Monday 28 March 2016

नाथाभाऊ, अजितदादांचे मनावर घेवू नका !!

(मा. ना. एकनाथराव खडसे यांना खुले पत्र)


मा. ना. नाथाभाऊ
रामराम.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज तथा पक्षाच्या अध्यक्षांचे पुतणे आजितदादा पवार जळगावात पक्षाचा मेळावा घेवून गेले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजितदादांनी खडसेंच्या घराणेशाहीचा उल्लेख केला. त्यावर लगेच प्रतिक्रिया देवून त्यांचे काका तथा मोठेसाहेब यांच्या वक्तव्याची आपण आठवण करून दिली हे बरेच झाले. काका खासदार, काकांची मुलगी खासदार आणि स्वतः अजितदादा आमदार असताना त्यांनी आपल्या खान्देशी मातीत येवून आपल्यावर घराणेशाहीची टीका करणे हे अतीच झाले. 

खडसे परिवारातील पदाधिकाऱ्यांसंदर्भात आपण यापूर्वी वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. जळगाव पिपल्स सहकारी बँकेतर्फे खडसे परिवाराच्या सत्काराचा एकत्रित कार्यक्रम झाला होता. त्यावेळी आपण भावूक होत मनमोकळे बोलून भूमिका मांडली होती. राजकारणातील कोणत्या अपरिहार्य कारणांमुळे आपल्या कुटुंबातील मंडळींना पदे स्वीकारावी लागली याचा उहापोह आपण केला होता. तो शब्दं शब्द कानात आजही घुमतो आहे.

लोकसभेत नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत हवे होते. अशावेळी रावेरची जागा गमावली जावू नये म्हणून पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलला. आपण व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करून रावेरसह जळगावची जागा जिंकली. जळगावमध्ये भाजपला एवढे मताधिक्य कसे मिळाले ? हा प्रश्न आजही पाचोरा, भडगाव, पारोळा येथे विचारला जातो. बहुधा तो मोदी लाटचा परिणाम समजला जातो. 

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये आपण सर्वपक्षीय आणि बिनविरोधचा फार्म्यूला आणला. जिल्हा बँक, दूध संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेले गैरप्रकार चर्चेत होते. सहकार खात्याकडे तेव्हा केवळ चौकशीच्या फेऱ्यात असलेली प्रकरणे पोलीस दप्तरी गेली तर काय होईल ? या भीतीने धास्तावलेले अनेकजण रिंगणातच आले नाही. रा. काँ. च्या खासदारांनी निवृत्तीच जाहीर केली. त्यामुळे भाजपच्या अनेकांना बँक व दूध संघात संधी मिळाली. अशावेळी बँकेतील आणि दूध संघातील नेतृत्वात मतभेद नको म्हणूनच संचालकांनी खडसे परिवारातील नेतृत्व स्वीकारले. ही सुध्दा अपरिहार्यताच होती व आहे. 

मा. नाथाभाऊ आपण म्हणता ते शब्दशः खरे आहे. आपल्या परिवारातील कोणतेही नेतृत्व लादलेले नाही. ते लोकांनी स्वीकारलेले आहे. त्यांना निवडून दिले आहे. म्हणून आपण अजितदादांच्या टीकेकडे लक्ष देवू नका. किंबहुना अजितदादांनी सत्य जाणून न घेता विपर्यास केला आहे. 

मा. नाथाभाऊ आपण महाराष्ट्र सरकारमध्ये ज्येष्ठमंत्री म्हणून क्रमांक दोनवर आहात. कार्यकर्त्यांच्या मनात आपण क्रमांक एकवर आहात. फेसबुकवर आजही "एकनाथराव खडसे फॉर महाराष्ट्र सीएम" (https://m.facebook.com/KHADSEEKNATH)
 या नावाने पेज आहे. इतरांपेक्षा आपणाकडे मंत्रालये तब्बल १२ आहेत. जळगावसह बुलढाणा जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात. पक्षाचे जिल्हाध्यक्ष निवडायचे असतील तर इतर कोणालाही आपण आपल्या गाडीत कधीही बसवू शकतात. आपल्या नेतृत्वात अल्प संख्यांक आयोगाच्यापदी बसलेले नेते भले मोठमोठे पुरस्कार जिल्ह्यासाठी खेचून आणतात. असे सारे सहमतीने व लोकशाहीला धरून "अॉल ईज वेल" सुरू असताना अजितदादांनी आपल्या मातीत येवून घराणेशाहीचा आरोप करणे याचा निषेध सर्वच स्तरातून व्हायला हवा.

महाराष्ट्राला घराणेशाहीचा वारसा सन १९७० मध्ये विठ्ठलराव व बाळासाहेब विखे-पाटील कुटुंबाने दिला. सहकाराच्या वर्चस्वातून ही घराणेशाही सुरू झाली. हा वारसा नंतर शंकरराव व अशोक चव्हाण, शरदराव-अजितदादा पवार व सौ. सुप्रिया सुळे, वसंतराव व सुधाकरराव नाईक, वसंतदादा व प्रकाशबापू पाटील आदींनी अंगिकारला. त्यानंतर कदम, सातव, वासनिक, भोसले, मोहीते पाटील, राणे, भुजबळ आदी काँग्रेस विचारसरणीच्या घरांमध्ये वारसशाही आली. उत्तर महाराष्ट्रात येवल्याचे भुजबळ आणि नंदुरबारचे डॉ. विजयकुमार गावीत यांचे घराणे पदांसाठी व्हीआयपी म्हणून नावलौकिक मिळवून आहे. 

सन १९९२ मध्ये शिवसेनेत उध्दव व राजच्या प्रवेशाला जुजबी विरोध झाला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सामनात अग्रलेख लिहून वारसदारांच्या नेतृत्वाचे समर्थन केले होते. तो अग्रलेख भाजपच्या नेत्यांनी मिळवून त्याच्या झेरॉक्स वाटायला हव्या. असे केल्याने शिवसेनेतील छोट्या लोकांचे तोंड गप्प होईल.

आज राज्यातील सर्व पक्षांच्या राजकारणाचे निरीक्षण  केले तर ठळकपणे जाणवते की, बारामती तथा पुण्यात पवारांची दुसरी-तिसरी पिढी, सांगलीत वसंतदादा पाटील यांची तिसरी पिढी, साताऱ्यात भोसले घराण्याची तिसरी पिढी, सोलापुरात मोहितेंची तिसरी पिढी, सुशीलकुमार शिंदे यांची दुसरी पिढी, नगरमध्ये विखे पाटलांची तिसरी पिढी, थोरात, राजळे, ढाकणे, गडाख, घुलेंची दुसरी पिढी, कोल्हापुरात मंडलिक, महाडिक, माने यांची दुसरी पिढी, नाशिकमध्ये भुजबळांची दुसरी पिढी, भाऊसाहेब हिरेंची तिसरी पिढी, जळगावात ईश्वरलाल जैनांची दुसरी, विदर्भात नाईकांची दुसरी पिढी, मराठवाड्यात शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांची दुसरी पिढी, गोपीनाथ मुंडेंची दुसरी पिढी, कोकणात शेकापच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी, नारायण राणेंची दुसरी पिढी, अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दुसरी पिढी, मुंबई-ठाणे पट्टयात गणेश नाईक, प्रकाश परांजपे यांची दुसरी पिढी राजकारण व सहकारात नेतृत्व करीत आहेत. 

घराणेशाहीचा हा इतिहास लक्षात घेता ना. खडसे कुटुंबावर होणारा घराणेशाहीचा आरोप तकलादू आहे. कारण वरील सर्व घराणी वर्षानुवर्षे घरातच पदे ठेवत आहेत. या तुलनेत ना. खडसे कुटुंबाचे राजकारणात येणे हे अलिकडचे आहे. ते सुध्दा केवळ सहकारात आहे. जसे खासदारकी दीडएक वर्ष, जिल्हा बँक किमान वर्ष, दूध संघ केवळ काही महिने. ही पदेही ना. खडसे कुटुंबाला स्वीकारावी लागली आहेत. ती इतरांनी आग्रह करून दिली आहेत. याचे मूळ कारण, खडसेंच्या नेतृत्वात मनमानी व बंडखोरीची लागण होण्याची शक्यता नाही.

वरील सर्व विवेचन लक्षात घेता. मा. ना. नाथाभाऊ आपण विरोधकांच्या टीकेचा विचार न करता जिल्ह्यात "शत प्रति शत भाजप" आणि दोन्ही काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी जे जे करता येईल ते आवर्जून करावे. पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते निष्ठेने सोबत आहेत. शिल्लक राहिले ते पेपरवाले. त्यांच्या लेखनाचा आपल्याला काय फरक पडतो ? निवडणुकांच्या काळात हिच मंडळी पैकेजसाठी नेत्यांना शोधतात आणि रात्री वाट पाहात बसून असतात हा आपला अनुभव आहे. 

म्हणूनच हे खुले पत्र लिहीले. दिलखुलासपणे.

आपला
एक पत्रकार मित्र

8 comments:

  1. Excellent article
    Those who point fingers at Nathabhau must introspect and see the rapid rate at which he is taking major decisions at state level.

    ReplyDelete
  2. वास्तव मांडले आहे सर तुम्ही ....हाथी चले बाजार कुत्ते भुके हजार .....

    ReplyDelete
  3. वास्तव मांडले आहे सर तुम्ही ....हाथी चले बाजार कुत्ते भुके हजार .....

    ReplyDelete
  4. सटिक विश्लेषण . . ..

    ReplyDelete
  5. सटिक विश्लेषण . . ..

    ReplyDelete
  6. अत्यंत वास्तव विश्लेषण.. शेवटच्या एका ओळीने मात्र भंपक पत्रकारितेची चड्डीच ओढली राव...

    ReplyDelete
  7. खर-खुरे
    भलते,भलते एकदम बुरे !

    ReplyDelete