Wednesday 13 April 2016

राजकीय तळीरामांची "बार मिटींग" !!!

(सध्या राजकीय पक्षांच्या प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्याचा हंगाम आहे. भाजपची प्रदेश कार्यकारिणी ३१ मार्चला जाहिर झाली. तीत प्रदेश चिटणीसपदी एकमेव महिला आमदार आहेत. १२ एप्रिलला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहिर झाली. तीत बंडखोरी करणारे माजी खासदार, पराभूत आमदार, अमळनेरच्या महिला नेत्या आणि धरणगावचे जुने पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी वर्षभरापूर्वीची आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचे कोणीही नाही. शिवसेनेत पूर्वी उपनेते असलेल्यांना आता तो दर्जा असल्याची माहिती नाही. प्रदेश कार्यकारिणींचा हा विषय सर्वच राजकीय पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये चर्चेत आहे. सत्तेचीपदे कुटुंबात वाटली जात असताना पक्षसंघटनेतही स्थान नसलेली मंडळी रात्री स्टेशन रोड जवळच्या प्लाझामध्ये आपले दुःख ग्लासात बुडवताना गप्पा मारत होती. त्याची अन सेन्सर्ड अॉडीओ कैसेट हाती आली. १००% टक्के वास्तव असलेला संवाद नावे बदलून दिला आहे.)
(रात्रीचे ९.३०. प्लाझामधील एसी बैठक फूल्ल. भाजपचा माजी पदाधिकारी एकटाच आत येतो. एकही टेबल रिकामा नसल्याचे पाहून हिरमुसला होतो. तेवढ्यात प्लाझा व १२/१४ बारचे मालक त्यांना पाहतात आणि जवळू येवून नमस्कार भाऊ म्हणतात. दोघांचा नमस्कार संपतो.)

भाजपवाला - काय भागवत भाऊ सर्व महाराष्ट्रात पाणी टंचाई असली तरी तुमच्या बारमध्ये पाण्याची टंचाई कधीही नसते ? पेग बनवायला पाणी नाही म्हणून बार बंद असे ऐकले नाही ?
भागवत भाऊ (कसंनुस हसत) - नाही भाऊ तसं नाही. उन्हाळ्यात गर्दी असते. आपण सर्वांचीच व्यवस्था करतो.  आणि पाण्याचे काय आहे, ते दादाने वाघुर केल्यापासून जळगावात टंचाई नाही म्हणा ! थांबा मी पोराला सांगून टेबल लावतो.
(तेवढ्यात राष्ट्रवादीवाला नाराज भाई येतो. तोपण बसायला जागा नाही पाहून भाजपच्या भाऊ जवळ थांबून विचारतो)
राष्ट्रवादीवाला - काय भाऊ आज एकटेच ? जोडीदार नाही सोबत ?
भाजपवाला - हो आज एकटाच आहे. बाकीचे पदाधिकारी लातुरला गेले. पाणी वाटप करायला. भाऊंचा आदेश होता.
(दोघांचे बोलणे सुरू असताना काँग्रेसचा माजी पदाधिकारी येतो. हा पदाधिकारी अर्जफाटे करण्यात पटाईत. दोघांना नमस्कार करून बसायला जागा नाही हे समजून जातो. तेथेच उभे राहून म्हणतो.)
काँग्रेसवाला - मग, आज काय भाजप-राष्ट्रवादीचा गळ्यात गळा ...
भाजपवाला (चिडून) - ओ भाऊ आम्ही अलग अलग आहोत. जागा नाही म्हणून थांबालो. (राष्ट्रवादीवाला हसतो)
काँग्रेसवाला (हसून) - भाऊ नाहीतरी तुम्हाला भाजपत जागा कुठे आहे ? जागा किंवा पद पाहीजे असेल तर आडनाव बदला (जोरात हसून राष्ट्रवादीकडे टाळी मागतो. राष्ट्रवादी एक डोळा मिचकावून टाळी देतो. तेव्हाच शिवसेनेचा वैतागलेला भाऊ तेथे येतो. भाजपकडे संशयाने पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीला खडूसपणे विचारतो)
शिवसेनेवाला - अरे भाऊ या भाजपच्या नादी लागू नका. दादा, बाहुबली आत आहे, माजी दादांचाही नंबर लावतील. ही भाजपवाली मंडळी बेभरवशाची आहे.
भाजपवाला (घुश्श्यात) - भाजप आणि आमच्या नेत्यावर बोलू नका ! तुमच्या पक्षाचे पाहा !
राष्ट्रवादीवाला (दोघांना समजावत) - तुम्ही दोघे भांडू नका.ही मनपा नाही आणि सभागृह नाही. हा बार आहे. येथे जातीभेद, पक्षभेद विसरायचा ... सर्वजण एकाच माळेचे मणी असतात ...
(तेवढ्यात भागवतराव हसत हसत येवून म्हणतात)
भागवत राव - बापारे, चारी पार्टीवाले एकाच जागी आले का ? चला कोपऱ्यात टेबलवर बसा ... जागा केली आहे

(चौघे कोपऱ्यातील टेबलाजवळ जावून बसतात. वेटर अॉर्डरचा, चकण्याचा, पाणी, सोडा सोपास्कार पार पाडतो. थोड्यावेळाने बाटली उघडतानाच काँग्रेसवाला उत्तेजित होवून म्हणतो)
काँग्रेसवाला- भाऊ साला पक्षासाठी कितीबी करा ...आमचे लोक प्रदेश कार्यकारिणीत आम्हाला घेत नाहीत ...(बोलताना चेहरा उतरतो. राष्ट्रवादीवाला तीनच ग्लास भरतो.)
भाजपवाला - भाऊ तीनच भरले ? तुमचा नाही ..?
राष्ट्रलादीवाला (पाणी सोडा टाकत) - भाऊ नवरात्री चालू आहे ना ! ... नऊ दिवस पाळतो. खाणे पिणे व पायात चप्पल घालणे बंद ...
शिवसेनावाला (जोराने हसत ग्लास उचलून चिअर्स म्हणतो. भाजपवाला ग्लासात बोट बुडवून दोन थेंब बाहेर उडवतो व काँग्रेसवालाच्या ग्लासला ग्लास ठोकून चिअर्स म्हणतो)
भाजपवाला (अचानक आठवून राष्ट्रवादीवाल्यास) - तू घेत नाही ना !! मग तुझा चकना वेगळा सांग. साल्या तू घेत नाही पण चकना दहा जणांचा खावून टाकतो (सारेच हसतात)
(एक एक पेग पोटात गेल्यावर चर्चा रंगायला लागते. राष्ट्रवादीवाला सिंधी पापड मागवतो. भाजपवाला सिगारेट पेटवतो. राष्ट्रवादीवाला चकना संपवतो)
भाजपवाला (काँग्रेसवाल्यास) - भाऊ तुमची पार्टी चांगली आहे. सत्ता नाही तरी कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारिणीत पदे दिली ... साला आमच्या पार्टीत फक्त आमदार बाईला चिटणीस केले ...(सिगारेटचा मोठ्ठा धूर सोडतो)
काँग्रेसवाला (दुखती नस दबाल्याने चिडून) - हा चार जण घेतले. पण त्यात एक बंडखोरी करून नोटीस घेणारा आहे, दुसरा पराभूत आमदार आहे. ती अमळनेरवालीबाई गल्लीत निवडून येत नाही, ती प्रदेशवर आहे. आणि धरणगाववाला बाजार समितीत हरला तरी ... मी एवढा जुना ... मला घेतले नाही ...
राष्ट्रवादीवाला (भाजपवाल्याचा दुसरा ग्लास भरत) - भाऊ तुमच्या दोघांच्या पार्टीत प्रदेशवर काही तरी चालू आहे. आमच्या राष्ट्रवादीत काहीच चालू नाही. ते छोटे दादा आले, गटबाजीवर बोलले पण पक्षाच्या प्रदेशवर जळगावचा कोणीच नाही ... (तेवढ्यात शिवसेनावाल्याला उचकी लागते. भाजपवाला त्याला पाणी देतो)
भाजपवाला - घे घे पानी पी ... एकदम पीवू नको आणि चकना कमी खा ! ठसका लागणार नाही ...
शिवसेनावाला (पाणी गटागटा पीवून झाल्यानंतर) - साल्या तुझ्या हातचे काहीच नको ..पण प्यावे लागते (ठसका थांबतो)
शिवसेनावाला - तुमच्या तिघांच्या पार्टीत जुने-नवे, एखादा-दुसरा प्रदेशमध्ये आहे तरी ... आमच्याकडे मागे उपनेते दिले होते ... नंतर ती यादी परत बदलली नाही ... आमच्याकडे राज्यस्तर पदाधिकारीच नाही ...
काँग्रेसवाला (पेग संपवत) - खरे आहे भो ... पक्षात आपली लायकी चादरी उचलायचीच. पद हवे असेल तर गॉड फादर नाहीतर बाप फादर पाहीजे.
(काँग्रेसवाला आणि भाजपवालाही एका घोटात ग्लास संपवतात)
भाजपवाला -  (शर्टावर पडलेला चकना झटकत) भाऊ आम्हाला पक्षात आणि सत्तेत पण पद नाही. आमचे दिन अच्छे नाही.
राष्ट्रवादीवाला (जागेवरुन उठत) - हे असेच आहे. आमची सत्ता होती तेव्हा मंत्र्यांच्या नाना नावांच्या भावांची चलती होती.
(शिवसेनावाला, काँग्रेसवाल्यांना थोडी चढालेली. एकमेकाचा हात धरून उठतात. भाजपवाला पोराला बोलावून बिलाचे विचारतो.)
पोरगा (हाताने नाहीची खूण करीत) - भागवत भाऊने बील नाही सांगेल है. म्हणे खुप दिवसांनी तुम्ही एकत्र आलात म्हणून भाऊने पार्टी दिली. (चौघांना सुखाद धक्का बसतो. एकमेकाला नमस्कार करून निरोप घेतात)

No comments:

Post a Comment