Friday, 29 January 2016

काँग्रेसमध्ये इनकमिंग

महानगर जिल्हा काँग्रेस समितीसाठी समाधानाची बातमी आली आहे. समाजातील विविध घटकांतील काही मंडळींनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. पक्षनेते आमदार भाई जगताप जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या दौर्‍यावर येवून गेले. त्यांच्या उपस्थितीत जळगाव महा
नगरातील अखिल भारतीय गौर बंजारा संघटनेचे कार्याध्यक्ष तुळशीराम जाधव, मुरलीधर चव्हाण, बाबुलाल चव्हाण, सुदाम राठोड, सुप्रीम कामगार युनियनचे लीडर आर. एस. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अभिषेक जगताप,   सुरेश पाटील, माजी सैनिक राजेंद्र महाजन, पंकज सूर्यवंशी, गोविंदा भोई, अशोक निंबा पाटील, गुलाब शेख, सुरेश सूर्यवंशी, सॉफ्टवेअर इंजिनिअर महेंद्र पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप नेतृत्वातील सरकारे आहेत. जळगाव जिल्ह्यातही भाजपचे वर्चस्व आहे. अशा वातावरणात काही मंडळी ‘गलितगात्र काँग्रेस’ पक्षात प्रवेश करतात, त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणूक आणि अलिकडे सहकार क्षेत्रात झालेल्या सर्वपक्षीय निवडणूक अशा तीन रणधुमाळीत काँग्रेस पक्षातील बरीच ज्येष्ठ मंडळी भाजपवासी झाली. अनेकांनी सहकारातील सत्तेसाठी तडजोडी स्वीकारल्या. त्यामुळे काँग्रेस भवनात येणार्‍यांची संख्या रोडावली. अखेर जिल्हा आणि महानगर कार्यकारिणीत किमान १२५ वर अशी २५० जणांची नियुक्ती केली गेली. तेव्हा कुठे जयंती-पुण्यतिथीला फोटोपुरतेका होईना पदाधिकारी दिसू लागले.

सध्या कोणत्याही निवडणुकीचा हंगाम नाही. पक्ष कोणत्याही सत्तास्थानी नाही. पक्षाकडून काही मिळेल याची खात्री नाही. असे असतानाही समाजातील काही घटक आज काँग्रेसचे सदस्यत्व घेत आहेत, ही बाब लक्षवेधी आहे. अर्थात, काँग्रेस पक्षाला जळगाव शहरात कार्यरत ठेवण्याचे काम महानगर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी करीत आहेत. शहराच्या विकास आणि राजकारणाशी संबंधित फलक लावणे, आंदोलन करणे यात काही प्रमाणात डॉ. चौधरी यांचा सहभाग असतो. मुख्यमंत्री जळगावात आले तर प्रश्‍न विचार, गाडी अडवा, हॉकर्सच्या आंदोलनास पाठींबा देे असे काही ना काही त्यांचे सुरू असते. डॉ. चौधरी तसे सोशल मीडियातही सक्रिय आहेत.
काँग्रेसमध्ये प्रवेश करणारी मंडळी भलेही पॉप्युलर नसतील, फारशी माहितगार किंवा चर्चेतील नसतील. पण एक बाब लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे, जी मंडळी काँग्रेसमध्ये आली ती सर्व समाजातील वेगवेगळ्या घटकातील आहे. खरे तर यापूर्वी काँग्रेसची बलस्थाने याच समाज घटकात होती. हाच काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता. तो जर पुन्हा काँग्रेसकडे वळत असेल तर ‘अच्छे दिन’ आणण्याच्या भ्रमात असलेल्या सत्ताधारी पक्षाला विचार करण्यासारखी स्थिती आहे.

 भाजप हा सदस्य नोंदणी, क्रियाशील सभासद वगैरे आकडेवारीत इतरांपेक्षा पुढे दिसतही असला तरी, ती मंडळी कायमची भाजप सोबतच असेल? याची खात्री नाही. हिंदीत एक चांगले वाक्य आहे, ‘वक्त बदलते देर नही लगती’. नाही म्हटले तरी काँग्रेसमधील ‘इनकमिंग’ ची दखल भाजप, शिवसेना सारख्या सत्ताधारी पक्षांनी घ्यायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारशी पडझड झालेली नाही. पण पक्षात जे आहेत, तेच पक्षाच्या लोकांना निवडून येवू देत नाहीत, हेही सत्य आहे. अशावेळी समाजातील नवे घटक पक्षाशी जोडण्याचे काँग्रेसचे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकते. सर्वांसाठी.

2 comments:

  1. आपल्यासारख्या परखड,प्रगल्भ,प्रामानिक ,वरिष्ठ संपादकांची शाबासकी अत्यंत मोलाची,हुरुप वाढवणारी.आपल्या जनहितासाठी भविष्यात चालणार्या छडीचादेखील नम्रतापूर्क स्वीकार करु.धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. आपल्यासारख्या परखड,प्रगल्भ,प्रामानिक ,वरिष्ठ संपादकांची शाबासकी अत्यंत मोलाची,हुरुप वाढवणारी.आपल्या जनहितासाठी भविष्यात चालणार्या छडीचादेखील नम्रतापूर्क स्वीकार करु.धन्यवाद सर.

    ReplyDelete