Sunday 24 April 2016

जळगाव मनपात मोठी भरती ...तातडीने हवेत ज्योतिष, तांत्रिक

जळगाव महानगर पालिकेवर सध्या असलेल्या विविध गंडांतरामुळे सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन यांच्यासह जनताही परेशान आहे. मनपाला आर्थिक आणि प्रशासकीय अशा प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय व त्यानुसार कृतीची गरज आहे. तशी पाऊले महापौर व आयुक्त टाकत आहेत. पण मध्यंतरी एक बातमी प्रसिध्द झाली आहे की, मनपा कशामुळे अडचणीत आहे याचा शोध घेण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी ज्योतिष्याचा सल्ला घेतला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, मनपाच्या वास्तूत दोष आहे आणि मनपाचा लोगो बदलायला हवा. अर्थात, यावर पदाधिकारी किंवा प्रशासनाचे अधिकृत कोणतेही भाष्य नाही. मात्र, लोगो बदलून आणि वास्तू दोष काढून कोणतीही स्थिती बदलली असती तर जगात सारे काही आनंदी राहीले असते.

मनपातील काही मंडळी वास्तूदोष आणि लोगो बदल करायचा विचार करीत असतील असे गृहीत धरून ही पोस्ट लिहीत आहे. तसे नसेल तर पुढे वाचायची आवश्यकता नाही. आणि आशय बाजूने का विरोधात हे समजूनच कृपया प्रतिक्रिया द्यावी.

स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जळगाव मनपाची १७ मजली इमारत भारतात इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठेही नाही. ही इमारत उभी करताना ठेकेदार गोलाणी बिल्डर्स यांच्याशी केलेले व्यवहार पोलीस दप्तरी दाखल आहेत. गुन्ह्याच्या तपासात सत्य समोर येईल. या संदर्भातील गुन्हा, आरोप यात घुसण्याचे कारण नाही. ज्याचा दोष असेल तो भोगेल. असे असले तरी या १७ मजलीचे काम सुरेशदादा जैन यांच्याच नेतृत्वात झाले हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही. या कामगिरीचा विचार करून १७ मजलीस सुरेशदादा जैन टावर्स नाव दिले होते. नंतर कुरघोडीच्या राजकारणात या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल केले गेले. या विषयी कोणीही आक्षेप घेतला नाही व आजही नाही. हा खेळ करणारे कोण होते ? इमारतीचे नाव बदलल्यामुळे जळगावकरांना काही जादा सुविधा मिळाल्या होत्या का ? उत्तर अर्थात नाही. त्यावेळी नाव बदलूनही आज आलेली आपत्ती कायम आहे. मग आज अशुभ कशाला म्हणायचे ?

१७ मजलीच्या खाली गोलाणी मार्केटमधील दुकानदारांसाठी स्वच्छतागृह व शौचालय होते. ते सध्या बंद आहे. मनपाचा कोणताही आयुक्त किंवा महापौर ही सेवा दुरुस्त करू शकला नाही. वास्तूशास्त्रात पहिला नियम मल विसर्जन व्यवस्था सुनियोजीत व दुर्गंधी टाळणारी असावी हा आहे. येथे मनपाच्या  खालीच घाणीचे साम्राज्य असल्याने कोणता वास्तूविशारद व वास्तूदोष निवारक तज्ञ मनपाचे भविष्य चांगले आहे असा सल्ला देईल ??
जळगाव मनपाचा लोगो बदलाचा घाटही घातला जात आहे असे चर्चेत आहे. तसे असेलतर याचे कारण जनतेसमोर आले पाहिजे. कोणत्याही संस्थेचा लोगो बदलणे म्हणजे आघाडीतून भाजपत जाणे, मनसेत नाराजांचा वेगळा गट असणे, भाजपत चार गट असणे, राष्ट्रवादीत जेवढे नगरसेवक तेवढे गट असणे इतके सोपे नाही. लोगो बदलासाठी समर्थन करता येईल असे कारण हवे. ते महापौरांनी जाहिरपणे सांगावे. तसेच लोगो बदलासाठी राज्यस्तरावर जाहिरात संस्थांकडून निविदा मागवावी. हे काम होत असेल तर ते कोपऱ्यात होवू नये.

मनपात वास्तूदोषामुळे अडचणी असतील तर जाहिरात देवून अधिकृतपणे वास्तूदोष निवारकांच्या जागा भराव्यात. हात पाहाणारे, कुंडलीवाले, पोपटवाले आणि अमावश्येला जादू-टोणा, मंत्र-तंत्र करणारे भरावेत. म्हणजे त्यांचा लाभ जनतेला होईल. महापौर किंवा आयुक्तांना सल्ला देणारे ज्योतिषी नगररचना विभागात आलेले आराखडे पाहून त्यातील दोष वेळीच दुरूस्त करतील. भले या कामाचे वेगळे वरून-खालून शुल्क घ्यावे. फावल्या वेळात मनपा पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, राजकीय पुढारी, शहरातील मान्यवर हात, कुंडली चेहरा दाखवून आपापले दोष दुरुस्त करू शकतील. भविष्य पाहून काम करणारे भरपूर असतात. त्यांची मनपात गर्दी होईल.
आता शेवटचा मुद्दा. ज्योतिष्य हे हिंदू संस्कृतिचा भाग आहे. त्यानुसार कार्यवाही केली तर मना हिंदुत्ववादी पध्दतीवर चालते असा शिक्का बसेल. उद्या काही मुस्लिम नगरसेवकांनी पीर-फकीर आणून उपाय करा म्हटले, त्यानंतर एखाद्या बिशप, पादरीने क्रूस लावा म्हटले तर मनपा पदाधिकारी व प्रशासन काय करणार ??
मनपातील पदाधिकारी व प्रशासन खुळचटपणे वागणार नाहीत अशी अपेक्षा करू या !!!

No comments:

Post a Comment