Tuesday, 12 January 2016

शनिशिंगणापूरचा वाद - मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

निशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून पूजा करण्याचा हक्क महिलांना देण्यास देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ. अनिता चंद्रहंस शेटे यांनीच नाकारला आहे. त्यामुळे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाकारण्याचा कोणताही वैदिक ग्रंथात अथवा कर्मकांडाचा कर्मठ ‘फतवा कुठेही अस्तित्वात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नाकारणारी मानसिकता आणि त्याला चिटकून राहणारी हट्टी कृती ही शनिशिंगणापूरच्या ग्रामस्थांनी, तेथील बहुजन समाजाने, तेथे वर्चस्व असलेल्या राजकीय पुढार्‍यांनी आणि गावातल्या महिलांनी रुढी-प्रथा-परंपरा म्हणून घट्ट धरून ठेवली आहे, हे लक्षात घ्यावे. अशा लोकांच्या गळ्यात समाज परिवर्तनाची घंटा तथाकथित सुधारणावादी, सहिष्णुवादी, पुरोगामी मंडळींनी बांधावी. बहुजन समाजाने बहुजन समाजासाठी हे बहुजनवादी परिवर्तन घडवून आणावे, हीच अपेक्षा आहे.

शनिशिंगणापूरमध्ये नोव्हेंबर २०१५ महिन्यात एका महिलेने चौथर्‍यावर चढून शनिदेवाच्या शिळेवर तैलाभिषेक केला होता. हे तथाकथित ‘भयंकर कृत्य माध्यमांमधून खूप चर्चिले गेले. त्यावेळी देशात ‘पुरस्कार वापसी करून आणि ‘असिहिष्णुता विषयक निषेधाचे वातावरण होते. सुधारणावाद्यांना देवादिकांच्या पूजापाठमधील स्त्री-पुरूष समानतेच्या हक्काची मागणी करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला होता.
महिलांना मंदिर प्रवेशाचा किंवा विशिष्ट देवतांच्या पूजेचा हक्क का नाही? असे प्रश्‍न विचारून देवादिके न मानणारी मंडळीही शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्या! अशी भलतीच मागणी करताना दिसत होते. खरेतर ‘सुधारणावादी-सहिष्णुतावादी-पुरोगामीवादी यांनी महिलांना आवाहन करून, तुम्ही शनिशिंगणापूरला जावूच नका, असे म्हणायला होते. ते तसे न करता, स्व. नरेंद्र दाभोळकर-स्व. गोविंद पानसरे यांचे नाव घेत महिलांसाठी पूजेचा अधिकार मागत होते. हे भलतेच होते.
त्यानंतर जवळपास दीड महिन्यांचा काळ गेला. शनिशिंगणापूरच्या देवस्थानसाठी असलेल्या विश्‍वस्त मंडळाची निवड अलिकडे झाली. या विश्‍वस्त मंडळात दोन महिलांचा समावेश झाल्याचे ‘ऐतिहासिक वृत्त सर्व माध्यमात चर्चेत होते. दुसर्‍या दिवशी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्षपद महिलेकडेच देण्यात आल्याचेही वृत्त दुपारपर्यंत ‘ब्रेकिंग न्यूज म्हणून फिरत होते. पण, दुपारनंतर जेव्हा पहिल्या महिला अध्यक्षा सौ. अनिता चंद्रहंस शेटे यांचे वक्तव्य चर्चेत आले, तेव्हा पहिल्या ऐतिहासिक घटनांचा धुराळा खाली बसला. कारण, शेटेंनी, शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना चढून अभिषेक न करू देण्याचीच परंपरा पाळणार असे सांगितले होते. हे धक्कादायक आहे मात्र, या गोष्टीचे समर्थन किंवा विरोध कोणत्याही दैववादी, वैदिक परंपरा पाळणार्‍यांनी केलेला नाही. अपवाद केवळ सनातन संस्थेशी संबंधित हिदुत्ववाद्यांचा. अर्थात, त्यांचा मुद्दा हा वेगळा आहे.
शनिदेवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाने किंवा महिला अध्यक्षांनी महिलांसाठीच पूजेचा हक्क किंवा अधिकार का नाकारला असावा याची कारणे क्रमाक्रमाने समजून घेतली तर ‘कोण मांजर आणि ‘कोणाची घंटा हे लक्षात येते. ते आता पाहू.
शनिशिंगणापूर ः गाव म्हणून
खरेतर, शनिशिंगणापूरचा विकास गेल्या दोन दशकात झाला. शनिशिळा आणि नंतर त्याला मिळालेले शनिदेवाचे रुप या प्रवासातील अनेक स्थित्यंतरे या गावाने पाहिली. शनिशिंगणापूर हे गाव पूर्णतः बहुजन समाजाचे आहे. शनिशिंगणापूर देवस्थान हे याच बहुजनांच्या ताब्यात आहे. त्याचे कारभारी, पंच आणि आता विश्‍वस्त बहुजन समाजाचेच आहेत. एवढेच नव्हे तर शनिदेवाचे पुजारी सुद्धा बहुजन समाजाचेच आहे.
शनिशिळेला ४०० वर्षांची परंपरा सांगितली जाते. पंच मंडळाचा इतिहास ५२ वर्षांचा आहे. या कालप्रवासात ३ समज तेथील ग्रामस्थांनी निर्माण केले आणि ते कर्मठपणे प्रथा-परंपरा-रुढी म्हणून जपले. पहिला ः शनिची पूजा महिलांनी चौथर्‍या खालून करावी, दुसरा ः गावातील घरांना दरवाजे असू नये. गावात चोरी होत नाही. आणि तिसरा ः शनिशिळेची पूजा ओले भगवे वस्त्र घालूनच करावी.
वरील तीनही समज हे शनिशिंगणापूरच्या बहुजन समाजाने जन्माला घातले आणि ते पिढीजात जोपासले. या मागचे कारण श्रध्देपेक्षा व्यावसायिक आहे. शनिचे कर्मठ देवस्थान म्हणून शनिशिंगणापूरचा लौकीक जगभरात आहे. म्हणूनच तेथे दर्शनासाठी भविकांची गर्दी होते. ही गर्दी आता १२ महिने असते. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला येणारे ४० टक्के भाविक शनिशिंगणापूरला जातात. यावर भविकांच्या माध्यमातून होणारे अर्थकारण लक्षात यावे.
शनिशिंगणापूर ः गावचे राजकारण
शनिशिंगणापूरमध्ये बहुजन समाजाचे वर्चस्व असले तरी ते गट-तट यात विभागले आहे. अलिकडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. तीत भारतीय जनता पक्षाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या समर्थकांनी बाजी मारली. माजी खासदार यशवंतराव गडाख, त्यांचे पूत्र शंकरराव गडाख यांच्या समर्थकांची प्रस्थापित सत्ता गेली. ग्रामपंचायत मुरकुटे यांच्या समर्थकांकडे आहे. देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाची निवड नुकतीच झाली. त्यात एकूण ११ पैकी ९ जण गडाख समर्थक आहेत. म्हणजेच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी एका बाजूला आणि देवस्थानचे विश्‍वस्त दुसर्‍या बाजूला असे जुनेच समिकरण आहे. ग्रामपंचायतचे राजकारण आणि देवस्थानचे अर्थकारण यात नेहमी धुसमूस होत असल्याने समर्थकही गावातले आणि विरोधकही गावातले हे वास्तव चित्र आहे. मात्र, देवस्थानच्या सर्व कर्मठ समज, प्रथा, परंपरा, रुढी यांना चिटकून राहणारी ही मंडळी आहे.
शनिशिंगणापूर ः खरे अर्थकारण
शनिदेवाच्या दर्शनाला दरवर्षी जगभरातून येणार्‍या लाखो भविकांमुळे देवस्थानचे उत्पन्न आता ५० कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीला केवळ यात्रा किंवा भाविकांचा प्रवेशकर या माध्यमातून केवळ काही लाखांचे उत्पन्न मिळते. म्हणजेच देवस्थानचे विश्‍वस्त ‘तुपाशी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी ‘उपाशी हेही सत्य आहे. विश्‍वस्त मंडळ देवस्थान परिसरात भाविकांना सुविधा देण्यासाठी विविध योजनांचा विकास करीत आहे मात्र, गावातील सुविधांसाठी विश्‍वस्त पैसा देत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि देवस्थानचे विश्‍वस्त यांच्यात अर्थकारणावरून धुम्मस असते.
नोव्हेंबर २०१५ मध्ये महिलेने शनिदेव चौथर्‍यावर चढून अभिषेक केल्याचा वाद जेव्हा गाजला त्यावेळी विश्‍वस्त ॲड. सयाराम बानकर यांनी ग्रामसभेत देवस्थानच्या विश्‍वस्तपदाचा राजीनामा दिला. तो देताना त्यांनी म्हटले होते की, विश्‍वस्त मंडळ राजकारण्यांचा अड्डा आहे. विश्‍वस्त मंडळात अनेक गैरव्यवहार आहेत. बावनकर राजीनामा देत असताना देवस्थान शुद्धीकरणाची प्रक्रियाही पार पाडली गेली. त्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट ठेवून गाव बंद पाळला. दुसरीकडे इतर विश्‍वस्तांनी बानकरांचा दावा खोडून काढत पुन्हा नव्या समितीत विश्‍वस्त होण्यासाठी बानकरांनी हे खोटनाटेे आरोप केल्याचे म्हटले होते. या आरोपप्रत्यारोपांकडे दुर्लक्ष केले तरी शनिदेव देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाचे आर्थिक व्यवहार पारदर्शी आहेत असे म्हणायला जागा नाही. हेही खरे आहे.
शनिशिंगणापूर ः विश्‍वस्त निवड
नोव्हेंबर २०१५ मधील वादविवाद गाजत असताना जानेवारी २०१६ मध्ये नव्या विश्‍वस्तांची पुढील पाचवर्षांसाठी निवड होणार हेही निश्‍चित होते. मुरकुटे आणि गडाख यांच्या गटांपैकी कोणाची वर्णी लागणार ही उत्सुकता होती. सत्तेत असलेले मुरकुटे बदल घडवतील अशी ‘हवा होती. १९६३ पर्यंत देवस्थानचे काम पंच कमिटी पाहायची. १९९३ पासून नवी घटना दुरूस्ती करून धर्मदाय आयुक्तांच्या निगराणीत विश्‍वस्त निवड होणे सुरू झाले. नव्या घटनेत दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला विश्‍वस्त होण्याचा अधिकार केवळ स्थानिक लोकांनाच आहे. म्हणजेच गावातील बहुजन समाजातील लोकांनाच. दुसरा म्हणजे, विश्‍वस्तपदासाठी धर्मदाय आयुक्तांकडे विहीत नमुन्यात अर्ज करायचा. ते इच्छुकांच्या मुलाखती घेवून विश्‍वस्त निवडतील. आता जानेवारी २०१६ मध्ये याच प्रमाणे प्रक्रिया पार पाडली. ११ जागांसाठी ९८ जणांचे अर्ज आले. त्यात ११ महिलांचे अर्ज होते. या सर्व महिलांनी आग्रह व हट्ट करून अर्ज भरले होते. विश्वस्तपदांसाठी गडाख-मुरकुटे गटामध्ये रस्सीखेच होती. बानकर, शेटे, दरंदले, बोरुडे या घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर ९ पुरूष आणि २ महिला निवडल्या गेल्या. यात गडाख यांचे ९ समर्थक असल्याचा योगायोग आहे. धर्मदाय आयुक्तांनी इच्छुकांच्या मुलाखती घेताना त्यांना जे प्रश्‍न विचारले त्यातून कोण निवडले जाणार हे निश्‍चित होते. गावात कधीपासून राहता? देवस्थानची  व परंपरांची माहिती आहे का? विश्‍वस्त का व्हायचे आहे? गावचा इतिहास काय? ही प्रश्‍नावळी लक्षात घेता गावाच्या परंपरेच्या विरोधात जाणारे मत मांडणारा विश्‍वस्त होणार नाही हे निश्‍चित होते. म्हणूनच धर्मदाय आयुक्तांनी अनिता चंद्रहस शेटे, शालिनी राजू लांडे, बापूसाहेब शंकर शेटे, डॉ. रावसाहेब सुखदेव बानकर, नानासाहेब विठ्ठल बानकर, योगेश कचरू बानकर, डॉ. वैभव सुखदेव शेटे, आदिनाथ जगन्नाथ शेटे, दीपक दादासाहेब दरंदले, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे आणि भागवत सोपान बानकर यांची विश्‍वस्त म्हणून निवड केली. अर्थात, यात दोन महिलांना संधी देत असल्याचा निर्णय ऐतिहासिक वाटत असताना नंतर तोही फुसकाच ठरला. या विश्‍वस्तांनी नंतर एकत्र बसून सौ. अनिता शेटे यांना अध्यक्षस्थानी बसविले. अर्थात, या निवडीला मुरकुटे समर्थक बापूसाहेब शेटे व डॉ. रावसाहेब बानकर अनुपस्थित होते. सौ. शेट या अध्यक्ष होत असताना, महिलांना यापुढे शनिदेव चौथार्‍यावरून दर्शनासाठी परिवर्तनवादी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. पण, अध्यक्ष महिलेनेच प्रथा, परंपरा, रुढीला चिटकून राहण्याचे सांगितल्याने विषयच संपला.
शनिशिंगणापूर ः आमदार नाराज
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नव्या  विश्वस्त मंडळावर आमदार बाळासाहेब मुरकुटे नाराज आहेत. मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख अप्रत्यक्षपणे देवस्थानचा कारभार हाकत असून त्यांच्या संस्थेत नोकरी करणारेच या विश्वस्थ मंडळात राहीले आहेत. या सर्वांनी मोठे गैरव्यवहार केले आणि आत्ताही हेच लोक पुन्हा विश्वस्त मंडळात दाखल झाल्याचा मुरकुटे यांचा दावा आहे. तो खराही आहे. विश्‍वस्त समितीविषयी मुरकुटे मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहेत.
शनिशिंगणापूर ः दुतोंडी भूमिका
शनिशिंगणापूरच्या ग्रामस्थांची आणि तेथे राजकारण करणार्‍या नेत्यांची भूमिका नेहमी दुतोंडी राहिली आहे. गावाच्या परंपरांना चिटकून राहिले तरच ग्रामस्थ साथ देतात हा अनुभव आहे. त्यामुळे कोणतीही परंपरा बदलाची गोलमोल भाषा वापरायची मात्र कृती परंपरावादी ठेवायची हा आतापर्यंतचा अनुभव आहे.
जेव्हा नव्या विश्‍वस्तांमधून पदाधिकारी निवडीची बैठक देवस्थानच्या सभागृहात यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हाही हाच अनुभव आला. विश्‍वस्त समितीच्या सरचिटणीसपदी दीपक दादासाहेब दरंदले, चिटणीसपदी अप्पासाहेब शेटे आणि कोषाध्यक्ष म्हणून योगेश बानकर यांची निवड झाली. आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते नव्या पदाधिकार्‍यांसह विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने सोमनाथ दरंदले, अविनाश बानकर, पोपट कुर्‍हाट, भाऊसाहेब दरंदले, जगन्नाथ दरंदले, किशोर बानकर यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांचा सन्मान केला. मावळते अध्यक्ष प्रा. शिवाजी दरंदले, सोपान बानकर, रंगनाथ शेटे, विश्वस्त डॉ. वैभव शेटे, आदिनाथ शेटे, भागवत बानकर, शालिनी लांडे यांनी पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. येथे कोणीही महिलांचा हक्क वगैरे यावर भाष्य केले नाही. मात्र, नेते म्हणवणारे यशवंतराव गडाख शाब्दीक चलाखी करीत म्हणाले, एका युवतीने शनिमंदिरातील चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतल्याने महिलांना दर्शनाबाबतचा प्रश्न पुढे आला. सरकारने कायदा करून सर्वच धर्मांतील प्रार्थनास्थळे महिलांसाठी खुली केली, तर शनिशिंगणापूर येथेही त्याचे पालन होईल. सती जाण्याची प्रथा इंग्रज सरकारने कायदा करून बंद केली. कुठलाही गंभीर व वादाचा प्रश्न कायदा, प्रबोधन व विचारांनी सोडविणे गरजेचे आहे. येथील रुढी-परंपरा कुणी बळजबरीने किंवा गुपचूप मोडली, तर फक्त विश्वस्त मंडळालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू नये. परंपरा जपणे हे सर्व ग्रामस्थांचे काम आहे. ही प्रतिक्रिया किंवा आवाहन वाचले तर गडाख यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही शनिशिंगणापूरची परंपरा मोडायला तयार नाही हे दिसते.
गडाख यांची, त्यांच्या समर्थकांची, विरोधकांची सुद्धा मानसिकता आणि कृती एकच दिसते. ती म्हणजे ‘आम्हाला शनि शिंगणापूरमधील देवदर्शनाच्या परंपरा-प्रथेत बदल करायचा नाही आता ही मानसिकता शनिशिंगणापूरच्या बहुजन समाजाची असेल तर वैदिक किंवा कर्मकांडच्या कर्मठ परंपरांना उगाचच दोष देण्यात किंवा त्यावर आगपाखड करण्यात काय हशील आहे? आता मुद्दा हाच आहे की, विविध ब्रिगेड, मंच, सेना किंवा राष्ट्रपुरुषांच्या नावाने धर्माची स्थापना करणारी मंडळी आपल्याच बहुजन समाजाला रुढी, परंपरा, प्रथा मोडण्यासाठी का प्रवृत्त करीत नाहीत? त्यांचा मूलतः दैववादालाच विरोध आहे. हेच सूत्र घेवून त्यांनी ‘बहुजनांनी बहुजनांचे बहुमताने परिवर्तन केले असा नवा इतिहास सहज लिहायला हवा. तसे झाले तर मांजराच्या गळ्यातही घंटा बांधली जाईल आणि देव-धर्माच्या नावाने डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजराला धडाही मिळेल. पण तसे होणार नाही, असे दिसते.
देवस्थानमधील विश्‍वस्त
शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्‍वस्त गावातीलच असावे अशी आता घटनेत तरतुद आहे. त्यामुळे राजकारण करणार्‍या पुढार्‍यांना गावातील समर्थकांमधूनच पदाधिकार्‍यांची निवड करावी लागते. गेल्या २०-३० वर्षांत देवस्थानचे विश्‍वस्त जरी गावातले असले तरी ते राजकारणी नेत्यांच्या संस्था, शाळा, कारखाने यात नोकरी करणारेच होते. त्यामुळे अप्रत्यक्ष नेत्यांच्या हातात सत्ता होती. आता उदाहरण म्हणून पाहायचे असेल तर कार्यकारी अधिकारी हे पद पाहू. या पदावर ११ वी झालेली व्यक्ती असून त्याचे वेतन आहे दरमहा ७० हजार रुपये आहे. ही व्यक्ती एका नेत्याच्या संस्थेच सचिव म्हणूनही नोकरी करते.

शनिशिंगणापूर ः विविध आंदोलने

शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यास महिलांना बंदी आहे. या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्व. नरेंद्र दाभोलकर यांनी आंदोलन केले होते. त्याला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, अनिल राठोड, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी विरोध केला होता. स्व. दाभोलकर यांनी शनिशिंगणापूरच्या संदर्भात ‘चला चोरी करायला शिंगणापूरला असेही आंदोलन केले होते.

शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचा हक्क मिळावा म्हणू येत्या २६ जानेवारीला चारशे महिलांना घेवून आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडने दिला आहे. दुसरीकडे या आंदोलनाला विरोधासाठी हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत. भूमाता ब्रिगेडला विरोध करणार असल्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे. यासाठी संपूर्ण राज्यात येत्या ९ जानेवारीपासून हिंदू जनजागृती समिती हिंदू परंपरा रक्षण मोहीम राबवणार आहे.

No comments:

Post a Comment