Sunday 31 January 2016

देवी मंदिरात महिलाच पुरोहित हव्यात...!!!


शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर आणि हाजी अली दर्गाहात महिलांना प्रवेशाचा विषय गरमागरमीत असताना एक कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, विविध देवींच्या मंदिरात पहाटेच्या काकडाप्रसंगी किंवा अभिषेकानंतर देवींचे महावस्त्र बदलण्याचा अधिकार पुरुष पुरोहितांना कसा प्राप्त झाला आहे? आता याचे उत्तर तथाकथित कर्ममार्तंड काय देतील ? पाहू या !


पंढरपुरात रुक्मिणीच्या पूजा अर्चेसाठी महिला पुरोहितांची नेमणूक केली गेली आहे. मात्र, देशातील आणि  महाराष्ट्रातील देवींच्या शक्तिपीठात आजही पुरुष मंडळीच पूजापाठ करतात. कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुकादेवी या तीन पूर्ण शक्तिपीठ आणि सप्तशृंगगड निवासिनी देवी या अर्धपीठात आजही देवीचे षोडशोपचार पुरुषच करतात. येथे प्रश्न निर्माण होतो की, महिला देवादिकांचे कपडे बदलण्याचा धार्मिक आणि नैतिक अधिकार पुरुष पुरोहितांना दिला असल्याचा उल्लेख कुठल्या कर्मग्रंथात आहे ?

रेणुका, महालक्षमी आणि सप्तशृंगनिवासिनी देवी या अचल म्हणजे एका स्थानी स्थिर आहेत. मात्र, तुळजापूरची भवानी चल असून वर्षातून तीनवेळा देवी मूर्ती भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवली जाते. त्याला देवीचा निद्राकाल म्हणतात. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपरेने जोपासला जातो. या विधीसाठी देवी मूर्तीला स्पर्शाचा अधिकार पानेरी मठाचे महंत सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री-पुरुषांनाच आहे. इतर मंदिरांच्या ठिकाणी काय नियम आहेत? हे माहित नाही.

पूजाविधी संदर्भात माहिती घेत असताना लक्षात येते की, पूजेचे तीन प्रकार आहेत. त्यात षोडशोपचरी पूजा ही १६ प्रकारची साधने आणि आवाहन, कृती यातून केली जातेषोडशोपचरी पूजा ही अशाच पाच साहाय्यातून होते. मानसपूजा ही कोणत्याही साधन, आवाहन शिवाय केवळ मनाच्या संस्कारातून होते. देवादिकांच्या अभिषेकावेळी देवी मूर्तींसाठी काही कर्मठ पथ्येही पाळायची असतात. जसे - देवीमूर्ती उचलताना बोटांचा स्पर्श केवळ आसनाला होईल अशा प्रकारे हाताळणे. अभिषेकानंतर मूर्तींचे अंग कोरडे करण्यासाठी देवता-देवींसाठी वेगळे वस्त्र वापरणे. अंग पुसताना अंगठ्याने मूर्ती घासणे. देवीमूर्तींच्या वरील अंगाला समोरून स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे. असाच पूजाविधी हा मंदिरातील देवतांच्या मूर्तींसाठी आहे. मग, प्रश्न येतो या कर्मठ पथ्य पालनाचे काय ?

सप्तशृंगगड निवासिनी देवी मंदिराचा गाभारा आठवून पाहा. तेथे देवी मूर्तीला हार, चढावा चढविण्यासाठी समोर लाकडी पाटीच लवून टाकली आहे. त्यावर पुरोहीत सर्रास चालतात. देवी मूर्तीला इतर प्रकारे स्पर्श होत नसेल कशावरुन ?

महाराष्ट्रात आता महिला पौराहित्य करू लागल्या आहेत. पुण्यात गणेशस्थापना, कोलकत्यात देवी स्थापना महिला पुरोहितांच्या हस्ते होते. झारखंड राज्यात जमशेदपूरमध्ये अंत्यसंस्कार विधी महिला पुरोहित करु लागल्या आहेत. मिझोरममध्ये चर्चमधील पौराहित्य करण्यासाठी बैपटिस्ट चर्च ऑफ मिजोरम (बीसीएम) ने महिला पुरोहित नेमले आहेत. हे सारे बदल, परिवर्तन स्वीकारले जात असताना आता महिलांनी मंदिर, मशिद, दर्गाह किंवा चर्चच्या प्रवेशाचा हक्क मागता देवीमंदिरात महिलाच पुरोहित असावेत, नेमावेत हाच मुलभूत हक्क मागावा. तसे केल्याने देवीच्या गाभाऱ्यात घुसलेल्या कर्ममार्तंडांना बाहेर काढता येईल.

हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम धर्मातही मशिद, कबरस्तानात दर्ग्याच्या गर्भगृहात स्त्रियांना जाता येत नाही. मात्र, सर्वच मुस्लिम स्त्रियांना मशिदीत जाता येत नाही, असे नाही. मुस्लिमांमध्ये शिया, सुन्नी, खोजा, बोहरी आहेत. त्यांच्यात मतभेद आहेत. खोजा जमातीत दैनंदिन धर्मकृत्य करणारे दोन पुरोहित असतात. मुखी हा मुख्य पुरोहित आणि कामडिया हा त्याचा सहाय्यक. या जमातीच्या स्त्रियांना मशिदीत जाता येते. त्यामुळे स्त्रियांची धर्मकृत्ये या दोन पुरोहितांच्या बायकाच करतात. मुखियानी आणि कामडियानी असे त्यांना संबोधण्यात येते. बोहरा स्त्रियांनाही मशिदीत जाण्याची परवानगी आहे. सुन्नी पंथात स्त्रियांच्या मशीद प्रवेशाबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. लहान मुलींना ईदच्या दिवशी मोठ्या उत्साहाने मशिदीत नेले जाते, परंतु एकदा ती मुलगी मोठी झाली की, तिला प्रवेश बंद होतो. मुस्लिम धर्मातील बुरखापद्धती आणि मासिक पाळीशी निगडित असणाऱ्या पवित्र-अपवित्रतेच्या कल्पना याच्या मुळाशी असाव्यात.

स्त्रियांना मशिदीत जायला बंदी असली तरी दर्ग्याच्या परिसरात वावरण्यास वा नमाज पढण्यास त्यांना कोणी अडवत नाही. त्यामुळेच दर्ग्याला जाणाऱ्या भाविकात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असते. अर्थात, दर्ग्यामध्ये मुख्य कबरीपर्यंत स्त्रियांना जाता येत नाहीच. त्यामुळे तिथेही काही प्रमाणात त्यांचा प्रवेश निषिद्धच मानलेला आहे. मशीद प्रवेश आणि दर्गा प्रवेश याबाबतही वेगवेगळे प्रघात दिसतात.

इजिप्त, सोमालिया अशा देशातल्या स्त्रिया मशिदीत जाऊन नमाज पढू शकतात. कर्नाटकातही स्त्रियांना दर्ग्यात जाता येते. मुस्लिम महिलांवरील प्रवेशबंदीला कुराणात कोठेही आधार नाही. नंतरच्या काही हदीसांमध्ये या संदर्भातले उल्लेख सापडतात. खुद्द महंमद पैगंबरांच्या काळात आणि पुढे तिसऱ्या खलिफापर्यंत स्त्रिया मशिदीत जाऊ शकत होत्या असे उल्लेख सापडतात. ही प्रथा नंतर केव्हातरी अस्तित्वात आली असावी.

मुस्लिम स्त्रियांसाठी वर्ज्य असलेले आणखी एक ठिकाण म्हणजे कबरस्तान. मृत माणूस हा पूर्णपणे नग्नावस्थेत असतो. स्त्रियांनी त्या अवस्थेतला माणूस पाहणे निषिद्ध मानले जाते. म्हणून त्यांना कबरस्तानात जाता येत नाही. तरीही शब्बे मेहराज ईद च्या दिवशी सर्व स्त्री-पुरुष कबरस्तानात जातात आपल्या मृत नातेवाईकांच्या कबरीसमोर प्रार्थना म्हणतात.

ख्रिश्चन धर्मात सर्व स्त्री-पुरुषांना चर्चमध्ये जाता येते. परंतु अघापही स्त्रियांना धर्मगुरूपदाचा अधिकार नाही. गेल्या वर्षी चर्च ऑफ इंग्लंड कडे या मागणीसाठी ब्रिटिश महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यात त्या यशस्वी झाल्या. अर्थात कॅथॉलिक संप्रदायाबाबतीत अघापही कडवी भूमिका घेतो.

वरील सारे विवेचन लक्षात घेवून आता एकच मागणी करायची ईच्छा होते ती म्हणजे, देवी-मदर मेरी यांच्या सेवेसाठी, पौराहित्यासाठी आता महिला पुरोहितांचीच नेमणूक करण्याची मागणी करावी...

सहमत आसाल तर शेअर करा ...  लाईक करा ....

No comments:

Post a Comment