Sunday 7 February 2016

दोन ग्रहांची दोन टोके

(शनिशिंगणापूरचा स्त्री द्वेष्टा शनी आणि अमळनेरचा स्त्री उध्दारक मंगळ ***)
विश्वस्त मंडळाच्या परंपरा पालनाच्या वृत्तीला चिटकून राहण्याच्या वृत्तीमुळे शनिशिंगणापूर (जि. अहमदनगर) च्या शनिग्रहाची कूप्रसिध्दी होते आहे. शनिशिळेच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा अधिकार नाकारल्यामुळे शनिची अप्रतिष्ठा होते आहे. दुसरीकडे अमळनेर (जि. जळगाव) येथील मंगळग्रह मंदिरात स्रीयांच्या थेट सहभागातून विविध उपक्रम मंदिराचे विश्वस्त मंडळ राबविते आहे. या मंडळाने भव्य प्रसादालय उभारणीसाठी भूमिपूजन आणि गणेशाच्यापितळी प्रतिमेची स्थापना करण्याचा छोटेखानी उपक्रम नुकताच घेतला. कोपीष्ट ग्रहांच्या दोन देवस्थानांच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यपध्दतीत हा फरक आहे.


तसे पाहिलेतर स्त्री- पुरुषांच्या जन्म व लग्न कुंडलीत कारक ग्रह म्हणून शनि आणि मंगळाचे स्थान अथवा प्रभाव हा कोपीष्ट आहे. म्हणून शनि आणि मंगळ शांती केली जाते. स्त्रीच्या कुंडलीत मंगळ असला की, त्याची शांती करावी लागते. त्यासाठी विधी आणि मुहूर्त असतो. शनि शांतीसाठी पर्यायी तोडगे आहेत. शनिला तेल चढविण्हाया व्यतिरिक्त अभिषेक होत नाही. हा अनुभव लक्षात घेतला तर शनिपेक्षा मंगळ ग्रह स्त्रीयांना जास्त त्रासाचा ठरतो. हे कारण समोर ठेवून मंगळ ग्रह देवस्थानाने महिलांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले पाहिजे. मात्र, तेथे दर मंगळवारी आणि आता इतर दिवशीही स्त्रीया, मुलींची दर्शनाला गर्दी असते. थेट गाभाऱ्यात जावून भक्ति आणि मनोभावे दर्शन करता येते.

शनि आणि मंगळ ग्रहांची किंवा देवस्थानांची तुलना करण्याचे कोणतेही कारण नाही. पण, दोघांच्या परिणामांचे फल जाणून घेताना शनिशिंगणापुरात स्त्रीयांना चौथऱ्यावरून दर्नाशनाचा नाकारला जाणारा अधिकार आणि अमळनेरला मंगळाचे गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी स्रीयांची होणारी गर्दी हा भेद तुलना करायला भाग पाडतो.

एक गोष्ट नक्की, शनि आणि मंगळ हे दोघेही देव नाहीत. दोघेही ग्रह आहेत. दोघेही कोपीष्ट आणि खडतर, कष्टाचे फळ देणारे आहेत.  ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह आहेत. सूर्य, चंद्र, गुरू, शुक्र, मंगळ, बुध आणि शनि हे मुख्य ग्रह असून राहू-केतू उपग्रह आहेत. सूर्य-मंगळ हे क्रूर आणि शनि, राहु, केतू हे पाप ग्रह मानले जातात. सूर्य आपले डोळे, डोके आणि हृदयावर प्रभाव टाकतो. मंगळ पित्त, रक्त, कान, नाकावर परिणाम करतो. तर शनि हाडे, मेंदू, पायांवर अनिष्ट क्रिया करतो. राहू-केतू स्वतंत्र प्रभाव न टाकता ते ज्या राशीत ज्या ग्रहांबरोबर असतात त्याचा प्रभाव वाढविण्याचे काम करतात.

जन्मकुंडलीत १२ भाव असतात. सूर्य प्रथम भाव, दशम भाव चंद्र, चतुर्थ भाव शनि, षष्ठ आणि अष्टम भाव शुक्र, सप्तम भाव मंगळ असून तृतीय आणि षष्ठ भाव गुरू आहे. द्वितीय, पचंम, नवम, एकादश भाव बुध आहे. जर भावकारक ग्रह त्या भावात एकटा असेल तर त्या भावाचे नुकसानच करतो. त्याचे उदाहरण असे - चंद्र, शुक्र व बुध ज्या स्थानवर बसतात त्यांची वृध्दी करतात. गुरू ज्या घरात बसतो त्याचे नुकसान करतो. परंतु, ज्या घरात पाहतो त्याचा फायदा करतो. मंगळ जेथे बसतो तेथे व पाहतो त्या सर्वांचे नुकसान करतो. सूर्य आपल्या स्थानानुसार लाभ देतो. शनि ज्या घरात बसतो त्या घरात फायदेशीर ठरतो. परंतु, ज्याकडे पाहतो त्याचे नुकसान करतो. याचाच अर्थ शनिपेक्षा मंगळ जास्त कारक आहे. 

याबरोबर हेही लक्षात घेवू की, ग्रहांची दृष्टी नेमकी कशी असते.

प्रत्येक ग्रह ज्या स्थानावर असतो त्याच्या सातव्या स्थानी त्यांची पूर्ण दृष्टी असते. मंगळ जिथे राहतो तिथून चवथ्या, सातव्या व आठव्या स्थानावर त्याची दृष्टी असते. गुरुच्या स्थानापासून पाचव्या, सातव्या व नवव्या स्थानावर त्याची नजर असते. शनिच्या स्थानापासून तिसऱ्या, सातव्या व दहाव्या स्थानावर तो पूर्ण लक्ष ठेवतो.

आता थोडे शनिचा उपद्रव आणि मंगळ दोष समजून घेवू.

शनि एका घरातून दुसऱ्या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. हा प्रवास साडेसाती म्हणून गणला जातो. शनि अगोदरच्या राशीला येतो तेव्हा साडेसाती सुरु होते. आधीची रास (अडीच वर्षे) + स्वत:ची रास (अडीच वर्षे) + नंतरची रास (अडीच वर्षे) असा हा एकूण साडेसात वर्षांचा काळ साडेसाती  असतो. शनिचा कोप काहीतरी वाईट घडविण्यास भाग पाडतो, अशी समजूत आहे.
स्री-पुरुषाषांच्या लग्न कुंडलीत मंगळ 'दोष' त्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता मंगळ दोषाची भीती मनात घातली जाते. यातून मुलीचा  विवाह जमायला अडचण येते. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. तो ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्याला सुद्धा प्रभावित करतो. मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.

आता शनि कोप आणि मंगळ दोष कसा दूर होतो पाहू

शनि कोप दूर करण्यासाठी तेल, मोहरी, उडदाच्या डाळीचे दान करावे. पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा. मारुती व सूर्याची आराधना करावी, मांस-मद्य यांचा त्याग करावा, गरीबांना मदत करावी, काळ्या रंगांचे वस्त्र घालणे टाळावे. पण काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे.

मंगळ दोष दूर करण्याएसाठी रोज गणपतीला गणेश अथर्वशीर्षाचा अभिषेक करून २१ दुर्वा तसेच तांबडे फूल, तांबडे गंध व तांबड्या अक्षता वाहव्यात. नंतर गुळाचा नैवेद्य दाखवावा. हा एक अतिशय प्रभावी उपाय समजला जातो. याच्याच जोडीला मंगळाचा जप १० हजारवेळा करून नंतर शांति होम हव केल्यासही मंगळ दोष कमी होतो. मंगळ दोष कमी करायला गणेशाची उपासना करणे, हनुमानाची उपासना करणे, दुर्गा मातेची उपासना करणे, सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वताःवर संयम ठेवणे व त्यासाठी रोज सकाळी १० मिनिटे व रात्री झोपताना १० मिनिटेध्यानाची सवय लावून घेणे.

अमळनेर येथे दर मंगळवारी अभिषेक व मंगळ शांतीसाठी होम हवन होतात. येथे भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अमळनेर जळगावपासून सुमारे ६० किलोमीटरवर आहे. जळगावहून सकाळी नऊच्या सुमारास भुसावळ-सुरत पॅसेंजर व नवजीवन एक्सप्रेस आहेत. जळगाव बस स्थानकावरूनही अनेक बसआहेत. धुळे शहरापासून अमळनेर ३६ किलोमीटरवर असून तेथून बस व खाजगी वाहनांचे अनेक पर्याय आहेत. येथे मंगळवारी महाप्रसाद असतो. कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, पुरी व गुळाचा शिरा आसा प्रसाद आवघ्या १५ रुपयात दिला जातो.

मंगळ ग्रह मंदिर संपर्क
मोबाईल क्रमांक  - 09850344422 किंवा 09657723898

पत्ता - श्री मंगळ देव ग्रह मंदिर, चोपडा रोड, मु. पो. ता. अमळनेर, जि. जळगाव, पिन ४२५४०१ (महाराष्ट्र)

वेबसाईट - www.mangalgraha.in

व्हिडीओ पाहा -  https://m.youtube.com/channel/UCdKzXMOjfaFRS1G2C189voA

(*** वरील लिखाण अंधश्रध्दा पसरविण्यासाठी केलेले नाही. दोन ग्रह आणि देवस्थानांच्या भूमिका समोर ठेवून केले आहे. लेखक स्वतः ग्रहांच्या प्रभाव, कोप यापेक्षा कर्माला प्राधान्य देतो.)

No comments:

Post a Comment