भारतातला पहिला आणि गुजरात राज्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लागला आहे. भारत आणि जपानच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जाईल. यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रत्यक्ष काम पुढील वर्षी सुरु होवून सन २०२३ मध्ये बुलेट ट्रेन धावू लागेल. प्रकल्पाचा ८० टक्के खर्च जपान सरकारची कंपनी करणार असून कर्ज स्वरुपात केलेल्या खर्चावर केवळ एक टक्के व्याज द्यावे लागणार आहे. बुलेट ट्रेनमुळे गुजरातचे मुंबईशी जवळकी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
गुजराती माणसाला आजही मुंबईचे आकर्षण आहेच. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा परिणाम म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मात्र, आज ६५ वर्षांनंतरही गुजरातमधील लोकांचे मुंबईविषयीचे आकर्षण अजुनही संपलेले नाही. गुजरातपासून रेल्वे प्रवासात आठ ते दहा तासांच्या अंतरावर असलेल्या मुंबईला अवघ्या दोन तासात कवेत घेण्याचे गुजरातींचे स्वप्न बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भविष्यात साकारणार आहे. अर्थात, यामागे प्रयत्न आहेत ते गुजरातचे मूळ निवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुंबईचे मूळ निवासी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे. या दोघांनी देशाचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे.
भारतात बुलेट ट्रेन पळवायची मूळ कल्पना ही वादातीत ठरलेले माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांची होती. रेल्वेमंत्री असताना सन २००९-२०१९ दरम्यान त्यांनी ५ मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यात मूळ मार्ग पुणे-अहमदाबाद व्हाया मुंबई होता. त्याचे अंतर ६५० किमी आहे. मात्र, उपयुक्तता आणि व्यवसाय या दोन कसोटींवर पुणे वगळले गेले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सन २०१५ मध्ये या प्रकल्पाला पुन्हा समोर आणले.
भारतीयांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होण्याच्यादृष्टीने डिसेंबर २०१५ मध्ये महत्त्वपूर्ण घटना घडली. जपानचे पंतप्रधान शिंजो एब भारताच्या दौर्यावर असताना त्यांनी मोदींसोबत सहकार्याचे अनेक करार केले. त्यात अहमदाबाद-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी तांत्रिक व अर्थ सहाय्य करण्याचा ऐतिहासिक करारही केला. हैदराबाद हाऊसमध्ये या करारावर सह्या झाल्या. या करारानुसार येत्या ७ वर्षांत जपान सरकारची कंपनी भारतीय रेल्वेला बुलेट ट्रेन तयार करुन देईल.
अहमदाबाद-मुंबई अंतर ५३४ किलोमीटर आहे. आज त्यावर प्रती तास १५० किमी वेगाने काही सुपरफास्ट एक्सप्रेस धावतात. त्यांना हे अंतर पूर्ण करायला सात ते आठ तास आणि इतर एक्सप्रेसला आठ ते १० तास लागतात. भविष्यात अवतरणारी बुलेट ट्रेन ही ताशी ३०० पेक्षा जास्त वेगाने धावेल. तसा तीचा अपेक्षित वेग ताशी ३५० किमी असेल. त्यामुळे बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबादला अवघ्या दोन तासात जोडेल.
या प्रकल्पासाठी एकूण १४.६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास सव्वा लाख कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. त्यातील पाऊणटक्के पेक्षाही अधिक रक्कम जपान सरकारकडून मिळणार्या कर्जरुपी मदतीतून उभारली जाईल. बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५३४ किलोमीटर लांबीचा दुहेरी आणि स्वतंत्र लोहमार्ग उभारण्यात येईल.
हा लोहमार्ग पूल, खांब अशा स्वरुपात असेल. या व्यवस्थेमुळे प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटींनी वाढला आहे. त्यामुळे भूसंपादन किंवा फारशी जमीन खरेदी करावी लागणार नाही. शिवाय, सध्याच्या रेल्वे टॅ्रकजवळच बुलेट ट्रेन मार्ग उभारला जाणार आहे. बुलेट ट्रेन क्षेत्र पशू, पक्षी, मानव यांच्या वापरासाठी प्रतिबंधित असेल. या खर्चिक प्रकल्पासाठी जपानने दीर्घमुदतीच्या अर्थपुरवठ्यासाठी शंभर अब्ज येनचा म्हणजे ९५ हजार कोटी रुपयांचा आराखडा निश्चित केला आहे. उर्वरित रक्कर भारतीय रेल्वेची कंपनी कर्जरोखे काढून पैसा उभारेल.
जपान सरकारने याआधीही अनेक देशांना बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाची निर्यात केली आहे. सन २००७ मध्ये हे तंत्रज्ञान तैवानला देण्यात आले होते. इंडोनेशियामध्येही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होता. पण, चीनच्या नाराजीमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. भारतातील प्रकल्पाबाबत मात्र जपान सरकार बरेच आशावादी असून प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी त्यांनीही जोमाने सुरु केली आहे.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतीय रेल्वे मंत्रालय नव्या रेल्वे कंपनीची स्थापना करणार आहे. बुलेट ट्रेनच्या बांधणीपासून ती सुरु होण्यापर्यंतची क्रिया या कंपनीकडे असेल. यात रेल्वे मंत्रालय ५० टक्के आणि गुजरात, महाराष्ट्र सरकार प्रत्येकी २५ टक्के भागिदार असतील.
भारतातली पहिली वहिली अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन जगातली सर्वांत स्वस्त ट्रेन असण्याची शक्यता असेल. या बुलेट ट्रेनचे भाडे एका प्रवाशासाठी २,८०० रुपये असेल, असे प्रकल्प अहवालात गृहीत आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी बुलेट ट्रेनचे भाडे ८,००० रुपये आकारले जाते. त्या तुलनेत भारतीय बुलेट ट्रेन ५३४ किमी अंतरासाठी स्वस्त ठरु शकते. २०२३ मध्ये अंदाजे ४० हजार व्यक्ती रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील, असाही अंदाज आहे. बुलेट ट्रेनचे सर्व डबे वातानुकूलित असतील.
या प्रकल्पाचा आराखडा ‘रिटेस’, ‘इटाल्फर’ आणि ‘सिस्ट्रा’ या तीन कंपन्यांनी जुलै २०१५ मध्ये एकत्रितपणे तयार केला आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर ११ स्थानके असतील. यातील सात स्थानके महाराष्ट्रात असतील. ही बुलेट ट्रेन ठाणे येथे मुक्कामी असेल. मात्र, ती बांद्रा-कुर्ला टर्मिनस ते अहमदाबाद धावेल. विरार, डहाणू, पालघर, वापी, वलसाड, सुरत, भडोच, वडोदरा आणि अहमदाबाद ही संभाव्य मार्गावरील प्रमुख स्थानके असतील. सध्या बुलेट ट्रेन आराखड्यास अंतिम आकार देण्याचे काम सुरू आहे.
फडणवीसही बुलेट ट्रेनच्या प्रेमात
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन ही २०० किमी अंतर वाढवून नाशिकमार्गे न्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, भौगोलिक अडचणींमुळे वाढता खर्च लक्षात घेवून जपानी कंपनीने ती सूचना नाकारली. तरीही फडणवीस यांनी अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये नवी मुंबईला जोडावे म्हणून बेलापूर स्थानकाच्या समावेशाचा आग्रह धरला आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी मुंबई-नाशिक हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव तयार केला आहे. या संदर्भात फडणवीस यांनी मोदी व प्रभुंना पत्रे लिहीली आहेत. रेल्वेच्या आणि देशाच्या आगामी अर्थसंकल्पात यासाठी शिर्ष निर्माण करण्याची विनंती पत्रातून केली आहे. अर्थ सहाय्यासाठी जपानी कंपनी ‘जायका’ कडे प्रयत्न करणार आहे. मुंबई-नाशिक हा सुमारे १८० किमीचा हायस्पीड ट्रेन मार्ग बांधतांना सह्याद्री डोंगररांगेला भेदण्याचे मोठे आव्हान आहे.
No comments:
Post a Comment