Thursday 28 April 2016

संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीतहाय क्वालिटी धाग्याचे उत्पादन

राज्यात दुष्काळीस्थितीमुळे बहुतांश सुतगिरण्या बंद आहेत. बाजारात कापूस नसल्यामुळे खान्देशातील मोठ्या संख्येतील जिनिंग प्रेसिंग उद्योग अडचणीत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीने अशाही वातावरणात अवघ्या साडेतीन महिन्यात उच्च प्रतिचा ३४ काऊंट धागा निर्मिती करुन गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून कापूस गाठी मागवून तीन शिफ्टमध्ये सुतगिरणी सुरू आहे. ही माहिती सुतगिरणीच्या अध्यक्षा तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी महान्यूजला दिली.

सौ. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी सुतगिरणीच्या साडेतीन महिन्यांच्या प्रवासाची माहिती देताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीची नोंदणी सन १९८६ मध्ये झाली होती. तेव्हा मुक्ताई, बोदवड परिसर आणि लगतच्या तालुक्यांमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार द्यावा आणि सुतगिरणीच्या माध्यमातून इतर पूरक सहकारी उद्योग सुरू करावेत हा हेतू होता. मात्र, भाग भांडवल उभारणीतील अडचणी आणि सरकारकडून अपेक्षित सहकार्य वेळीच मिळाले नाही. त्यामुळे सुतगिरणी उभारणीचे काम रेंगाळले. त्यानंतर १९९८ ते २००० दरम्यान काही प्रमाणात बांधकाम करण्यात आले. सन २००८ मध्ये या सुतगिरणीचे अध्यक्षपद निखील एकनाथराव खडसे यांच्याकडे आले. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुतगिरणी उभारणी आणि मशनरी मागविण्याच्या कामाला गती दिली. या सुतगिरणीत एकूण १२ हजार ५०० स्पिंडल्स लावण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० स्पिंडल्स लावून काम सुरू करण्याचे ठरले. पणमध्यंतरी एका दुर्घटनेत निखील खडसे यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर सौ. रोहिणी खडसे – खेवलकर यांच्याकडे सुतगिरणीचे अध्यक्षपद आले.

सुतगिरणी उभारण्याच्या कामाला भाजप नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली असे सांगत सौ. रोहिणी खडसे – खेवलकर पुढे म्हणाल्या, स्व. निखील खडसे यांचे सुतगिरणी उभारण्याचे स्वप्न पूर्ण
करण्याचा वसा घेवून मी कामाला लागले. राज्याचे कृषिमंत्री, महसूल तथा इतर १० विभागांचे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सहकार्यामुळे इतर अडथळे दूर होत गेले. डिसेंबर २०१५ च्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उद्घाटन झाले. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा पालकमंत्री एकनाथराव खडसे हेही उपस्थित होते. सुतगिरणीच्या अवघ्या साडेतीन महिन्यांच्या प्रवासाविषयी सौ. रोहिणी खडसे
– खेवलकर पुढे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात सुतगिरणीत साडेतीन हजार स्पिंडल लावण्यात आले आहेत. त्यावर धाग्याचे प्रॉडक्शन सुरू होते.

सुतगिरणीकडे स्वतःचे जिनिंग प्रेसिंग नाही. त्यामुळे इतर जिनिंग प्रेसिंगकडून कापूस गाठी मागून त्यापासून धागा निर्मिती सुरू झाली. नंतर सरकारकडून अनुदानाच्या मदतीचा पुढील हप्ता मिळाल्यानंतर स्पिंडलची संख्या सहा हजारपर्यंत वाढविण्यात आली. आता यापुढील टप्प्यात आणखी सहा हजार स्पिंडल्स वाढविण्याचे नियोजन असून तशी जागा व यंत्रणा उपलब्ध आहे. म्हणजेच सुतगिरणीत १२ हजार स्पिंडल्स लावण्याचे स्व. निखील खडसे यांचे
स्वप्न पूर्ण होणार आहे.

सुतगिरणीतील रोजगाराविषयी सौ. रोहिणी खडसे - खेवलकर म्हणाल्या, संत मुक्ताई सहकारी सुतगिरणी पूर्णतः तंत्रज्ञानावर चालते. सर्व काम स्वयंचलित यंत्रांवर होते. त्यामुळे येथे मनुष्यबळाची फारशी आवश्यकता नाही. तरी सुद्धा पहिल्या टप्प्यात १५० जणांना रोजगार दिला आहे. यात जवळपास निम्म्या संख्येत महिला आहेत. ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुतगिरणीत स्पिंडल वाढल्यानंतर आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा रोजगार सर्व स्थानिक युवकांना दिला जाणारआहे.

सुतगिरणीतील धागा उत्पादनाविषयी सौ. रोहिणी खडसे – खेवलकर म्हणाल्या, सुतगिरणी सध्या जळगाव जिल्ह्यातून धरणगाव, बोदवड, बुलडाणा जिल्ह्यातून चिखली, मलकापूर आणि मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील जिनिंग प्रेसिंगमधून कापसाच्या गाठी मागविण्यात येत आहेत. त्यापासून उच्च प्रतीचा धागा तयार केला जात आहे. हा धागा प्रामुख्याने मालेगाव आणि इचलकरंजी येथील लूमसाठी किंवा यंत्रमागांसाठी पाठविली जात आहे. ३४ काऊंटचा धागा हा उत्तम प्रतिचामानला जातो. तोच सध्या सुतगिरणीत तयार होत आहे.

आगामी काळात सुतगिरणीच्या माध्यमातून मुक्ताईनग परिसरात कॉटन पार्क तयार करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याकडून कापूस घेतल्यानंतर त्यापासून धागा, कापड व इतर उत्पादने तयार करण्याचे प्रकल्प उभारले जाणारआहेत. या सुतगिरणीच्या उभारणीत मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे मोटे सहकार्य आहे, असा उल्लेख सौ. रोहिणी खडसे – खेवलकरयांनी अखेरीस केला.

No comments:

Post a Comment