Wednesday, 20 April 2016

”मेपल” च्या गृह घोटाळ्यामुळे सरकारसह दैनिकांची बेअब्रूच !!!

सवर्सामान्य कुटुंबाला पुण्यात अवघ्या पाच लाख रुपयांत 'वन रुन किचन' घर देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भल्यामोठ्या दोन पानी जाहिराती गेल्या १४ व १५ एप्रिल २०१६ ला महाराष्ट्रातील आघाडीच्या काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, पंतप्रधान जन आवास योजनेचा लोगो वापरला आहे. घराच्या बुकिंगचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक मात्र बँक म्हणून 'बँक आफ महाराष्ट्र'* चा उल्लेख आहे. प्रकल्पास 'पीएमआरडीए' तर्फे मान्यताप्राप्त असा उल्लेख आहे. पाच लाखातील घरे कुठे देणार त्या जागा म्हणजे पुण्यालगतची गावे चाकण-तळेगाव, वाघोली अनेक्स, सणसवाडी, रांजणगाव, वाई, शिरवळ, शिक्रापूर, ऊरळी कांचन, कोंढवा-अनेक्स-बोपगाव, तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूर-कोंढापुरी आहेत. जाहिरातीत घरांच्या किंमतीची आकडेमोड प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांसाठी अशा दोन प्रकारात आहे.

घरांच्या बुकिंगची जाहिरातअसली म्हणजे, बुकिंग अमाऊंट दिलेली असते.  या जाहिरातीतही बुकिंग अमाऊंट १,१४५ रुपये आहे. यात १,००० रुपये बुकिंगचे व १४५ रुपये सेवाकर म्हणून घेतले जाणार होते. हा व्यवहार बँक आफ महाराष्ट्र मार्फतच होणार होता. या योजनेच्या नियमावलीत दोन महत्वच्या 'मेख' आहेत. पहिली मेख म्हणजे, नोंदणीचे १,००० रुपये शुल्क विनापरतीचे म्हटले आहे. कितीही लोकांचे बुकिंग केले तरी मेपल ही संस्था केवळ दहा हजार लोकांनाच लॅटरी पद्धतीने घरे देणार आहे. म्हणजेच दहा हजार वगळता इतर सर्वांची बुकिंग अमाऊंट मेपल च्या खिशात जाणार. दुसरी मेख म्हणजे, घराच्या बुकिंगसाठी अर्ज करणारी महिला असावी आणि तीच्या नावावर घर नसावे.



क्रेडाईच्या पदाधिकारींसोबत गिरीश बापट व सचिन अग्रवाल (डाविकडून कोट घातलेला दुसरा)
मेपल ची ही 'महाराष्ट्र हाऊसिंग डे' योजना फ्रॉड असल्याचे पहिल्याच दिवशी लक्षात आले. औरंगाबादला हायकोर्टात वकिल म्हणून काम करणाऱ्या भावाने दुसऱ्या दिवशी या योजनेची कायदेशीर चिरफाड करीत ती फसवी असल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी आमचे मित्र पोलिस अधिकारी काईंगडे यांनीही मेपल ची गृहनिर्माण योजना फसवी असल्याचे सांगत गुंतवणुकदारांना सावध करणारा संदेश व्हाट्स अप वरुन टाकला. तेव्हा लातुरचा रेल्वेने पाणी पुरवठा हा इव्हेंट आणि लातुरच्या पालकमंत्र्यांचे सेल्फी फोटोसेशन यावर लक्ष दिलेले होते. त्यामुळे मेपल चा विषय लिहायचा असूनही हातातून निसटून गेला.

दरम्यान, मेपल च्या गृहनिर्माण योजनेतील फसव्या बाजू समोर आल्यामुळे सरकारमधील संबंधित मंडळी जागी झाली आणि पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नारायण पालमल्ले यांनी फिर्यादी होवून मेपल चे संचालक सचिन अशोक अग्रवाल, नवीन अशोक अग्रवाल आणि विक्री व्यवस्थापक प्रियांका अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला. यात ४२० हे फसवणुकीचे कलम आहे.

पोलिसांसमोरुन पळून जाताना सचिन अग्रवाल
इथपर्यंतचा प्रवास योग्य म्हणावा असाच आहे. मात्र या घटनेमागील कारणांचा आणि बेसावध, निष्काळजीपणाचा शोध घेताना जी-जी मंडळी यात दोषी आढळते त्यांच्यावर राज्य सरकार काय कारवाई करणार ? हा मुद्दा आहे. सार्वजनिक रुपात या गृहनिर्माण घोटाळ्यात कोणाकोणाची बेअब्रु झाली ते क्रमाने पाहू.

महाराष्ट्रात प्रसिद्ध जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव, प्रतिपादन आणि त्यांच्या केंद्रीय याजनेचा उल्लेख आहे. (अशा प्रकारे पंतप्रधानाचे नाव वापरून जनतेला फसवणारी जाहिरात करता येते का ? उठसूठ राज्य सरकारांना सूचना देणारे 'पीएमओ' या प्रकाराबाबत फडणवीस सरकारला खुलासा विचारणार आहे का ?)

जी बाब पंतप्रधान मोदींच्या उल्लेखाबाबत आहे तीच बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटो व नावाविषयी आहे. (त्यामुळे या प्रकाराच्या फसवणुकीत आपले छायाचित्र प्रसिद्ध झाले याची व्यक्तिगत दखल घेवून मुख्यमंत्री फडणवीस जनतेची माफी मागणार आहेत का ?)
यापूर्वी सुप्रिम कोर्टाने सरकारी जाहिरातीत मंत्री व इतरांचे फोटो छापायला निर्बंध घातलेले असताना खासगी व फसवणूक करणाऱ्या जाहिरातीत फोटो व नाव आल्याने मुख्यमंत्री किती संवेदनशील होणार ? हाही प्रश्नच आहे.

या गृहनिर्माण घोटाळ्यात सध्या तरी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पूर्णतः अडकलेले दिसतात. मेपल चा संचालक सचिन अग्रवाल हा बांधकाम संस्थाची शिखर संस्था क्रेडाईचा पदाधिकारी आहे. त्याच्यासोबतचे बापट यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय, बापट व अग्रवाल यांनी एका वाहिनीवर एकत्र चर्चाही केली. तेथूनच तो फरार झाला असे वृत्त आहे. (या प्रकारात स्वतःच्या आणि राज्य सरकारच्या पत घालविण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून बापट यांनी राजीनामा देत आत्मक्लेष करायला हवा. तसा ते करतील ?)

गृहनिर्माण व नगरविकासमंत्री प्रकाश मेहता भाजपचेच आहेत. त्यांनी काही प्रमाणात या गृहनिर्माण घोटाळ्यात सत्वर कार्यवाही केली आहे. मात्र राज्य व केंद्र सरकार तथा पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे फोटो परस्पर वापरून जाहिरात करणाऱ्यांवर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सरकारची जबाबदारी संपणार आहे का ? (यात जर गिरीश बापट आणि त्यांच्याशी संबंधितांचा सहभाग असेल तर मेहता हे बापटांना सरकारबाहेर काढा असे मुख्यमंत्र्यांना सांगू शकतील ?)

पुण्याजवळ गृहनिर्माण प्रकल्पाचा विषय असल्यामुळे तो तेथील जिल्हाधिकारी, पुणे व पिंप्री-चिंचवड मनपा प्रशासन आणि पीएमआरडीए या यंत्रणांशी संबंधित आहे. मेपल प्रकल्पासाठी ज्या सोळा लोकशन्सचा दावा बंधितांनी केला आहे त्या महसूल विभागाशी संबंधित आहेत. मेपलच्या जाहिरातीत प्रकल्पास मान्यता असेही म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, मनपा आणि संबंधित यंत्रणा यांना हात झटकून मोकळे होता येणार नाही. (मेपल ने जाहिरपणे केलेले हे सार्वत्रिक फसवणुकीचे धाडस लोकांना सरकार व त्यामधील हितसंबंधियांची मिलीभगत अथवा संगनमत वाटू नये म्हणून सरकारला आपली अब्रू वाटविण्यासाठी ठोस कारवाई करावी लागेल. तसे केले नाहीत तर बुवाबाजीच्या, मंत्रतंत्र व यंत्राच्या फसव्या जाहिराती करणाऱ्यांत व मेपल च्या हितसंबंधियात काहीही फरक राहणार नाही. खरे तर मेपल व त्याच्या संचालकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करायला हवा)

आता अखेरचा मुद्दा. केंद्रातील व राज्यातील भाजप नेतृत्वाला पारदर्शकता, नैतिकता याचे सल्ले देत अग्रलेख किंवा विशेष वृत्तांकनातून शहाणपण शिकवणाऱ्या दैनिकांनी मेपल च्या फसव्या जाहिराती अग्रभागी प्रसिद्ध केल्या. सरकारच्या कोणत्याही योजना, नियोजन, उपक्रम आदींवर संशय घेत प्रश्नांचा भडिमार करणाऱ्या शहाण्या, हुशार संपादकांना मेपल च्या योजनेविषयी साधे साधे प्रश्न पडू नयेत ? हे काही मनाला पटत नाही. दैनिकामध्ये जाहिरातींच्या खरेपणाची काळजी किंवा शहानिशा वाचकांनी करावी अशी चौकट छापल्यानंतर दैनिकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संपते का ? यावरही आता चर्चा व्हायला हवीच. मेपल ची फसवी जाहिरात छापणाऱ्या दैनिकांनी वाचकांची माफी मागणारे निवेदन प्रसिद्ध करायला हवे. त्यासाठी वाचकांनी संपादक किंवा संबंधित व्यवस्थापनाला पत्र लिहून तसा आग्रह धरायला हवा. या विषयावर सार्वत्रिक चर्चा व्हायलाच हवी .....

* बँक अॉफ महाराष्ट्र ने या व्यवहारात आपली भूमिका केवळ रक्कम गोळा करणे एवढीच असल्याचे स्पष्ट केले होते .
संदर्भासाठी लिंक

www.loksatta.com/pune-news/fir-on-director-of-mapple-group-1229086/

abpmajha.abplive.in/pune/sachin-agrawal-escapes-in-front-of-police-and-girish-bapat-215142

http://www.batmidar.in/2016/04/20

abpmajha.abplive.in/pune/filmy-style-escape-for-maple-cmd-sachin-agarwal-215265

1 comment:

  1. If daily newspaper start checking authenticity of each n every ad than they cannot publish ad's of Hair oil , medicines, doctors even lifebouy n Rice

    ReplyDelete