Sunday 31 January 2016

बुरख्यातले हुंकार...!


शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेशाचा हक्क मागण्यासाठी हिंदू महिलांचे आंदोलन सुरु असताना मुंबईच्या हाजी अली दर्गाहच्या गाभाऱ्यात प्रवेशाचा हक्क मिळावा म्हणून मुस्लिम महिलांच्या संघटनांनीही आंदोलन केल्याचे वृत्त आले. या दोन्ही प्रकारात तीन साम्य स्थळे आहेत. त्यापैकी पहिले, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे कट्टरवादी आपापल्या धर्माची भलावण करताना धार्मिक आचरणात महिला पुरुषांना समान अधिकार असल्याचा दावा करतात. दुसरे साम्य म्हणजे, शरीराच्या नैसर्गिक क्रियेशी संबंधित कारणाने महिलांना मंदिर किंवा दर्गाहच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणारा धर्म संदेश किंवा फतवा कोणत्याही धर्मग्रंथात लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. आणि तिसरे साम्य म्हणजे, महिलांना दर्शनाच्या मर्यादा या शनि शिंगणापूर देवस्थान किंवा दर्गाहच्या विश्वस्त मंडळाने घातले आहेत

या मर्यादा घालणारी मंडळी हिंदुंमधील पौराहित्य करणारी किंवा मुस्लिमांमधील मुल्ला, मौलवी, उलेमा नाहीत. म्हणजेच, हिंदू किंवा मुस्लिम महिलांना दर्शनाच्या मर्यादेत ठेवणारे परंपरावादी तेथील ट्रस्टी, विश्वस्त आहेत.
शनि शिंगणापूर येथे चौथऱ्यावर चढून दर्शनाचा हक्क मागणाऱ्या महिला जरा जास्त मुक्त विचारसणीच्या आहेत. त्यांच्यापैकी बहुतजणी कपाळी कुंकू किंवा टीकली लावत नाहीत. काहीजणी गळ्यात मंगळसूत्र घालत नाहीत. अशा मुक्त विचारांच्या या महिला आजही काळ्या पाषाणाला देव मानतात आणि त्यांना दर्शनाचा हक्क हवा, ही गोष्ट पचनी पडत नाही. शनि शिंगणापूरला दर्शनाच्या रांगेत रोज दिसणाऱ्या महिलांशी आंदोलक महिला कुठेही साम्य दर्शवित नाहीत. हे आंदोलन प्रामाणिक वाटत नाही.
मात्र, हाजी अलीच्या दर्गाहमधील गाभाऱ्यात प्रवेश मागणाऱ्या महिला निश्चितपणे परंपरावादी वाटतात. कारण, त्या आजही बुरख्यातल्या, पडद्यातल्या आणि डोक्यावर पदर अथवा ओढणी बाळगणाऱ्या आहेत. बुरख्याआडचा हा हुंकार परिवर्तनाचा प्रामाणिक एल्गार वाटतो. मुस्लिम महिलांमधील बदलाचा हा संघर्ष अलिकडच्या अनेक घटनांमधून प्रतिबिंबित होतो आहे. इस्लामच्या शरीयत कायद्यानुसार, दर्गाहमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे विश्वस्तांनी महिलांना गाभाऱ्यात प्रवेशबंदी लागू केली आहे, हा दावा सिध्द करणारे कोणतेही धार्मिक दाखले संबंधित विश्वस्त देवू शकलेले नाहीत.

हाजी अली दर्गाह गाभाऱ्यात प्रवेशापूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या दहशतवादी संघटना इसिसविरोधात सोलापुरातील मुस्लिम महिलांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. देशातल्या मुस्लिम मुलांना इसिसमध्ये जाण्यापासून रोखण्याची मागणी या महिलांनी केली. आपल्या देशाशी गद्दारी करणाऱ्यांना देशातील सच्चे मुसलमान कधीही पाठीशी घालत नाही. वेळप्रसंगी देशासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे, असे आंदोलक मुस्लिम महिला म्हणाल्या.

इसिसविरोधात असेच काहीसे आंदोलन नाशिक येथेही करण्यात आले. नाशिक छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे सारडा सर्कल भागात इसिस आणि पाकिस्तान विरोधात  घोषणाबाजी करण्यात आली. इसिस संघटना भारतीय तरुणांना आमिष दाखवून इस्लामला बदनाम करीत असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी इसिसच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारत, पुतळा दहन केले.

मध्यंतरी कोल्हापुरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी असताना मुस्लिम महिलांनी निवडणूक लढवू नये, असा फतवा मज्लिसे शुरा उलेमा कोल्हापूर ने काढला होता. मुस्लिम महिलांचा मुलभूत अधिकार नाकारणाऱ्या या फतव्याला तीव्र विरोध झाला. तथाकथित मुस्लिम धर्मगुरूंनी फतवा नंतर मागे घेतला. हिलाल कमिटीने फतवा मागे घेतल्याचे जाहीर केले. बरे झाले, वेळीच त्या फतव्याला विरोध झाला, नाहीतर धर्मग्रंथाच्या आडून मुस्लिम महिलांना निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा विचार इतरत्र फोफावला असता.

तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देण्याच्या पध्दती विरोधातही मुस्लिम महिलांचा विरोधाचा हुंकार आहे. ९२ टक्के मुस्लिम महिलांना ही पध्दत अन्यायकारक वाटते. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या समाजसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष  समोर आला आहे. तलाक देण्यासाठी स्थानिक काझी, नातेवाईक यांच्या माध्यमातून निरोप पाठवून किंवा -मेल, एसएमएसचा वापर करून तलाक दिला गेल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणात समोर आली आहे.

मुस्लिम महिलांचा मौखिक तलाक पध्दतीला विरोधाचा लढा १९८५ पासून चर्चेत आहे. तेव्हा देशभरात शाहबानो प्रकरण गाजले. ४३ वर्षे संसार करुन तलाक देणाऱ्या वकिल नवऱ्याकडे शाहबानोने पोटगीचा हक्क मागितला. तेव्हा मुस्लिम महिलांच्या बुरख्याआडचा पहिला हुंकार सार्वत्रिक झाला. १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांना पोटगीचा हक्क बहाल केला. पण, हा निकाल शरीयत आणि इस्लाममधील हस्तक्षेप आहे अशी भूमिका आजही ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमाते उलेमा हिंद यांनी घेतली आहे.

महिलांचे हक्क, अधिकार नाकारणारे कोणतेही विधान अथवा तत्वज्ञान कोणत्याही मूळ धर्मग्रंथात नाही. धर्मग्रंथाचा वेगवेगळा अर्थ सांगणाऱ्या संस्था, संघटना किंवा व्यक्तींनी विचारांचा दुभंग निर्माण केला आहे. अशा दुभंगातूनच विविध प्रश्नांमध्ये महिलांची हुंकार दडपला जातोय.


No comments:

Post a Comment