भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ अॉक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला म्हणजे २ अॉक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा हेतू पंतप्रधान मोदींनी डोळ्यांसमोर ठेवला आहे. या आभियानाची अंमलबजावणी लोकसहभागातून व्यक्तिगत आणि सामुदायिक स्वरुपात व्हावी अशी अपेक्षा आहे. त्याच्या पूर्तीसाठी सरकारी पातळीवर संकल्पित लोकसहभागाचे मॉडेल पूर्णतः फसलेले आहे. हा गेल्या दीडवर्षातला अनुभव आहे.
सरकारी मॉडेल काय आहे ?
स्वच्छता अभियानास प्रारंभ करताना पंतप्रधान मोदींनी ३ पध्दतींचा वापर केला. पहिली म्हणजे, समाजासमोर असलेल्या ९ सेलेब्रिटींना स्वतः आवाहन करून सार्वजनिक स्वच्छतेसाठी समोर येण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींच्या जाहीर आवाहनावर ही सेलेब्रिटी मंडळी केवळ एक दिवस आणि ते सुध्दा काही मिनिटे सार्वजनिक स्वच्छता करू शकली. त्यानंतर ती गायब झाली. परिणाम काय झाला तर, टीव्ही आणि छापिल माध्यमांसाठी केवळ एक दिवस बातम्यांचा विषय मिळाला. नंतर पुन्हा अस्वच्छता जैसेथे झाली.
पंतप्रधान मोदींनी दुसरी पध्दत वापरली की, प्रत्येक नागरिकाने वर्षभरात केवळ १०० तास स्वच्छतेचे काम करावे. याचा परिणाम असा झाला की, कॉलनी, वसाहत, रहिवास भागात नागरिकांना स्वच्छता मोहीम प्रारंभाचे भरते येवून लोकांनी २/३ तास परिसर स्वच्छता केली. मात्र, नंतर स्वच्छतेचा बहर ओसरून उरलेल्या ९७/९८ तासांची स्वच्छता नंतर करू असा आळसपूर्ण माहौल तयार झाला. आज करे सो कल, कल करे सो परसो और इतनीभी क्या जल्दी है जब जिना है बरसो, या मानवी प्रवृत्तीनुसार स्वच्छतेचे इतर तास परत सुरू झालेच नाही.
पंतप्रधान मोदींनी तिसरी पध्दत वापरली. ती म्हणजे स्वतः झाडू घेवून सफाईसाठी रस्त्यावर उतरले. हे प्रसंग बातम्यांसाठी व फोटोंसाठी चांगले होते. मात्र, अवघ्या १५/२० मिनिटांच्या स्वच्छेतेनंतर स्वतः मोदी दीडवर्षात कुठेही स्वच्छता करताना दिसले नाही. जसे मोदी स्वतःचे १०० तास विसरले तसे प्रत्येक सामान्य माणूसही आपले १०० तास विसरला.
अखेर हाती काय आले ?
पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान हाही प्रारंभ शूर इव्हेंट ठरला आहे. विशिष्ट दिवस, काळ एवढ्यापुरते लोकांना स्वच्छतेचे भरते आल्याचे दिसले. मात्र, यातून नियमित स्वच्छता आणि स्वच्छतेची सवय लागावी हा हेतू साध्य झाला नाही.
पंतप्रधान मोदींच्या या स्वच्छ भारत अभियानास त्यांचा स्वतःचा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षानेही सक्रिय पाठिंबा दिला नाही किंवा गावोगावी स्वच्छतेचा पाठपूरावा केला नाही. हेही अपयशाचे कारण लक्षात घ्यावे.
काही प्रमाणात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय रेल्वे सेवा व यंत्रणेत आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी विद्यापिठे तसेच महाविद्यालयांमधून या अभियानाच्या यशस्वितेसाठी थोडे बहुत प्रयत्न केले. काही प्रमाणात वाराणसी येथे स्वयःसेवी संस्थांच्या लोकसहभागातून १०० वर गंगा घाटांची स्वच्छता झाली असून तेथे हे काम नियमित सुरू आहे.
लोकसहभागाचे यशस्वी मॉडेल
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत काही ठिकाणी लोकसहभागाचे दोन-तीन मॉडेल यशस्वी ठरले आहेत. अर्थात, या मॉडेलची रचना ही फक्त आणि फक्त सामुदायिक स्वच्छता आभियानाची आहे हे सर्व प्रथम लक्षात घ्यावे. आता काही उदाहरणे पाहू.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत काही ठिकाणी लोकसहभागाचे दोन-तीन मॉडेल यशस्वी ठरले आहेत. अर्थात, या मॉडेलची रचना ही फक्त आणि फक्त सामुदायिक स्वच्छता आभियानाची आहे हे सर्व प्रथम लक्षात घ्यावे. आता काही उदाहरणे पाहू.
फासे पारधींचे उदाहरण
कोल्हापूर शहरापासून अवघ्या चार-पाच किलोमीटरवर फासे पारधींची उचगाव पूर्व शांतीनगर वसाहत आहे. तेथे २०० कुटुंबे आहेत. तेथील फासेपारधी समाजाने स्वच्छता अभियानची स्वत:पासून सुरुवात केली. वसाहतीमधील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक कुटुंंबातील एक व्यक्ती याप्रमाणे ३२ जणांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. सहा ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुप महिन्यातील ५, १०, १५, २०, २५, ३० या तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत एक दिवस स्वच्छता करतो. ग्रुपमध्ये नोकरदार, शेतमजूर, महिला, युवकांचा सहभाग आहे. पाच वर्षांपासून अशाप्रकारे स्वच्छतेचा कार्यक्रम न चुकता राबविला जात आहे. परिणामी प्रत्येक कुटुंबालाच आता स्वच्छतेची सवय जडली आहे. प्रत्येक ग्रुपला आपणाला कधी स्वच्छता करायची आहे, ते कळावे यासाठी वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे स्वत:हूनच संबंधित ग्रुप स्वच्छता करतो. स्वच्छतेबरोबरच झाडांना पाणी घालणे, एखाद्या घराच्या परिसरात अस्वच्छता असली तरी ती स्वच्छ केली जाते. (*१)
प्रभागाच्या स्वच्छतेचे उदाहरण
अहमदनगर येथे नगरसेवकाने स्वच्छता आभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणे बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. (*२)
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराचे उदाहरण
रत्नागिरी जिल्ह्यात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी राबविली. जाधव यांनी प्रशासकीय कामांबरोबरच रत्नागिरी शहर व जिल्ह्यात प्लास्टिक निर्मूलनासह सार्वजनिक स्वच्छतेचा सातत्याने आग्रह धरला. त्या दृष्टीने त्यांनी रत्नागिरी शहरातील कचरा मोठ्या स्वरूपात गोळा होणारी ठिकाणे तसेच पाणीसाठ्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत नगर परिषदेला वेळीच स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः जिल्हाधिकारी म्हणून जाधव यांनी लक्ष घातल्यामुळे काही अंशी स्वच्छता आभियान यशस्वी होवू शकले. (*३)
नगरसेवकाचा सततचा उपक्रम
जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख तथा एल. के. फाऊंडेशनचे प्रमुख ललित कोल्हे यांनी दीड वर्षांपासून स्व खर्चाने स्वच्छतादूतांची फळी उभी केली आहे. जवळपास १५ महिला व २० पुरुष अशा ३५ मजुरांचा खर्च ललित कोल्हे स्वतः करीत आहे. या मजुरांच्या वेतनावर महिन्याला १ लाख ३२ हजार, ट्रॅक्टर भाडे ४५ हजार, इंधन खर्च १८ हजार असा सुमारे २ लाख १५ हजार मासिक खर्च केला जात आहे. (*४)
पेन्ट युवर सिटी उपक्रम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात पेन्ट युवर सिटी हा स्वच्छ भारत आभियानअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला जात आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३ ए २ या संस्थेच्या सहयोगाने स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणारे वॉल पेंटींग वाशी परिसरात पे ॲण्ड पार्किंगच्या भिंतीवर केले जात आहे. या वॉल पेंटींगमध्ये महात्मा गांधीजींचे रेखाचित्र व स्वच्छता करताना मुलांसह मोठी माणसे चित्रित करण्यात आली आहेत. अशा चौकात पुन्हा घाणीचा प्रादुर्भाव होणे काही प्रमाणात कमी झाले आहे. (*५)
लोकसहभाग वाढीसाठी निष्कर्ष
पंतप्रधान मोदींनी स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढीसाठी सुरू केलेले अभियान निश्चित कौतुकास्पद आहे. मात्र, या अभियानाची कार्यसिध्दता ही प्रामुख्याने सामुदायिक स्वच्छतेवरच असणे आवश्यक आहे.
उपरोक्त उदाहरणे लक्षात घेतली तर समुह म्हणून केलेल्या कामात सातत्य आणि हेतू सिध्दता दिसते. व्यक्तिगत, सेलेब्रिटी आदींच्या भरवशावर अभियान यशस्वी होताना दिसत नाही. अपवादात्मक स्थितीत खासगी संस्थाही शहर स्वच्छता करताना दिसतात. स्वच्छता आभियान लोकसहभागातून यशस्वी करायचे असेल तर सामान्य लोकांच्या वसती, कॉलनी, रहीवास परिसरात द्वारसभा घेवून समुह, सामायिक शक्तीला जागृत करणे आवश्यक आहे.
संदर्भ
(*१) लोकमत कोल्हापूर / हैलो कोल्हापूर / पान २ / दि १६ डिसेंबर २०१४
(*२) सकाळ नगर / महानगर / पान १ / दि. १४ जानेवारी २०१५
(*३) महाराष्ट्र टाईम्स / रत्नागिरी / पान ६ / दि. १८ फेब्रुवारी २०१६
(*४) जळगाव लाईव्ह / अॉनलाईन / पहिले पान दि. २२ फेब्रुवारी २०१६
(*५) एनएमएमकोलाईन.कॉम / न्यूज / स्वच्छ भारत आभियान संदेश देणारी वॉल
(*१) लोकमत कोल्हापूर / हैलो कोल्हापूर / पान २ / दि १६ डिसेंबर २०१४
(*२) सकाळ नगर / महानगर / पान १ / दि. १४ जानेवारी २०१५
(*३) महाराष्ट्र टाईम्स / रत्नागिरी / पान ६ / दि. १८ फेब्रुवारी २०१६
(*४) जळगाव लाईव्ह / अॉनलाईन / पहिले पान दि. २२ फेब्रुवारी २०१६
(*५) एनएमएमकोलाईन.कॉम / न्यूज / स्वच्छ भारत आभियान संदेश देणारी वॉल
No comments:
Post a Comment