Friday 1 April 2016

भैरुदादाकी जय हो !!!

भालचंद्र तथा भैरुदादा पाटील
जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या १४ संचालकांची निवड बिनविरोध झाली. गेल्या ८२ वर्षांपासून म्हणजे बँकेच्या स्थापनेपासून संचालकांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा कायम राखली गेली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील तथा भैरुदादा यांच्यावर बँकेच्या १४ हजारांवर सभासदांनी दाखविलेला हा विश्वास आहे. याबरोबरच पाटील कुटुंबावर असलेला सभासदांचा पिढीजात विश्वासही कायम असल्याचेच हे प्रतिक आहे. 

येथे घराणेशाही हा मुद्दा पूर्णतः गैरलागू ठरतो कारण, पाटील कुटुंबातील ज्या ज्या मान्यवरांनी बँकेचे नेतृत्व केले त्यांनी आपापल्या उत्तुंग कारकिर्दीचे दीपस्तंभ बँकेच्या प्रगतीपथावर रोवले. प्रत्येक नेतृत्वाने दुसऱ्याची सावली होण्यापेक्षा आपापले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपले. त्यातून बँकेला विस्तारले आणि प्रगतीचा नवा टप्पा गाठला. याशिवाय पाटील कुटुंबाने काळानुसार आपापसात खांदेपालटही केला. हे या कौटुंबिक प्रवासाचे वैशिष्ट्य.

सन २००६ पासून भैरुदादा बँकेचे नेतृत्व करीत आहेत. ते स्वतः रसायनशास्त्राच्या अभियांत्रिकी शाखेची बीई पदवीधारक आहेत. "वेगा केमिकल्स" म्हणून त्याचा स्वतंत्र उद्योग प्रकल्प आहे. रंग तयार करण्यासाठी लागणारे रसायन या उद्योगात तयार केले जाते. त्याची मागणी संपूर्ण भारतातून होते. एक यशस्वी उद्योक म्हणून त्यांनी स्वतःचा दीपस्तंभ उभा केला आहे.

जळगाव पीपल्स बँकेत अध्यक्ष म्हणून काम करताना भैरुदादांनी विज्ञान व तंत्रावर आधारलेल्या बँकींग प्रणालीचा स्वीकार केला. त्यांनी सर्व सेवा-सुविधांमध्ये बँकेला अग्रेसर केले. त्यातून बँकेची आर्थिक प्रगती चौफेर झाली. आज बँकेची उलाढाल १९ हजार कोटी रुपयांवर असून ती आगामी दोन वर्षांत २५ हजार कोटींवर नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
जळगाव पीपल्स बँकेतर्फे कलाम वर्ष २०१६ चे प्रकाशन करताना बँकेचे संचालक
भैरुदादा कुशल प्रशासक, संघटक, उद्योजक आणि समाजसेवी आहेत. अशा विविध जबाबदारी यशस्वीपणे पेलणारे भैरुदादा मनस्वी आणि सहृदयी आहेत. माणूस कोणतेही काम करताना तीन प्रकारे करतो. पहिला प्रकार म्हणजे फक्त मुखातून निघणारे शब्द. दुसरा प्रकार म्हणजे मेंदूतून निघणारे विचार. तिसरा प्रकार म्हणजे अंतःकरणाच्या प्रेरणेतून होणारी कृती.  या तीनही प्रकारातून स्वतंत्र कार्यशैली असलेली माणसं अनेक असतात. पण, तिनही पध्दतींचा कृतीतून वापर करणाराच सहृदयी असतो. भैरुदाअसेच सहृदयी आहेत. 

आपण ज्या सामाजिक संस्थेत काम करतो त्याला मंदिर समजणे ही एक पवित्र भावना आहे. संस्थेच्या भिंती मंदिरचा गाभारा आणि सभासदांचा संस्थेवर आणि संचालकांवर विश्वास म्हणजे गाभाऱ्यातील स्थितःप्रज्ञ विश्वास. या विश्वासावर रोज काम म्हणजे गाभाऱ्यातील देवाची पूजाअर्चा. अगदी मंगल आणि पवित्र भावना. भैरुदादांना हा विचार आणि वसा कुटुंबातून मिळाला. पापभिरु आणि प्रामाणिक ज्येष्ठांनी समाजसेवेचा मार्ग दिला. त्यावर भैरुदादा पदभ्रष्ट न होता अविरत आणि अविचलीत चालत आहेत.

जळगाव पीपल्स सोसायटी ही सन १९३३ मध्ये स्थापन झाली. सामान्य माणसाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समुह संस्था असावी या हेतूने रावसाहेब रुपचंद लाठी, एस. व्ही. देशपांडे, मिश्रीलाल जोशी आणि काकासाहेब रामदास लहानू पाटील यांनी एकत्र येवून जळगाव पीपल्स सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी सोसायटीचे व्यवहार पारदर्शक ठेवले. आर्थिक शिस्त पाळून सभासदांना गरजेनुसार उत्कृष्ट सेवा दिली. १९६९ मध्ये यशवंतराव पाटील यांनी नेतृत्व केले. त्यांनी बँकेचा शाखाविस्तार केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने १९८४ मध्ये बँकिंग लायसन्स परवाना पीपल्स बँकेला प्रदान केला. नंतर अप्पासाहेब प्रभाकर रामदास पाटील यांनी नेतृत्व केले. त्यांनी बँकेत तंत्र आणि कुशल मनुष्यबळ आणले. १९९४ मध्ये बँकेची "डायमंड ज्युबली" साजरी झाली. नंतर बाबुलाल रामलाल चौबे यांनी बँकेचे नेतृत्व केले. त्यांनी बँकेच्या सेवेत आधुनिकतेला प्राधान्य दिले. याच काळात बँकेला पहिल्यांदा एक कोटींचा नफा झाला. १९९६ मध्ये बाळासाहेब पुरुषोत्तम यशवंत पाटील यांनी नेतृत्व केले. त्यांनी बँकेत आयटी विभाग सुरु केला. सर्व शाखा रेडिओ फ्रिक्वेन्सीने जोडल्या. बँकेने सर्वप्रथम बायो एटीएम सुरु केले. बँकेने स्वतःचे कोअर बँकींग सॉफ्टवेअर "यशवंत" तयार केले. त्याला रिझर्व बँकेच्या व्यवस्थेने "ग्रेड वन" दिली.

सन २००६ दरम्यान भैरुदादा तथा भालचंद्र पाटील यांनी नेतृत्व स्वीकारले. आजपर्यंत त्यांचेच नेतृत्व होते आणि आता सन २०२१ पर्यंत त्यांचेच नेतृत्व राहील. गेल्या पाच वर्षांत जळगाव पीपल्स बँकेने सेवेत अनेक मापदंड निर्माण केले. त्याचे फल स्वरूप भैरुदादांना "बँकिंग फ्रंटिअर्स २०१५" चा "बेस्ट चेअरमन" पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्य काळात बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळविला. आता बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळविण्यासाठी वाटचाल सुरू आहे. 

स्वतःच्या कार्यशैलीचे गुणात्मक वर्णन करताना भैरुशेट म्हणतात, "माझे पाय सदैव जमिनीवर घट्ट रोवले असून डोके सदैव वर आहे ते कधीही उलटे होवू देणार नाही. बँकेच्या प्रगतीचे एक एक शिखर सर करीत ही बँक देशातील सर्वोत्तम ५ बँकांमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार." 

सामाजिक उत्तरदायित्वाचा वसा जपत भैरुदादा यांनी बँकैतर्फे दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय  सेवेत सुधारणा व विस्तार केला. प्रभाकर पाटील नेत्रालयाचे रुपांतर प्रभाकर पाटील मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत सध्या दातांवरील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील. तसेच भविष्यात नाक, कान, घसा व फिजिओथेरपीचे उपचार केले जाणार आहेत. भैरुदादा नॕब या अंधासाठी कार्य करणाऱ्या  संघटनेचेही राज्यस्तर उपाध्यक्ष आहेत.
जळगाव पीपल्स बँक आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर आहे. बँकेला ३१ मार्च २०१५ अखेर नफा ८ कोटी ८४ लाख झाला आहे. बँकेकडे १४०० कोटींच्या ठेवी असून कर्ज वाटप ८२१ कोटींचे आहे. बँकेची ३३३ कोटींची गुंतवणूक आहे. बँकेचा शाखाविस्तार २९ असून कर्मचारी संख्या २८७ आहे. बँकेशी संलग्नीत एकूण १६२ महिला बचतगट आहेत. बँकेच्या एटीएमची जोडणी देशभरातील सर्व एटीएमशी झाल्याने संपूर्ण भारतातील २१३ बँकांच्या १ लाख ५५ हजार ३८७ एटीएम मधून रुपये काढण्याची सुविधा जळगाव पीपल्स बँकेच्या खातेदारांना उपलब्ध झाली आहे. त्वरित क्लिअरिंग व्यवहारासाठी डिजीटल चेक इमेजेसच्या माध्यमातून कार्य करणारी सीटीएस सुविधा बँकेच्या औरंगाबाद शाखेतून कार्यान्न्वित झाली आहे. बँकेची ही गरुड भरारी विद्यमान आणि भावी चेअरमन भालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वात सुरु आहे. 

बँकेतील बिनविरोध निवडीबद्दल भैरुदादा आणि इतर मान्यवर संचालकांचे अभिनंदन !!!

No comments:

Post a Comment