Thursday 25 February 2016

परमेश्वराने हिरावला केंद्रबिंदू

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा खान्देशचे मोठेभाऊ आदरणिय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना आज २५ फेब्रुवारी २०१६ रोजी परमेश्वराने आपल्यातून हिरावून घेतले. यशस्वी उद्योजक अशी ओळख असलेल्या मोठ्याभाऊंची अलिकडची ओळख तत्वचिंतक म्हणून होती. मोठेभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनोखे पदर अनेक अंगाने लिहीता येतील. एखादा हिरा जसा सहा बाजुंनी अंगावर चकचकीत पैलू घेवून इतरांना प्रकाशमान करीत असतो तसे मोठेभाऊ होते. पत्रकार असल्यामुळे २७ वर्षांत अनेकवेळा मुलाखत, भेट, भाषणे अशा माध्यमातून मोठेभाऊंना अनुभवण्याची आणि मायेच्या सावलीत जाण्याची संधी मिळाली. स्वसुखाचा केंद्रबिंदू दुसऱ्याला देवू नको, असा सल्ला देणाऱ्या मोठेभाऊंना आज परमेश्वरानेच आपल्यातून हिरावले आहे.

आ. मोठेभाऊंचा तीन वर्षांपूर्वी ७५ वा वाढदिवस होता. मी, हेमंत अलोने आणि मनिष पात्रिकर असे तिघे मिळून देशदूत विशेष पुरवणीचे नियोजन करीत होतो. बहुधा इतर कोणत्याही माध्यमाने असा प्रयत्न त्यावेळी केलेला नव्हता. या विशेष पुरवणीच्या निमित्त मी आ. मोठेभाऊंची मुलाखत घेतली. ती तब्बल दोन तास सुरु होती. मोठेभाऊंच्या वाटचालीतील अनेक संदर्भ तोंडपाठ असल्यामुळे मी प्रश्नांची मालिका गुंफली होती. मोठेभाऊ सविस्तर उत्तरे देत होते. त्यामुळे मुलाखत रेकॉर्ड केली होती.

गावातल्या निवासस्थानी खूर्चीवर पाय लांबवून बसलेले मोठेभाऊ अखंडपणे बोलत होते. मी जीवनाचा तत्वसार ऐकत होतो. एकएक प्रश्नाच्या उत्तरात शहाणपणाच्या आणि व्यवहाराच्या १०० गोष्टी मोठेभाऊ सांगत होते. रेकॉर्ड केलेली मुलाखत किमान २०० वेळा मागेपुढे करून मी ऐकली आणि शब्दंशब्द ती प्रसिध्द केली. देशदूतच्या १६ पानी टैब्युलाईड अंकात ५ पानांवर ही मुलाखत विस्तारली. बहुतेक मराठी पत्रकारांमध्ये मी घेतलेली ही मोठ्याभाऊंची मैरेथॉन मुलाखत असावी.

मोठेभाऊंच्या सहवासातील अनेक प्रसंग आहेत. त्या प्रत्येक प्रसंगाने माझ्याकडून धडा गिरवून घेतला आणि प्रसंगी मला  धडा शिकवला सुध्दा. मला हे सर्व प्रसंग काल परवा घडल्यासारखे भासतात. प्रत्येक प्रसंगाचा अन्वयार्थ आजही आगळावेगळा भासतो.

पत्रकारितेचा शिकाऊ आणि हूडपणाचा काळ होता. मी सकाळ जळगावसाठी बातमीदार होतो. सकाळने अॉल एडिशन उद्योग पान सुरु केले होते. त्यावर मोठेभाऊंविषयी लेख हवा होता. तो काळ जैन इरिगेशनच्या विस्ताराचा होता. मुलाखतीची वेळ रोज मागून मिळत नव्हती. एके दिवशी वेळ घेवून गेलो तर मोठेभाऊ ऐनवेळी आलेल्या कामाला निघाले होते. ते गाडीत बसणार होते. माझा हिरमोड झाला. मी मोठेभाऊंना म्हटले, भाऊ मी आठवडाभरापासून प्रतिक्षा करतोय मला तुमची मुलाखत हवी. त्यावर मोठेभाऊ थांबले. शेजारी बहुधा उदय महाजन होते, त्यांना भाऊंनी विचारले हा म्हणतो ते खरे आहे का ? महाजनला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. आज मला लिहीताना थरथरायला होते कारण, मोठेभाऊ मला सॉरी म्हणाले आणि त्यांनी गाडीतून उतरून निवासात जावून मला १० मिनिटे मुलाखत दिली. तेव्हा मी पहिला लेख लिहीला होता शिखर झालेला माणूस ! मोठ्याभाऊंचे ते सॉरी म्हणणे आजही काल परवा घडल्यासारखे वाटते.

त्यानंतर भाऊंची पहिली बायपास झाली. हिल्सवर भेटणाऱ्यांची रिघ होती. आम्ही सकाळचे ५/६ जण गेलो. मोठेभाऊ मोकळेपणाने बोलत होते. मी विचारलेच, भाऊ अडचणीतही तुम्ही आनंदी कसे ? मोठेभाऊ म्हणाले, फार सोपे आहे. माणसाने आपल्या आनंदाचा केंद्रबिंदू आपल्याच हातात ठेवावा. दुसऱ्याला देवू नये. मग, कोणी कितीही डिवचले तरी आपण आपला सुखाचा केंद्रबिंदू सोडू नये. मोठेभाऊंचे हे समजून सांगणे आजही पावलो पावली आठवते. कारण दुसऱ्यांचे सुख हिरावण्याचे कार्य करणारे अवतीभवती खूप असतात.

मोठेभाऊंच्या ७५ व्या वाढदिवसाची पुरवणी उत्तम झाली. त्याच्या प्रकाशनासाठी जैनहिल्सवर गेलो. मोठेभाऊ खुश होते. आम्हाला ३/४ जणांना घेवून बसले. विशेष पुरवणीच्या मुखपृष्ठावर डेरेदार वटवृक्ष होता. त्याच्या चर्चेतून विषय स्व. कांताबाईंच्या वटवृक्ष प्रेमाचा निघाला. जैनहिल्सवर स्व. कांताबाईंनी २ वटवृक्ष जपले, वाढविले आहेत. मोठेभाऊ भावूक झाले. सोलर एनर्जी प्रकल्प विस्तारासाठी तेव्हा जैनहिल्स परिसराला लागून शेत खरेदी केले होते. या शेताला लागून दुसऱ्या शेतात ऋषीमुनींसारख्या जटारुपी पारंब्या असलेला डेरेदार वटवृक्ष होता. तो वटवृक्ष मोठेभाऊंना भावला. त्यांनी त्या वृक्षापर्यंत जागा घेण्यास भाग पाडले. ते स्वतः तेथे फिरायला जात. तो वटवृक्ष पाहण्याची ईच्छा हेमंत अलोने यांनी व्यक्त केली. ती विनंती स्वीकारत मोठ्याभाऊंनी त्यांच्या वाढदिवसाचे जेवण त्या वटवृक्षाजवळ देण्याची आमची व्यवस्था केली. ३ वाहने व पाच, सहा जण दिमतीला होते. जगप्रसिध्द उद्योजकाने दिलेली ही मेजवानी आम्ही पुढील सातजन्मे विसरू शकत नाही.
(सविस्तर वाचा -
 https://m.facebook.com/tdilip/albums/4708083794318)

हृदयाशी संबंधित ५ वेगवेगळ्या अनुभवांना मोठेभाऊ सामोरे गेले. त्यामुळे निरोगी आणि सरळसोट आकारातील शरिरयष्टी हा त्यांचा लहान-मोठ्यांना निग्रही सल्ला देण्याचा विषय असे. एकदा वाढदिवसाला भेटीसाठी गेलो. तेव्हा पोटाचा आकार वाढलेल्या मान्यवरांसह आम्हाला मोठेभाऊ म्हणाले, आहारात पांढरी वस्तू खाणे बंद करा. पुढे म्हणाले, पांढऱ्या वस्तू म्हणजे साखर, मीठ, मैदा. अर्थात, मोठ्याभाऊंचा सल्ला सर्वांनी हसतखेळत ऐकून घेतला.

मी सुस्पष्टपणे मांडलेला विचार मोठेभाऊंनी स्वीकारल्याची अशीच एक आनंददायी आठवण आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई यांचा पहिला नागरी सत्कार जळगावला होणार होता. त्यामुळे कार्यक्रम आणि संभाव्य भाषणाविषयी पत्रकारांना बोलवून मोठेभाऊ विचारणा करीत होते. एकेदिवशी माझाही नंबर आला. स्वागताध्यक्ष म्हणून मोठ्याभाऊंनी तयार केलेल्या संभाव्य भाषणाला  हो हो करीत पसंती अगोदर आलेल्या मंडळींनी दिली होती. त्या भाषणाचा आशय खान्देशची महती सांगत प्रतिभाईंच्या स्तुतीकडे जाणारा होता. भाषण वाचून संपले. भाऊ म्हणाले, कसे झाले ? मी लगेच म्हणालो, भाऊ हे सामान्य भाषण आहे. राष्ट्रपतींचा सत्कार जळगावात होणे ही ऐतिहासिक घटना आहे. तुमचे भाषण आपल्या मातीची कहाणी नव्हे तर गाऱ्हाणी मांडणारे हवे. बस्स मी बोललो आणि भाऊ म्हणाले, अरे तू म्हणतो ते खरे आहे. मलाही हे जमत नाही आहे. मी आता हे बदलून टाकतो. त्यानंतर मोठाभाऊंनी ताईंच्या सत्कार कार्यक्रमात केलेले भाषण विविध संदर्भांचा दस्तावेज ठरले.

मोठेभाऊंची अगदी अलिकडची आठवण. तरुण भारतचा दिवाळी अंक २०१५ हा पाणी, महिला आणि शिक्षण विषयावर होता. तो अंक मोठेभाऊंच्या अवलोकनार्थ पाठविला. मोठेभाऊंना आशय आवडला. पाणी, शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी अंक आणि आशयाचे कौतुक करणारे पत्रच पाठविले. त्यात भाऊ म्हणाले, यस ईट ईज डिफ्रन्ट दॕन अदर्स. मोठेभाऊंच्या शाब्बासकीचीही पाठीवरची ताजी थाप.

मघाशी मी मोठेभाऊंच्या दीर्घ मुलाखती विषयी सांगितले. त्या मुलाखती दरम्यान मी भाऊंना प्रश्न केला, भाऊ ७५ वर्षांच्या वाटचालीचा आपला तत्वसार कोणता आहे ? मोठेभाऊ थांबून म्हणाले, मी आत्मकेंद्री होवून स्वतःचा विचार केला असता तर आज आहे त्यापेक्षा जास्त पैसा माझ्याकडे राहिला असता. दुसऱ्याचा विचार करून करायची वाटचाल खडतर असते पण ती वाटचाल उज्ज्वल असते. याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर देताना मोठेभाऊंनी जीवनाचे दोन तत्व सांगितले. पहिले म्हणजे, कोणतेही काम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. त्या कामाच्या गुणवत्तेत सर्वोत्तम ५ जणांमध्ये क्रमांक पटकवा. दुसरे तत्व सांगितले, आपल्या काम, कार्याला तत्वाची झालर लावा. म्हणजे सारे काम सुंदर होईल.

मोठेभाऊंच्या भाषणाचे अनेक संदर्भही आठवतात. ते खूप परखड आणि भविष्याचा वेध घेताना पर्याय सूचविणारे बोलत. सुरेशदादा जैन आणि ईश्वरलाल जैन यांना आपापसातील मतभेद दूर करण्याचा जाहीर सल्ला मोठाभाऊंनी दिला होता. तो दोघांनी पाळला. कार्यक्रमस्थळ होते महामार्गावरील दादावाडीत प्राणप्रतिष्ठा महोत्सव.

मोठेभाऊ धार्मिक व्यासपीठावरही मोकळेपणाने बोलत. समाजातील काही प्रथापरंपरांवर स्पष्ट मत मांडत. मुलांना धर्म कर्म याची शिकवण देतांना परंपरेच्या व्यापारात न अडकवता नव्या उद्योगात टाका असे ते सांगत. मारवाडी माणूस दोनचे चार करतो मात्र सांगताना लपवतो असा उल्लेख करून भाऊ म्हणत मी २ चे १० करतो आणि त्याच्यातले पुन्हा ९ चे २० करतो. असे तुम्हीही करा आणि मुलाबाळांना शिकवा. महामुनी तरुण सागरजींच्या उपस्थितीत जैन स्थानकात झालेले मोठेभाऊंचे भाषण समाजासाठी डोळे उघडणारे होते. मोठेभाऊंच्या सल्ल्यानुसारच अशोक जैन यांनी जैन समाजातील लग्न खर्चाला कात्री लावणारे निर्णय अलिकडे जाहीर केले.

आ. मोठेभाऊंच्या आठवणींची ही मालिका सरता सरणार नाही. २७ वर्षांतले १०० प्रसंग मेंदूतून बाहेर निघायला उताविळ आहे. पण लेखन आणि जागेला मर्यादा आहे. मोठ्याभाऊंचे जाणे हे देहरुपाच्या अस्ताच आघात आहे. पण, आपलेपणाच्या अनंत आठवणींमुळे आणि उत्स्फूर्तपणे पाठोपाठ येणाऱ्या शब्दांच्या गुंताळ्यात मोठेभाऊ आपल्यासोबत पुढील हजारवर्षे तरी जगतील. नाही तरी माणस आपल्यात बोलून चालूनच आजरामर होतात ना ! आ. स्व. मोठेभाऊंच्या स्मृतीस वंदन. भाऊंचा आत्मा परमेश्वराने परत पाठवावा ही भाबडी अपेक्षा.

कौटुंबिक भाऊ 

मोठेभाऊंच्याकडे शहरातील निवासस्थानी जाणे व्हायचे. तेव्हा सायंकाळी सौ. ज्योतीभाभी असत. एके सायंकाळी आम्ही पोहचलो तेव्हा मोठेभाऊंच्या भोवती कुटुंबातील अनेक जण उभे होते. दुरून चर्चेचा स्वर कानावर येत होता. मोठेभाऊंना आलूभरलेला समोसा खाण्याची ईच्छा होती. पण, समोसा तळलेला नको होता. त्यामुळे विना तळलेला समोसा कसा बनवता येईल ? यावर मंथन सुरू होते. भाजलेला समोसा किंवा वाफवलेला समोसा असे पर्याय चर्चेत होते. मोठेभाऊ प्रत्येकाचे ईनआऊट सांगून अजून दुसरा पर्याय सांगा म्हणत होते.

दुसऱ्या एका प्रसंगी चर्चा उद्योजक कुटुंबाच्या विभाजनाची होती. त्यावर भाऊ कठोरपणे म्हणाले, मी सुनबाई घरात आणताना एकत्र कुटुंबात राहण्याची अट टाकूनच आणतो. काही गोष्टी या ठरवून केल्या पाहिजे. तरच घर टिकते आणि प्रगतीही होते. मोठ्याभाऊंनी सर्व सुनांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्यावर सामाजिक कार्याची जबाबदारीही टाकली. अगदी आलिकडे सौ. भानवाभाभींच्या नेत्र इस्पितळाची उभारणी भाऊंनी जिद्दीने करून घेतली. निमखेडी रस्त्याच्यावरील जैन फैक्टरीच्या मूळ जागेवर  झालेल्या  कार्यक्रमात मोठेभाऊ बोलताना भारावले होते. त्यांचा आवाज तेथे कातर झाला होता.

No comments:

Post a Comment