Saturday, 16 January 2016

मानवतेचा संवादसेतू


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं) चे ज्येष्ठनेते आणि राष्ट्रीय मुस्लिम मंच (रामुमं) चे प्रणेते इंद्रेश कुमार यांनी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम प्रतिनिधींशी संवाद साधला. अत्यंत खुल्या वातावरणात त्यांनी आपले म्हणणे मांडले आणि इतरांचेही ऐकून घेतले. माणूस, माणूसपण आणि मानवतावाद या त्रिसूत्रीला धरून ‘रामुमं देशभरात कशाप्रकारचे उपक्रम राबवित आहे, याची माहिती इंद्रेश कुमार यांनी दिली. संघ विचारधारेशी संबंधित वाद-विवादाचे विषय बाजूला होते. त्यामुळे त्यांच्यात आणि उपस्थितांमध्ये ‘मानवतेचा संवादसेतू निर्माण झाला. विचारांच्या आदान-प्रदानचे हे सकारात्मक वातावरण पुढे नेण्याची जबाबदारी आता दोन्ही बाजुंची आहे. या ‘संवादसेतू ला ‘विसंवादाचे गालबोट लावणार्‍यांना वेळीच दूर सारणे आवश्यक आहे.

इंद्रेश कुमार यांचा जळगावमध्ये सलग तीन दिवस मुक्काम होता. ‘रास्वसं च्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक, ‘रामुमं च्या माध्यमातून मुस्लिमांशी संवाद साधणे आणि ‘जळगाव शहर महासंगम मध्ये मार्गदर्शन करणे या तीन हेतुंनी त्यांचा मुक्काम होता.

संघाच्या वेगवेगळ्या प्रचार-प्रसार कार्यात इंद्रेश कुमार यांची भूमिका ‘ओपिनियन आणि डिसिजन मेकर्स म्हणून राहिली आहे.  वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे, १९५९ पासून इंद्रेश कुमार संघ परिवारात आहेत. ते स्वतः तांत्रिक अभियांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. देशाच्या जवळपास सर्वच प्रांतात त्यांचा संपर्क असून गेल्या १३ वर्षांपासून ते जम्मू-काश्मीर, झारखंड, छत्तीसगड या सिमावर्ती प्रांतात मुस्लिमांच्या संघटनसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच पुढाकारातून २००२ मध्ये ‘रामुमं ची स्थापना झाली. या मंचाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कुराणचा आणि इस्लामविषयक अभ्यास करीत मुल्ला-मौलवी-मुफ्ती यांच्यासह मुस्लिम नेते, समाजसेवक यांच्याशी वारंवार संपर्कात राहून, बोलून त्यांनी ‘रामुमं च्या सामाजिक कार्याची उद्दिष्ट्ये निश्‍चित केली आहेत. त्याच मार्गावर त्यांचा ठामपणे प्रवास सुरू आहे.

देशाच्या पातळीवर ‘रामुमं ला कसा प्रतिसाद आहे हे लक्षात घ्यायचे असेल तर या संघटनची इंटरनेटवर उपलब्ध असलेली वेबसाईट  पाहावी. तेथे कार्यपद्धती, उद्दिष्ट, करीत असलेले काम, पदाधिकारी अशी भरपूर माहिती मिळते. देशातील जवळपास २७ राज्यांमधील २०० जिल्ह्यात मुस्लिम युवकांच्या माध्यमातून ‘रामुमं चे काम सुरू आहे. या संघटनची रचनाही चार स्तराची आहे. मुख्य टिम, पदाधिकारी, विद्वत्तामंडळ आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील काम करणारी मंडळी. जवळपास १० लाख मुस्लिमांच्या संपर्कात इंद्रेश कुमार असून त्यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील विद्वतजणांच्या बैठका होवू लागल्या आहेत.

इंद्रेश कुमार यांनी गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहिब यातील संदेशात असलेली साम्य स्थळे आणि मानवतावादाची शिकवण शोधून ‘रास्वसं च्या मूळ विचारांची उत्तमपणे मांडणी आणि त्याला अनुसरून कृती केली आहे. म्हणूनच त्यांचा संवाद हा सुसंवाद ठरतो. दुसर्‍या धर्मातील विसंगतीवर बोलण्यापेक्षा ते सुसंगतीवर बोलतात. ते कोणालाही भावते, आवडते. कृतिशील होण्यास प्रवण करते.

जळगाव येथेही इंद्रेश कुमार यांनी शहरातील मान्यवर मुस्लिम विद्वतजणांशी असाच सुसंवाद साधला. गणेश महामंडळाचे प्रमुख सचिन नारळे यांनी या सुसंवाद चर्चेचे आयोजन एखाद्या ‘कमर्शिअल कॉन्फरन्स प्रमाणे केले होते. विविध क्षेत्रात नावलौकीक, प्रतिष्ठा असलेल्या सुमारे १०० जणांना या चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. ९० जणांची उपस्थिती होती. खर्‍या अर्थाने सुसंवाद येथेच यशस्वी झाला. राजकारण, समाजकारण, शिक्षण, व्यवसाय, व्यापार, नोकरी, कौशल्ये आदी सर्वच क्षेत्रातील मंडळी इंद्रेश कुमार यांना ऐकायला, त्यांची विचारधारा समजून घ्यायला आली.

इंद्रेश कुमार यांच्या चर्चेचा खुलेपणा सर्वांच्या विना सुरक्षा तपासणीतून लक्षात आला. ते म्हणाले, ‘मी तुम्हाला भेटायला खुल्या मनाने आलो आहे. माझा तुमच्यावर विश्‍वास आहे. भगवान महान आहे असे मी म्हणतो, तुम्ही अल्लाहू अकबर म्हणतात. इतर गॉड र्ईज ग्रेट म्हणतात. मग, आपण सारे मिळून परमेश्वरालाच महान मानतो तर त्याच्या सेवकांवर अविश्‍वास नको. या चर्चेतील माझे म्हणणे कोणाला ध्वनीफितबद्ध करायचे असेल तर जरूर करा. मात्र, कोणताही पूर्वग्रह किंवा विशिष्ट विचारधारा पकडून संवादाचा विसंवाद करू नका.’
जळगाव येथे राजकारण, समाजकारण, शिक्षण, व्यवसाय, व्यापार, नोकरी, कौशल्ये आदी सर्वच क्षेत्रातील मंडळी इंद्रेश कुमार यांना ऐकायला, त्यांची विचारधारा समजून घ्यायला आली

एवढी सुस्पष्ट भूमिका मांडल्यानंतर इंद्रेश कुमार यांनी  ‘रामुमं च्या माध्यमातून विविध ठिकाणी राबविण्यात येणार्‍या समाजिक उपक्रमांची माहिती दिली. त्यात दुर्बल घटकातील मुलांना पेन-वह्या-पुस्तके वाटप, गरीब घटकांसाठी धान्य वाटप, शब्बे बारातच्यानिमित्त दफनभूमितील कार्यक्रमात मुस्लिमांच्या राष्ट्रपुरूषांसाठी प्रार्थना करणे, वृक्षारोपण करणे, रमजानचा रोजा सोडण्यापूर्वी मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक किंवा शहिदांच्या गोष्टी सांगणे, गोहत्या बंदी, गोसंगोपन अशा विविध विषयांशी संबंधित उपक्रम, समाजकार्य याचा माहितीत समावेश होता. कुराण किंवा इस्लामच्या कोणत्याही तत्त्वाला दूर सारत किंवा हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव टाकत, अशी कोणतीही वैचारिक मांडणी इंद्रेश कुमार यांनी केली नाही.

त्यांच्या विचारधारेत माणूस, माणूसपण आणि मानवतावाद हेच सूत्र होते. त्यामुळे कट्टरपणे विरोध करणे, वादविवाद करणे, मुद्दा खोडणे अथवा आपलाच मुद्दा रेटणे असे प्रकार दोन्ही बाजूंकडून झाले नाहीत. उलटपक्षी दुहेरी संवादाची संधी मिळाल्यानंतर जवळपास प्रत्येकाने हा सुसंवाद वाढवत न्यावा अशीच अपेक्षा व्यक्त केली. शक्य झाले तर जळगाव येथे राष्ट्रीय मुस्लिम मंचचा राज्यस्तर कार्यक्रम घ्या असेही सूचविण्यात आले.

वंदे मातरम् चा मुद्दा चर्चेत आला. त्यावर इंद्रेश कुमार म्हणाले, या राष्ट्रात आपण राहतो, त्या राष्ट्राच्या भूमिला वंदन करण्याचा विचार यात आहे. कुराणातही वतनसाठी ‘मर मिटनेचा  उल्लेख आहे. यावर उपस्थित मान्यवरांपैकी एकाने अत्यंत सकारात्मक मत मांडले. देशाची फाळणी झाल्यानंतर आताच्या पिढीला मुस्लिमांची होरपळ माहित नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी भारतातील मुस्लिमांना आपले राष्ट्रप्रेम सिद्ध करावे लागते. आमचा धर्म केवळ अल्लाहला वंदन करायचे सांगतो. याचा अर्थ आम्ही भारतीय भूमिशी प्रेम करीत नाही असा नाही. यावर, विवादाची भूमिका इंद्रेश कुमार यांनी घेतली नाही.  साध्वी, साक्षी महाराज यांच्या विखारी वक्तव्यांचाही उल्लेख झाला. त्याचे समर्थन किंवा विरोधही केला गेला नाही. हे दोन अपवाद वगळता संपूर्ण चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. चर्चा संपल्यानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेत अनेकांनी इंद्रेश कुमार यांच्याशी सविस्तर बोलणे केले.

कार्यक्रम संयोजनाबाबत सचिन नारळे यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मुस्लिम समाजातील सर्व विचारप्रवाहातील लोकांना त्यांनी एकत्र आणले. ते म्हणाले, ‘रास्वसं परिवारातील प्रमुखांनी या कार्यक्रमाची जबाबदारी मला दिली. मी ती निष्ठेने पार पाडली. मला माहिती आहे, संघ परिवार कोणतेही कार्य करतो ते छान आणि सकारात्मकपणे करतो. मला समाधान आहे, मी जोडलेली माणसे चर्चेत आली. आता पुढील आदेश मिळाला तर निश्‍चित जळगावात आपण राज्यस्तरिय कार्यक्रम घेवू शकू.

एकंदरीत इंद्रेश कुमार यांच्या चर्चेने जळगावमधील संघ परिवार आणि मुस्लिम समाज बांधव यांच्यातील मानवतेचा एक संवादसेतू उभारण्याचे काम सुरू केले आहे हे निश्‍चित!

 वितंडवादी मंडळींकडे दुर्लक्ष

इंद्रेश कुमार यांच्यासोबतच्या चर्चेत सहभागासाठी काही मुस्लिम मंडळींना बोलावण्याचे टाळण्यात आले. याचे कारण अशा मंडळींची विचारधारा, कार्यशैली याची माहिती संपूर्ण समाजाला आहे. काही चर्चा या पूर्णतः मेंदू खुला ठेवून करायच्या असतात. तसे केले तरच अंतःकरणातही सकारात्मक संदेश जातो.इंद्रेश कुमार यांच्या चर्चेतील कोणत्याही विधान, वक्तव्य, प्रतिपादन याच्याविषयी उपस्थित ९० जणांपैकी एकानेही नाराजी, विरोध याचा सूर आवळला नाही. मात्र, ज्या लोकांना बोलावले गेले नाही त्यापैकी दोघांनी समाजाचा बुध्दीभेद करणे सुरू केले. इंद्रेश कुमार यांची चर्चा ‘रास्वसं विषयी नव्हतीच. ती होती ‘रामुमं च्या कार्याविषयी. हा मुद्दा बाहेरून बोंबलणार्‍यांना सांगणार कोण? मात्र, ऐकीव, सांगीव गोष्टीवर पत्रकबाजी करणार्‍यांनी वितंडवादाची भूमिका घेतली. एका राजकिय पक्षातून दोन जणांची हाकलपट्टीही करण्याचे घाटले. हा सारा प्रकार हास्यास्पद आहे. मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा खुळचटपणाही केला गेला. ज्या संघ विचारांचा वसा घेणारे सरकार सत्तेत आहे, त्याच सरकारने आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांना बसवले आहे, हेही ही खुजी मंडळी विसरली. एखाद्या पंगतीचे आवतण नसलेल्या माणसाने पंगतीत जेवून आलेल्याला, तू का गेला असे विचारणे आणि पंगतीतील पदार्थ हे अखाद्य होते असा बोलभांडपणा करणे, असा हा प्रकार आहे. यात समाजाचे दाढीधारी धर्मभक्त आणि तथाकथिक समुपदेशक उघडे पडले. या वितंडवादी मुखंडाना एकच प्रश्‍न विचारावासा वाटतो, अरे बाबांनो तुम्ही समाजिक कार्य केल्याचे एखादे उदाहरण आहे का? ते करीत असाल तर तुम्हीही समाजातील मान्यवरांना चर्चेला बोलवा. बघा बरे, तुमच्या बोलावण्यावर विश्‍वास ठेवून कोण कोण येतो? ‘रास्वसं किंवा ‘रामुमं खुलेपणाने बोलावून आपले मत, विचार मांडतो. तुम्हीही असा प्रयत्न करून बघा.







No comments:

Post a Comment