलेले जावाई -सासरे हे नाते, कन्या सीतेविषयी असलेला मोह हे सारे बाजूला सारुन रामाला वनवासात जाण्याचा दिलेला निर्णय मनाला रुखरुख लावून गेला. जर रामाने वचन मोडले असते आणि तो परत राज्य करायला अयोध्देत आला असता तर "रघुवंश"ला जाब विचारण्याचे धाडस कोणात होते का ?? मालिकेने घालवलेला मूड सौ. मंदाताईंच्या यशामुळे आनंदून गेला ...

सावित्रिच्या रुपात सौ. मंदाताई ...

प्रत्यक्ष यमराजाला युक्तिवादात हरवून पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रिची गोष्ट सर्वांना माहित आहे. या सावित्री सारखाच पत्नी धर्म सौ. मंदाताईंनी निभावला आहे.  ना. एकनाथराव खडसे यांना वर्ष-दीड वर्षापूर्वी मूत्रपिंडाचा आजार होता. मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मूत्रपिंड दान करणे किंवा खरेदी करणे या क्रिया कायदेशीर भाषेत किचकट आहेत. दान करणारेही मिळत नाहीत. हे सारे प्रश्न लक्षात घेवून सौ. मंदाताई यांनीच आपले एक मूत्रपिंड ना. एकनाथराव खडसेंना दान केले. आज ना. खडसे यांची प्रकृती उत्तम असून महसूल, कृषी, दुग्ध, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक, मत्सोत्पादन आदी १२ मंत्रालयांचा कार्यभार ते सांभाळत आहेत.

3 comments:

  1. मा.मंदाताईंचे यश महिलांना प्रेरक ठराव असंच आहे, प्रगतीच्या केवळ गप्पा हाकून महिला सक्षम होणार नाहीत त्यासाठी मंदाताईंचा प्रवास अभ्यासावा लागेल. एक समर्थ व्यक्तिमत्व म्हणजे मंदाताई ...👍

    ReplyDelete
  2. मा.मंदाताईंचे यश महिलांना प्रेरक ठराव असंच आहे, प्रगतीच्या केवळ गप्पा हाकून महिला सक्षम होणार नाहीत त्यासाठी मंदाताईंचा प्रवास अभ्यासावा लागेल. एक समर्थ व्यक्तिमत्व म्हणजे मंदाताई ...👍

    ReplyDelete