![]() |
आदिवासी नृत्य पथकातील बावा, बुध्या |
यावल अभयारण्याचा अति अंतर्गत भाग असलेल्या जामन्या पाड्यावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे गेल्या २६ मार्चला आदिवासी होलिकोत्सवाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. या उत्सवाच्या प्रारंभाची नोंद लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने झाली. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्यासह जळगाव शहरातील सुमारे २०० वर मान्यवरांनी या होलिकोत्सवाला हजेरी लावली. एक नवा सांस्कृतिक इतिहास लिहीला जात असताना त्या उत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या मंडळींना लाभले.
![]() |
ना. गिरीश महाजन, सौ. साधना महाजन, प्रतिभाताई शिंदे |
या होलिकोत्सवासाठी प्रतिभाताईंनी मलाही आग्रहाने बोलावले होते. मी आणि जैन स्पोर्टचे प्रमुख फारुक शेख, विवेक आळवणी आणि तीन-चार जण होलिकोत्सवासाठी जामन्याकडे उशिरा रवाना झालो. पाल येथे पोहचायला रात्रीचे ११ वाजल्यामुळे आम्ही तेथून जळगावकडे परत फिरलो. होळी हुकल्याची रुखरुख मनाला होती. मात्र, दुसऱ्या दिवशी प्रतिभाताईंशी बोलून होलिकोत्सवाचा आँखोदेखा वृत्तांत मिळवला. कधीकधी माध्यमेही करंटेपणा करतात. आपल्या भागातील ऐतिहासिक घटनांची नोंद हातात लेखणी बाळगणारे करू शकत नाहीत. मी रविवारची प्रतिक्षा केली. कोणत्याही दैनिकात जामन्याच्या होळीवर रविवारचा लेख दिसला नाही. फेसबुक सारख्या सोशल मीडियावर दोन-चार जणांचे फोटो होते मात्र, होलिकोत्सवाचे वर्णन, महत्त्व शब्दांत नव्हते. अखेर म्हटले आपणच लिहून काढू.
मी नंदुबार जिल्ह्यात बातमीदार म्हणून काम केले आहे. ते दिवस सरदार सरोवर प्रकल्पास विरोध करणाऱ्या मेधाताई पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचे आणि विस्थापितांच्या पूनर्वसनाचा प्रश्न मांडणाऱ्या प्रतिभाताई शिंदे यांचे होते. या दोन्ही नेत्यांमुळे सातपुडा आणि तेथील आदिवासी आमच्या लेखणी आणि नजरेला दिसले, समजले. प्रतिभाताईंमुळे धडगाव तालुक्यातील काठी येथील बांबूची राजवाडी होळी २/३ वेळा अनुभवली. के. सी. पाडवींमुळे असली येथील होळी पाहिली.
![]() |
होळीच्या दांड्या भोवतीचे रिंगण |
![]() |
होळी नृत्य पथकात सहभागी मान्यवर |
पालपासून जवळपास ३० किलोमीटवर जामन्या आहे. गाव आणि पाडा यातील वस्ती. आदिवासींमधील पावरा समाजाच्या १२००/१५०० झोपड्या असतील. तेथे पहिल्यांदा आदिवासींची बांबू होळी साजरी झाली. या पहिल्या ऐतिहासिक उत्सवाचा प्रारंभ खासदार खडसे यांच्या हस्ते झाला. सुमारे पंधरा हजार आदिवासी यात सहभागी झाले. रावेर, यावल, चोपडा तालुक्यासह नंदूरबार, अक्कलकुवा व मध्यप्रदेशातील आदिवासी उपस्थित होते. त्यांनी नृत्य, वादन, गायन आणि वस्त्र प्रावरणे घालून उपस्थित मान्यवरांचे रंजन केले. सायंकाळी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची रंगत उत्तररात्री रंगत गेली. मान्यवरांनी आदिवासींसोबत नृत्य केले, पोषाख, टोप घालून फोटो काढून घेतले. मध्येच पावसाने हजेरी लावून उत्सवात धांदल उडविली. पहाटे पहाटे होळीचा बांबू दांडा पेटविण्यात आला.
![]() |
आदिवासी टोप घालणारी मान्यवर महिला |
धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि जळगांव जिल्ह्यातील चोपडा, यावल व रावेर तालुक्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद आदी सातपुड्याच्या परिसरातील गाव-पाड्यांवर बांबूची होळी करतात. नंदुरबार जिल्ह्यातही हिच होळी असते.
![]() |
रिंगण नृत्यात मान्यवर |
पहाटे ५ च्या दरम्यान होळी पेटविली जाते. होळी पेटविण्याचा मान त्या त्या गावाच्या पोलीस पाटलांचा, गाव कारभारीचा असतो. होळी पेटविल्यानंतर सर्वजण खोबरे, गुळ, डाळ्या होळी मातेला अर्पण करून दर्शन घेतात. कपाळावर राख लावून वंदन करतात. नवसकरी व विविधरूप धारण केलेले कलापथक होळीच्या भोवती धावत धावत ५ फेऱ्या मारतात. नंतर घराकडे परततात.
होळी पेटल्यानंतर बांबूचा बुंधा जळतो आणि वरचा दांडा कोसळतो. तो पूर्व दिशेला पडावा असे नियोजन असते. पडणादा दांडा अंधातरीत झेलतात. हा दांडा इतर गाव-पाड्यांचे मानकरी कोयत्याने एका घावात तोडतात. तो तुकडा मानाचा म्हणून सोबत नेतात. नंतर उरलेला शेंडीचा भाग गोलाकार (त्रिज्यासारखे) फिरवून लोकांना त्याचे दर्शन घेवू देतात. या शेंडीची मेलादा बाजारातून सवाद्य मिरवणूक काढून सर्वांना दर्शन दिले जाते. होळीजवळ नवस बोलणारे असतात. ते पुढे दिवस किंवा वर्षभराचा नवस बोलतात. तसे व्रतस्थ राहतात. अशा प्रकारे आदिवासींच्या होलिकोत्सवाची सांगता होते.
प्रतिभाताईंमुळे जळगाव जिल्हावासियांना आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. जामन्यचा होलिकोत्सव असाच रंगातदार साजरा झाला. नेहमीसाठी लक्षात राहणारा ...
(फोटो व माहिती सौजन्य - प्रतिभाताई शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा, जळगाव)
No comments:
Post a Comment