Saturday 23 January 2016

‘मनोबल’ - प्रवाह विरोधातील एक चळवळ

ळगाव येथील ‘दीपस्तंभ फाऊंडेशन ने गेल्या दशकात स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण आणि व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. केंद्राचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी परिश्रमातून ही संस्था विस्तारली आणि नाव रुपाला आणली. विशिष्ट उंची निश्चित झाल्यानंतर यशाची झिंग थिजते किंवा समांतर अवस्थेत राहते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, कधीकधी समांतर अवस्था नव्या उर्मिने, नव्या यशासाठी उसळी मारू लागते आणि त्यातून नव्या क्षितिजाकडे वाहणारा प्रवाह सुरू होतो. असाच नवा प्रवाह यजुर्वेंद्र महाजन यांनी सध्या निवडला आहे. प्रज्ञाचक्षु (अंध) आणि दिव्यांग (अपंग किंवा विशेष) स्थितीतील होतकरू, प्रज्ञावंत, गुणवंतांना प्रशासकीय सेवेत हक्काची तीन टक्के कोट्यात जागा मिळवून देण्याचा. या नव्या प्रवाहाचे तरंग अनुभवू या...
उंबराच्या झाडाखाली नेहमी भरपूर मुंगळे असतात. काही रांगेत चालणारे. काही सैरभैर इतस्ततः भटकणारे. अगदी निरखून पाहिले तर मुंगळ्यांच्या गर्दीत उंबराची दोन-चार पाने पुढे सरकताना दिसतात. या पानांच्या खाली एखाद-दोन मुंगळे असतात. पानांचे ते ओझे वाहून नेण्याची धडपड त्या मुंगळ्यांची सुरू असते. पान कुठे घेवून जायचे याचे लक्ष्य निश्चित नसले तरी पानाचे ओझे वाहून नेण्याचे आव्हान त्या मुंगळ्यांनी स्वीकारलेले असते. इतर सैरभैर मुंगळ्यांच्या गर्दीत पानाखालचे हे मुंगळे इतरांना दिसत नसले तरी ते त्यांचे काम करीत असतात.
मला हे उदाहरण आठवले ‘दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी अलिकडे स्वीकारलेले नवे आव्हान पाहून. सन २००५ पासून सुरू असलेल्या  फाऊंडेशनच्या यशाची उंची नावलौकिकाच्या उच्चतम पातळीवर स्थिरावली आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या तयारीसाठीचे इतर उपक्रम राबविणारे दीपस्तंभ सध्यातरी एकमेव फाऊंडेशन असावे. यशाच्या या प्रवाहाला थिजलेपण न येवू देता यजुर्वेंद्र महाजन यांनी उंबराचे एक पान शिरावर घेवून नव्या आव्हानाचा प्रवास सुरू केला आहे. हा प्रवाह आहे ‘मनोबल केंद्राला आकाराला आणण्याचा आणि विस्ताराचा.
केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवेत प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग व्यक्तींना सेवेसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत. मात्र, एखादा अपवाद वगळता या हक्काच्या आरक्षणाकडे संबंधित युवक जात नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांना तशी संधीच कुठेही उपलब्ध नव्हती. सरकारी धोरणात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग तरुणांना काही सवलती आहेत. मात्र, उच्च शिक्षणासाठी किंवा त्यानंतर नोकरीसाठी फारशा संधी किंवा सवलती नाहीत. शिक्षण झाले असेल तर हस्तकौशल्याधारित रोजगारासाठी तूटपुंज्या कर्जपुरवठ्याच्या काही योजना आहेत. या सरकारी मर्यादेच्या पलिकडे त्यांचे आयुष्य आणि जग नाही. देशाच्या लोकसंख्येत आज जवळपास तीस कोटी लोक प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग आहेत. महाराष्ट्रात आज ही संख्या ३० लाख आहे. अशा मोठ्या संख्यात्मक घटकातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तीन टक्के युवक पुढे येत नाहीत, ही बाब तशी निराशाजनकच म्हणावी.
असाच विचार यजुर्वेंद्र महाजन यांच्या मनात आला. त्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांशी संवाद सुरू केला. वैद्यकीय, समुपदेशक, मानसोपचार तज्ञांशी ते बोलले. हळूहळू त्यांच्या लक्षात प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग घटकांच्या अडचणी आल्या. अभ्यासाची पुस्तके ब्रेल लिपित नाही, भौतिक सुविधा प्रतिकूल आहेत, यंत्र व तंत्र सुविधा अल्प आणि महागड्या आहेत. खर्च आणि सहकार्य याच्या कौटुंबिक मर्यादा आहेत. सर्वांत मोठी उणीव ही मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन, समुदेशन याच्या अभावाची ही आहे. उंबराच्या पानाचे हे ओझे यजुर्वेंद्र महाजन यांनी मानगुटावर वाहून नेण्याचे आव्हान याच मंथनातून स्वीकारले. त्यातून आकाराला आले ‘मनोबल.
दीपस्तंभ फाऊंडेशन च्या माध्यमातून गरीब, होतकरु गुणवांतांना मोफत वा सवलतीच्या दरात निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सन २०११ पासून सुरू आहे. यात प्रज्ञाचक्षु किंवा दिव्यांग युवकही असत. मात्र, ‘मनोबल ची स्थापना ही केवळ प्रज्ञाचक्षू व दिव्यांग अशा युवकांना प्रशासकीय आणि खासगी क्षेत्रातही उच्चस्तरिय सेवा मिळवून देण्याच्या हेतूने करण्यात आली.
मनोबल आज आकाराला आले असून जवळपास ६० युवक-युवती तेथे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यांची निवड प्रवेश परीक्षा घेवून करण्यात आली. दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेतून १०० विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन नावे निश्चित करण्यात आली. त्यापैकी ६० जण आज ‘मनोबल मध्ये दाखल आहेत.  या विद्यार्थ्यांना दीड वर्ष यूपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे निवासी प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रज्ञाचक्षु व दिव्यांग मुलांचे शिक्षण, निवास आणि भौतिक-तांत्रिक  सुविधा अशी सारी आव्हाने पेलून ‘मनोबल धावायला सज्ज आहे. ‘मनोबल मध्ये दाखल प्रत्येक मुलाचा वार्षिक खर्च साधारणतः ४४ ते ५० हजार आहे. मुलांचा निवास भाडोत्री इमारतींमध्ये आहे, भोजन व्यवस्था कराराची आहे. त्यामुळे खर्च जास्त आहे, तूर्त देणगींवर भागते आहे. मात्र, खर्चाचा ताळमेळ व्यस्त आहेच.
मनोबलच्या स्वतंत्र उभारणीसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ जागा पाहिली आहे. संपूर्ण प्रकल्पचा खर्च २ कोटी रुपये आहे. जळगावचे दानशूर व्यक्तिमत्त्व रतनलालजी बाफना यांनी ‘मनोबल साठी इमारत बांधून देण्याकरिता १ कोटी रुपये देण्याचा संकल्प केला आहे.  मदतीचे इतरही हात पुढे येत आहेत. इतर समाजसेवी संस्था शक्य ती साधन सामुग्रीची मदत करीत आहेत. प्रज्ञाचक्षुंना अभ्यासाकरिता उपयुक्त ‘एन्जल प्रो हे यंत्र उपलब्ध झाले आहे. रोटरीने पाणी शुद्धीकरण यंत्रणा भेट दिली आहे. 
मनोबल च्या या प्रवासात प्रज्ञाचक्षु घटकांसाठी उच्च शिक्षणानंतरच्या शिक्षण, प्रशिक्षणाचे दालन सुरू होते आहे. अशा युवकांसाठी उच्चस्तरिय स्पर्धा परीक्षांचे सर्व संदर्भ साहित्य ब्रेल लिपीत करण्याचे काम सुरु आहे. या बरोबरच ही पुस्तके ऑडिओ स्वरूपातही तयार करावी लागत आहेत. या कार्यात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, स्पर्शज्ञान, सावित्री फोरम, सक्षम, ज्ञानप्रबोधिनी, सिनर्जी, एनआयव्हीएच या संस्थांचे सहकार्य घेतले आहे. प्रज्ज्ञाचक्षु व दिव्यांग युवकांचे समुपदेशन करण्यासाठी दोन प्रज्ञाचक्षु तज्ज्ञ मार्गदर्शकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोबल केंद्रात गेल्यानंतर तेथील युवक, युवतींशी संवाद साधताना प्रत्येकाचे आयुष्य हे अनंत अडथळ्यांची शर्यत असल्यासारखे भासते. जगण्याच्या लढाईसाठी डोळसपणा नाही आणि मनगट, पायात त्राण नाही तरीही मनाने कणखर, घट्ट असलेली ही मुले डोळस प्रशासनात दिव्यदृष्टी घेवून प्रवेश करण्यात सज्ज होत आहेत. यजुर्वेंद्र महाजन यांचे यश आहे ते येथे. उंबराचे पान ते लिलया वाहून नेतील हा विश्वास ‘मनोबलमधील युवक, युवतींच्या बोलण्यातून जाणवतो.
मनोबलची दखल आता पासून इतर संस्थांच्या वर्तुळात घेतली जात आहे. बहुधा प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग युवक, युवतींसाठी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षिण देणारी ‘मनोबल ही एकमेव संस्था ठरावी.
मनोबल मध्ये सहभागी युवक-युवतींना सहजीवनाचा धडाही दिला जातो आहे. किंबहुना, तो संबंधितांनी गरजेतून स्वीकारला आहे.  ‘मैत्री सहयोग गटाची स्थापना हा उपक्रम एकमेकांच्या साथ संगत मधून गरजा कमी करायला शिकवतो. प्रज्ञाचक्षु युवकांसोबत इतर विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, गटचर्चा करणे, ऑडीओ स्वरुपात पुस्तकांच्या नोट्स तयार करणे, चालू-घडामोडी उपलब्ध करून देणे. असे उपक्रम राबविले जात आहेत.
राष्ट्रीय पातळीवर सामाजिक क्षेत्रात अभिनव कार्य करणार्‍या संस्थांसाठी दरवर्षी ‘पुणे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर तर्फे ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर सोशल इनोव्हेशन चे आयोजन केले जाते. ‘मनोबल व ‘गुरुकूल या प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची संधी यजुर्वेंद्र महाजन यांना मिळाली. या परिषदेचे आयोजक डॉ. रघुनाथ माशेलकर होते. उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, डॉ. विजय केळकर यांच्यासह टाटा मोटर्स यासारख्या ७० नामांकीत कंपन्यांच्या प्रतिनिधिंनी ‘मनोबलची माहिती घेतली.
अशा प्रकारच्या संपर्कातून ‘मनोबल च्या उभारणीस समाजिक तथा कार्पोरेट जगतातून मदतीचा ओघ सुरू होण्याची शक्यता आहे. जयुवेंद्र महाजन यांनी वयाच्या मध्यावर एक आव्हानात्मक काम स्वीकारले आहे. देशातल्या प्रज्ञाचक्षु आणि दिव्यांग मुलांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी करण्याचा यजुर्वेंद्र महाजन यांचा हा ‘डोळस प्रयत्न अंध-अपंगांच्या प्रशासनात नक्कीच प्रकाश आणेल असा विश्‍वास वाटतो.

 मनोबल चा असा झाला प्रारंभ


रतनलाल सी. बाफना ट्रस्टच्या सहकार्याने दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित अंध व अपंग (प्रज्ञाचक्षु व विशेष) विद्यार्थ्यांसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ‘मनोबल सुरू झाले आहे. हे देशातील पहिले पूर्ण वेळ निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र व कौशल्य विकास केंद्र आहे. देशातील पहिले प्रज्ञाचक्षु आयएएस कृष्णगोपाल तिवारी, जागतिक बँकेचे सल्लागार समीर घोष, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत व समीक्षा आमटे यांच्या उपस्थितीत दि. २ ऑगस्ट २०१५ ला ‘मनोबल चे उद्घाटन झाले. महाराष्ट्रातील १६ जिल्हा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेवून त्यातून ६० युवक, युवतींची निवड करण्यात आली. या केंद्रासाठी डॉ. रवी महाजन व सौ. रेखा महाजन यांनी पंधरा हजार चौरस फूट जागा स्वर्गीय के. एम. महाजनसर यांच्या स्मरणार्थ देणगी स्वरुपात दिली. सिनकर परिवाराने कै. पुंडलिक सोनीराम सिनकर (वाणी) यांच्या उत्तर कार्याला येणारा खर्च न करता, त्यांच्या स्मरणार्थ प्रकल्पासाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी एक लाख रुपये, स्वरूप देशमुख यांनी एकतीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. डॉ. महेंद्र काबरा वर्षभरासाठी दहा विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेचा खर्च उचलणार आहेत. या प्रकल्पासाठी नॅब महाराष्ट्र, स्पर्श ज्ञान मुंबई, हेल्पर्स ऑफ हण्डीकॅप कोल्हापूर, सक्षम अकोला, केअरींग फ्रेंड्स मुंबई, स्नेहालय अहमदनगर, प्रयास अमरावती, ज्ञानप्रबोधिनी पुणे, केशवस्मृती प्रतिष्ठान, सिनर्जी पुणे, नॉब मुंबई, शिवम प्रतिष्ठान, कराड या संस्थांचे मार्गदर्शन आणि  देशबंधू मंजु गुप्ता फाऊंडेशन, लक्ष्मी ऍग्रो केमिकल्स, ई ण्ड जी ग्लोबल, आर्यन ऍग्रो इको रिसॉर्ट, पगारीया बजाज, महालक्ष्मी स्विट्स, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, रोटरी परिवार, अहिंसा ट्रस्ट, त्रिमूर्ती फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभत आहे. 
(प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी संपर्क लक्ष्मण सपकाळे, प्रकल्प व्यवस्थापक ९३२५६३४१४१)

No comments:

Post a Comment