Sunday 10 April 2016

जळगावच्या गवळणी मुक्ताईच्या बाजाराला..!!

खडी गंमत किंवा तमाशातील "गवळण" सादर करणारे कलावंत (संग्रहीत छायाचित्र)
(सकाळचे नऊ वाजलेत. जळगावच्या काही गवळणी लगबगीने मुक्ताईच्या बाजाराला निघालेल्या. थोराड मावशी सर्वांत पुढे चालत गुणगुणते आहे, "मुगडी माझी सांडली गं ... जाता मुक्ताईला गं ... जाता मुक्ताईला." मागे चालणाऱ्या आठ, दहा गवळणींमध्ये दोन, तीन तरुणी आपापसात गुलूगुलू बोलून फिदीफिदी हसताहेत.)
मावशी (ब्रेक लागल्यागत थांबून मागे वळून पाहून म्हणते) - चला चला पोरीहो ... लवकर चला ... सूर्य वर यायला लागला. मुक्ताईहून परतताना दुपार होईल.
(मावशीने सांगितल्यानंतर साऱ्या गवळणी झपाझपा चालायला लागल्या.  मावशीने गाणे बदलले. ती म्हणायला लागाली, "या रावजी ... बसा भावजी ..." तिच्या मागोमाग गवळणी झपाझप चालायला लागल्या.)

(रस्त्याचा चढ चढून मावशी जशी वर आली तसा पेंद्या गप्पकन  कमरेवर हात ठेवून तिच्या समोर उभा ठाकला. अचानक समोर आलेल्या पेंद्याला पाहून मावशी दचकली. पेंद्या मात्र ख्खी ख्खी करून हसत होता.)
मावशी - (पेंद्या समोर हात हलवत) आत्ता ग बया ! बाई माणसाने चालावं कसं ? कारे कोण तू ? असा रस्त्यात वासरुवानी कसा घुसला ???
पेंद्या - (दोन्ही हात पसरून गवळणींचा रस्ता अडवत) - ओ मावश्ये तुला कशात मोजू ?? बाई की माणसात ?? कुठे निघाल्या एवढ्या गडबडीने ? थांबा ... थांबा ... जरा थांबा.
(मावशीच्यामागे सर्व गवळणी लपल्या. टुकूरटुकूर पेंद्याच्या आणि मावशीच्या तोंडाकडे पाहू लागल्या. मावशीने पदर खोचला आणि पोरींना धीर देत म्हणाली ...)
मावशी - थांबा गं पोरी हो ... घाबरू नका ...माझ्या मागे थांबा ... (पेंद्यापुढे दोन्ही हात नाचवत) कायरे कोण तू ?? कशाला आम्हा गवळणींचा रस्ता अडवतो ...
पेंद्या (कपाळावर आढ्या घालत) - ए मावश्ये मला नाही ओळखत ? ... मी पेंद्या ... पेंद्या ... किसनदेवाचा पर्सनल सिक्रेटरी ... म्हनजे खासगी पीए ... तुम्ही मुक्ताई तालुक्यातल्या दिसत नाही ... मग आल्याकुठे ... चालल्या कुठे ??
मावशी (धीर धरून, घसा खाकरून) - अरे पेंद्या ... आम्ही जळगावच्या गवळणी ... मुक्ताईला निघालोय ... तू रस्ता सोड आम्ही व्हीआयपी आहोत ...
पेंद्या (बावळट चेहरा करत स्वतःशीच) - आयला, जळगावच्या गवळणी मुक्ताईच्या बाजाराला ?? ... ए मावश्ये काय म्हणलीस ? ... तुम्ही जळगावच्या गवळणी ... मग एवढ्या लांब ९० किलोमीटरवर मुक्ताईला कशाला आल्या ... आणि तुमच्या डोक्यावर दुधा, तुपाची मडकीपण नाहीत ... तुम्ही गवळणींच कशा वरुन ?? आज तर मुक्ताईचा बाजारपण नाही ...
मावशी (ठामपणे खडसावत) - पेंद्या मेल्या सर्रक बाजूला ... अरे आम्ही आज बाजाराला नाही ... नाटकाला आलोय ...
पेंद्या - (डोक्याचा भुगा झाल्यागत) - ओ मावश्ये सकाळी सकाळी लावली का ? आरे मुक्ताईला नाटकाला ??? इथे कुठे नाटकघर आहे बाई ??

मावशी (समजावणीच्या सुरात) - अरे पेंद्या मुक्ताईला नाटक पाहायला नाही तर नाटक कंपनीत आलो आम्ही ... तेथे नाटक कंपनी सुरु झाली ... तिच्यात भरती आहे आज ... (असे म्हणत पेंद्याचा हात झटकत मावशी पुढे जायला करते)
(आता पेंद्याल झटका बसतो ... मुक्ताईला नाटक कंपनीत भरती ? ... साला आपल्यालाच माहिती नाही. पेंद्या पुन्हा दोन्ही हात आडवे करून विचारतो)
पेंद्या - ऐ मावश्ये गप्प जरा ... पुढे जावू नको ... मला सांग ही नाटक कंपनी काय भानगड आहे ... आणि तुमची जळगाववाल्यांची भरती ? कशासाठी ??
मावशी (पेंद्याच्या समोर उजवा हात नाचवत) - मेल्या मुडद्या, बाजूला हट ... तुला लोकांची काय नाटके माहित ? आम्ही जळगावाच्या गवळणी ... आम्ही जळगावात भरपूर नाटके करतो ... पेंद्या हलकटा, आम्ही जागतिक रंगाभूमिदिन वेगवेगळ्या गटातटात साजरा करतो ... राज्य नाट्य स्पर्धेत, कामगार कल्याण मंडळ, वीज मंडळ स्पर्धेत भाग घेतो ... पुरुषोत्तम सुध्दा सुरू केलाय ... आता आम्ही व्यावसायिक  नाटके सुध्दा बसवतो मुडद्या ! सार सार परिवर्तन केले ... तुला माहित नाही ... हट बाजूला ...
पेंद्या  (ओरडत) - ऐ मावश्ये, भटक भवानी .... थांब जरा ... जळगावला भरपूर नाटके करतो म्हणते अन् मग मुक्ताईला का कडमडली  ... तेबी या पोरी ... सोरी घेवून ??
मावशी (आता दम दिल्याचा आवाज) - पेंद्या तू आता बाजूला होतो का ? (कमरेच्या पाऊच मधून मोबाईल काढत) ... की लावू ताईला ... मेल्या तडीपार होशील ...

पेंद्या (ताईचे नाव ऐकून आवाज नरम करीत. पेंद्याची फजिती पाहून इतर गवळणी पदराआड हसतात) - ओ मावश्ये गप गुमान ... ठेव तो मोबाईल परत ... मला नीट सांग ... ही नाटक कंपनी काय भानगड आहे ??
मावशी (मोबाईल बंद करीत) - आता कसा ठिकाणावर आला ... मी सांगते नीट ऐक. मध्येमध्ये बोलू नको (गवळणींकडे पाहात) पोरीहो तुम्ही चालून थकल्या असाल. न्याहरी करा. मी या पेंद्याला समजून सांगते ... (गवळणी मागे न्याहरीला बसतात. मावशी पेंद्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावते) ... पेंद्या ... अरे आम्ही जळगावच्या नाटकवाल्या गवळणी.  जळगावला आमची राज्य नाटक कंपनीची शाखा आहे ... पण तो कारभारी असून नसून सारखाच ... मेला राजीनामाही देत नाही ... नाटकात काम पण करीत नाही ... राज्य नाटक कंपनीने मुक्ताईला दुसरी कंपनी सुरु करायला परवानगी दिली म्हणे ... ही नवी कंपनी लई भारी आहे ... डायरेक्ट नाटक कंपन्यांची परिषद घेणार म्हणे (मावशीला बोलून दम लागातो ... पेंद्या मिनरल वॉटरची बाटली देतो. मावशी नखाने झाकण उडवून गटागटा पाणी पिते ... श्वास भरून म्हणते ...) पेंद्या नव्या नाटक कंपनीत पदांची भरती आहे म्हणे ... नाटकाशी संबंध असावाच असे नाही ... म्हणून आम्ही आज जळगावहून  भारतीला आलो बाबा ... (मावशी झटक्यात बोलून तोंडाने श्वास घेते)
पेंद्या (न समजून ... बावळट चेहरा कायम ठेवून) ... पण मावश्ये मुक्ताईला तर नाटक घर नाही ... मग येथे नाटक कसे होणार ??
(मावशी आता रागावते. पेंद्याच्या पाठीत धपाटा घालून म्हणते ...)

मावशी - पेंद्या नालायका ... नाटके जळगावातच होतील ... भरती मुक्ताईला आहे ... नाटक परिषद पण जळगावलाच होईल ... पण ही कंपनी ग्रामीण भागात नाटक चळवळ वाढवेल ... आम्ही जळगावच्याच गवळणी असू फक्त बाजाराला पावती मुक्ताईची असेल ...
पेंद्या (अजूनही बावळटागत) - पण मावशी तु कोणत्या पदावर बसशील .... तू तर खूप ज्येष्ठ झाली आहे ...
मावशी (पेंद्याला धपाटा घालत) - मेल्या मुडदा बसिवला तुझा ... आता मला कशाला हवे पद ... अपूर्णांक असलो तरी खूप खूप अनुभवाचा पूर्णांक आहे माझा ... आता या नव्या पोरींना पदावर बसवते ...
(तेवढ्यात न्याहरी करून गवळणी परत येतात. मावशी लगबगीने उठते.  पेंद्याला म्हणते ... चल रे मेल्या जावू दे आम्हाला ... मावशी पुन्हा पाऊच मधून मोबाईल काढते ... ताईला लावते .... "ताई नमस्कार ... आम्ही जळगावच्या नाटकवाल्या गवळणी आलो आहोत ... तुम्ही बंगल्यावर आहात ना !! ... येतो ... येता आम्ही भेटायला ... ")

( उपरोक्त लेखन हे महाराष्ट्रातील खडी गंमत किंवा तमाशा प्रकारातील गवळण प्रकारात आहे. येथे गवळण हा जाती किंवा समाजवाचक शब्द नाही. तो साहित्य प्रकारातील आहे. वरील कथानक पूर्ण काल्पनिक आहे. कोणाच्या अवमानाचा हेतू नाही)

(लेखन प्रकार संदर्भ - महान्यूज संकेतस्थळावरुन / लेखक /
प्रकाश खांडगे / thinkmaharashtra.com/kala/खडीगंमत)

No comments:

Post a Comment