Thursday 7 April 2016

"पेन"मधील "शाई" त बदल !!

मित्राहो नमस्कार.

आज दि. ८ एप्रिल २०१६. चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा वर्षप्रतिपदा. मराठी वर्षारंभ तसेच शक शालिवाहन सुरू होण्याचा पहिला दिवस. नव्या शकाचा प्रारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.  गुढी ही आनंदाप्रीत्यर्थ उभारतात. गुढी उभारणे म्हणजे आनंद व्यक्त करणे, प्रसिद्धी पावणे, कीर्तिवंत होणे, नावलौकिक करणे, सत्ता प्रस्थापित करणे, हक्क सांगणे वगैरे. एखादा संकल्प केला की आपण संकल्पाची गुढी उभारली किंवा संकल्पाचे तोरण लावले असे म्हणतो. म्हणून पाडव्याला नवीन वर्षाचा संकल्प केला जातो. मी सुध्दा आजच्या मुहूर्तावर नवा संकल्प जाहीर करतो आहे. आयुष्यात "नव्या वाटेवर" चालण्याचा हा संकल्प आहे.

गेली २७ वर्षे (सन १९८९ पासून) छापिल माध्यमात फोटोग्राफर, बातमीदार, उपसंपादक, सहयोगी संपादक, सहाय्यक संपादक आणि मुख्यसंपादक अशा पदांवर सकाळ, देशदूत आणि जळगाव तरुण भारत या तीन दैनिकात काम केले. संपादकिय काम म्हणजे, "शब्दांच्या योग्य रचनेत सत्य किंवा वास्तवाचे चित्रण" करणे होय. काही जण त्याला परखड लेखन म्हणतात. अशा लेखनाचा वसा संपादक स्व. द्वारकानाथ लेले, उत्तम कांबळे, विवेक गिरधारी, विश्वास देवकर आणि उमेदीच्या काळातील ज्येष्ठ सहकारी राजीव खांडेकर, प्रदीप निफाडकर, श्रीकांत कात्रे, श्रीनिवास हेमाडे यांच्याकडून मी घेतला. गेली २७ वर्षे हा वसा माझ्या कामात जपला. नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला अशा पाच जिल्ह्यात विविध प्रकारचे संपादकिय काम मी केले. बातमीदार प्रशिक्षण निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्हे फिरलो.

संपादकिय लेखनासाठी माझ्या "पेन" मध्ये "शाई" नेहमी स्वतःच्या विचारांची भरली. हे विचार नेहमी तटस्थ पण सत्य, वास्तवाचे अक्षर घेवून कागदावर आणि नंतर संगणकावर उतरले. लेखनाशी प्रामाणिक राहिलो. काही वेळा लेखणी स्वैर झाल्यानंतर तीला मर्यादेत आणण्याचे काम ज्येष्ठ मित्र "श्री एजन्सी"चे लक्ष्मिकांतशेट मणियार, "नवजीवन" सुपर मार्केट चेनचे अनिलभाई कांकरीया, "वसंतस्" सुपर शॉपचे नितीनभाई रेदासानी, "मल्टिमीडिया" फि. प्रा. लि. चे सुशीलभाऊ नवाल, "मृदंग इंडिया असोशिएट" चे अनंतराव भोळे आणि परममित्र अनिल जोशी या मित्रांनी केले.

बातमीदार किंवा संपादक म्हणून काम करताना व्यक्ती द्वेषाने पछाडून किंवा सुपारी घेवून कधीही लेखन केले नाही. त्यामुळे अवमानाचा आरोप, खटला यास सामोरे जाण्याची वेळ आली नाही. अपवाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परदेशी तरुणी परविना बिरगोनी आणि अला अब्देल प्रकरणी वृत्तांकन केल्याबद्दल विद्यापिठाच्या प्रशासनाने दाखल केलेला खटला.

संपादक असण्याचे प्रभावलय गेली ८/९ वर्षे अनुभवले.  संपादकाला समाजात आजही मान-सन्मान मिळतो. पूर्वीचे संपादक हे विचारांची उत्तुंग उंची गाठणारे आणि बहुश्रूत होते. त्यांच्या लिखाणावर अंक चालत. मात्र, अलिकडे संपादक हा व्यवहारांचे अनेक विषय हाताळणारा असावा लागतो. कामाच्या विभागणीनुसार संपादकांची पदे निर्माण होवू लागली. अग्रलेख मागे घेवून संपादकाने माफी मागण्याचे प्रकरण घडल्यानंतर संपादकाच्या गरजेचा मुद्दा चर्चेत आला. अशा बदलत्या काळात वृत्तपत्राच्या प्रवाहापासून लांब राहण्याचा अपरिहार्य निर्णय घेणे गरजेचे दिसत आहे. याचा अर्थ पत्रकारिता सोडली असे मुळीच नाही. उलटपक्षी बदलता काळ आणि पर्यायी माध्यमे लक्षात घेवून  पत्रकाराने कार्यात काय आणि कसा बदल करायला हवा त्याचे एक मॉडेल तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी पत्रकारिता सोडू शकत नाही. पण, संपादकाची "प्रतिमा" सोडणे आवश्यक वाटते आहे. एक नक्की, एखाद्या वृत्तसंस्थेचा प्रस्ताव असला तर नक्कीच स्वीकारणार आहे.

खर सांगतो, संपादक म्हणून काम करणे हे आरशातील प्रतिबिंबाच्या प्रेमात पडण्यासारखे आहे. खऱ्याखुऱ्या माणसापेक्षा लोक संपादकाच्या प्रतिमेवर प्रेम करतात. मान, सन्मान त्या प्रतिबिंबाला असतो. संपादकावर "माणूस"- म्हणून प्रेम करणारे मोजकेच असतात. बहुतांश मंडळी संपादकाच्या प्रतिबिंबावर भाळतात. ते प्रतिबिंब दृश्यहिन झाले की, चालत्या-बोलत्या माणसाला विचारणारे कमी होतात. हा अनुभव ६ वर्षांपूर्वी गाठीला असल्यामुळेच मी "नवा आरसा" शोधण्यापेक्षा "स्वतंत्र माणूस" म्हणूनच उभे राहायचे ठरविले आहे. हे आव्हान आहे.

एका बाबतीत मी सुदैवी आहे. अडचणीचे प्रसंग आल्यावर माझ्यासोबत ठाम उभे राहणारे काही मित्र आहेत. ते माझ्यासाठी नेहमी पर्यायांचा शोध घेत असतात. त्यांनी तसा प्रयत्न आताही केला. माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला होता, आहे त्याच पारंपरिक प्रवाहात काम करणे. दुसरा होता, नवी कल्पना घेवून स्वतः उभे राहणे. पहिल्या पर्यायासाठी योग्य संधी उपलब्ध झाली नाही. मनाच्या खोल कप्यात स्वतंत्रपणे उभे राहण्याचा निर्णय आकाराला येत गेला. अनिलभाई कांकरीया यांनी सल्ला दिला, "आता स्वतःच्या झाडाला पाणी घाला." मी यावर विचार करीत होतो. "मृदंग" असोशिएटचे अनंतराव भोळे म्हणाले, "२७ वर्षांचा अनुभव आणि तुमच्या लेखणीचे बलस्थान लक्षात घेवून व्यवसायात उतरा."

मराठी, हिंदीचे उत्तम लेखन. इंग्रजीचे प्रमाण रचनेत लेखन. अहिराणीतही लेखन. संगणकावरील गरजेच्या कामाची उत्तम हाताळणी. बातमी, लेख, विश्लेषण, बातमी मागची बातमी अशा लेखनातील सहजता. व्यक्ती चित्रणासाठी आवश्यक शब्दांचे महत्त्व, फोटोग्राफीचे उत्तम भान. जळगाव शहरातील मान्यवरांशी व्यक्तीगत संबंध. २४ तास कामाची तयारी, स्वतःचे काम स्वतःच करण्याची तयारी. नियोजित वेळेच्या आधी काम पूर्ण करण्याची जिद्द. जळगाव जिल्ह्याच्या भूत आणि वर्तमान इतिहासाची बारकाव्याने माहिती. भविष्याचा अंदाज घेण्याची क्षमता. यासह वृत्तपत्र, सोशल मीडिया माध्यमांचा योग्य वापर करण्याचे "कौशल्यपूर्ण भान" हे स्वतःमधील गुणधर्म लक्षात घेवून माध्यमात स्वतःचेच क्षेत्र विस्ताराचा निर्णय अंतिम होत गेला.

अखेर विचारांच्या योग्य दिशेतून मला मार्ग सापडला. माध्यमांमधील सध्याचे नवे आणि भविष्यात विस्तारणारे क्षेत्र मी निवडले. आई-वडील, पत्नी-मुलगा, भाऊ-बाहिण सर्वांना विश्वासात घेवून मला काय करायचे ते सांगितले. त्यांनी मला आशीर्वाद आणि पाठबळ दिले. मी वेळ वाया न घालवता काम सुरु केले. संपूर्ण मार्च महिना हा "ट्रायलरन" चा होता. महिनाभरात आत्मविश्वास आला की, आपण निवडलेला मार्ग योग्यच आहे. आपल्याच झाडाला आपण पाणी घालायचे ही क्रिया सुरु झाली. हे नवे काम करताना लेखणीतील "संपादकीय प्रभावळीची शाई" काढून टाकणे गरजेचे होते. संपादक स्वतःसाठी लिहतो. व्यवसाय करताना मला "इतरांसाठी लेखन" करायचे आहे. म्हणून त्या कामास लागणारी "शाई" त्यात भरली. वृत्तसंस्थेसाठी ज्या शब्दांचे सामर्थ्य वापरले तेच शब्द आणि सामर्थ्य आता समाजातील मान्यवरांसाठी वापरण्याचे ठरविले. मनातील संकल्पना हळूहळू साकार झाली.

पाडव्याला आपण गुढी उभारतो. गुढीसाठी वापरले जाणारे प्रत्येक साहित्य जीवनाचा प्रतिकात्मक अर्थ सांगते. गुढीची काठी सरळ आणि मजबूत असते. माणसाचे आयुष्यही असेच हवे. मान ताठ राहील असे. काठीला खालची बाजू असते आणि वरची बाजू शिखर दाखवते. ध्येयाची सतत आठवण देणारी स्थिती. काठीवर फुलांची माळ असते. आयुष्यातील कर्तृत्वाला सद्गुणांच्या सुगंधाचा संदेश देणारी. गुढीवर कोरे वस्त्र असते. मानवाच्या चारित्र्याचे प्रतिक. स्वच्छ, कोरे आणि मर्यादा झाकणारे. गुढीवर लिंबाचा पालाही असतो. दोन अर्थाने. एक कटुतेची चव सांगणारा आणि दुसरा किटकनाशकाचा गुण असलेला. माणसाला आयुष्यात वर्तन आणि सावधतेचा संदेश देणारे हे प्रतिक. गुढीवर साखर पाकाचा हार असतो. गोडपणा सांगणारा आणि विजयीभव म्हणणारा. शेवटी गुढीच्या टोकावर गडू उलटा असतो. त्याचा तो आकार म्हणजे यशाच्या कळसाचे प्रतिक. उलटा गडू हा संपन्नतेचे प्रतिकही असतो. तृप्तता आणि संपन्नता असेल तेथेच भांडी उलटी करून ठेवतात. रिकामे भांडे अतृप्ततेचे कुलक्षण समजले जाते. गुढीचा हा सकारात्मक संदेश घेवून नव्या क्षीतिजाकडे झेपावण्याचा माझा संकल्प आहे.

नव्या फर्मच्या माध्यमातून स्वतंत्रपणे काम करण्यास प्रारंभ मी आजपासून करीत. ज्यांच्या सोबत काम करेल ती सर्व मंडळी जळगाव शहरातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत असतील. माणसे अनुभवणे, वाचणे आणि शब्दांच्या नेमक्या अर्थात त्यांना टीपणे असे हे आनंददायी काम आहे. यात गंमत आहे, ती म्हणजे काम भरपूर आहे. काम करणाऱ्याने आपली क्षमता ओळखून आव्हान स्वीकारावे. माझ्यासाठी हेच "नवे क्षितीज" आहे. मित्र, हितचिंतक आदींना माहिती व्हावी म्हणून सविस्तरपणे लिहीले. आपण सर्व मला कामाच्या नव्या रुपात स्वीकाराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.

“मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब
मेरा वक्त भी बदलेगा... तेरी राय भी”…!!!

धन्यवाद. शुक्रीया. आभार. थँक्स.

3 comments: