Friday 15 April 2016

इंद्रमहाराज आणि हाजी अली एकत्र येणार !!!

स्त्री बलेच्या संकटावर नारदांची शिष्टाई

(दुपारची वेळ. ४६ डिग्री तापमान डबल एसीच्या गारवा घेत इंद्रमहाराज पेंगुळलेले आहेत. त्यांच्या घोरण्याचा आवाज द्वारपालाला येतोय. घड्याळाचा सेकंद काटा कासवगतीने टीक टीक करतोय. तेवढ्यात इंद्रमहाराजांच्या शयनकक्षाजवळ गलबाला ऐकू येतो. काळ्याशार पेहरावात शिंगणापूरचे शनिमहाराज, लाल भडक कुंकू लावलेली कोल्हापूरची लक्ष्मीबाई, अर्धपंचा घातलेले त्र्यंबकेश्वरचे महादेवभाई, लाल-पांढरे कपडे घातलेली शबरीमाला मावशी तावातावाने द्वारपालशी भांडाताहेत.)
शनिमहाराज - (दरडावून) अरे द्वारपाला, जावून इंद्रमहाराजांना उठव. त्यांना सांगा अतिक्रमणाने हैराण झालेली मंडळी दरवाजावर आलेली आहे.
महादेवभाई - (आजिजीने) - हो बाबा उठव त्यांना. आमची फिर्याद द्यायची आहे.
लक्ष्मीबाई - (तोऱ्यात) ए मेल्या. बघतोस काय तोंडाकडे उठव त्या महाराजाला. आम्हाला विस्थापित व्हायची वेळ आली अन हे झोपा काढताहेत ... उठव ...

(एव्हाना हा गलका एकून इंद्रमहाराजांची झोप मोडली. त्यांनी एसी कमी केला. पलंगावरूनन उठत पायात खडावा घातल्या. उपरणे ठिकठिक केले आणि दोन वेळा टाळी वाजवून म्हटले ...)
इंद्रमहाराज - कोण आहे रे तिकडे ... द्वारावर काय गोंधळ आहे.
द्वारपाल (अदबीने) - महाराज हे चौघे जण भूलोकाहून आले आहेत. आपल्याला भेटायला ...
इंद्रमहाराज - अरे भूलोकची केस पहिले चित्रगुप्तकडे पाठव ... माझ्याशी डायरेक्ट काय काम ...
(तेवढ्यात त्या द्वारपालाला धक्का मारून चौघे तरातरा आत घुसतात.)

शनिमहाराज (संतापात थरथरत इंद्रमहाराज समोर हात हलवत) - काय महाराज डोक्यात राजेशाही घुसली का ? आता आम्हाला तुमच्याकडे यायला द्वारपालाची परवानगी लागेल ...
(चौघांना एकत्र पाहून इंद्रमहाराज चपापतो. हात जोडून उसने आवसान आणून म्हणतो ...)
इंद्रमहाराज - यावे यावे शनिमहाराज, महादेवभाई, लक्ष्मीबाई, शबरीमाला मावशी ...बसा बसा आसनस्थ व्हा ... अरे सेवक थंड ताकाचे पाच पाऊच आण.
(चौघे घुश्शात बसतात. सेवक पाणी देवून ताकाचे पाऊच देतो.) इंद्रमहाराज - (मधाळ भाषेत बोलतात) सध्या स्वर्गातल्या डेअरीची दुरुस्ती चालू आहे. सेंन्टेड दूध, आईस्क्रीम, श्रीखंड बंद आहे. घ्या ताक घ्या.
(सर्वजण पाऊचला स्ट्रॉ टोचून ताक पितात)
शनिमहाराज  (खोचकपणे) - मला माहिती आहे २५ कोटींचा ठेका आहे डेअरी दुरुस्तीचा ...(ऐकून इंद्रमहाराजला ठसका लागतो)
इंद्रमहाराज (सावरत)- नाही अजून प्रस्तावच आहे. टेंडर झालेले नाही. बरे ते जावू द्या ... (चौघांना हात जोडत) असे एकाएकी भूलोक सोडून आमच्या लोकी का आलात ? खाली काही गडबड ?
शनिमहाराज (हातवारे करीत) - पाहा पाहा हे आमचे राजे ... पृथ्वीवर काय चालले यांना माहित नाही ... कसे असेल म्हणा ... येथे डान्स (दर) बारला बंदी कुठे होती? हे आपले करमणुकीतच मस्त ...
महादेवभाई (वैतागून) - खरे आहे शनिभाऊ ... यांना कशाचाही त्रास नाही. यांचे कुठे मंदिरच नाही. त्यामुळे आळीपाळीच्या भक्तांचा त्रास नाही ... शिव शिव (उसासे टाकतो)
लक्ष्मीबाई (अक्षरशः फिस्कारत) - यांना मंदिरातल्या आणि बाहेरच्या बायांचा त्रास नाही ... केवळ दरबारातल्या मेकअपवाल्यांवरच यांची नजर ...
इंद्रमहाराज (नरमाईने) - मी महिलांचा मान करतो, सन्मान करतो ... तुमचा पण करतो ... मला सांगा तरी काय झाले ???

शनिमहाराज (घसा खाकरत) - थांबा मीच सांगतो ... (महादेवभाई, लक्ष्मीबाई शबरीमाला मावशी हो हो म्हणत इशारा करतात आणि बोला बोला म्हणतात ... थोडावेळ शांतता ... इंद्रमहाराज बावळ्यागात चौघांकडे पाहतो)
शनिमहाराज  (हळूहळू बोलतो) - महाराज आम्ही चौघे आता स्त्री बलेने त्रस्त आहोत. वेळीच हस्तक्षेप झाला नाही तर मला शिंगणापूरचा चौथरा सोडावा लागेल ... महादेवभाई त्र्यंबकेश्वरमधून विस्थापित होतील आणि ... या या लक्ष्मीबाई आणि शबरीमाला या सुध्दा बायांच्या शत्रू होतील .. यांनाही स्त्री बलेचा त्रास आहे.
इंद्रमहाराज (खुळ्यागत) - अरे हे काय सांगता आहात ? तुमच्या निवासाचे पट्टे महसूलने दिले ते  स्त्री बला प्रवेश वर्जीत आहेत ... मग या कोण बाया घुसल्यात ... कुठे घुसल्यात ?? आणि महाराष्ट्रात ब्रम्हवृंदच कारभारी आहे ना ??
शनिमहाराज (चिंतीत आवाजात) - महाराज तुमचे गुप्तचर खाते एक तर झोपा काढते आहे किंवा तुम्ही "जाणत्या राजा" वानी सर्व माहित असून आम्हाला कात्रजचा घाट दाखवत आहात ...
इंद्रमहाराज (डाव्या हातने गळ्याला चिमटी घेते) - शनिदेवा सर्व अप्सरांची शप्पथ. मला खरेच माहित नाही हो ... काय आहे ...
शनिमहाराच (पडेल आवाजात) - गेले वर्षभर सुरु होता त्रास. आता आमच्या चौथऱ्यावर स्त्री बला चढू लागल्या आहेत... साडेसाती म्हणून आमची लोकांना भीती होती ... आता आम्हालाच स्त्री बलेचे भय वाटते आहे ...
महादेवभाई (काकुळतीने) - आमचेही तसेच हो. गाभाऱ्यात आम्ही चंदन लेप लावून शांत पडून असायचो. आता तेथेही  स्त्री बला घुसून आम्हाला इथून तिथून स्पर्श करणार आहे ...
लक्ष्मीबाई (घुश्श्यातच) - आता मला म्हणू नका मी स्त्री बलेची विरोधक म्हणून ... मलाही हा त्रास सुरु झालाय ...
(इतकावेळ अंग आकसून गप्प बसलेली शबालीमाला मावशी म्हणते)
शबालीमाला मावशी - अजून मला असा त्रास नाही. पण माझ्याही गाभाऱ्यात स्त्री बला घुसू शकते ...
इंद्रमहाराज (चौघांना उद्देशून) - पण हे घडले कसे, कधी, कोणाच्या आदेशाने ???
शनिमहाराज - पृथ्वी तलावर भारत भूमित सध्या स्त्री बलेच्या प्रवेशाचाच प्रश्न शिल्लक आहे. स्त्री बलाही त्याच्यावरच भांडते आहे. दिसेल त्या मंदिरात स्त्री बलेस प्रवेश हवा ... दिसले मंदिर की घूस ... असे चालले आहे ...पोलिस, चैनलवाले व पत्रकारांना हेच काम आहे ... आज कोण, कुठे घुसली ?? आणि कोर्टानेही स्त्री बलेचा कैवार करीत मंदिर आहे ना मग घुसू द्या महिलांना असा निकाल दिला आहे ...
लक्ष्मीबाई (तावातावाने) - त्याच आदेशाचा तर परिणाम आहे हा ... अहो कपाळी कुंकू न लावणारी, मंगळसूत्र न घालणारी,  पूर्वी मंदिरात न येणारी, वडाला दोरा न गुंडावणारी, करवाचौथचा उपवास न करणारी, हर जन्मात जोडीदार बदल हवा म्हणत हरतालिका व्रत नाकारणारी ही स्त्री बला आता आमच्याच मागे लागली आहे ... खरे आहे ... स्त्री बलाच स्त्रीची दुश्मन आहे ...
महादेवभाई (खुले अंग उपरण्याने पुसत) - शिव ... शिव आता अंगाला कुठे कुठे स्पर्श होतो म्हणून सांगू ...
(शबारीमाला मावशी काही बोलूच शकत नाही ... तिच मंदिर कशासाठी आहे हेच तीला आजही समजत नाही)
(आता इंद्रमहाराजच्या चेहऱ्यावर तणावाचे जाळे. कधी डाव्या हाताने कान खाजवत. कधी उजव्या हाताने डोके खाजवत परेशान ...)
इंद्रमहाराज (खोल गेलेल्या आवाजात) - बंधुंनो आणि भागिनींनो समस्या गंभीर आहे. मी येथून खाली भूलोकी काय करावे म्हणता ???
(आता यावर सारेच चिंतीत ... खुप खल सुरु ... या कानातून त्या कानात ... आकडेमोड ... मोजदाद ... कपाळवर हात ... तोंडावर बोट ... )

इंद्रमहाराज - (युरेका ... युरेका ओरडतो) - सापडला मार्ग सापडला ... अरे पृथ्वीवर आपले कमिशन एजंट, दुकानदार, पदवी देणारे, शंख करणारे चार आचार्य, पंथ, ध्यान,धारणावाले आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या स्वप्नात जावून दुष्टांत ... दुष्टांत द्या ... म्हणा ... स्त्री बला मंदिरात घुसली तर अनर्थ होईल ... प्रलय होईल ... राज्य जाईल ... कोप होईल ... हा दुष्टांत संबंधित बाबा, बुवा, शंखाचार्य जाहीरपणे बोलले की बवाल सुरु होईल ... काहीही दुर्घटीत घडले की त्याचा संबंध कोप, अनर्थ, प्रलयाशी जोडाला जाईल. २४ तासवाले "ॲक्ट अॉफ गॉडवर" भारुड चर्चा लावतील तर पेपरवाले रकानेच्या रकाने छापून भाकड कथांच्या कहाणी छापतील .... स्त्री बलेचा त्रास काही काळ थांबेल ...
(इंद्रमहाराजचे ऐकून चौघांची कळी थोडी खुलते ... असे होवू शकते का ?  यावर खल चालू होतो ... तासाभराने चर्चा एकमतावर येते ... जेथे स्त्री बला घुसवायला प्रतिक्षा करावी लागली तेथे स्त्री बलेस बाहेर ठेवायला काहीही कारण होवू शकते यावर शहाणपणाने एकमत होवून चर्चा संपत येते. ताज्या सोमरसाचे पान करून पाचही जण उठतात ....अचानक धमकावण्याच्या भाषेत इंद्रमहाराजला उद्देशून शनिमहाराज बोलतात ..)
शनिमहाराज - इंद्रमहाराज तुमचा हा तोडगा वापरून स्त्री बला माझ्या पाठी लागली नाही तर तुमचे भले होईल ... नाहीतर मी शिंगणापूर सोडून मी येथे येवून इंद्रनगरीचे महाराणीपद स्त्री बलेकडे देण्याची मागणी करणार आहे ... ३३ कोटीत महिला मतदार निम्म्या आहेत ... मग बसाल बोंबलत ...

(सर्वजण उठायच्या तयारीत असताना नारायण ... नारायण म्हणत नारद प्रकटतात. सर्वजण त्यांना मुनीवर म्हणून प्रणाम करतात. नारद हसून इंद्रमहाराजला विचारतात, काय महाराज बरे आहे ना ?? ... इंद्रमहाराज ओशाळून मुंडी हलवतो ...)
नारद (मिश्कील हसत) - इंद्रमहाराज तुम्हाला मुंबईच्या हाजी अली बाबांचा सांगावा आहे ...
इंद्रमहाराज (शक्य तेवढी नम्रता दाखवत) - आदेश करा वा मूनीवर
नारद (हसत) - हाजी साहेबांनाही स्त्री बालेचा त्रास आहे ... ते म्हणतात आता आपण एकत्र आले पाहिजे ...
(हे ऐकून इंद्रमहाराजला भोवळ येते. त्यांना सावरायला सेवक धावतात. तोवर इतर चौघे काढता पाय घेतात ...नारद अंतर्धान पावतात ...)

(** फार्समधील पात्रे काल्पनिक. देवादिकांच्या  अथवा प्रेषिताच्या नावाशी मुळीच संबंध नाही)ङ

No comments:

Post a Comment