Friday 22 April 2016

जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची डिजिटल भरारी

जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शाळांचे डिजिटलीकरण, संगणकीकरण, मोबाइल डिजिटलीकरण आणि "आयएसओ" करण अशा विविध उपक्रमात भरारी घेतली आहे. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची ही कार्यशैली सध्या राज्यभरात "जळगाव पॅटर्न" म्हणून नावलौकिक मिळवून आहे. या पॅटर्नचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपये निधी उभारला आहे.

जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग सध्या विविध प्रकारच्या सहा उपक्रमांवर लक्षपूवर्क काम करीत आहे. प्राथमिक शिक्षणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करीत अध्यापन कार्य विद्यार्थ्यांसाठी आनंददायी करीत आणि त्यांच्या आकलन शक्तीत वाढ करणारे असावे याकडे या उपक्रमांमध्ये लक्ष देण्यात आले आहे. या सहा योजनांमध्ये प्रमुख्याने शाळांचे "आयएओ" करण करणे, शाळांचे शैक्षणिक व्यवस्थापन डिजिटल करणे, मोबाइल डिजिटलीकरण करणे, ज्ञान रचनावादी अध्यापन करणाऱ्या शाळांची संख्या वाढविणे,  ॲक्टीव्ह केस लर्निंग कार्ड असलेल्या शाळांची संख्या वाढविणे आणि शाळांमध्ये विद्याथ्यार्ना टॅब वाटप करणे या योजनांचा समावेश आहे.

वाचा महा न्यूजवर

http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=4Q8Nl7HIi0U=

http://103.23.150.134/Uploads/SNIMAGE19372Yash_jalgaon_Digital%20Shala.jpp


प्राथमिक शिक्षणात जिल्हा परिषदेचा "जळगाव पॅटर्न" तयार करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे विद्यमान सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उप शिक्षणाधिकारी तेजराव गाढेकर, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख आणि आयटी विभागाचे निलेश पालवे यांच्या कोअर टीमचे आहे.

ई लर्निंग उपकर्मांतर्गत जळगाव जिल्हा नियोजन आणि विकास समितीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीचा वापर पहिली ते आठवीच्या वर्गांसाठीचा सर्व अभ्यासक्रम डिजिटल स्वरुपात तयार करून तो विद्यार्थ्यांना स्क्रिनवर दाखविण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी आवश्यक असलेले संगणकचे सर्व सॉफ्टवेअर खुल्या निविदा पद्धतीने खरेदी करण्यात आले. यात एकूण ५२ शाळांना ई लर्निंगचे किट देण्यात आले. सर्वच शाळांमध्ये डिजिटल किटचा वापर उत्तमपणे केला जात आहे.

जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमध्ये आयएसओ प्रणाली स्वीकारून गुणवत्ता व दर्जा सुधारण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला आहे. यात शाळांच्या भौतिक सुधारणांसह दप्तर अद्ययावत करणे, नोंदी परिपूर्ण करणे, विद्यार्थ्यांची नियमित हजेरी, शिक्षकांची हजेरी, संगणकिय यंत्रणेचा परिपूर्ण वापर आदी बाबींकडे लक्ष देवून "आयएसओ" मापदंड पूर्ण करण्यात आले आहेत. आतापर्यंत ५६ शाळांनी "आयएसओ" दर्जा प्राप्त केला आहे.

मोबाइल डिजिटल उपक्रमात ३६९ शाळांचा सहभाग आहे. यात शिक्षकांच्या मोबाइलमध्ये एक विशिष्ट प्रकारचे ॲप देण्यात आले आहे. त्याद्वारे शिक्षक आपल्या अध्यापनाशी संबंधित कोणतेही चित्र, दृश्य अथवा माहिती विद्यार्थ्यांना फळ्यावर मोठे करून दाखवू शकतात.

डिजिटल स्कूल उपक्रमांतर्गत २४२ शाळांना अध्यापनासाठी लागणारे सर्व डिजिटल साहित्य देण्यात आले आहे. त्यात एलसीडी प्रोजेक्टर, संगणक याचा समावेश आहे. २४२ पैकी केवळ ५२ शाळांमध्ये सरकारी योजनेतून साहित्य देण्यात आले आहे मात्र, १९० शाळांमध्ये गरजेचे सर्व साहित्य स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांनी लोकवर्गणी गोळा करून दिली आहे. त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये होते.

रचनावादी अध्यापन करणाऱ्या शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करणे आणि त्याचा अध्यापनात वापर करणे यावर भर दिला आहे. यात विद्यार्थ्यांना गटनिहाय चर्चा करुन शिकविले जाते. अशाच प्रकारे विविध साहित्यांचा वापर करुन एबीएल (ऍक्टीव्ह केस लर्निंग कार्ड) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिले जाते.

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटलीकरण करण्याच्या उपक्रमांत स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय सहभाग, त्या-त्या भागातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाथिकारी यांचे सहकार्य  तसेच माजी विद्यार्थी यांची मदत महत्त्वपूर्ण ठरली आहे.

माजी विद्यार्थ्यांच्या मदतीचे उदाहरण लक्षात घ्यायचे तर पिंगलवाडी (ता. अमळनेर) येथील शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी २२ लाखांची मदत केली. तसेच निपाणे (ता. चाळीसगाव) येथील माजी विद्यार्थ्यांनी २४ लाखांची मदत केली. या लोकवर्गणीतून शाळांची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहे उभारणी, शालेय साहित्य खरेदी आदी कामे करण्यात आली. अशा प्रकारची अनेक उदाहरणे असून लोकवर्गणीच्या कामांची एकूण किंमत किमान एक कोटी रुपयांवर जाते.

शाळांच्या डिजिटलीकरणाच्या पुढील टप्प्यात आता विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप आणि शाळांना प्रोजेक्टर वाटप करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिक सुविधांमध्ये आता खासगी शाळांशी स्पर्धा करण्यास तत्पर झाल्या असून गुणवत्ता आणि दर्जा सुधारच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्रथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शैक्षणिक पुनरुत्थानाचे काम होत असल्याचे दिसून येईल असा विश्वास आहे.

अशी सुधारली गुणवत्ता
जळगाव जिल्हा परिषदेच्या एकूण १,८४८ शाळा आहेत. यातील १४४ शाळा आ श्रेणीत आहेत. १,०४९ शाळा ब श्रेणीत आहेत. ६५३ शाळा क श्रेणीत आहेत. ५ शाळा ड श्रेणीत आहेत. इ श्रेणीत एकही शाळा नाही. शाळांच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाकडे जि ल्हा परिषद सीईओ पाण्डेय यांनी व्यक्तिशः लक्ष दिले आहे. शाळांचे "आएसओ" करण, ई लर्निंग आणि डिजिटलीकरणाची क्रिया त्यांनी सतत पाठपुरावा करून सातत्याने प्रगतीत ठेवली आहे.

No comments:

Post a Comment