Saturday 30 January 2016

सेवा गौरवाचा सामाजिक ‘वसा’

स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या प्रेरणा आणि पुढाकारातून सुरू झालेल्या ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ आणि ‘जळगाव जनता सहकारी बँक’ यांनी संयुक्तपणे सुरू केलेला ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ प्रदान सोहळा आज (रविवार, ३१ जानेवारी २०१६ ला) होत आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. आपण सामाजिक कार्य करतोच मात्र, इतर व्यक्ती आणि संस्थांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन द्यावे या हेतूने सुरू केलेल्या सेवा गौरवाचा हा प्रवास...


 ‘सब समाजको लिए साथमे आगे है बढते जाना’ या ध्येयाने प्रेरित होऊन समाजाची सर्वांगिण प्रगती व्हावी म्हणून स्व. डॉ, अविनाशदादा  आचार्य यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकिय क्षेत्रात सर्वांना मार्गदर्शक ठरतील अशा ‘केशवस्मृती सेवा समुह’ प्रकल्पांची स्थापना जवळपास २३ वर्षांपूर्वी केली. हे प्रकल्प इतरांशी स्पर्धा करणारे नव्हे तर त्या-त्या क्षेत्रातील आदर्श संकल्पनांचे उत्तम अविष्कार ठरावेत या हेतूने त्यांचा विस्तार केला. वेळोवेळी आढावा घेत त्यांच्या कार्यशैलीची गुणवत्ता, उपयुक्तता वाढविली.

केशवस्मृती सेवा समुहात आज ७ सामाजिक प्रकल्प, ३ वैद्यकीय प्रकल्प, ३ शैक्षणिक प्रकल्प आणि जळगाव जनता सहकारी बँक, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव उद्योजक नागरी सहकारी पतसंस्था असे ३ आर्थिक सेवा प्रकल्प आहेत. यापैकी जळगाव जनता बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकमेव शेड्यूल बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम सातत्याने सुरू असतात.

केशवस्मृती प्रतिष्ठानने समुह सेवेचा वसा हा ‘सेवा वस्ती विभाग’च्या माध्यमातून दुर्बल घटकातील गरजूंना देण्यात येणार्‍या विविध सेवांमधून जपला आहे. हा विभाग शिक्षण, आरोग्य व संस्कार यासाठी काम करतो. १३ वर्षांपासूनची मुले, महिला, वृद्ध यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. महिलांच्या आरोग्य तपासणी व हिमोग्लोबिन तपासणीसाठी शिबिरे घेतली जातात. मुलांसाठी बालवाचनालये सुरू आहेत. गरीब मुलांसाठी पाठ्यपुस्तक सहयोग योजना राबविली जाते.
अगदी अलिकडे सेवा वस्ती विभागाने जनेरिक औषधांचे दुकानही सुरु केले आहे. त्याचा लाभ दुर्बल घटक व सर्व सामान्यांना होतो आहे.

जळगाव जनता बँक प्रशिक्षण केंद्रामार्फत बँकेचे कर्मचारी व अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू असते. व्यापारी व उद्योजकांना चांगल्या हिशोबनीसांची आवश्यकता असते, हे हेरून व्यापारी जमाखर्च हा विद्यापीठ मान्यता असलेला अभ्यासक्रम या केंद्रात शिकविला जातो.
‘विवेकानंद प्रतिष्ठान’ प्रकल्पाद्वारे मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी या माध्यमांतून बालवाडीपासून १० वी पर्यंत तसेच सीबीएसई, डीएड, कम्युनिटी कॉलेज, अध्यापक प्रशिक्षण, निवासी संकुलासारख्या बहुविध शैक्षणिक प्रकल्पातून दर्जेदार, संस्कारक्षम, देशप्रेमी युवापिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. समाजाची सेवा करीत असताना ‘तळागाळातील व्यक्तीचा विकास’ हे ध्येय समोर ठेवून विविध प्रकल्प कायान्वित आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित संशोधन आणि नवोपक्रमावर आधारित एक राज्य परिषदही विवेकानंद प्रतिष्ठानच्या नेतृत्वात घेण्यात आली.

मूकबधीर मुलांच्या ‘श्रवणविकास’ विद्यालयातून मूकबधीर मुलामुलींना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी सामाजिक बांधिलकी जपणार्‍या प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षकांचे अथक परिश्रम सुरु आहेत.

‘जळगाव जनता इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ हा प्रकल्प बँका व सहकारी पतसंस्थाचे संगणकीकरण तसेच बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा विकसित करून त्या महाराष्ट्राबाहेरील राज्यात देखील पुरविण्याचे कार्य करीत आहे.

खेड्यापाड्यातून कामानिमित्त जळगाव महानगरात येणार्‍या हजारो सामान्य नागरिकांना, महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना स्वादिष्ट, रुचकर, ताजे अन्न अल्पदरात मिळावे म्हणून ‘क्षुधाशांती’ सेवा केंद्रामार्फत भोजन व नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे.
‘मांगीलालजी बाफना नेत्रपेढी’ची वाटचाल गरीब जनतेच्या सेवेत समर्पित आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात डोळे तपासणी, इतर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्रतज्ज्ञांकडून केल्या जातात. गरीब नेत्रपिडीतांना सर्व प्रकारच्या नेत्रसेवा मोफत  दिल्या जातात. नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.

‘माधवराव गोळवलकर रक्तपेढी’ जिल्ह्यातील जनतेचा विश्‍वास संपादन करून रक्त संकलन आणि वितरण असे कार्य करीत आहे. गरजूंना विशिष्ट रक्तघटक पुरविण्याचा काम अण्णासाहेब जगन्नाथजी शिंदे, माधवराव गोळवलकर रक्तविघटन केंद्रातून केले जात आहे.

‘मातोश्री’ वृध्दाश्रमाच्या माध्यमातून निराधार, निराश्रीत वृध्दांची सेवा करण्याचे कार्य सुरू आहे. हा वृद्धाश्रम १९९८ मध्ये सुरू झाला. तेथे १०० जणांच्या निवासाची व्यवस्था आहे.

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या पुढाकारातून  गणेशोत्सवाला विधायक चेहरा देण्याचे काम ‘गणेश महामंडळ’ने केले आहे. पारंपरिक जल्लोषात आणि शांततेत विसर्जन मिरवणूक संचालन, धार्मिक ऐक्य राखणे असे काम या महामंडळाकडून केले जाते. गणेश मंडळांची नोंदणी, सामाजिक विषयावर आरास करणे, मिरवणुकीसाठी आकर्षक बक्षीसे देणे हेही महामंडळाचे कार्य आहे.

‘माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान’ मार्फत सकारात्मक आणि सशक्त समाज निर्मितासीठी जळगाव ‘तरुण भारत’ हे दैनिक प्रसिद्ध केले जाते. या शिवाय, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानने मुंबईतील ‘समतोल प्रतिष्ठान’ च्या सहकार्याने बस-रेल्वे स्थानकावरील निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन आणि घरवापसी असाही नवा प्रकल्प सुरू केला आहे.

जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्रिय जाळे निर्माम झाले आहे. बचत गटांमधील महिलांना बँकेचे शेअर देऊन सभासद देखील करून घेतले आहे. या बचत गटांचा दरवर्षी एक व्यावसायिक मेळावा व प्रदर्शनही घेतले जाते.

समाजातिल सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे, त्याचे संवर्धन आणि  उत्कृष्ट सादरीकरणाची निवड या हेतूने  केशवस्मृती प्रतिष्ठान दरवर्षी ‘भुलाबाई महोत्सव’ चे आयोजन करीत असते.

अशा प्रकारे विविध क्षेत्रातील कार्य करणार्‍या प्रकल्पांचा सुंदर ‘बुके’  डॉ. अविनाश आचार्य यांच्या नेतृत्वात तयार झाला आहे. सध्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बुकेतील प्रत्येक प्रकल्प हा फुलाप्रमाणे टवटवित आणि लोकसहकार्य, लोकप्रगती आणि लोकशक्ती या कार्यात अग्रेसर ठेवला आहे.

सेवा समुहाच्या कार्यात समुह नेतृत्वाची परंपरा ‘कलेक्टीव्ह विस्डम’ या नव्या संकल्पनेतून साकारते आहे. विभिन्न व्यक्तीमत्वाच्या विविध गुणसंपन्न लोकांना समाजकार्यासाठी एकत्र आणण्याचे कार्य प्रकल्पातील ज्येष्ठ मंडळी करीत आहेत.

एखाद्या प्रकल्पाची ओळख त्या प्रकल्पात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या समुह व सामाजिक कृतीतून होत असते. केशवस्मृति सेवा समुहाचे प्रकल्पही जवळपास २०० ते २५० कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या जबाबदारीतून जोडतात. त्यांचे समाजात व्यक्तीगत किंवा संस्थात्मक कार्य असले तरी केशवस्मृती सेवा समुहात कार्य केल्याने त्यांच्या हाती समाजकार्याचा ‘वसा’ सांभाळण्याची जबाबदारी आपसूक येते. असा ‘वसा’ घेवून इच्छित कार्याच्या सिद्धीसाठी अखंड वाहणारा सेवा समुह म्हणजेच ‘केशवस्मृती सेवा समुह’ आहे.

काय आहे आगामी नियोजन?

केशवस्मृती सेवा समुहाचा विस्तार करताना अनेक नवे प्रकल्प विचाराधीन आहेत. त्यात सर्वाधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा ‘कॅन्सर हॉस्पिटल’ उभारणीचा आहे. यासाठी रोटरी सोबत चर्चा सुरू आहे. रेल्वे स्थानकावर आढळणार्‍या बालकांच्या पूनर्वसनाचा प्रकल्प सुरू झाला आहे. जेनेरिक औषध विक्री केंद्र सुरू झाले आहे. याशिवाय, प्रौढ मतिमंदांचे संगोपन केंद्र, बिछान्यावरील वृद्धाचे सुश्रुषा केंद्र, वृद्धाश्रमात निसर्गोपचार केंद्र, घनकचरा व्यवस्थापन याच्याशी संबंधित प्रकल्प नजरेसमोर आहेत. ते सुरू करण्यासाठी नियोजन करीत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment